Monday, September 29, 2025

दुबईत टीम इंडियाचा राजतिलक

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “दुबईत टीम इंडियाचा राजतिलक”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

क्षणाक्षणाला धडधड वाढवणार्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकचा सुपडा साफ करत नवव्यांदा आशिया चषक हस्तगत केला आहे. पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जीवघेण्या द्वंद्वाला रिंकू सिंहने शेवटचा वार करत संपुष्टात आणले आहे. दिडशेच्या आतले लक्ष्य असले तरी फायनलच्या दबावाने आपला टॅाप ॲार्डर कोसळला तरीही मध्यक्रमात तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने निकराने खिंड लढवत विजयावर मोहोर उमटवली आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच एकमेकांशी अंतिम फेरीत लढणार्या दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला परंतु डेथ ओव्हर्समध्ये पाक गोलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत चषक पटकावला आहे.


झाले काय तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करण्याचा सूर्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता कारण अंतिम सामन्यात पाठलाग करण्यात दबाव येत असतो. त्यातच अष्टपैलू पांड्या नसल्याने संघाचा समतोल बिघडला होता. पण शिवम दुबेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने “दुबे पांड्या तो नहीं लेकिन पांड्या से कम भी नहीं” हे दाखवून दिले. पाक ने सामन्यागणिक आपली फलंदाजी सुधारत झकास सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर धावांची बरसात करत असताना आपला वरूणराजा चक्रवर्ती देवासारखा धावून आला. खतरनाक साहीबजादा फरहानचा काटा काढून त्याने पाकच्या रथाचे एक चाक काढले.


अनुभवी फखर झमनच्या दिमतीला सैम अयुब आला पण त्याला कुलदीपने चकवले. यानंतर आपल्या फिरकीने जो चिखल केला, त्यात पाकचा रथ पुर्णपणे फसला. पाक संघ दोन बाद ११३ ते सर्वबाद १४६ असा गडगडला. मुख्य म्हणजे कुलदीपने ४ बळी टिपत पाकच्या फलंदाजीचे अड्डे उध्वस्त केले. तर प्रारंभी अपयशी ठरलेल्या बुमराहने हॅरीस रौफ आणि मो. नवाझला स्वस्तात निपटवले. नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजी समोर पाक सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली होती परंतु नंतर ते संथ विकेट, जुना चेंडू आणि फिरकीच्या जाळ्यात पुरते अडकले.


टीम इंडियाला पाठलाग करतांना ना खूप मोठे लक्ष्य होते ना समोर खतरनाक गोलंदाज. पण अंतिम सामन्याचा दबाव आपले काम करून गेला. भरवश्याच्या टॅाप ॲार्डरला (म्हशीला) टोणगा झाला. अभिषेकचे बाद होणे समजू शकतो. पण सूर्या आणि गील बेजबाबदारपणे बाद झाले. सूर्या तर संपूर्ण मालिकेत फलंदाजीत ना कॅान्फीडंट दिसला ना सिरीअस. त्याला फुल लेंथ डिलीव्हरी टाकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याचा झिरो डिग्री प्लेअर केला. तर शुभमन गील ने चौकार ठोकून पुढच्याच चेंडूंवर विकेट दिली. स्लो पीचला अनुसरून गोलंदाज अशरफने कमी गतीने चेंडू टाकत गील ला फसवले.


चौथ्या षटकातच आपली तीन बाद वीस अशी दयनीय अवस्था झाली होती. आता सगळ्या नजरा तिलक वर्मावर टिकल्या होत्या. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत निश्चयाने फलंदाजी केली. त्याने संजू सोबत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची बहुमुल्य भागीदारी करत डाव सांभाळला. मात्र सॅमसन बाद होताच अष्टपैलू शिवम दुबे मैदानात आला आणि सामना आपल्याकडे झुकू लागला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा फटकावतांना “सिर्फ कानून के ही नहीं, दुबेजी के भी हात लंबे होते है” हे दाखवून दिले. तिलक वर्मा आणि दुबेच्या वेगवान ६० धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारे आव्हान सोपे झाले होते. 


खरेतर पाक ने फलंदाजीत जरी कच खाल्ली होती तरी ते गोलंदाजीत भारी पडले होते. मात्र क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्याने त्यांच्या हातातून सामना निसटला. गील ला धावबाद करण्यात ते चुकले पण ते त्यांना महागात पडले नाही. पण संजू सॅमसन चा १२ धावांवर झेल सोडणे आणि तिलक वर्माला ऐन मोक्याच्या वेळी धावबाद करू न शकल्याने ते पराभूत झाले. गोलंदाजीत फिरकीपटू चांगला दबाव टाकत असताना पाक कर्णधार सलमान आगा ने वेगवान हॅरिस रौफ ला पाचारण केले आणि इथेच त्यांचा घात झाला. हॅरीस रौफच्या १५ व्या षटकात १७ धावा निघताच रौफ चा खौफ नष्ट झाला. तर घुंगरू शेठ अब्रार अहमदचे बॅालिंग एन्ड चेंज केल्याने त्याची लय बिघडली होती.


पाक कर्णधार रणनितीत कमी पडला. त्याने शाहीन आफ्रिदीची षटके लवकर संपवल्याने डेथ ओव्हर्स मध्ये ते नागडे झाले. तर अनुभवी मो. नवाझला त्याने केवळ एक षटक गोलंदाजी दिली. हॅरिस रौफ टीम इंडीयासाठी रन मशीन ठरला. तर टीम इंडीयाने फलंदाजीतील पडझडीनंतरही डाव सावरला. तिलक वर्माने एका बाजूला किल्ला लढवत शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. कोणताही अनावश्यक फटका न मारता जबाबदारीने फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आशिया चषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताने आपणच आशिया चषकाचे खरे हकदार आहोत हे सिद्ध केले आहे.

—————————————————

दिनांक २९ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...