#@😈😈😈😈😈😈😈😈#@
*नवा गडी, नवा राज, भाग ०३*
*डॅा अनिल पावशेकर*
—————————————————
ताश्कंदला पहिले तीन दिवस आमचा मुक्काम होता हॅाटेल उझ्बेकिस्तान इथे. हा संपुर्ण देश भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९६६ ला ताश्कंदला विनाशकारी भुकंपाने बेचिराख केले होते परंतु बलदंड सोवीयत संघाने आपले बाहुबल दाखवत अवघ्या आठ वर्षात ताश्कंदचा कायापालट करून दाखवला. यांत हॅाटेल उझ्बेकिस्तानचा समावेश होतो. १९७४ ला निर्मीत, १६ मजल्यांचे आणि तब्बल २२३ खोल्यांचे हे हॅाटेल ताश्कंदचे सर्वात मोठे आणि उंच हॅाटेल मानले जाते. या हॅाटेलच्या उभारणीत संपुर्ण सोवीयत संघाच्या मजुरांनी हातभार लावला होता. तसेही सोवीयत संघाच्या प्रत्येक सदस्य राज्यात (देशात) त्या त्या देशाच्या नावावर सर्वात मोठे हॅाटेल्स बांधले गेले आहेत. मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर सध्या ह्या हॅाटेलची रया गेलेली आहे. समोरून भव्य दिव्य दिसणार्या, भासणार्या ह्या हॅाटेलला आता उतरती कळा लागलेली आहे. कोणत्याही द्रुष्टीकोनातून हे हॅाटेल फोर स्टार हॅाटेल वाटत नाही.
वारंवार आपण एखाद्या जुन्या महालात वावरत असल्याचा भास होतो. २०१० ला या हॅाटेलचे रिनोवेशन केले होते पण त्यालाही आता जवळपास १४ वर्षे झाली. इथली कुलींग व्यवस्था दम तोडत आहे. इंटेरीअर साधारण आहे तर रूम सर्व्हिस फारशी समाधान कारक नाही. पर्यटकांच्या द्रुष्टीने जीव की प्राण असलेली वायफाय सुविधा हाय काय नाय काय सारखी आहे. त्यातही मोबाईल चार्जिंगसाठी राऊंड सॅाकेट असल्याने तुम्हाला वेगळे अॅडॅप्टर विकत घ्यावे लागते. थोडफार समाधानाची बाब म्हणजे हे हॅाटेल शहराच्या मध्यभागी आहे आणि जवळच अमीर तिमूर चौक, मेट्रो, ब्रॅाडवे स्ट्रिट आहे. तसेच इथला ब्रेकफास्ट भरगच्च, विविधांगी असतो. व्हेज, नॅानव्हेजची व्हेरायटी भरपूर असल्याने चांगल्या पोटपूजेची हमी असते.
हॅाटेलच्या हाकेच्या अंतरावर ब्रॅाडवे स्ट्रिट आहे. याचे पूर्वीचे नांव सेलगॅाख स्ट्रिट आणि अमीर तिमूर चौक ते इंडीपेंडेंट चौका दरम्यान याची व्याप्ती. दोन्ही बाजूंनी दाट, गर्द हिरवीगार झाडी, कडेला फुलझाडांच्या रांगा. इथेही प्रेम युगलांचा राबता पण कोणतेही जोडपे अश्लिल चाळे करणे, चिमटे काढणे, गुदगुल्या करणे, लिचोडे घेणे, अंगाला अंग घासणे इत्यादी वाह्यात प्रकार करतांना दिसले नाहीत. तर जागोजागी खंडीभर फुलंच फुले असतांना, फुले तोडू नये, तोडल्यास प्रेयसीला द्यावी अशा खोचक सुचना सुद्धा लिहिलेल्या आढळत नाही. थोडक्यात काय तर पार्क असुनही एकदम सात्विक, सोज्वळ, शुद्ध शाकाहारी वातावरण!
ब्रॅाडवे स्ट्रिट ला खरेतर एक प्रकारची मिनी जत्रा म्हणायला हवे, कारण आबालव्रुद्धांपर्यंत सर्वांच्याच करमणूकीची सोय इथे आहे. खाद्यपदार्थांची दुकाने, चहा कॅाफी स्टॅाल, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, आईसक्रीम पार्लर, नाइन डायमेंशनल थ्रिलर गेम झोन तर युवा वर्गासाठी सॅाकर, बॅाक्सिंग, आर्चरी, शुटिंग, टेबल टेनिस ची सोय आहे. सोबतच आर्ट,पेंटिंग गॅलरी दर्दींना आक्रुष्ट करते. ब्रॅाडवे लगतच दोन थिएटर पण आहेत. रशिएन अकॅडेमीक ड्रामा थिएटर आणि अलिशेव नोरी ओपेरा, बॅले थिअटर. भटकंती करणार्यांसाठी सायकल आणि स्कुटर भाडेतत्वावर मिळतात. तर ज्वेलरी आणि सोविनीर शॅाप्समधून तुमचा खिसा हलका करायची संधी मिळते.
हॅाटेल उज्बेकिस्तीन आणि ब्रॅाडवे स्ट्रिटच्या मधोमध अमीर तिमूर चौक आहे आणि चौकाच्या मध्यभागी तैमूरचा अश्वारूढ पुतळा आहे. आपल्या द्रुष्टीने तैमूर एक क्रुर आक्रमक आणि विध्वंसक एवढीच त्याची ओळख. मात्र उझबेकांचा तो राष्ट्रनायक आहे. उझ्बेकिस्तानच्या जवळपास सर्वच शहरात त्याच्या नावाचे चौक आणि त्याचा पुतळा आहे. तिमूर चौकाची कहानी रंजक आहे, नवा गडी नवा राज ची त्यात झळक आहे. वास्तविकतः १८८२ ला हा चौक रशियन तुर्कस्थानच्या पहिल्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत बांधला गेला. १९१७ ला या चौकाचे नामकरण रिव्हाल्युशन चौक असे झाले आणि १९४० च्या दरम्यान इथे जोसेफ स्टॅलीनचा पुतळा उभारला गेला. मात्र १९६१ ला हा पुतळा हटवल्या गेला आणि तब्बल सात वर्षानंतर १९६८ ला तिथे कार्ल मार्क्सचा पुतळा उभारला गेला. ही कहानी इथेच नाही संपत तर १९९१ ला उझ्बेकिस्तान सोवीयत संघातून बाहेर पडून स्वतंत्र झाल्यावर उझ्बेकचे पहिले अध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांनी १९९४ ला तिथे कार्ल मार्क्सचा पुतळा काढून तैमूरला स्थापन केले.
या भटकंतीत रात्र झाली होती आणि आता वेळ होती पोटपूजेची. कारण असे म्हटल्या जाते की ‘वॅार इज वॅार बट लंच इज अॅान ए शेड्युल’. ताश्कंदला इंडीयन रेस्टॅारेंट फारतर तीनचार, त्यात मुंबई रेस्टॅारेंट उत्तम, जणुकाही आपल्या शहराताच जेवन करत असल्याची फिलिंग. जेवन करण्याबाबत माझे काही नियम, घरी जेवायचे असले तर जगण्यासाठी खाणे. बाहेर असेल तर खाण्यासाठी जगणे! यातला गंमतीचा भाग सोडला तरी तिथचे अन्नपदार्थ पाहून काय खावे आणि काय नाही हे सुचत नव्हते. दोन मोठ्या प्लेटमध्ये हिरवेकंच सलाद, पीली दाल (तुरीच्या दाळीचे वरण), राजमा, जिरा राईस, चपाती, गाजराचा शिरा! तरीपण पोटात कावळे ओरडत असूनही मी खूप संयम राखला कारण माझी फेवरेट चिकन बिर्यानी सर्वात शेवटी येणार होती आणि एकदाची ती आल्यावर मी त्यावर तुटून पडलो.
क्रमशः,,,,,
दिनांक २० मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————
No comments:
Post a Comment