Monday, February 24, 2025

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

  “सुपर संडे ला पाक चा सुपडा साफ”

               ‘डॅा अनिल पावशेकर’

++++++++++++++++++++++++

चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने परंपरागत वैरी पाक चा सुपडा साफ केला असून उपांत्य फेरीचे बर्थ कन्फर्म केले आहे. तर सतत दुसऱ्या पराभवाने पाकचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील सामन्यातील चुकांपासून बोध न घेत रिझवान ॲंड कंपनीने पुन्हा एकदा गोगलगाय छाप फलंदाजीने आत्मघात करून घेतला. त्यांचे प्रमुख फलंदाज बाबर आझम, मो. रिझवान असो की सौद शकील यांनी थोडीफार फलंदाजी केली परंतु ना त्यात पुरेसा वेग होता ना त्याने त्यांच्या डावाला आकार आला.


खरेतर फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो, त्याचप्रमाणे २४१ सारख्या तोकड्या टारगेटला धारदार गोलंदाजी आणि पोलादी क्षेत्ररक्षणाने वाचवायचे असते. जी कहाणी पाक फलंदाजीची, तिच त्यांच्या गोलंदाजीची. शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ आणि नसीम शहा म्हणजे जणुकाही नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाडा. इतर गोलंदाज म्हणजे आनंदी आनंद. त्यातही पाक संघात इतके नवनवीन खेळाडू आहेत की कोणी एका दमात जर संघात खेळणार्या अकरा जणांची नावे तोंडपाठ सांगितली तर आयसीसी एका लाखाचे बक्षीस जाहीर करू शकते.


वास्तविकत: दुबईच्या मैदानावर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचे जिंकण्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही पाक ने प्रथम फलंदाजी पत्करली. पण बाबर आझम आणि इमाम उल हक ला चांगली वेगवान सुरुवात करता आली नाही. मुख्य म्हणजे मो. शमी दुखापतीने बाहेर पडल्याने भारतीय गोलंदाजी संकटात होती. पाक सलामीवीरांना प्रतिहल्ला करण्याची नामी संधी होती. पण ते चुकले. याउलट आपल्या संघाने संकटात संधी शोधत दोन्ही सलामीवीरांना सेंड ॲाफ दिला. पांड्याने बाबर आझमला चकवले तर अक्षर पटेलने इमाम उल हक ला डायरेक्ट थ्रो वर धावबाद केले.


पहिल्या पॅावर प्ले चा कचरा झाल्याने मो. रिझवान आणि सौद शकील दबावात आले. दोघेही खेळपट्टीवर दळण दळत बसले. पहिल्या चारही फलंदाजांनी इतके चेंडू निरंक (डॅाट बॅाल) खेळले की आपण एखादा कसोटी सामना तर बघत नाही ना असा भास होत होता. भरीस भर म्हणजे पहिल्या सामन्या प्रमाणे या सामन्यात सुद्धा आपण शेजारधर्म निभावला. पहिले रिझवानला तर नंतर सौद शकीलला जीवदान देण्यात आले परंतु हे दोघेही त्याला कॅश करू शकले नाहीत. आपल्या संघाने लागोपाठ दोन सामन्यात स्थिरावलेल्या दोन फलंदाजांना जीवदान दिले, सुदैवाने ह्या चूका दोन्ही सामन्यात भारी पडल्या नाहीत.


राहिली बाब प्रत्युत्तराची तर रोहित ॲंड कंपनीचा पाक ला सरळ इशारा होता, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे. त्यातही पाकचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर आपल्या सलामीवीरांनी हल्लाबोल करत आपले इरादे स्पष्ट केले. भलेही रोहीत लवकर बाद झाला परंतु तो विजयाचा रोडमॅप दाखवून गेला. भारतीय संघाचा छावा शुभमन गिलने रिझवान सेनेवर प्रतिहल्ला करत पाक गोलंदाजांना बॅकफुटवर आणले. त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, शॅार्ट आर्म पुल पाहणे सुखावह होते. दिमतीला विराट असल्याने त्याचा खेळ आणखी बहरला. शुभमनला बाद करण्याची एक संधी पाक ने दवडली आणि तिथून टीम इंडियाची गाडी सुसाट निघाली.


संघाचे शतक होताच शुभमन परतला पण पाकचे हाल काही कमी झाले नाही. श्रेयस अय्यर सध्या डिमॅालीशन मुड मध्ये खेळत असून त्याने या सामन्यातही आपली बॅट परजली. त्यालाही जीवदान देत पाकने सामन्यात परण्याची संधी दवडली. त्याने विराट सोबत वेगवान शतकी भागीदारी करत आपल्या विजयाचे तोरण बांधले. या सर्व घडामोडींचा सुत्रधार होता किंग कोहली. ज्याप्रकारे ट्रॅव्हीस हेड भारताला छळतो अगदी तिच कहानी विराटची पाक सोबत आहे. पाक गोलंदाज दिसतात विराटचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्याला फलंदाजीत अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे असे वाटते.


एकदिवसीय सामन्यात पाठलाग कसा करायचा, दडपण न घेता धावफलक कसा हलवायचा, क्षेत्ररक्षणातील मोकळ्या जागा हेरून एकेरी दुहेरी धावा कशा करायच्या याचे त्याने या सामन्यात सुरेख प्रदर्शन केले. मुख्य म्हणजे या वयातही ज्या चपळतेने तो धावतो ते पाहता तो मागच्या जन्मी नक्कीच चित्ता असेल असे वाटते. विराटचा क्लास, त्याचा फिटनेस, त्याची एकाग्रता, सामना जिंकण्याचा द्रुढनिश्चय त्याला किंग कोहली का म्हणतात हे दाखवून देते. पाक कडे विराटचा तोड नव्हता, ना त्यांची गोलंदाजी तितकी परिणामकारक होती. त्यातच मोक्याच्या क्षणी महत्वाचे झेल सोडल्याने पाकला सामन्यात कमबॅक करता आले नाही. थोडक्यात काय तर पाक संघाची अवस्था सध्या डाळ शिजत नाही, वरण उकळत नाही अशी झाली आहे. 


प्रदीर्घ काळानंतर त्यांना आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली परंतु ना त्यांची फलंदाजी बहरली ना गोलंदाजी. ना वरिष्ठ खेळाडू कसोटीवर उतरले ना ज्युनियर खेळाडू. एकंदरीत काय तर सगळंच मुसळ केरात! याउलट भारतीय गोलंदाज विशेषतः हार्दिक पांड्याने बाबर आणि सौद शकीलला बाद करत मोठी कामगिरी बजावली.  तर कुलदिपच्या फिरकीपुढे इतर फलंदाज हतप्रभ दिसले. आपल्या संघांने दोन झेल जरूर सोडले परंतु दोन फलंदाजांना धावबाद करत बॅकलॅाग भरून काढला. भारतीय फलंदाजीचा सध्या वसंत ऋतू सुरू असून रोहीत, शुभमन, विराट, अय्यर फलंदाजीत बहरत आहे. फक्त मो. शमीचा फिटनेस चिंतेची बाब दिसून येते. लागोपाठ दोन सामने जिंकून टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचली आहे. पाकची कूर्मगती फलंदाजी, पांड्या कुलदीपची प्रभावी गोलंदाजी, शुभमन अय्यर आणि कोहली ची विराट फलंदाजी ह्या सामन्याच्या मुख्य बाबी ठरल्या. 

++++++++++++++++++++++++

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...