#@😈😈😈😈😈😈😈😈#@
“बांग्ला टायगर्सने झुंजवले”
‘डॅा अनिल पावशेकर’
++++++++++++++++++++++++
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शेजारी बांग्ला टायगर्सनी टीम इंडियाला चांगलेच झुंजवले आहे. प्रारंभी निरस वाटणाऱ्या लढतीत बांगलादेशने चिवट फलंदाजी करत रंगत भरली आणि उत्तरार्धात त्यांच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत टीम इंडियाला घाम गाळायला लावला. बांगलादेशी संघ नेहमीच आपल्या संघासाठी एक लिटमस टेस्ट असते आणि याचाच प्रत्यय या सामन्यातही पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे त्यांनी रोहीत, विराटचा चांगला होमवर्क केला परंतु शुभमन गिल आणि के एल राहुलने त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. दोन्ही संघांनी ऐन मोक्याच्या वेळी गचाळ क्षेत्ररक्षण करत याबाबतीत दोघांचाही डीएनए एकच आहे हे दाखवून दिले.
झाले काय तर आयसीसी ओडीआय रॅंकिंग मध्ये अव्वल असलेल्या भारतीय संघाची गाठ नवव्या स्थानी असलेल्या बांगलादेशशी होती. मात्र बरेचदा आपला संघ थोराशी थोर आणि लहानाशी लहान याप्रकारे खेळतो. कारण ज्याप्रकारे मो.शमी, हर्षित राणा आणि अक्षर पटेलने बांग्ला संघाची ५ बाद ३५ अशी धुळधाण केली ते पाहता हा संघ शंभरीत निपटेल असे वाटले होते. पण क्रिकेट एवढे सहजसोपे नसते. अक्षरच्या हॅटट्रीकची संधी आणि बांगला संघाची मान मुरगळायची नामी संधी रोहीतने गमावली आणि तो क्षण बांगलादेश साठी पुनर्जन्म ठरला. लगेचच पांड्याने तौहीद ह्रदयला जीवदान देत बांग्ला संघाचे ह्रदय धडधडत राहील याची काळजी घेतली. अर्थातच आपला संघ इतका परोपकारी होत असतांना राहुल तरी कसा मागे राहील, त्यानेही यष्टीचित करण्याची सोपी संधी गमावून प्रतिस्पर्धी संघाला आयसीसीतून चक्क जनरल वार्डात आणले. गलितगात्र झालेल्या संघाला तीन बुस्टर डोज देऊन सुद्रुढ केल्याबद्दल आपल्या संघाला यावर्षीच्या नोबेलसाठी आपली दावेदारी नक्कीच मजबूत करता येईल.
लाईफ आफ्टर डेथ हे काय असते हे जीवदान मिळालेल्या जाकर अली आणि तौहीद ह्रदय यांनी दाखवून दिले. तोपर्यंत खेळपट्टी फलंदाजीला साजेशी झाली आणि या दोघांनीही त्यावर १५४ धावांचे महाकाव्य लिहिले. एकेरी दुहेरी धावा आणि संधी मिळताच चेंडू सीमारेषेपार करतया दुक्कलीने आपली गोलंदाजी बेरंग करून टाकली. वास्तविकत: ५ बाद ३५ असतांना तिथे प्रतिस्पर्ध्याला चिरडायला बुमराह नावाचा बुलडोझर हवा होता परंतु तो जायबंदी असल्याने निवडीस मुकला होता. तर शमीने भलेही पुनरागमन झकास केले पण तो या सामन्यात टेरर वाटला नाही. शिवाय त्याचे वय, फिटनेस पाहता रोहीतने त्याला काळजीपूर्वक जपले. याचाच फायदा बांगलादेशी फलंदाजांनी घेतला आणि त्यांनी धावसंख्या फुगवली.
सुरुवातीला झालेल्या पडझडी नंतर सर्वबाद २२८ ही धावसंख्या निश्चितच कौतुकास्पद होती. सोबतच या धावपट्टीवर कसा खेळायचे याचा परिपाठ त्यांनी दाखवला होता. मात्र नवीन चेंडू आणि रोहीतच्या बादशाही फलंदाजीची जुगलबंदी आपल्या डावाच्या प्रारंभी दिसली. रोहीत पुढे बांग्ला गोलंदाज खुजे वाटत होते परंतु अती आक्रमणाच्या नादात रोहीत फसला. २०२३ विश्वचषकात अंतिम सामन्यात ज्याप्रकारे बाद झाला होता, अगदी तसेच या सामन्यातही तो बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर विराटने धुरा सांभाळली पण तो लयीत दिसला नाही. तसेही विराटसाठी ॲाफ च्या बाहेर चेंडू आणि लेग स्पिनर हे सरकारमान्य सापळे आहेत आणि विराट त्यात अलगद अडकतो. मग तो आदील रशिद असो की रिशद होसेन असो. पाठोपाठ श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने मोठ्या फटाक्यांच्या नादात आपली विकेट फेकली. खेळपट्टी संथ, त्यातच ती फिरकीला साथ देऊ लागल्याने फलंदाजी सोपी नव्हती. विशेषत: नवीन फलंदाजांनी शुभमनचा कित्ता गिरवायला हवा होता. अचानक तीस धावांत तीन बळी गेल्याने आपल्या क्रिकेट प्रेमींची धाकधूक वाढली होती. जिंकायला अवघ्या ८५ धावा हव्या होत्या आणि सहा फलंदाज बाकी असूनही मैदानात आपली स्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली होती.
राहुलने शुभमनच्या साथीने मोर्चा जरूर सांभाळला परंतु तो सामन्याच्या दबावात दिसत होता. खरेतर यावेळी बांगलादेशचा अप्पर हॅंड होता परंतू त्यांचा क्षेत्ररक्षक जाकर अली अत्यंत स्वाभिमानी खेळाडू निघाला. त्याने रोहीतने दिलेल्या जीवदानाची परतफेड याच सामन्यात राहुलला जीवदान देऊन केली. कर्माच्या द्रुष्टीने हे योग्य होते परंतु यामुळे बांगलादेशचा संघ बॅकफुटवर आला. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. इथून मग शुभमनने दमदार शतक झळकावले तर राहुलने त्याचा क्लास दाखवला. सामना अटीतटीचा होत असतानाच गचाळ क्षेत्ररक्षणाने बाजी पलटली.
सामना भलेही आपण जिंकला पण जाकर अली आणि तौहीद ह्रदयच्या संयमी फलंदाजीने सर्वांचे ह्रदय जिंकले. अर्धा संघ तंबूत परतूनही या दोघांनीही दाखवलेली जिद्द, समयसूचकता, क्रिकेट सेन्स वाखाणण्याजोगे आहे. गोलंदाज भरात असताना त्यांनी ठंडा करके खाओ पॅालीसी वापरली. प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाज म्हणून त्यांना खेळतांना आपल्याला थोड्या वेदना जरूर होत होत्या परंतु त्या प्यार का दर्द है, मिठा मिठा प्यारा प्यारा या प्रकारच्या होत्या. कर्जबाजारी झालेल्या बांगलादेशी संघाचे त्यांनी चक्क आमार बांगला सोनार बांगला केले. या दोघांनीही आपल्या फलंदाजीने संघाच्या फाटल्या गोधडीला ढाके की मलमल सारखे सुंदर रूप दिले.
भारतीय गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर मो.शमीचे नक्कीच कौतुक करावे लागेल. ३४ वर्षीय शमीने शारिरिक मानसिक आघात सहन करत आपले प्रदर्शन उंचावले. वास्तविकत: खेळपट्टी राज कपूरच्या मंद मंद, संथ संथ मंदाकिनी सारखी परंतु मो. शमीने आपल्या लाईन, लेंथ आणि सिम गोलंदाजीने तिची सौंदर्यस्थळे दाखवली. त्यात तब्बल पाच बांगलादेशी फलंदाज घायाळ झाले. हर्षित राणा तर सरप्राईज पॅकेज वाटतो. तो केव्हा येतो, केव्हा बळी घेतो समजतच नाही. तर संघांतील अक्षर, जडेजा आणि कुलदीप या फिरकीपटुंची भाउगर्दी पचायला जड जाते.
थोडक्यात काय तर बांगलादेशला छोटा बच्चा समजणे कोणत्याही संघाला भारी पडू शकते. जाकर अली आणि तौहीद ह्रदय ज्याप्रकारे कानामागून आले आणि तिखट झाले ते पाहता बांगलादेशी फलंदाज मोठा स्कोअर जरी नाही उभारू शकले तरी ते आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारू शकतात. त्यातच त्यांचे फिरकीपटू पाक, दुबई खेळपट्टीवर इको फ्रेंडली आहेत. आपल्या कडे एखादा आणखी वेगवान गोलंदाज हवा होता असे राहून राहून वाटते. अर्शदीपची टी ट्वेंटीतली क्षमता वादातीत आहे. पण या स्पर्धेत रोहीत त्याचा कसा वापर करतो हे येणाऱ्या सामन्यात पाहायला मिळेल. राहुलने फलंदाजीत पासिंग मार्क जरी मिळवले असले तरीही तो यष्टीरक्षणात काठांवर पास आहे. टीम इंडिया हा सामना जरी जिंकला असला तरीही पाक आणि किवी संघासमोर आपल्या गोलंदाजांची परिक्षा घेतली जाईल. फलंदाजीत रोहीतच्या झंझावाताला शुभमन ॲंड कंपनीचे कोंदण लाभले तर टीम इंडिया कोणत्याही गोलंदाजी आक्रमणावर प्रभुत्व गाजवू शकते. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या पहिल्यावहिल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
++++++++++++++++++++++++
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++

No comments:
Post a Comment