@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*रेहान, रेहान,, रेहान,,,*
***********************************
स्थळ चंदिगढचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ दुपारी १२ वाजताची. माझा मित्र फ्रेश होण्यासाठी आत गेल्याने त्याच्या लगेज बॅगसह मी पुरुष प्रसाधन गृहाबाहेर उभा होतो. हाती मोबाईल असल्याने सोशल मिडिया वर भटकंती चालू होती. अचानक एक साठीतली आजीबाई रेहान, रेहान चा धावा करत माझ्या दिशेने येताना दिसली. मी लगेच मोबाईल मधून डोके काढत त्या आजीबाईला थांबवले आणि नक्की काय झाले ते विचारले असता तिचा नातू रेहान दिसत नसल्याचे तिने सांगितले. मी लगेच तिला तिथेच थांबविले आणि प्रसाधन गृहात रेहान नावाच्या मुलाचा शोध घेतला आणि बाहेर येत तिला रेहान आत नसल्याची कल्पना दिली.
माझे उत्तर ऐकताच तिचे अवसान गळाले आणि तिने आणखी जोराने रेहानच्या नावाने टाहो फोडायला सुरुवात केली. प्रसंग बाका होता, तात्काळ मित्राला सगळं सामान सोपवून मी त्या आजीबाईकडून जुजबी माहिती घेत रेहान शोध मोहीम हाती घेतली. अर्थातच विमानतळ म्हटले की कडक सुरक्षा आणि चोख बंदोबस्त हे ठरलेलं असतं. शिवाय जागोजागी सिसिटिव्ही लागले असल्याने त्या चिमुकल्याला नक्कीच शोधून काढता आलं असत. मात्र क्षणाक्षणाला त्या आजीबाईची वाढत जाणारी चिंता, धडपड पाहता लगेच तिला धिर दिला आणि मी रेहानला शोधून देतो असा विश्वास व्यक्त केला. यानंतर तिचा आक्रोश जरी कमी झाला तरी डोळ्यातून गंगाजुमुनेचा धारा वहायला लागल्या होत्या.
खरेतर रेहान हे पाच सहा वर्षाचे बाळ, खेळण्या बागडण्याचं त्याच वय, विमानप्रवास, चेक इन सारख्या क्लिष्ट गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नव्हत्या. त्याचे आई-वडील काऊंटर वर बोर्डींग पास काढण्यात गुंग आणि या बाळस्वारीने आजीला हुलकावणी देत धुम ठोकली होती. रेहानला शोधून काढायचे काम थोडे जिकरीचे होते. कारण मी त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय त्या दिवशी बाळगोपाळांनी विमानतळ गजबजून गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होती. अशावेळी रेहानला शोधण्यापेक्षा तो कुठे असू शकतो याचा क्षणभर विचार केला आणि लगेच त्याचे उत्तर सापडले.
अगदी समोरच लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान होते आणि तिथे काही बालके खेळणी न्याहाळत होती. मी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि रेहान रेहान म्हणून आवाज दिला असता एका बाळाने मान वळवून माझ्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत ती स्वारी खेळण्यांकडे रमून गेली. कदाचित मी अनोळखी व्यक्ती आणि चेहऱ्यावर मास्क असल्याने त्याची ही प्रतिक्रिया नैसर्गिक होती. मात्र माझ्या मागेच असलेल्या आजीने तिच्या मौल्यवान खजिन्याला लगेच ओळखले, उचलून धरले आणि मायेने कवटाळून टाकले. बाळराजे मात्र आजीने लगबगीने ओढून जवळ घेतल्याने किंचित भांबावलेले होते. किंबहुना त्याच्या दृष्टीने जीव्हाळ्याचा विषय असलेल्या खेळण्यापासून तुटातुट केल्याने थोडेफार नाराज होते.
मात्र आजीबाईला तिचा मायेचा गोळा सापडल्याने सुखावून गेल्या होत्या. डबडबलेल्या डोळ्यांनी ती कृतज्ञतेने माझ्याकडे पाहत नि:शब्द झाली होती. एवढ्यात बाळाचे पालकसुद्धा घामाघूम होत तिथे पोहचले. मात्र बाळाला सुखरूप पाहताच त्यांचाही जीव भांड्यात पडला. वास्तविकत: लहान मुलांना सांभाळणे अत्यंत जिकरीचे काम असते. सार्वजनिक ठिकाणे असो अथवा धार्मिक स्थळे किंवा गर्दीची कुठलीही जागा असो, लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. थोडीशी चुकामूक झाली तरी अनर्थ होऊ शकतो.
या सर्व रणधुमाळीत एक गोष्ट प्रामुख्याने दृष्टीस येते ती म्हणजे विमानतळावर हमखास आढळणाऱ्या मानवी निर्जीव भावनेची. ती आजीबाई सुरवातीपासून बाळाच्या नावाने धावपळ करत असतांना कुणीही तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. किंबहुना ती व्यक्ती संकटात आहे याचे कोणालाही सोयरसुतक नव्हते. जो तो आपापल्या बोर्डींग पास आणि आयडेंटीटी सांभाळण्यात मशगुल होता. एवढ्या श्रीमंत गर्दीत गरीब, दुर्मिळ असलेली माणुसकी हरवली होती. ना कोणी विचारपूस करण्याचे थोडे सौजन्य दाखवले ना कोणी तिला आधार देण्याचे धाडस दाखविले.
एक मात्र खरे, भलेही आपण एखाद्या संकटात प्रत्येक वेळी, प्रत्येकाची मदत करु जरी शकलो नाही तरी कमीतकमी विचारपूस करून त्या व्यक्तीला दिलासा जरूर देऊ शकतो. देव जरी होता आले नाही तर शंकरासमोरचा निमुटपणे सर्व ऐकणारा नंदी जरुर होऊ शकतो. माणुसकी हरवलेल्या गर्दीत आपातग्रस्तांना मार्गदर्शन करण्याचे काम करायला काय हरकत आहे? एरवी विमानतळावर "तोऱ्यात" मिरवणाऱ्यांनी "तोळ्यामासाएवढी" जरी मानवतेची जपवणूक केली तरी तिथे नंदनवन होणे अशक्य नाही. मात्र एवढी भावनिक गुंतवणूक आणि उलाढाल आज दुरापास्त झाली आहे. स्वार्थ आणि आपल्याच कोषात मग्न असणाऱ्यांच्या जगतात माणुसकी नावाचा शब्द शोधूनही सापडेल की नाही याची शंकाच वाटते. हवेत उडण्याची मनिषा बाळगणाऱ्यांनी मानवी मूल्यांची जपवणूक करत पाय जमिनीवर ठेवावे असे याठिकाणी जरूर नमूद करावेसे वाटते.
************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment