@#😈😈😈😈😈😈😈😈#@
“पहिल्या कसोटीत इंग्लंडची सरशी”
✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️
—————————————————
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडची सरशी झाली असून भारताचा धक्कादायक पराभव झाला आहे. दोन्ही डावात भारतीय संघाचा वरचष्मा राहिला होता परंतु ऐनवेळी तळाचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी सुमार कामगिरी केल्याने भारताच्या हातून सामना निसटला आणि इंग्लंडचा संघ विजयी झाला आहे. खरेतर कसोटीत प्रत्येक दिवशी प्रत्येक सत्रात कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असते आणि इथेच आपला संघ इंग्लंडवर लगाम घालू शकला नाही. त्यातही दोन्ही डावात मान्सून सेल लागल्याप्रमाने भारतीय क्षेत्ररक्षकांनी जवळपास अर्धा डझन झेल सोडले आणि स्वहस्ते सामना इंग्लंडला बहाल केला.
झाले काय तर गेल्या ९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाची कामगिरी ७ पराभव, एक ड्रॅा आणि एक विजय अशी दारिद्र्य रेषेखालची होती. त्यातही रोहित, विराट वानप्रस्थाश्रमाला लागल्याने “मेरे करन अर्जुन आएंगे, मॅच बचाएंगे” असे अजिबात नव्हते. त्यामुळे जे का रंजले गांजले आहेत ते संघात ठेवून भारतीय संघाची वाटचाल चालू झाली. केएल राहुल सोडला तर करुण नायर, जडेडा, शार्दूल ठाकूर हे भुले बिसरे गीत होते आणि त्यांची कामगिरीही यथातथाच राहिली. तर फलंदाजीत नवोदित साई सुदर्शन आणि गोलंदाजीत क्रिष्णा हे प्रसिद्ध होऊ शकले नाहीत.
वास्तविकत: पहिल्या डावात जैस्वाल, शुभमन गिल आणि पंतने शतकांची रास लावून भक्कम सुरुवात केली होती. परंतु ४ बाद ४३० ते सर्वबाद ४७१ अशी आपली घसरगुंडी झाली. ९/११ च्या हल्ल्यात न्युयॅार्कचे ट्विन टॉवर जेवढ्या वेगाने कोसळले त्यापेक्षाही जास्त वेगाने आपले तळाचे फलंदाज कोसळले. जणुकाही सर्वांच्या अंगात ग्लेन मॅक्सवेल घुसल्यासारखे ते त्वेषाने खेळले आणि स्वस्तात माघारी परतले. फलंदाजी म्हणजे निव्वळ चौकार आणि षटकार ठोकणे नव्हे तर भागीदारी करणे, खेळपट्टीवर तग धरून राहणे, विरोधी गोलंदाजांना थकवणे आणि शेपूट जास्तीत जास्त लांबवणे हे आपले फलंदाज विसरले. पहिल्या डावात कमीत कमी ५०० चा आकडा आपण नक्कीच गाठू शकलो असतो पण तसं झालं नाही.
फलंदाजांच्या मर्यादित कामगिरीला गोलंदाजांनी चांगली साथ दिली होती परंतु तिथे क्षेत्ररक्षण आडवे आले. इंग्लंडनेही काही झेल सोडले होते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी मनापासून त्यांना रिटर्न गिफ्ट दिले. सर्वात कहर म्हणजे जडेजा सारखा क्षेत्ररक्षक जेव्हा झेल सोडतो तेव्हा नक्की कोणाकडून चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा करावी हे कळत नाही. तरीही आपल्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४६५ वर थोपवून थोडीफार लाज राखली होती.
भारताचा दुसरा डाव जणुकाही पहिल्या डावाची कॅापी होती. यावेळी जैस्वाल, शुभमन ऐवजी केएल राहुल, पंतने शतके झळकावून संघाचा डोलारा सांभाळला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ४ बाद ३३४ ते सर्वबाद ३६४ असा गळपटला. दुसऱ्या डावात कमीत कमी १०० धावा कमी केल्याने इंग्लंडवर जो दबाव निर्माण व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. पुन्हा एकदा तळातील फलंदाजांनी तू चल मै आया केल्याने इंग्लिश संघाचा हुरूप वाढला. चौथ्या दिवशी दबावात येणाऱ्या इंग्लंड संघाला भारतीय संघाने संध्याकाळी तुलनेत कमी धावांचे टार्गेट आणि पुरेसा वेळ दिल्याने ते ड्राईव्हिंग सिटवर येऊन बसले.
पाचव्या आणि निर्णायक दिवशी इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना भीक घातली नाही. बुमराह ॲंड कंपनी चातकासारखी विकेटची वाट बघत होते पण डकेट, क्राऊलीने दमदार फलंदाजी करत सामना इंग्लंडकडे झुकवला. खेळपट्टी जरूर जीवंत होती पण बॅझबॅालपुढे आपले गोलंदाज हतबल झाले. त्यातही जैस्वालने डकेटला नव्वदीत जीवदान दिल्याने भारतीय गोलंदाजांचे उरलेसुरले अवसान गळून पडले. मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णाने जरूर लय पकडली होती मात्र तोपर्यंत “हुजूर आते आते बहोत देर कर दी” असे झाले होते.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रोहित, विराट संघात असताना आपल्या संघाची जी दादागिरी असायची, एक लय असायची, मैदानात जी एनर्जी दिसायची ती या सामन्यात दिसली नाही. कर्णधार म्हणून शुभमन नवखा असल्याने त्याला शिकायला वेळ द्यावा लागेल. तर गोलंदाजीत “एक अकेला बुमराह क्या करेगा” हा प्रश्न वारंवार पडतो. त्यातही बुमराहचे गोलंदाजीतील दुसऱ्या डावातील अपयश चिंतेची बाब आहे. जडेजा, शार्दूल ठाकूर हे दोघेही आपले अष्टपैलूत्व सिद्ध करू शकले नाहीत. तर नवोदित साई सुदर्शन आणि करून नायर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. सर्वात जास्त निराशा झाली ती आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण पाहून. संघाचे कोच असलेले श्रीयुत गौतम नक्कीच हा विषय गंभीरपणे घेऊन पुढे अशा चुका सुधारतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
थोडक्यात काय तर या कसोटीत फलंदाजांनी कमावले, क्षेत्ररक्षकांनी गमावले असे झाले आहे. गचाळ क्षेत्ररक्षण, लोअर ॲार्डरची अवसानघातकी खेळी, दुसऱ्या डावात निष्प्रभ गोलंदाजी हे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. समाधानाची बाब म्हणजे पंतने दोन्ही डावात धडाकेबाज खेळी करून डावाचा टेंपो राखला परंतु त्यानंतर इतर फलंदाजांनी डावाची माती केली. मालिकेत अजूनही ४ कसोटी सामने बाकी असल्याने भारतीय संघ मुसंडी नक्कीच मारू शकतो. मात्र त्याकरिता पहिल्या कसोटीत फारशी चमक न दाखवणार्यांना शाल श्रीफळ द्यावे लागेल. तसेच अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॅाशिंग्टन सुंदर, आकाशदीप, अर्शदीप, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांच्यातून योग्य निवड करावी लागेल.
—————————————————
दिनांक २५ जून २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————
No comments:
Post a Comment