@#😈😈😈😈😈😈😈😈@#
“लॅार्ड्सचा बखरनामा”
✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️
—————————————————
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की लॅार्ड्सच्या रणभूमीवर झालेल्या निकराच्या लढाईत भारतीय संघ धारातीर्थी पडला असून इंग्लंड संघाने मालिकेत २/१ अशी बढत घेतली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला आपल्या क्रिकेट प्रेमींच्या ह्रुदयासोबतच फुफ्फुस किडनी आतडे जिंकायची नामी संधी होती परंतु वारंवार विजयश्रीला अव्हेरणे भारतीय संघाला महाग पडले आणि हातातोंडाशी आलेल्या विजयाला मुकावे लागले. गोलंदाजांच्या मेहनतीला कधी क्षेत्ररक्षकांनी तर कधी फलंदाजांनी साथ न दिल्याने पहिल्या कसोटी प्रमाणे तिसऱ्या कसोटीतही आपल्या संघावर पराभवाची नामुष्की आली आहे.
झाले काय तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकल्याने मालिकेतली रंगत वाढली होती. त्यातही तिसरा सामना प्रसिद्ध लॅार्डस मैदानावर असल्याने त्याला आणखी ग्लॅमर प्राप्त झाले होते. मागील दोन लढतींचा अनुभव लक्षात घेता बेन स्टोक्सने चतुराईने प्रथम फलंदाजी पत्करली. पहिल्या दिवशी लॅार्ड्चे उत्साही वातावरण, हिरव्याकंच नैसर्गिक आवरणातील मंद मंद खेळपट्टी जणुकाही मंदाकिनी सारखी गुबगुबीत. गच्च भरलेले मैदान, लक्षणीय प्रेक्षणीय चढउतार! ना फलंदाजांवर मोहीत ना गोलंदाजांच्या प्रेमात. हाच तोरा या पीचने पहिले तीन दिवस दोन्ही संघांना दाखवला, जे काही करायचे आहे ते तुम्ही करा. कारण स्पष्ट होते, मेरेही पास तुझे आना है, तेरेही पास मुझे जाना है.
खेळपट्टीचा अंदाज घेऊन इंग्लिश संघाने बॅझबॅालला तिलांजली देत चक्क संथबॅाल खेळी केली. विशेषतः दुसऱ्या दिवशी बुमराहच्या स्विंग, सिमने इंग्लिश तंबूत वादळ निर्माण केले पण पुन्हा एकदा चेंडू बदलल्याने आपल्या गोलंदाजांना त्याचा फटका बसला. तरीही इंग्लंडला २७१/७ रोखण्यात यश आले होते. पण पुन्हा एकदा आपला संघ इंग्लंड संघाला चिरडण्यात अपयशी ठरला. जणुकाही इंग्लंड संघ क्रश असल्यासारखे आपले गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्यांच्यावर भाळले आणि शेपटाने ११६ धावा जोडून धापा टाकणार्या संघाला चारशेच्या जवळपास घेऊन गेले.
इंग्लंडची धावसंख्या फुगल्याने आपल्या संघाला कमीतकमी १०० धावांची आघाडी घेणे गरजेचे होते आणि आपली वाटचालही तशीच सुरू होती. विशेषत: राहुलच्या शतकाने आपल्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीला शिघ्रपतनाने ग्रासले. जिथे इंग्लंड संघाने २७१/७ ते सर्वबाद ३८७ अशी झेप घेतली, तिथे आपण ३७६/६ ते सर्वबाद ३८७ असे गळपटलो. ना आघाडी मिळाली ना सामन्यात वरचढ होता आले. दोन्ही संघांनी सारखीच धावसंख्या रचल्याने तिथे “आजा मेला नातू झाला” हिशोब बरोबर झाला अशी स्थिती होती. पहिले तीन दिवस निकालाच्या दृष्टीने वांझोटे ठरले होते.
मात्र तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात झॅक क्राऊलीने खोडसाळपणा केल्याने भारतीय संघ खवळला आणि तिथे एकदमसे वक्त बदल दिये, जज्बात बदल दिये, जिंदगी बदल दिये, हालात बदल दिये अशी परिस्थिती निर्माण झाली. साध्या वरणासारखी भासणारी कसोटी अचानक दाल तडका वाटू लागली. भारतीय संघात तिसऱ्या दिवसाअखेर ॲड्रीनॅलीन रश निर्माण झाले आणि त्याचा फटका इंग्लंड संघाला चौथ्या दिवशी बसला. भरीस भर म्हणून पीच गोलंदाजांकडे आक्रुष्ट झाली. स्विंग आणि बाऊंसने फलंदाजांची भंबेरी उडविली. विशेषतः सिराजने तिखट मारा करून इंग्लंडला गळती लावली तर वॅाशिंग्टनने सुंदर मारा करत बुमराहच्या साथीने इंग्लंडला १९२ धावांत गुंडाळले.
लॅार्ड्सवर तिरंगा फडकवण्यासाठी टीम इंडियाला फक्त १९३ धावा हव्या होत्या मात्र पीच ची स्थिती पाहता अब तेरा क्या होगा कालिया अशी मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि झालेही तसेच. पहिल्या तीन दिवसात २० बळी घेणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी तब्बल १४ फलंदाज प्राणास मुकले. पाचव्या दिवशी राहुल, पंत या अस्सल फलंदाजांवर आणि अष्टपैलू जडेजावर संघाची भिस्त होती. तर नितीश रेड्डी आणि वॅाशिंग्टन सुंदर हे दोन्ही नवोदित खेळाडू अष्टपैलू असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्यातरी ते रॅा मटेरियल आहेत, त्यांचे फिनिश्ड प्रॅाडक्ट मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार. त्यामुळे या तिन्ही फलंदाजांचा कस लागणार होता.
मात्र जडेजाने एकाकी अपयशी झुंज दिली. भलेही बुमराह आणि सिराजने मिळून तब्बल १४ षटके खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करत जडेजाला साथ दिली परंतु चौथ्या डावात १९३ चा गोवर्धन उचलण्यासाठी टॅाप ॲार्डरला मेहनत घ्यावी लागणार होती, जी त्यांनी नाही घेतली. असहायपणे आशाळभूत होऊन आपण बुमराह सिराजकडे धावांसाठी डोळे लावून बसलो. खरेतर हे चुकीचे होते, बैलाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे होते. चौथ्या दिवशी ॲड्रीनॅलीन रश झालेल्या आपल्या संघाला १९३ चे लक्ष्य गाठतांना फलंदाजीत टेस्टेस्टेरॅानची निकड होती आणि त्याची जबाबदारी राहूल जडेजासह यशस्वी जैस्वाल, करुण नायर, कर्णधार गील आणि पंत यांची होती.
असे म्हणतात की विजयाला अनेक बाप असतात तर पराजय हा पोरका असतो, अनाथ असतो. तरीही फलंदाजीत जैस्वाल, करूण नायरचे अपयश ठळकपणे जाणवते. करूण नायर तर जणुकाही स्पिड गव्हर्नर लावल्यासारखा पन्नाशी ओलांडत नाही. तर पंतचा खेळ, त्याचे धावबाद होणे संघासाठी दुर्दैवी ठरले. सलामीला जैस्वालला जोफ्रा आर्चरने दोन्ही डावात सहज गिळले तर इंग्लंडने पहिल्या डावात गील चे फुटवर्क रोखतांना विकेट किपरला वर आणून त्याची नाकाबंदी करून टाकली होती. तसेच त्यांनी दुसऱ्या डावात पंत फटकेबाजी करू शकणार नाही अशा प्रकारे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण लावले. मुख्य म्हणजे आपण पहिल्या डावात ३१, दुसऱ्या डावात ३२ अवांतर धावा देत स्वतःसाठी खड्डा खोदला होता.
थोडक्यात काय तर चौथ्या डावात आपल्या फलंदाजांचा अग्नीपरिक्षा होती, ज्यात ते खरे नाही उतरले. तर पहिल्या डावात इंग्लंडला लवकर गुंडाळण्यात आपण अपयशी ठरलो. पहिल्या डावात आपल्या क्षेत्ररक्षकांची गचाळ कामगिरी, दोन्ही डावातल्या अतिरिक्त ६३ धावा ह्या चुका टीम इंडीयाच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. तर केएल राहुलचे शतक, जडेजाचे फायटींग स्पिरिट, सिराज बुमराह जोडीची तुफानी गोलंदाजी ह्या प्लस पॅाईंट ठरल्या. तर बेन स्टोक्स कर्णधार म्हणून गील पेक्षा उजवा ठरला. जोफ्रा आर्चरने तो कसा खास गोलंदाज आहे हे त्याच्या वेगवान आणि अचानक उसळत्या चेंडूने दाखवून दिले. इंग्लंड गोलंदाजांचे झपकन आत येणारे चेंडू भारतीय फलंदाजांना खेळणे अवघड होते. दुर्दैवाने भारतीय संघाला चौथ्या दिवशी संध्याकाळी आणि शेवटच्या दिवशी फलंदाजी करावी लागली, तेव्हा खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीला अनुकूल होती, हा मुद्दा सुद्धा तेवढाच जय पराजयावर परिणामकारक ठरला.
—————————————————
दिनांक १५ जुलै २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————

No comments:
Post a Comment