@#😈😈😈😈😈😈😈😈#@
“दुबईत पाक क्षेपणास्त्रे निकामी”
“डॅा अनिल पावशेकर”
————————————————
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या भारत पाक लढतीत कर्णधार सूर्याच्या एस-४०० डिफेन्स सिस्टिमने शाहीन आफ्रिदी समवेत पाकचे गोलंदाजीतले सगळे क्षेपणास्त्रे निकामी करून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करताना पाकची भारतीय गोलंदाजांसमोर घसरगुंडी झाली आणि त्यांना अवघ्या १२७ धावांत गुंडाळले गेले . फलंदाजी करताना पाक संघ प्रचंड दबावात दिसला आणि केवळ साहीबजादा फरहान, फखर झमन, शाहीन आफ्रिदी वगळता इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. तर प्रत्युत्तरात आपल्या फलंदाजांनी पाक गोलंदाजी सहज खेळत सामना ७ गड्यांनी जिंकला आहे .
झाले काय तर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील ही लढत एकतर्फी ठरली. तसे पाहता दोन्ही संघ सध्या संक्रमणावस्थेत आहेत. भारतीय संघातील रोहित, विराट, जडेजाने टी ट्वेंटीतून निव्रुत्त झाले आहे तर पाक संघाने बाबर आझम, रिझवानला संघातून डच्चू दिला आहे. मात्र तरीही भारतीय संघ पाक संघापेक्षा सरस आहे आणि हेच सामन्यात सिद्ध झाले. पाक संघात नाव घेण्यासारखा ना फलंदाज आहे ना गोलंदाज. शाहीन आफ्रिदीने जरूर गोलंदाजीत नाव कमावले आहे पण या सामन्यात तो निष्प्रभ ठरला. एकतर नवखा संघ आणि त्यातही साधारण रणनिती. कारण दुबईत पाठलाग करणाऱ्या संघाने जास्त विजय मिळवले आहेत परंतु पाकने प्रथम फलंदाजी निवडून पहिलेच ते बॅकफुटवर आले होते.
भारत पाक सामन्यात खेळाडूंवर मानसिक दबाव काय असतो हे या सामन्यात दिसून आले. डावाच्या सुरुवातीला आक्रमणाच्या नादात पाकचे दोन फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर जी फलंदाजीत जी गळती लागली ती शेवटपर्यंत कायम राहिली. पांड्या बुमराहने दोन बळी टिपत जो दबाव पाक फलंदाजांवर निर्माण केला तो कुलदीप अक्षर आणि वरूण चक्रवर्तीने कायम ठेवला. त्यातही साहीबजादा फरहान आणि फखर झमनने ३९ धावांची भागीदारी करत डाव सावरला होता मात्र कोणताही फलंदाज आश्वासक फलंदाजी करत नव्हता. डावाच्या अखेरीस शाहीन आफ्रिदीने दांडपट्टा चालवत पाकची थोडीफार लाज राखली.
पाक सव्वाशेत गारद होताच सामना कुठे चालला याचा अंदाज येत होता मात्र भारतीय संघाचा काय ॲप्रोच असेल याची उत्सुकता होती. अभिषेक शर्माने ती उत्सुकता लवकर संपवली. शाहीन आफ्रिदीवर ताबडतोब हल्ले करत त्याने आपल्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. त्याची झटपट ३१ धावांची खेळी भारतीय संघाचा टेम्पो सेट करून गेली. शुभमन गिल जरूर लवकर बाद झाला परंतु त्यानेही दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली होती. दोन्ही सलामीवीर परतताच कर्णधार सूर्या आणि तिलक वर्माने पाक गोलंदाजांना कोणतीही संधी न देता ५६ धावांची भागीदारी करत सामना आवाक्यात आणला. शेवटी शिवम दुबेच्या साथीने सूर्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
थोडक्यात काय तर पाक संघाने या सामन्यात सपशेल शरणागती पत्करली होती. ना फलंदाज चमकले ना गोलंदाजांना प्रभाव पाडता आला. दोन्ही बाबतीत भारतीय संघ उजवा ठरला. कुलदीप, अक्षर आणि वरूणच्या फिरकीसमोर पाक संघाने सरेंडर केले तर सैम अयूब सोडता इतर पाक गोलंदाजांनी निव्वळ खानापुर्ती केली. पाक संघ सुपर फोर मध्ये जरूर प्रवेश करेल. मात्र तिथे त्यांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अन्यथा तिथे ते भारता सहित श्रीलंका, अफगाण किंवा बांगलादेश समोर ते टिकाव धरू शकणार नाहीत. याउलट भारतीय संघाने टी ट्वेंटीत आपणच दादा आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
—————————————————
दिनांक १५ सप्टेंबर २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————

No comments:
Post a Comment