Monday, July 7, 2025

दो पंछी दो तिनके, ले के चलें है कहां

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

“दो पंछी दो तिनकें,लेके चले है कहां”


       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो परंतु भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ०६ जुलै हा सर्वात मोठा दिवस मानायला हरकत नसावी. कारण कोणत्याही स्टार फलंदाज किंवा गोलंदाजां शिवाय टीम इंडियाने एजबस्टनला इंग्लंड संघाला तब्बल ५८ वर्षांनी मातीत लोळवण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. पतौडी, वाडेकर, वेंकटराघवन, कपिल देव, अझरुद्दीन, धोनी, कोहली आणि बुमराह या दिग्गज कर्णधारांना एजबस्टनचा गड सर करता आला नव्हता पण हे शिवधनुष्य शुभमनने पेलले आणि ही कसोटी दिल का नव्हे तर गील का मामला आहे हे सिद्ध केले.


झाले काय तर पहिल्या कसोटीत दुधाने पोळल्याने आपला संघ दुसऱ्या कसोटीत ताक फुंकून पिणार हे नक्की होते. सोबतच फलंदाजीत लोअर अॅार्डर असो की क्षेत्ररक्षण, दोन्ही जागी कायदे में रहोगे तो फायदेमे रहोगे हे जाणून होते. त्यासाठी संघबदल गरजेचा होता आणि तीन बदलांसह आपला संघ इंग्लंडशी दोन हात करायला सज्ज झाला होता. तरीही बुमराहची छत्रछाया नसल्याने भारतीय संघ पोरका झाला होता. भलेही आकाशदीपचा समावेश झाला तरीही प्रतिस्पर्ध्यांच्या २० विकेट काढण्यासाठी आकाश पाताळ एक करावे लागणार यात दुमत नव्हते.


त्यातही सपाट खेळपट्टी आणि बुमहाचा वरदहस्त नसल्याने भारतीय गोलंदाजी संघाची कमजोरी कडी वाटत होती. मात्र इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाटा पीचवर गील ला “कम अॅान किल मी” केले. अर्थातच या संधीचा पुरेपूर फायदा भारतीय संघाने घेतला. जैस्वाल, गील ने तडाखेबंद फलंदाजी करत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले. तर वाहत्या गंगेत जडेजा, वॅाशिंग्टन सुंदरने हात धुवून घेतले. मुख्य म्हणजे शभमनने दणकेबाज द्विशतकी खेळी करत मैफिल लुटली. तंत्र, ताकद, टायमिंग आणि तिक्ष्ण नजरेचा धनी असलेल्या शुभमनने इंग्लंडच्या भूमीवर प्रिन्स युगाचा प्रारंभ केला.


प्रिन्सच्या धडक बेधडक खेळीने गलितगात्र झालेल्या इंग्लंड संघाला सिराज आकाशदीप जोडीने जेरीस आणले. वास्तविकत: मो. सिराज ढोर मेहनत करणारा गोलंदाज मात्र त्याला हवे ते यश मिळत नव्हते. निर्मल बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याची विकेटची किरपा जणुकाही एजबस्टनसाठी थांबली होती. तर आकाशदीप इंग्लंड साठी डिफरंट फ्लेवर आणि सरप्राईज पॅकेज होतं. मात्र फळ्यावर जवळपास सहाशे धावा बघताच दोघांच्याही अंगी दहा हत्तींचे बळ आले होते. आकाशदीपने डकेट पोप ला लागोपाठ दोन चेंडूत माघारी धाडतात सिराजच्या उत्साहाला उधाण आले आणि त्याने इंग्लंड संघाचे शिरकाण केले. सिराजने आकाशदीपचा कित्ता गिरवत जो रूट, बेन स्टोक्सला लागोपाठ दोन चेंडूत तंबूत पाठवले.


भलेही हॅरी ब्रुक, स्मिथने मोठी शतके केली परंतु तरीही भारताला १८० धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात राहुल, गील, पंत आणि जडेजाने आश्वासक फलंदाजी करत इंग्लंडला सामन्यातून बेदखल केले. शुभमनने दुसऱ्या डावात दिडशतकी खेळी करत पुन्हा एकदा आपली दादागिरी दाखवली. खरेतर भारतीय संघ ५०० धावांच्या आघाडीवर आपला डाव घोषित करू शकला असता परंतु बॅझबॅालच्या विषाची परीक्षा घेणे योग्य नसते ठरले. त्यातही एक कसोटी गमावल्याने भारताला आणखी एक पराभव नको होता. तर सहाशेच्या वरचे आव्हान इंग्लंड साठी अशक्य कोटीतली बाब होती.


टीम इंडियाच नांव पैलतीरावर न्यायची जबाबदारी पुन्हा एकदा सिराज आकाशदीप जोडीवर होती. आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा खात्मा करायचा विडा उचलला तो आकाशदीपने. सपाट पीचवर लाईन आणि लेंथवर अचूक मारा करत त्याने इंग्लिश फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. कधी चेंडू आत तर कधी बाहेर काढले. आकाशदीपचे चेंडू धरले तर चावते सोडले तर पळते असे होते. त्याची गोलंदाजीतील अशी ही बनवाबनवी इंग्लिश फलंदाजांसाठी चमत्कारिक होती. जो रूट सारख्या दिग्गज खेळाडूला त्याने ज्याप्रकारे बोल्ड करून मामा बनवले ते पाहून तमाम भारतीय चाहते नक्कीच गदगद झाले असतील.


जो रूट हा इंग्लिश फलंदाजीचा कणा आहे मात्र दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी हा कणा मुळापासून उखडून टाकला. ज्याप्रकारे दोन्ही डावात आपली फलंदाजी शुभमन भोवती केंद्रित होती, तोच रोल जो रूटचा इंग्लंड साठी होता. दुसऱ्या डावात इंग्लंडकडे सामना अनिर्णित ठेवणे हा पर्याय उपलब्ध होता पण त्यांनी बॅझबॅाल एके बॅझबॅालचे पाढे म्हटले. प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही, कधी कधी लढत अनिर्णित राखणेही नैतिक विजय मानला जातो. मात्र इंग्लिश फलंदाजांना टॅाप गिअर शिवाय दुसरा गिअर माहिती नसावा. एजबस्टनचा अभेद्य गड शुभमन, सिराज, आकाशदीप या त्रिमुर्तींनी सर केला.


शुभमनच्या अद्वितीय कामगिरीचे जेवढे कौतुक करावे तितके ते कमी आहे. मात्र सिराज आकाशदीप द्वयीने सामन्यात रंगत आणली. दोघांनीही प्रत्येकी एका डावात ६/६ बळी टिपले. दोघांनीही फुल लेंथ, शॅार्ट ॲाफ गुड लेंथ, शॅार्ट लेंथवर प्रत्येकी १/१ बळी घेतले तर गुड लेंथवर प्रत्येकी २/२ बळी मिळवले. पहिल्या डावात सिराजने सहा इंग्लिश फलंदाजांना सुपुर्दे खाक केले तर दुसऱ्या डावात आकाशदीप ने सहा इंग्लिश फलंदाजांना ढगात पाठवले. मुख्य म्हणजे या दोघांनाही क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ देत मागील सामन्यातले प्रायश्चित्त घेतले. या दोन्ही लो प्रोफाइल गोलंदाजांनी आपल्या मनगटाच्या बळावर प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे हे दाखवून दिले. या दोघांच्या कामगिरीवर अवघे क्रिकेट चाहते फिदा असून भविष्यातही ते आपल्या कामगिरीत सातत्य राखतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


भारतीय कसोटी संघाच्या कक्षा रूंदाणारा हा विजय आहे. सेना देशांमध्ये (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ॲास्ट्रेलिया) मालिका बरोबरीत आणणारा हा विजय आहे. शुभमनचा कर्णधार पदावरील पहिलाच विजय आहे. तर किंग कोहलीच्या राजेशाही नंतर प्रिन्स युगाच्या नांदीचा हा विजय आहे. १९७१ चा वाडेकरांच्या नेतृत्वाखालील विजय, २००१ साली ॲासी विरुद्ध कोलकात्याचा विजय आणि गॅबावर पुन्हा एकदा ॲासी वरील कसोटी विजय जेवढा मोठा, तेवढाच किंवा त्यापेक्षा काकणभर सरस हा विजय म्हणता येईल. “टूटा है गाबा का घमण्ड” नंतर “चकणाचूर हुआ एजबस्टन का गुरूर” असे नक्कीच म्हणता येईल. थोडक्यात काय तर गील च्या शुभ नेत्रुत्वात सिराज आकाशदीप हे दोन गोलंदाज म्हणजे “दो पंछी दो तिनके देखो ले के चले है कहां, ये बनाएंगे इक आशियां” असे म्हणावेसे वाटते.

—————————————————

दिनांक ०७ जुलै २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...