Sunday, July 27, 2025

एचएसईटी वर्कशॅाप २०२५

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

     *एच एस ई टी वर्कशॅाप २०२५*

—————————————————

दिनांक २३ जुलै ते २५ जुलै २०२५ ला शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर तर्फे बेसिक एच एस ई टी वर्कशॅाप आयोजित करण्यात आला होता. यांत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील जवळपास २० तर इतर आयुर्वेद महाविद्यालयातील दहा शिक्षकांचा सहभाग होता. तीन दिवसीय या प्रशिक्षण कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विविध दहा तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले असून पारंपारिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काय नवनवीन उपक्रम राबवता येईल याचा उहापोह करण्यात आला, त्यादृष्टीने काय पाऊले उचलता येईल याबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले.


खरेतर सतत तीन दिवस ते सुद्धा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत हा उपक्रम यशस्वीपणे राबविणे ही तारेवरची कसरत होती. परंतु डॅा राजेंद्र सोनेकर सर (अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर ), डॅा मनोज निंबाळकर सर (सचिव, स्टाफ कौन्सिल), डॅा मनिष भोयर सर (मुख्य समन्वयक एच एस ई टी), डॅा सुवर्णा व्यास (समन्वयक एच एस ई टी) यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. अर्थातच या कामी एच एस ई टी टीमचे सदस्य डॅा अमित नकानेकर सर, डॅा विरेश बिराजदार, डॅा आकांक्षा अकुलवार, डॅा सोनाली फुलकर आणि डॅा रत्ना दामले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


“वेल बिगन इज हाफ डन” असे का म्हणतात याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. साधारणपणे नवीन जागा, नवीन सहकारी, नवीन विषय म्हटले की थोडे अवघडल्या सारखे वाटते पण फर्स्ट डे फर्स्ट शो ला आम्हाला जो काही अनुभव आला तो थक्क करणारा होता. प्रारंभी सर्व सदस्यांचे एच एस ई टी टीम तर्फे हसतमुखाने स्वागत करण्यात आले. वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे वेळेत ब्रेकफास्ट वैगरे आटोपून आम्ही सर्वजण स्थानापन्न झालो. क्रिएटीव्हिटीचा सर्वोत्तम नमूना इथे बघायला मिळाला. यांत तीस सहभागी सदस्यांना सहा ग्रुप मध्ये विभागून प्रत्येक ग्रुपला कॅची नांवे देण्यात आली. जसे रिमेम्बर ग्रुप, अंडरस्टेंडिंग ग्रुप इ. मुख्य म्हणजे प्रत्येक ग्रुप मधील सदस्य नवनवीन असल्याने ट्यूनिंग जमायला वेळ लागला, पण लवकरच सर्व एकमेकांत मिसळून गेले.


सेल्फ इन्ट्रोडक्शन चा औपचारिक कार्यक्रमानंतर खरी धमाल केली ती आईस ब्रेकिंग उपक्रमाने. आपल्या मित्रांनी एकदुसर्याचे केलेले खरेखुरे वास्तव-अवास्तव वर्णन ऐकून सगळे पोट धरून हसले. वास्तविकत: हा एक शैक्षणिक कार्यक्रम होता परंतु आयोजकांनी कल्पकतेने त्याला ह्यूमन टच दिला. झाले काय तर इथे प्रत्येक सहभागी सदस्यांपैकी कुणी लेक्चरर, कुणी रीडर किंवा कुणी प्राध्यापक होते. मात्र दर दिवशी सत्राच्या प्रारंभी सामुहिक प्रार्थना केली जात होती ज्यामुळे शिक्षण, पद यांची श्रृंखला गळून आपण एक विद्यार्थी आहोत आणि या विद्यामंदिरात ज्ञानार्जनासाठी आलो आहोत ही भावना मनात घर करून गेली. या प्रार्थनेमुळे कधी कधी असे वाटायचे की आपण चक्क टाईम ट्रॅव्हल करून परत बालवयात गेलो आणि बालवाडी अथवा प्राथमिक शाळेत असल्याची निरागस अनुभूती मनाला आली.


विविध विषय आणि त्यानुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा होता. यानुसार पहिल्या दिवशी डॅा सई देशपांडे यांनी फिनॅामिनन ॲाफ लर्निंग, प्रिंसिपल्स ॲाफ ॲडल्ट टीचिंग, डोमेन्स आणि टॅक्सॅानॅामी यावर मार्गदर्शन केले. पाठोपाठ डॅा दीपक व्यास यांनी करिकुलम, आऊटकम्स ॲंड ॲाब्जेक्टिव्हस यावर प्रकाश टाकला. पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात डॅा ह्रिषीकेश पाठक इनट्रॅाडक्शन टू टीचिंग लर्निंग मेथड्स, टीचिंग लार्ज ग्रुप्स यावर तर डॅा अमित नकानेकर सर यांनी कम्युनिकेशन्स यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डॅा नीना नागदेवे यांनी मायक्रोटीचिंग ची उकल केली तर डॅा रोहित मोहरील यांनी टीचिंग स्मॅाल ग्रुप्स, वन मिनिट प्रिसेप्टर यावर प्रकाश टाकला. उत्तरार्धात डॅा अपेक्षा ढोले यांनी गिव्हिंग फीडबॅक प्रक्रियेची माहिती दिली. तर डॅा किरण टवलारे यांनी इन्ट्रोडक्शन टू असेसमेंट, असेसमेंट मेथड्स, असेसमेंट ॲाफ नॅालेज एमसीक्यू, एसएक्यू ॲंड एलएक्यू या विषयावर मार्गदर्शन केले.


तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची सुरवात डॅा स्वप्निल पाटील यांच्या इंटीग्रेटेड टिचिंग या विषयावर झाली. सोबतच त्यांनी रिलाएबिलीटी आणि व्हॅलिडीटी या मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्य म्हणजे एज्युटेनमेंट या उद्देशाने चिकन डान्सची संकल्पना मांडली, जी खूपच परिणामकारक ठरली. यानंतर डॅा कल्पना टवलारे यांच्या असेसमेंट ॲाफ नॅालेज, स्ट्रक्चर्ड ओरल एक्झामिनेशन, असेसमेंट ॲाफ परफॅार्मन्स ओएससीई ॲंड अदर न्यू मेथड्स वर मार्गदर्शन झाले. तर एच एस ई टी च्या समन्वयक डॅा सुवर्णा व्यास यांनी शेवटच्या शैक्षणिक सत्रात ब्ल्यू प्रिंटींग वर सविस्तर माहिती दिली. तब्बल तीन दिवस, सहा सत्रात, दहा वक्त्यांनी विविध विषयांवर मॅराथॉन मार्गदर्शन केले. सध्या नवनवीन विषयांसोबतच परंपरागत शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीची योग्य मांडणी केली गेली. पीपीटी, व्हिडिओज सोबतच प्रश्नोत्तरे, इंटरॲक्शन, ग्रुप टास्क, ग्रुप ॲक्टिव्हिटी द्वारे शैक्षणिक सत्रात रंगत आणली गेली. सोबतच डॅा मनिष भोयर सर, डॅा अमित नकानेकर सर आणि डॅा सुवर्णा व्यास यांच्या निरीक्षणात मायक्रोटिचिंग प्रेझेंटेड बाय पार्टिसिपंट्स पार पडले.


यानंतर वेळ होती ती समारोप समारंभाची आणि याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर चे प्राचार्य डॅा ब्रजेश मिश्रा सर उपस्थित होते. याप्रसंगी डॅा अनिल पावशेकर, डॅा सुप्रिया शेंडे, डॅा अरूण भटकर इत्यादी सहभागी सदस्यांनी फीडबॅक-मनोगत व्यक्त केले. तर डॅा सुवर्णा व्यास, डॅा मनिष भोयर, डॅा ब्रजेश मिश्रा सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डीन डॅा राजेंद्र सोनेकर सरांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील उपक्रमांची, भविष्यातील कार्यक्रमाची माहिती दिली. डॅा रत्ना दामले यांनी आभार प्रदर्शन केले तर डॅा अमित नकानेकर सर आणि डॉ. आकांक्षा आकुलवार यांनी समारंभाचे उत्कृष्ट संचालन केले.


थोडक्यात काय तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक द्वारे समर्थित, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर तर्फे आयोजित “बेसिक वर्कशॅाप इन हेल्थ सायन्स एज्युकेशन टेक्नालॅाजी” १००% यशस्वीपणे पार पडले आहे. मा. अधिष्ठाता डॅा राजेंद्र सोनेकर सरांचे कुशल नेतृत्व, मा. डॅा मनोज निंबाळकर सरांचे सहकार्य, मुख्य समन्वयक डॅा मनिष भोयर यांची सुसूत्रता, समन्वयक डॅा सुवर्णा व्यास यांचे मायक्रो प्लॅनिंग, डॅा अमित नकानेकर सरांचे अष्टपैलू कार्य, संपूर्ण  एच एस ई टी टीम चे रिअल ग्राउंड वर्क, मा. वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहभागी सदस्यांनी हिरहिरीने भाग घेणे, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ह्या बाबी कार्यक्रमाच्या सफलतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. 


यांत आयोजकांचे विशेष कौतुक करावे लागेल. कुठेही धांदल नाही की कुठेही गडबड नाही, अनावश्यक धावपळ नाही की कुठेही विसंगती नाही. प्रत्येक काम, प्रत्येक बाबी अगदी वेळेवर आणि निटनिटकेपणाने होईल याची दक्षता घेतली गेली. वक्तशीरपणा हा या कार्यक्रमाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट होता. प्रत्येक जागी आयोजकांनी घेतलेली मेहनत, कामाविषयी समर्पण, प्रयत्नात प्रामाणिकपणा झळकत होता. अगदी पहिल्या दिवशी जो उत्साह, कामाचा जो टेम्पो दिसला, तोच तिसऱ्या दिवशी पर्यंत कायम होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तिन्ही दिवस मग ते ब्रेकफास्ट असो की लंच, प्रत्येक दिवशी नवनवीन आणि रुचकर पदार्थांनी जेवणाची गोडी वाढवली होती.  संपूर्ण जीएसी-एच एस ई टी टीमचे या उत्कृष्टपणे राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन, मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा! 

————————————————

दिनांक २७/०७/२०२५

डॅा अनिल पावशेकर, नागपूर 

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...