@#😈😈😈😈😈😈😈😈#@
अरे दिवानो, मुझे पहचानो, मै हूं डॅान!
✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️
—————————————————
टीम इंडियाचे डिएसपी मो. सिराज यांनी धडक मोहीम राबवत बॅझबॅाल टोळीला जेरबंद केले आहे. ओव्हल कसोटीत अंतिम दिवशी उर्वरित चार फलंदाजांना काबूत करत इंग्लिश कंपूचे आव्हान संपुष्टात आणले आहे. कसेही करून ॲंडरसन तेंडुलकर चषक अपहरणाचा कट चाणाक्ष डिएसपी मो. सिराजने उधळून लावला असून त्याबद्दल त्यांना प्लेयर ऑफ दी मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रचंड नाट्यमय आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या ओव्हल कसोटीत सिराज ॲंड कंपनीने इंग्लंडचे वाटोळं केले आहे. ओली सुकी जिंकणार्या ओली पोपला मालिका जिंकण्यात अपयश आले असून बॅझबॅालला टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने २/२ असे थोपवले आहे.
झाले काय तर मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया ट्रम्पच्या भाषेत डेड इकॅानॅामी होती. मात्र टीम इंडियाने याच डेड इकॅानॅामीला डेडली इकॅानॅामी करत तमाम क्रिकेट पंडीतांचे दात घशात घातले आहेत. अगदी पहिल्या कसोटी पासून ते अंतिम कसोटी पर्यंत प्रत्येक सामन्यात प्रत्येक दिवशी इंग्लंडला कडवी झुंज देत भारतीय संघाने प्रत्येक सामन्याचा निकाल पाचव्या दिवशीच लागेल अशी टक्कर दिली. लॅार्ड्सला हतबल झालेल्या सिराजने ओव्हलला चलो आज कुछ तुफानी करते है सारखे मैदानात चक्रवात आणले आणि इंग्लंडला सहा धावांनी पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
खरेतर या कसोटीत खेळपट्टीने दर दिवशी नवनवीन नखरे दाखवले. पहिले दोन दिवस लाजत, मुरडत ती गोलंदाजांच्या प्रेमात होती. तिच्या बाऊंस आणि सीम पुढे दोन्ही संघांचे नामचीन फलंदाज ताथा थैय्या करत होते. भारतीय संघाने धडपडत कसेबसे सव्वादोनशे गाठले तर इंग्लंडचा संघ अडीचशेत आटोपला. दुसऱ्या दिवशी पीचच्या जरा जरा टच मी टच मी टच मी स्वभावाला सोळा फलंदाजांना नादी लागले. पण दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात पीचने नमते घेतले आणि तिसऱ्या दिवशी तर कमालच केली. जणुकाही पहिले दोन दिवस काही झालेच नाही या थाटात पीच फलंदाजांवर मोहीत झाली. आकाशदीप नावाचा टेलएंडर तिथे ६६ धावांचा आकाश दिवा लावून गेला.
तिसरा दिवस गाजवला तो यशस्वी जैस्वालने. पीच कशीही असो, प्रसंग कोणताही असो त्याचा सरळसोट फॅार्म्युला असतो, डर के आगे जीत है! त्याच्या बेधडक शतकाने भारतीय संघाने जवळपास चारशे धावांची मजल मारली. अर्थातच यांत जडेजा, वॅाशिंग्टन या अष्टपैलू जोडीच्या जोडीच्या अर्धशतकी खेळींचा समावेश होता. विशेषतः वॅाशिंग्टनने सुंदरने डावाच्या अखेरीस फलंदाजीत जो घणाघात केला, तोच शेवटी निर्णायक ठरला. मात्र सामन्यात अजूनही दोन दिवस बाकी असल्याने हा सामना बरोबरीत होता. त्यात पीचवर चेंडू फारशी करामत दाखवत नसल्याने इंग्लंडचे पारडे जड होते. तिसऱ्या दिवशअखेर एक बाद पन्नास अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंड संघाला नक्कीच गाढ झोप लागली असेल.
चौथ्या दिवशी खरी रंगत आणली ती हॅरी ब्रुक, जो रूट जोडीने. डकेटने ५४ धावांचा डाका टाकल्यानंतर या जोडीने भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. विशेषत: सिराजने सीमारेषेवर हॅरी ब्रुकला जीवदान देऊन तमाम क्रिकेट रसिकांना डिप्रेशन मध्ये टाकले. भरीस भर म्हणून प्रसिद्ध क्रिष्णा धावांचे लंगर लावून बसल्याने चिंता वाढली होती. या दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त शतकी खेळी करत भारताला सामन्यातून जवळपास बेदखल केले होते. मात्र मध्यान्हानंतर पीचने पुन्हा एकदा आपला स्वभाव बदलला. हळूहळू ती सिराज, क्रिष्णाला शरण जाऊ लागली. पण बाजी मारली ती आकाशदीपने. जवळपास दोनशे धावांची भागीदारी करून भारतीय संघाचा जीव टांगणीला लावणार्या हॅरी ब्रुकचा अडसर आकाशदीपने दूर केला.
लगेचच ब्रेथेल, जो रूटचा काटा काढून प्रसिद्ध क्रुष्णाने भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु अंधुक प्रकाशाने सामना पाचव्या दिवसावर नेला. शेवटचा दिवस, शेवटचे चार फलंदाज, त्यातही जेम्स स्मिथ सारख्या खतरनाक फलंदाजां समोर ३५ धावा म्हणजे “उंट के मुंहमें जीरा” होतं. तर आपल्या साठी ॲाल आईज ॲान सिराज” होतं. प्रसिद्ध क्रिष्णावर खूप भरवसा ठेवता येत नव्हता, कारण त्याच्यावर सहज बाऊंड्री लागत होती. तर आकाशदीप लयीत नव्हता. अखेर निर्णायक युद्धाला तोंड फुटले आणि पहिल्याच चेंडूंवर चौकार ठोकत इंग्लंडने दबाव वाढवला होता. शेवटी स्मिथ, ओव्हरटनला सिराजने तर टंग ला क्रिष्णाने बाद करत सामन्यात चुरस आणली. सरतेशेवटी जिंकण्यासाठी केवळ सहा धावा हव्या असताना सिराजने अटकिन्सनच्या दांड्या उडवल्या आणि या थरारक नाट्यावर पडदा टाकला.
वास्तविकत: रिषभ पंत, बुमराह हे प्रमुख खेळाडू नसतांनाही टीम इंडियाने मिळवलेला विजय कौतुकास्पद आहे. संपूर्ण कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजीचे ओझे वाहणाऱ्या सिराजने २३ बळी घेत डॅान ची भूमिका बजावली. मालिकेत जवळपास १००० चेंडू टाकत त्याने त्याचा फॅार्म, फिटनेस आणि फायटींग स्पिरिट दाखवून दिले. पाच वर्षे ढोर मेहनत केल्यानंतर सिराजला त्याचे फळ मिळाले, त्याची दखल घेण्यात आली. कसोटी मालिका निर्णायक अवस्थेत आल्यानंतर मियांभाईका मॅजिक चल गया! या विजयात पहिल्या डावात करूण नायरचे अर्धशतक, जैस्वालचे शतक आणि जडेजा सुंदरची फलंदाजी उल्लेखनीय ठरली. तर गोलंदाजीत मो. सिराजला क्रिष्णाची उत्तम साथ लाभली.
राहिली बाब इंग्लंडची तर त्यांनी पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळवूनही डावाची माती केली. तर दुसऱ्या डावात हॅरी ब्रुक, जो रूटच्या शतकानंतरही ते पाठलाग करतांना सामन्याचा दबाव झेलू शकले नाहीत. दोन्ही संघ विशेषतः इंग्लंड संघाने मोक्याच्या क्षणी झेल सोडले. त्यातच त्यांचे महत्त्वाचे खेळाडू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर संघात नसल्याने त्याचा त्यांना फटका बसला. उरलीसुरली कसर ख्रिस वोक्स जायबंदी झाल्याने त्यांची गोलंदाजी लंगडी झाली होती. या धावपळीत पीच ने रंग बदलल्याने कधी सामना भारताकडे तर कधी इंग्लंड कडे झुकत होता. मात्र ओव्हल वर चौथ्या डावात फलंदाजी करणे दिव्य काम होते, जे इंग्लिश फलंदाज करू शकले नाहीत आणि त्यांचा संघ पराभूत झाला.
ही संपूर्ण मालिका विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. जसे बेन स्टोक्स कधी नव्हे तो गोलंदाजीत असरदार ठरला तर डकेट, क्राऊली, पोप यांना फलंदाजीत लय सापडली. जोश टंग ने केवळ तीन सामन्यात बुमराहपेक्षा जास्त बळी मिळवले. हॅरी ब्रुकने दणकेबाज फलंदाजी करत बॅझबॅालची लाज राखली तर वोक्सने त्याचा क्लास दाखवला. टीम इंडिया तर्फे गीलने धावांचे रतीब घातला तर राहुलने चिवट खेळी करत बरेचदा डाव सांभाळला. जडेजा सुंदरने अर्धशतकी खेळी करत आपली उपयुक्तता दाखवून दिली. जैस्वालची निडर खेळी डावाचा टेम्पो सेट करत होती. अत्यंत चुरशीच्या या मालिके दोन्ही संघानी तुल्यबळ कामगिरी केली. इंग्लंडला होम ॲडव्हांटेज होते तरीही भारतीय संघाने जबरदस्त झुंज दिली. मालिकावीर म्हणून जरी हॅरी ब्रुकची निवड झाली असली तरीही असली हिरो, असली डॅान मो. सिराजचेच नाव घ्यावे लागेल.
—————————————————
दिनांक ०५ ॲागस्ट २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————
No comments:
Post a Comment