@#😈😈😈😈😈😈😈😈#@
“कोई रोको ना दिवानें को”
✍️डॅा अनिल पावशेकर✍️
—————————————————
ॲास्ट्रेलिया विरूद्ध भारत ही एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली असून ॲास्ट्रेलियाने यात २-१ अशी बाजी मारली आहे. मात्र ही मालिका लक्षात राहिल ती रोहित कोहली अर्थातच रोको या जोडीसाठी. गड गेला पण सिंह आला असे या मालिकेचे वर्णन करता येईल. पहिल्या दोन सामन्यात फ्लॅाप शो करणाऱ्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विलक्षण कामगिरी करत सामना एकतर्फी जिंकला आहे. खट्याळ संघव्यवस्थापन आणि नाठाळ क्षेत्ररक्षकांनी पहिल्या दोन सामन्यांतील चुका सुधारून अंतिम सामन्यात संघबदल करून आणि प्रदर्शन उंचावत मालिकेत थोडीफार अब्रू राखली आहे. येणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी हा विजय भारतीय संघासाठी महत्वाचा असून रोहित कोहली जोडीने आपल्या लौकिकास साजेशी खेळी करत सिडनीमध्ये छोटी दिवाळी साजरी केली आहे.
झाले काय तर कसोटी, टी ट्वेंटीत रोको जोडी निव्रुत्तीनाथ झाल्याने आणि बराच काळ मैदानाबाहेर राहिल्याने ते या मालिकेत कशी कामगिरी बजावतील याबद्दल सगळेच साशंक होते. मात्र ही जोडी याबाबत ओल्ड वाईन ठरली. निजाम उल मुल्कने त्याच्या म्रुत्यूपत्रात चातुर्याच्या ओळी लिहिल्या आहेत. “नान तहहयात, दौलत ब करामत” म्हणजेच तुम्हाला अन्न जन्मभर मिळेल परंतु दौलत ही पराक्रमाने कमवावी लागते. या जोडीवर जे संशयाचे सावट पसरले होते, त्याला या जोडीने आपल्या पराक्रमाने दूर सारले आहे. दोघांनीही आपल्या मनगटाच्या जोरावर रन दौलत गोळा करत टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
रोहित बाबत बोलायचे झाले तर “रूक जाना नहीं तू कहीं हार के” याची प्रचिती येते. टी ट्वेंटी विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॅाफी जिंकूनही त्याच्या वाट्याला उपेक्षा आली होती. कधी मुंबई इंडियन्स चे कर्णधारपद पद हिरावून घेतले तर आता वन डे त पदावनती. ज्या शुभमनला रोको जोडीने आपल्या अंगा खांद्यावर खेळवले, त्याच्या हाताखाली या दोघांना खेळावे लागत आहे. भलेही निवड समिती भविष्याचे वेध घेत हे प्रयोग करत आहे पण कमीत कमी वन डे साठी रोहितची कर्णधार पदावरून उचलबांगडी नक्कीच खटकते. मात्र रोहित असे मानापमान पचवून पुढे गेला आहे. या मालिकेत पहिला सामना वगळता त्याचा खेळ म्हणजे बावनकशी सोने आहे.
तिसऱ्या सामन्यात, सिडनीचा त्याचा खेळ म्हणजे ओल्ड ॲंड गोल्ड रोहित होता. जणुकाही नियतीने त्याची ही खेळी त्याच्या अखेरच्या ॲास्ट्रेलिया दौर्यासाठी राखून ठेवली होती. वासिम अक्रम म्हणतो त्याप्रमाणे रोहितच्या खेळीला एक प्रकारचा लेझी एलीगन्स असतो. अचूक टायमिंग आणि अचाट ताकद ही त्याची कवचकुंडले! याचा वापर करून त्याने सिडनी मैदानावर स्वीप, फ्लिक, पुल आणि लॅाफ्टेड शॅाटची उधळण करत शतक झळकावले आणि रोहितपंचमी साजरी केली. ना कुठले अॅग्रेशन ना कुठली खुन्नस, बस फक्त रक्तविहीन रोहित क्रांती! सिडनीमध्ये ज्याप्रकारे त्याचा खेळ बहरतो ते पाहता त्याला सिडनीचा राजा ही उपाधी निश्चितच लागू पडते.
राहिली बाब विराटची तर पाठलाग करताना विराट आणि चित्ता यांत कोण सरस हे ठरवणे कठीण आहे. त्याचा मॅच फिटनेस तर एक दंतकथा झाली आहे. मॅट शॅार्टचा झेल घेताना त्याचे शरीर यंत्रवत हलले. कमालीचे हॅंड आय कॅार्डीनेशन, फिजिकल फिटनेस आणि झेल घेतांना त्याचे बॅाडी रिफ्लेक्सेस निव्वळ अवर्णनीय! विराटसारखा फिटनेस जर सर्वांनी आत्मसात केला तर आर्थोपेडीक आणि फिजोओथेरपीचे दुकान बंद झाले म्हणून समजा. प्रुथ्वी तिच्या अक्षावर २३.५ अंश झुकली आहे तर दर तासाला ती १५ अंश फिरते. मात्र विराट लेग ला खेळताना विशेषतः पुल, हुक करताना कमालीच्या वेगाने आणि भिंगरीसारखा फिरताना पाहून डोळ्याचे पारणे फिटते. पहिल्या दोन सामन्यात त्याचे फुटवर्क नीट न झाल्याने तो बाद झाला, मात्र याची कसर त्याने तिसऱ्या सामन्यात भरून काढली. त्याचे कट शॉट, फ्लिक आणि स्टार्कला मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह तर सचिनची आठवण करून देत होता. त्याचा शेवटचा शॅाट, अप्परकट तर कांगारूंना “हंसते जख्म” देऊन गेला असणार.
वास्तविकत: हा मालिका पराभव टीम इंडिया साठी टी ट्वेंटी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॅाफी, आशिया चषक या विजयानंतरचा उतारा होता. चुकीची संघनिवड चांगल्या संघाचा कसा पालापाचोळा करू शकते हे आपण या मालिकेत पाहिले आहे. निव्वळ फलंदाज नव्हे तर गोलंदाजही सामने जिंकून देतात यावर संघव्यवस्थापणाने विश्वास ठेवायला हवा. आठव्या क्रमांकावर फलंदाजीच्या नादात नितीश रेड्डीला अक्षरश: पहिल्या दोन सामन्यात संघात कोंबण्यात आले. तर जगातील सध्याचा सर्वोत्तम फिरकीपटू कुलदीपला खुर्ची उबवायला लागली. बुमराह कधी आणि कोणत्या सामन्यात, मालिकेत खेळणार हे सांगता येत नाही. यशस्वी जैस्वाल आणि मो. शमीचे कंपोस्ट खत करणे सुरू असून योग्य संघनिवड ही काळाची गरज बनली आहे.
थोडक्यात काय तर मालिका गमावूनही भारतीय पाठीराखे रोहित कोहलीच्या प्रदर्शनाने खुष आहेत. निश्चितच या दोघांचा सूर्य मावळतीला आलेला आहे. काळवेळ कोणालाही चुकली नाही. मात्र या मुद्द्यावर त्यांची हेळसांड अपेक्षित नाही. कमीतकमी वन डे मध्ये या दोघांचे फिटनेस, प्रदर्शन चांगले असेपर्यंत त्यांना विश्रांती देऊ नका. संघाच्या जडणघडणीत या दोघांचा मोलाचा वाटा आहे. ही जय विरूची जोडी पुन्हा होणे नाही. चमत्काराशिवाय जग नमस्कार करत नाही. या दोघांनी सिडनीमध्ये दाखवलेल्या चमत्काराचा निवड समिती नक्कीच बोध घेईल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट रसिकांसाठी रोको जोडी म्हणजे “कोई रोको ना दिवाने को, दिल मचल रह, इन्हे खेलते देखने को” अशी स्थिती आहे. या जोडीबाबत निवड समितीने बहादूर शहा जफरचा एक शेर जरूर ध्यानात ठेवावा.
“काटों को मत निकाल चमन से ओ बागवां”
“यें भी गुलों के साथ पलें है बहार में”
—————————————————
दिनांक २६ ॲाक्टोबर २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————
No comments:
Post a Comment