Wednesday, May 22, 2024

पर्बतोंसे आज मै टकरा गया, भाग ०४

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

*पर्बतोंसे आज मै टकरा गया, भाग ४*

            *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

उझ्बेक प्रवासाच्या दुसर्या दिवसाचे स्थान होते चिमगम माऊंटेन आणि चार्वाक लेक. ताश्कंद पासून १०० किमी अंतरावरील ग्रेटर चिमगम माऊंटेन हे चटकाल पर्वत श्रुंखलेतील सर्वात उंच शिखर असून याची उंची जवळपास ३३०९ मिटर इतकी आहे. तर छोटे शिखर २१०० मिटर उंचीचे आहे. ताश्कंद पासून इथे यायला अंदाजे दिडदोन तास लागतात परंतु मार्गातील निसर्गरम्य द्रुष्ये, उंच पहाड, घनदाट हिरवीगार व्रुक्षराजी प्रवास सुकर करते. त्यातही हळूहळू तापमान कमी होत गेल्याने प्रवासाचा आनंद द्विगुणीत होतो. चिमगम माऊंटेनला उझ्बेकचे स्वित्झरलॅंड म्हणतात. कारण ही पर्वत श्रुंखला कुठे शुभ्र बर्फाने, कुठे हिरव्याकंच फर व्रुक्षांनी तर कुठे पांढर्याशुभ्र खळखळत्या जलधारांनी अलंक्रुत असते. चिमगम चा अर्थ ग्रीन ग्रास अथवा ग्रीन व्हॅली असा होतो.


इथे खरी मजा येते चेअर लिफ्ट ने शिखरावर जाण्यात! एकतर इथे कडाक्याची थंडी, जवळपास सहा डिग्री सेल्सिअस, त्यातही ओपन चेअर, सुरक्षेच्या नावाखाली चेअरला आडवी एक छोटी लोखंडी सळी! खरोखरच ही राईड म्हणजे डर के आगे, बहोत जादा डर है या प्रकारातली. मुख्य म्हणजे बेस कॅम्प ला ट्विन चेअर येताच तुम्हाला खो दिल्यासारखे अक्षरशः चेअरमध्ये ढकलून दिले जाते. अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हणत आणि देवाचा धावा करण्यावाचून तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. जसजसे आपण वर ओढल्या जातो तसतसे पोटातले गोळे वाढत जातात. चुकूनही खाली लक्ष गेले तर पोटात फुलपाखरू उडायला लागते. प्रारंभी हवीहवीशी आणि गुलाबी वाटणारी थंडी हळूहळू शरीराची कुल्फी करू लागते.


भिती, रोमांच, धाकधूक या संमिश्र भावनेतून दहा मिनिटात शिखरावर आपण पोहोचतो परंतु तोपर्यंत आपली अवस्था दहा गेले आणि पाचच राहिले अशी होते. त्यातही खाली उतरायला पुन्हा एकदा त्याच अग्निदिव्यातून जावे लागेल या नुसत्या कल्पनेने अंगावर काटा उभा राहतो. पण आपला नाईलाज असतो. यावेळी एक शेर नक्की आठवतो, तो म्हणजे, ‘खुद ही को कर बुलंद इतना के आसमां पर पहुंचे और खुदा तुझसे पुछे, ऐ बंदे तू अब निचे उतरेगा कैसे!’ चेअर लिफ्ट मधून उतरतांना सुद्धा पुन्हा एकदा उडी मारतच उतरावे लागते कारण चेअर लिफ्ट सतत फिरत असते. मात्र एकदाचे खाली उतरले की ह्रदयाची धडधड कमी होते आणि सभोवतालचा नयनरम्य परिसर मन मोहून घेतो. आभाळाला हात टेकवणारी पर्वतशिखरे, भुरभूर वाहणारा गार वारा, काळजाचा थरकाप उडवणार्या खोल दर्याखोर्या मस्त मौसम तयार करतात.


पंधरा विस मिनिटे इथे रमल्यावर खाली उतरतांना पुन्हा तोच अनुभव, मनावर तेच दडपण, तिच भिती. मात्र यातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसर्या बाजुने वर येणार्या पर्यटकांशी संवाद साधणे. हाय, हॅलो, गुड मॅार्निंग करत आपली भिती दाबून इतरांच्या भितीची मजा घेणे. परदुःख शितलः असे म्हणतात ते याचसाठी. खाली उतरल्यावर सर्वात पहिले कोणते काम केले असेल तर ते कॅाफी पिणे. यानंतरचा पाडाव होता चार्वाक लेक. चार्वाक चा अर्थ चार बाग, चार गार्डन. हे जलाशय चिर्चीक, स्केम, कोसू आणि चटकाल या चार नद्यांद्वारे निर्मित केले गेले आहे. चिर्चिक या मुख्य नदीवर १६८ मिटर उंचीचे दगडी धरण बांधून हा प्रकल्प १९६४ ते १९७० दरम्यान पूर्णत्वास आला. मात्र हे धरण बांधतांना जवळपास १५० पुरातत्व वास्तु, स्थळे पाण्याखाली गेली.


१९६६ ला ताश्कंदला विनाशकारी भुकंपाने ग्रासले होते. त्यावेळी शहराच्या पुनर्निर्मितीसाठी वीजचे उत्पादन करण्याकरिता चार्वाक हायड्रो पॅावर स्टेशन उपयोगी पडले. या जलाशयाची नैसर्गिक रचना इतकी सुंदर आहे की जणुकाही निष्णात कलाकाराने एखादे रेखाचित्र रेखाटले असावे. खरेतर हे जलाशय मुख्य मार्गापासून आंत आणि बरेच खाली आहे. जलाशयाजवळ जाण्यासाठी स्पोर्ट्स मोटरबाईक (फोर व्हिल ड्राइव्ह) उपलब्ध असतात. हा एक वेगळाच थ्रिल आहे. कच्च्या रस्त्यावरून नागमोडी वळणांसह खाली उतरणे, वर चढणे जीवाचा थरकाप उडवून जातो. टू सिटर या बाईकवर प्रोफेशनल ड्रायव्हर बाजूला लटकून स्टिअरिंग सांभाळत असतो. अगदी आपल्याकडे अॅाटोरिक्षा चालवतात तसे.


ही राईड आटोपताच आम्ही दुपारच्या जेवनासाठी फैज उझ्बेक रेस्टॅारंटला गेलो. खरेतर उझ्बेक आहार हा मुख्यतः मांसाहारी असतो. अंडी, चिकन, लॅम्ब (मेंढी), मासे आणि काही ठिकाणी चक्क घोड्याचे मांससुद्धा त्यांच्या नियमीत आहाराचा भाग असतो. खाण्यात मोठ्या प्लेट एवढा गोलाकार अंतर्वक्र पाव, ज्याला ते नान म्हणतात असतो, सोबत योगर्ट (दही) आणि दोन प्लेट तुडुंब भरलेला सलाद. भाजी हा प्रकार उझ्बेक आहारात जवळपास नसतोच. तर्री, रस्सा कशाला म्हणतात हे त्यांच्या गावीही नसते. बरं नॅानव्हेज तरी कसं देतात तर कबाब करून. लोखंडी सळीत पिसेस लटकवून तर व्हेज सेक कबाब म्हणजे वांगे, आलू, टोमॅटो, सिमला मिरची भाजून परतवून. भात खरेतर अगदी प्रसादा सारखा दिला  जातो. पेय पदार्थात पाण्याचा वापर फारच कमी, त्याऐवजी आंब्याच्या पन्ह्याच्या चवीचा आंबटगोड हम्बोट चेरी ज्युस देतात.

क्रमशः,,,,

————————————————

दि. २१/०५/२०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...