Sunday, May 30, 2021

बेबी ऑफ सुकेशिनी अंतिम भाग

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
     *बेबी ऑफ सुकेशिनी, अंतिम भाग*
               *डॉ अनिल पावशेकर*
************************************
रुग्णालयातील अग्नितांडव आता हळूहळू संपुष्टात आले होते. आगीच्या झळांनी स्पेशल न्युबॉर्न‌‌‌ केअर युनिट बेचिराख करून टाकले होते. दरवाजे, भिंती काळवंडल्या होत्या तर जागोजागी अग्निज्वालांचे निशाण आगीची भयानकता दाखवून देत होते. आगीच्या दाहकतेने जळलेली कापडे, वाकलेले वितळलेले फर्निचर रात्रीच्या अप्रिय घटनेचे मुक साक्षीदार होते. त्या वार्डातील एक विशिष्ट गंध आगीच्या क्रुर खेळाची आठवण करून देत होता. जीव वाचलेले रुग्ण देवाचे आभार मानत घरची वाट धरू लागले होते तर बघ्यांची गर्दी हळूहळू पांगायला सुरूवात झाली होती.

तब्बल चार तासांचा जीवघेणा संघर्ष उतरणीला लागला होता. प्रकृतीच्या नित्यनेमाने तांबडे फुटायला सुरुवात झाली होती. बाळांच्या वार्डाचा लेखाजोखा यायला सुरुवात झाली. एव्हाना सुकेशिनी शुद्धीवर यायला लागली होती. अस्पष्ट आरडाओरड, हुंदके, देवाचा धावा तिच्या कानी पडू लागला होता. डोळे किलकिले करून रुग्णालयाकडे बघताच तिची तंद्री भंग पावली. तोपर्यंत सहकारी महिलांनी तिला सांभाळले होते. अग्निशमन दल परतीच्या वाटेवर होते तर पोलिस दलाने रुग्णालयाचा ताबा घेतला होता. अनावश्यक गर्दी हाकलून पोलिसांनी नातेवाईकांना एकत्र केले.

या भीषण अग्निकांडात एकूण दहा बालके मरण पावली होती तर सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. वाचलेल्या बालकांना इतरत्र सुरक्षित हलविण्यात आले होते तर मृत बालकांच्या नातेवाईकांना त्यांची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ओळख निश्चित करुन मातेच्या नावाने पुकारा करण्यात येऊ लागला होता. जसजसे नाव पुकारण्यात येत होते तसतसे रुग्णालयाचा परिसर दुःखावेगाने व्यापून जात होता. प्रत्येक वेळी अनोळखी मातेचा हंबरडा पहाटेच्या भयाण शांततेला चिरत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेत होता.

प्रत्येक नाव पुकारतेवेळी सुकेशिनीचे हात आपोआप जोडले जात होते तर मनोमन आपले नाव न आल्याबद्दल देवाचे आभार मानत होती. मात्र नशिबापुढे कोणाचं चालतं? आता फक्त एक नाव पुकारणे बाकी होते आणि सुकेशिनी अंगातले सर्व बळ एकवटून, कान टवकारुन, डोळ्यात तेल घालून नियतीच्या निर्णयाची वाट बघत होती. आतापर्यंत सामान्य असलेली तिच्या ह्रदयाची धडधड अचानक तीव्र झाली होती, कपाळावर आठ्या पडल्या होत्या तर पुर्ण अंगात कापरे भरायला सुरुवात झाली होती. दोन्ही हातांच्या मुठी गच्च ह्रदयाशी बांधून, श्वास रोखून शेवटच्या नाव पुकारण्याची वाट बघू लागली.

अचानक तिला कानात काल रात्रीच्या तिच्या छकुलीच्या हाका अस्पष्ट,आर्तपणे पुन्हा एकदा ऐकू यायला लागल्या होत्या,, आई मला वाचव, आई मला चटके लागत आहे, आई माझा श्वास कोंडतोय, आई मला जवळ घे. एकाएक काळचक्र कुठेतरी थांबून आपली क्रुर थट्टा करत आहे असा तिला भास झाला. असं काही झालंच नाही याची ती मनाला वारंवार खात्री पटवून देत होती. माझ्या छकुलीचं देव नक्कीच रक्षण करेल यावर तिचा ठाम विश्वास होता. शिवाय इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात आलेल्या आनंदाला कोणीही इतके निर्दयपणे हिसकावू शकत नाही याची तिला खात्री होती.

अखेर तिची प्रतिक्षा संपली आणि एक कर्कश, निष्ठूर आवाज तिच्या कानी पडला,,, बेबी ऑफ सुकेशिनी,, खरेतर हे शब्द कानाद्वारे नाही तर तिच्या ह्रदयाद्वारे ऐकले गेले आणि क्षणार्धात तिच्या आशा आकांक्षा, विश्वासाचा, श्रद्धेचा डोलारा कोसळून पडला. असं होऊच कस शकतं म्हणून ती उसळली आणि नाव पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यावर धावून गेली. मात्र नियतीचा संदेश स्पष्ट होता. काळाचे गणित चुकण्याचा प्रश्नच नव्हता. सुकेशिनीचा गोड संसार उध्वस्त झाला होता. धरणी दुभंगून त्यात समाविष्ट होऊन जावे अशी तिची मनोवस्था झाली होती. आतापर्यंत थोपवून धरलेले अश्रूंचे धरण ओसंडून वहायला लागले होते. वेड्या ममतेने पान्हा झरायला लागला होता.

काही वेळातच अश्रू आटायला लागले, पान्हा सुकायला लागला आणि वेडीपिसी होऊन ती छकुलीच्या नावे टाहो फोडायला लागली होती. कोणाला दोष देऊ,  कोणाला शाप देऊ, तिला काही सुचत नव्हते. तर तिकडे कोणीतरी सुरेशला या ह्रदयद्रावक घटनेची माहिती देताच तो ओक्साबोक्शी रडू लागला. आयुष्यात कधी कोणाचे चुकुनही वाईट केले नसतांना आपल्या नशिबी हा भोग का आला याचेच त्याला वाईट वाटले. साधी टाचणी टोचली किंवा अगरबत्तीचा चटका लागला तरी आपण कळवळून उठतो तर माझ्या छकुलीने हे सर्वकाही कसेकाय सोसले असेल याचा विचार करताच तो कोलमडून पडला.

नेहमीप्रमाणे दुर्घटना झाल्यानंतर जे होते ते इथेही झाले. राजकीय पर्यटनाला उधाण आले. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावे लाखोलाखोंच्या बोली राजकारणी करु लागले. सामाजिक चळवळीतले गिधाडे इथेही स्वार्थीपणे घिरट्या घालायला लागली. कडक कारवाईची आवई उठवण्यात आली. लगेचच बळीचे बकरे शोधायला सुरुवात झाली. एवढ्या मोठ्या दुर्घटनेचे खापर फक्त डॉक्टर, नर्सेस वर फोडण्यात आले. बहुतेकांना केंव्हा एकदा दोन-चार जणांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली जाते याची घाई झाली होती. दुर्घटनेचे मुळ कारण शोधण्यात कोणालाही स्वारस्य नव्हते कारण ते कित्येकांच्या मुळावर आले असते. निलंबन आणि बडतर्फीच्या सोयिस्कर शब्दाखाली दोषयुक्त यंत्रसामुग्री असो अथवा जुगाडी विजयंत्रणा असो अथवा फायर सेफ्टीचे नियम पायदळी तुडवणे असो किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असो, सर्वकाही झाकले गेले.

माध्यमांनी जरूर या घटनेला उचलून धरले, प्रसिद्धी दिली. मात्र त्या कोवळ्या जीवांना जातीपातीचे वलय नव्हते, धर्माची गडद किनार नव्हती, प्रांतवाद, अस्मितेचे वेष्टन नसल्याने ते लवकरच विस्मृतीत गेले. झाले गेले विसरून जग पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच कामाला लागले. मात्र ज्यांनी या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावले त्यांचे दुःख मायबाप सरकारने कागदी नोटांत मोजले. ही घटना सरकारी रुग्णालयात झाल्याने आंदोलनजीवींना याचे फारसे सोयरसुतक नव्हते. शिवाय ज्या राज्यात ही घटना घडली ते राज्य अशा बाजारु आंदोलनाला पोषक नव्हते. गोरगरिबांचे दिपक अकाली मालवून काळ पुन्हा एकदा आपल्या नव्या सावजाच्या शोधात निघाला होता. मात्र जाता जाता या दुर्घटनेत वाचलेल्या सातपैकी एका बाळावर एक महिन्याने काळाने झडप घालून बळीसंख्या अकरावर नेली होती.
************************************
दि. ३० मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Saturday, May 29, 2021

बेबी ऑफ सुकेशिनी भाग ०२

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
       *बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०२*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
खरेतर सुकेशिनी भंडाऱ्यापासून दुरवर खेड्यातील रहिवासी होती. नवरा सुरेश सोबत मोलमजुरी करून दिवस पुढे ढकलत होती. घरी अठराविश्व दारिद्र्य असूनही दोघांचा चांद्रमौळी झोपडीत एकोप्याने संसार सुरू होता. तसेही आपणास गरिबीत एकोपा आणि श्रीमंतीत दुरावा जागोजागी बघायला मिळतो. अर्थातच त्यांच्यावर लक्ष्मी जरी प्रसन्न नसली तरी निसर्गाने आपला प्राकृतधर्म तंतोतंत पाळला होता. पहिल्यांदाच आई होण्याच्या कल्पनेने सुकेशिनी सुखावली होती. तर सुरेश, *नवरा ते बाप* अशा प्रमोशनने मनोमन आनंदी झाला होता.

गावी फारशा आरोग्य सुखसुविधा नसल्याने या जोडप्याने भंडारा गाठले. बाळंतपण सुरळीतपणे पार पडले, सुकेशिनीच्या पोटी भाग्यलक्ष्मी जन्माला आली. मात्र सुकेशिनी आपल्या बाळाला मायेची ऊब देण्यात कमी पडली. यामुळे तिच्या छकुलीला कृत्रिम वातावरणात म्हणजेच इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. अर्थातच तिची बाळाशी जरी ताटातूट झाली असली तरी बाळाच्या भल्याकरीता हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते. तर दुसरीकडे सुरेशला आपल्या कन्येचे केंव्हा एकदा दर्शन घेतो असे झाले होते.

वास्तविकत: *बाप गरीब असो की श्रीमंत, त्याच्यासाठी त्याची मुलगी राजकन्या असते*. तिच्या कोडकौतुकासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. मुलगा जरी वंशाचा दिवा मानला गेला असला तरी घराला घरपण, ममत्व देण्यात मुलींचा हात कोणी पकडू शकत नाही. आजीची आपुलकी,ॠणानुबंध, आईचे वात्सल्य, मावशीची माया,ममता, काकूची कणव, आत्याचा आपलेपणा, बापाची अधिकारवाणी हे सर्वकाही विधात्याने मुलीच्या रुपात समाविष्ट करून तिला तुमच्या पोटी धाडले असते. बापाचा उर्मटपणा कमी करणे असो की भावाला वळण लावणे असो, आईला घरकामात हातभार लावणे अथवा तिला मानसिक आधार देणे असो, हे सर्व गुण मुलींमध्ये उपजत असतात. 

एरवी पाषाणह्रदयी असणारे बाप मुलीच्या लग्नात कोपऱ्यात एकटे डोळ्यांच्या कडा पुसतांना आपण नेहमीच अनुभवतो. शिवाय *कन्यादान करण्याचे महतपुण्य सर्वांनाच लाभते असेही नाही*. सुरेशही आपल्या लाडक्या कन्येच्या स्वागताला उत्सुक होता. कारण त्याच्या दारी लक्ष्मीची चिमुकली पाऊले उमटण्याची पुर्ण तयारी झाली होती. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या हे गुणगुणत तो छकुलीची वाट बघत होता.

मात्र दुसरीकडे *नियती आणि काळाची अभद्र युती झाली होती.*   छकुलीची प्रकृती झपाट्याने सुधरत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सुकेशिनीला बाळासहीत सुट्टी होणार होती. केवळ आजची रात्र कशीबशी काढायची असल्याने ती निश्चिंत होऊन झोपायला गेली होती. मात्र मध्यरात्रीला अनाहुत चाहूल लागल्याने ती दचकून जागी झाली होती. काळाचा भास झाल्याने ती मनोमन हादरली होती. कोणीतरी तिची आणि छकुलीची ताटातूट करत आहे याची अनामिक भिती तिच्या मनात घर करून गेली होती. कडाक्याच्या थंडीतही ती भितीपोटी घामाने डबडबून गेली होती. मात्र अंथरुणात पडून राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

तर काळाने आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला होता. स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट आणि तिथली ३६ बेड त्याचे लक्ष्य होते. सुदैवाने तिथे केवळ सतरा बालके उपचार घेत होती. मात्र काळाला सतरा काय आणि छत्तीस काय, कशाशी देणेघेणे नव्हते. त्याने वार्डात नजर टाकली, त्या सतरा कोवळ्या जिवांशिवाय तिथे कोणीही नव्हते. ना डॉक्टर ना नर्सेस. तिथे बिनधास्तपणे वावरत काळाने आपली क्रुर योजना आखली. ना तिथे त्याला आडकाठी करणारे, टोकणारे कोणी होते, ना आपात्कालीन प्रसंगी बाळांच्या मदतीला कोणी धाऊन येणारे होते. आपली कामगिरी किती चोख आणि अचूक असते याची काळाला खात्री पटली होती. अखेर घड्याळाने मध्यरात्रीचा दोन वाजण्याचा टोला देताच काळ भानावर आला, त्याने आपले *मिशन स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट* तडीस न्यायला सुरूवात केली.

हळुवारपणे तो एका इनक्युबेटरच्या वार्मरमध्ये शिरला. आपल्या प्रभावाने त्याने ज्वाळा निर्माण केल्या आणि कोवळी पाती, रोपटे अमानुषपणे करपण्यास सुरूवात झाली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर अग्नी नंतर धुरावाटे त्याने कोवळ्या जिवांचा श्वास रोखायचा प्रयत्न केला. सकाळपासून ओव्हरहिटींग झालेले इन्क्युबेटर काळाची साथ लाभताच धडाडून पेटू लागले. कोवळ्या जीवांना वाचविण्याचे प्रण घेतलेले *इन्क्युबेटर कोवळ्यांचाच कोळसा करू लागले*. अर्थातच ते हतबल, असहाय हाडामांसाचे इवलेसे, निष्पाप गोळे बलाढ्य काळाचा प्रतिकार करणे शक्यच नव्हते. शिवाय कच्याबच्च्यांचा रडण्याचा आवाज तरी किती असणार? काळाने छद्मी हास्य करत आपली दुष्ट कामगिरी फत्ते झाल्याची खात्री केली. जाता जाता आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून शॉर्ट सर्किटचा आभास निर्माण करून तो हळूच पसार झाला.

एव्हाना आगीने आपले रौद्ररूप धारण केले होते. इतरांना याची खबरबात लागताच एकच हलकल्लोळ माजला. पहिल्या मजल्यावरील आगीने इतरत्र डोकावणे सुरू केल्याने *जो तो जीव मुठीत धरून धावायला लागला*. प्रचंड अफरातफरी माजल्याने अर्धवट झोपेत असलेल्या सुकेशिनीला जाग आली. ती सुद्धा इतरांसारखी देवाचा धावा करत तळमजल्यावर आली. मात्र शेवटच्या पायरीवर ती थबकली, लगेच भानावर आली, आपली छकुली कुठे आहे, ती सुरक्षीत तर आहे ना, तिला काही झालं तर नाही ना? अशी एक ना असंख्य प्रश्नांची मालिका तिच्या डोक्यात घर करु लागली. मात्र तिला उत्तर तरी कोण देणार होतं? रुग्ण, नातेवाईकांच्या लोंढ्याने तिला फरफटत बाहेर ढकलले होते. 

अखेर ठेचाळत, पडझड करत ती रुग्णालयाच्या पटांगणात आली. लगेच तिची नजर पहिल्या मजल्यावर जाताच तिची वाचा बंद पडली. रात्री काळोखाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळा भयानकपणे उठून दिसत होती. मधातच धुराचे लोंढे आकाशी झेपावत होते. रुग्णांच्या अगतिक, असहाय्यपणे रडण्याने आसमंत दणाणून गेला होता. आत जावे म्हटले तर ना तेवढे त्राण तिच्या शरीरात उरले नव्हते ना आत जायचा मार्ग तिला सुचत होता. अग्निशमन दलाचे जवान आणि उपस्थित लोकांनी क्रुर आगीशी झुंजत काहींना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. बाहेर काढलेल्या प्रत्येकावर सुकेशिनी आशाळभूतपणे नजर टाकत होती. मात्र तिची छकुली तिच्या नजरेस पडत नव्हती. इतक्यात पहिल्या मजल्यावरून कोणीतरी ओरडले,,, *बच्चे जल गये* आणि हे ऐकताच सुकेशिनीची शुद्ध हरपली.
क्रमशः,,,,
--------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
सत्यघटनेवर आधारित या लेखात पात्रांची नावे काल्पनिक आहेत.
*************************************
दि. २९ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Friday, May 28, 2021

बेबी ऑफ सुकेशिनी भाग ०१

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
       *बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०१*
                *डॉ अनिल पावशेकर*
************************************
साल २०२१, दि. ०९ जानेवारी, स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आणि वेळ होती मध्यरात्रीची. मार्गशीर्ष अमावस्या तोंडावर आली होती आणि क्रुर काळ आपल्या सावजासाठी टपून होता. सर्वकाही शांत होताच काळाने वैनगंगेचे पात्र ओलांडून भंडारा शहरात प्रवेश केला होता. महामार्गावरील तुरळक वाहतूक वगळता तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर निद्रादेवीच्या अधीन झाले होते. काळ झपाझप पाऊले टाकत आपल्या लक्ष्याकडे निघाला होता. मार्गातील पिंपळ, चिंचेचे मोठाले वृक्ष आणि त्यावरील अतृप्त आत्मे काळाच्या दहशतीने गारठून गेले होते.

मात्र मानवाचे विश्वासू मित्र असलेले शहरातील श्वान काळाच्या मार्गात खोडा बनून उभे राहिले होते. आपल्या भेसून ओरडण्याने ते इतरांना सावध करत होते. तसेही एवढ्या काळकुट्ट रात्री, कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे रूदन ऐकायला रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. सर्वकाही सारीपाट काळाच्या मर्जीनुसार आखाला गेला होता. आपले सावज नजरेच्या टप्प्यात येताच काळ क्षणभरासाठी थबकला. एक जळजळीत कटाक्ष त्याने भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयावर टाकला. आपल्या कामगिरीची परत एकदा उजळणी केली आणि मोहीम फत्ते करायची मनोमन तयारी केली.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळूराम नावाचा पहारेकरी पेंगत होता. मात्र मानवाच्या सुरक्षेच्या कल्पना किती तुच्छ आणि तकलादू आहेत हे पाहून काळाने मनोमन स्मित केले. काळूरामला कोणीतरी आत शिरल्याचा भास झाला मात्र झोपेच्या तंद्रीत तो अरिष्ट ओळखू शकला नाही. काळाने आकस्मिक कक्ष न्याहाळला मात्र तिथे सगळं सुनसान होतं. वर्हांड्यातून समोर जाताच त्याला पुरुष रूग्णांच्या वार्डात काही वृद्ध, अगतिक, दुर्धर व्याधींनी ग्रस्त, प्राणांतिक वेदनेने तडफडणारे रुग्ण त्याची डोळ्यात तेल घालून वाट पाहतांना आढळले.

मात्र काळाची आजची निवड जगावेगळी होती. शस्त्रक्रिया वार्डातही फारसे वेगळे चित्र नव्हते. कित्येक रुग्ण आपला नंबर कधी लागणार यासाठी ताटकळत पहुडले होते तर शस्त्रक्रिया झालेल्यांना घरादाराची ओढ लागली होती. ऑर्थोपेडीक वार्डातील एकंदरीत परिस्थिती पाहता मानवाला जगण्यासाठी कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते याची काळाला कल्पना आली. सृष्टीकर्त्याच्या रचनेला मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने कितीही वाकुल्या दाखवल्या असल्या तरी विज्ञान आपलं अजुनही काही वाकडं करू शकत नाही हे समजल्याने काळाची मान गर्वाने आणखी उंचावली. कारण आज काळही आला होता आणि वेळही आली होती.

तळमजल्यावर फेरफटका मारल्यावर काळाने पहिल्या मजल्याकडे वाट धरली. खरेतर हाच पहिला मजला त्याची युद्धभूमी होती. तसेही सरकारी दवाखाने काळासाठी अपरिचित तर नव्हतीच. शिवाय इथे कितीही  धुमाकूळ घातला तरी बोलणारे कोणीही नव्हते. सोबतच मृत्युचे सरकारी सापळे बिनदिक्कतपणे तिथे पहिलेच स्थिरावले होते. गरज होती फक्त एका निमित्ताची, केमीकल रिॲक्शन सुरू व्हायची. अखेर पहिल्या मजल्यावर येताच काळाचे काऊंटडाऊन संपले. आता फक्त त्याला महिला, माता वार्ड ओलांडायचा होता. मात्र इथेच काळाची चाल मंदावली होती. त्याने स्मृती जागवताच भुतकाळात कुठेतरी स्त्री शक्तीने आपणास हतबल केले होते याची त्याला जाणीव झाली.

माता वार्डातही सामसूम होती. मात्र त्याची नजर सुकेशिनी वर पडताच काळ थोडा थबकला. एक अनामिक भावनेने त्याच्या पायाला ब्रेक लागले होते. कधी नव्हे ते आज या भयाण रात्री काळाची पाऊले जड झाली होती. फिक्कट पिवळ्या प्रकाशातही त्या माऊलीच्या तेजस्वी चेहऱ्याने काळाचा मार्ग रोखला होता. मात्र त्या माऊलीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे या कल्पनेने खुद्द काळही शहारला. आपल्या हस्ते कोणते पातक होणार आहे याची जाणीव होताच त्याला स्वतःला लाज वाटली. पहिल्यांदाच काळाच्या काळजाला भोके पडली होती. काळाचे क्रुर हात, राक्षसी पाऊले आणि निष्ठूर मन त्याच्याशी आज बंडखोरीच्या पावित्र्यात होते.

इकडे काळाच्या काळजात घालमेल सुरू होती तर तिकडे सुकेशिनीला तिचे अंतर्मन काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल देत होते. तरीपण ती निश्चिंत होती. आपल्या नवजात बाळासाठी तिचा पान्हा अहोरात्र झिरपत होता. मात्र तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. झोपेत असुनही तिला आपल्याकडे कोणीतरी नजर रोखून पाहत असल्याचा भास झाला आणि खाडकन तिला जाग आली. मान वळवताच कोणीतरी वर्हांड्यातून आपल्याला न्याहाळते आहे असे वाटले. मात्र डोळे फाडून पाहिले असता तिथे कोणीही नव्हते. आजुबाजुला नजर फिरवताच इतर माता पांढऱ्याशुभ्र बिछान्यावर लाल ब्लॅंकेट ओढून निजलेल्या दिसल्या. मनाची कशीबशी समजूत घालत ती पुन्हा एकदा बिछान्यात शिरली. इतक्यात हळुवारपणे तिच्या कानात तिच्या छकुलीचा क्षीण,आर्त आवाज घुमला, "आई मला वाचव, आई मला वाचव".
क्रमशः,,,,,
--------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
*लेखातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.*
*************************************
दि. २८ मे २०२१ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Monday, May 24, 2021

सुशीलकुमार, पोलादी तन अपराधी मन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
 *सुशीलकुमार, पोलादी तन अपराधी मन*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
साल २००८, स्थळ बिजींगचे नॅशनल स्टेडियम आणि निमित्त होते ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धेचे. अर्थातच ऑलिंपिक खेळणे येरागबाळ्याच काम नव्हे कारण हे एकप्रकारचे जागतिक बॅटल विदाऊट बुलेट असते. वर्षानुवर्षाची तपस्या, प्रचंड ढोरमेहनत, कमालीची चिकाटी, एकाग्रता, संयम आणि पराकोटीच्या देशाभिमानाची ही कसोटी असते. यातच आपला देश पदकांच्या बाबतीत नेहमीच दारिद्र्यरेषेखालील असल्याने देशवासियांना पदकाचे कमालीचे आकर्षण असते. याच पदक तृष्णेला तृप्ततेचा पहिला घोट खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकला ब्रॉंझ पदकाने पाजला होता.

मात्र यानंतर तब्बल ५६ वर्षांनंतर कुस्तीत ऑलिंपिक पदकाचा दुष्काळ संपण्याची सुचिन्हे दिसू लागली होती. संपूर्ण भारतीयांच्या नजरा बिजींगच्या नॅशनल स्टेडियमवर लागल्या होत्या आणि एक भारतीय गजराज आपल्याच ढंगात, मदमस्त चालीने कुस्ती आखाड्याकडे मार्गक्रमण करत होता. भारदस्त पिळलेले शरीर, निरागस चेहऱ्याने, अस्सल गावरानी ढंगात ही स्वारी इतिहास रचायला चालली होती. खरेतर या पठ्ठ्याच्या रुपाने तमाम भारतीयांच्या आशा आकांक्षा इच्छापूर्ततेकडे मजल दर मजल करत होत्या. अखेर या गड्याने देशवासीयांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि प्रतिस्पर्ध्याला लिलया लोळवत भारतमातेच्या चरणी कुस्तीतले दुसरे ऑलिंपिक पदक अर्पण केले.

बिजींगमध्ये भीमपराक्रम करणाऱ्या या खेळाडूचे नाव होते सुशीलकुमार. नजफगढ, दिल्लीत जन्मलेला या छोट्या भीमने देशात कुस्तीला लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षापासून पहेलवानी आणि आखाडा हेच त्याचे आयुष्य होते. गुरू सतपाल यांचा परिसस्पर्श होताच सुशीलकुमारने मागे वळून पाहिले नाही. अवघ्या १५ व्या वर्षी म्हणजेच १९९८ ला वर्ल्ड कॅडेट गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भक्कम ताकद, चित्याची चपळता, कमालीची एकाग्रता आणि संयमतेला पूरक आक्रमकतेची जोड लाभल्याने तो अजेय योद्धा ठरला होता.

सुशीलकुमारचा धडाडा ऑलिंपिक, आशियाई खेळ, कॉमनवेल्थ गेम्स असो की जागतिक स्पर्धा असो चांगलाच गाजत होता. आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्याने एकंदरीत दहा सुवर्णपदक, दोन रजत आणि चार कांस्यपदकांची लयलूट केली. पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुरस्कार त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागले होते. खेळातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासोबतच अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने तो गौरवीला गेला. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुशीलकुमारने असामान्य कामगिरी करत सर्वांना चकित केले होते. या कामगिरीने लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरत होती.

मात्र बळ आणि उन्माद ही लक्ष्मीची बाळं आहेत हे विसरून कसे चालणार? ज्या छत्रसाल स्टेडियमपासून त्याची कारकीर्द सुरू झाली तेच ठिकाण त्याची कारकीर्द संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरले. यश मिळवणं सोपं असतं मात्र यश पचवणं फार कठीण असतं. नेमकं हेच सुशीलकुमाच्या बाबतीत घडलं. पहेलवान सागर धनकरच्या खुनात सुशीलकुमारचे हात रंगलेले आहेत असा त्याच्यावर आरोप आहे. आरोप होताच सुशीलकुमार फरार झाला आणि त्याच्यावरील संशय आणखी बळावला. इंडीयाज मोस्ट सक्सेसफुल रेसलर ते इंडीयाज मोस्ट वॉन्टेड रेसलर व्हायला वेळ लागली नाही.

कधीकाळी बक्षिसे आणि इनामांच्या राशीत लोळणारा हा पहेलवान एक लाखाचा इनामी अपराधी होऊन बसला होता. पोलादी तन आणि अपराधी मनाचा हा धनी क्षणार्धात होत्याचा नव्हता झाला आहे. कधीकाळी गर्वाने अंगाभोवती तिरंगा ओढणारा हा व्यक्ती अपराध्यासारखा तोंडाला टॉवेल गुंडाळून पोलिसांच्या गराड्यात पडला आहे. तिरंगा ते तौलीया हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच वेदनादायी, क्लेशकारक असणार. मात्र सलमान असो की सुशीलकुमार कायद्यापुढे ते आज गुन्हेगारच आहेत. ज्या मातीने त्याला फर्श ते अर्श पर्यंतची यात्रा घडवून आणली, त्याने आपल्या मस्तीने त्याच्या आयुष्याची माती करून टाकली आहे.

२०१० कॉमनवेल्थ गेम्सला क्विन बॅटन रिले प्रिन्स चार्ल्सला देणारा आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवहन करणारा हा खेळाडू बेड्यात अडकल्याचे पाहून त्याचे चाहते नक्कीच हळहळले असणार. मात्र नायक ते खलनायक या प्रवासाला तो स्वतः जबाबदार आहे. उद्या कदाचित तो न्यायालयातून निर्दोष सुटेलही. मात्र यानिमित्ताने त्याच्या आयुष्यावर या घटनेचा बट्टा जरुर लागला आहे. दाग अच्छे है हे जाहिरातीत ऐकताना कितीही चांगले वाटत असले तरी खऱ्याखुऱ्या आयुष्यात ते किती वेदनादायी असते हे एव्हाना माउंटन ड्यू, आयशर ट्रॅक्टर आणि अंड्यांची जाहिरात करणाऱ्या सुशीलकुमारच्या ध्यानात आले असेलच.

खरेतर २३ मे हा दिवस जागतिक कुस्ती दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याच दिवशी भारताच्या ख्यातनाम कुस्तीपटूला गजाआड व्हावे लागले. किती हा दुर्देवविलास. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या गेलेल्या छत्रसाल स्टेडियमवरच सुशीलकुमारने आदी आणि अंताचा अनुभव घेतला आहे. वेळेपेक्षा कोणताही मोठा पहेलवान नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कधीकाळी कुस्तीप्रेमींच्या गळ्यातला ताईत असणारा सुशीलकुमार कायद्याच्या जाळीत पाहून कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असे म्हणावेसे वाटते.
***********************************
दि. २४ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Wednesday, May 12, 2021

प.बंगाल, पॅलेस्टाईन आणि पुतनेचा पान्हा

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*प.बंगाल, पॅलेस्टाईन आणि पुतनेचा पान्हा*
               *डॉ अनिल पावशेकर*
************************************
दिल्लीपासून जेरूसलेम जवळपास चार हजार किमी तर कोलकाता दिड हजार किमी अंतरावर आहे. मात्र आठवडा उलटूनही ज्यांना बंगालमधील रक्तरंजीत हिंसाचार दिसला नाही त्यांना जेरुसलेमच्या बातमीने अस्वस्थ केलेले आहे. अर्थातच अमेरिका असो वा इजरायल, शत्रुंचा बंदोबस्त कसा करायचा हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. शिवाय असे धाडसी निर्णय घेतांना मानवाधिकार, सर्वधर्मसमभावाला फाट्यावर कसे हाणायचे याची त्यांना चांगली जाणीव आहे. सोबतच युनो अथवा जग काय म्हणेल याची तमा न बाळगता ते एखाद्या कॉम्प्युटरलाही लाजवेल इतक्या चोखपणे हिशोब चुकता करतात.

झाले काय तर ममतांनी बंगाल काबिज करताच ममतांच्या गुंडांना आकाश दोन बोटे उरले आणि त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची बोटी बोटी करणे सुरू केले. राजकीय विरोधकांचा खात्मा करण्याच्या इर्षेने पेटलेल्या ममतांना आवरणारे तिथे कोणीही नव्हते. शिवाय असा हिंसाचार सरकार प्रायोजित असल्याने तिथल्या हिंदूंना कुणीही वाली उरला नव्हता. संपूर्ण देश ममतांच्या या क्रुरतेपुढे हतबल झालेला दिसत होता. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, महिलांवरील अत्याचार, लुटपाट आणि जाळपोळीबाबत कुठेही ब्र काढला जात नव्हता. याला कारणही तसेच होते.

कुठल्याही घटनेला राजकीय आणि जातीधर्माच्या चष्म्याने पाहिले जात असल्याने हिंदूंवरील अत्याचार मिडीया आणि तथाकथित सेक्युलर मंडळींच्या खिजगणतीतही नव्हता. याउलट मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना रक्तरंजित ममतांच्या रूपात कुणाला वाघीण तर कुणाला झाशीची राणी दिसायला लागली होती. मानवतेचा मुडदा पडत असताना असल्या मुर्दाडांना भाजपा पराभवाचा विकृत आनंद लपवता येत नव्हता. तसेही हिंदूंच्या हत्या मिडीयाच्या दृष्टीने टीआरपी योग्यतेच्या नसल्याने वेगळे काही सांगायची गरज नव्हती.

एरवी देशात कुठेही खुट्ट झाले तरी उर बडवणारे यावेळी धर्मनिरपेक्षतेच्या उशीखाली मुंडके घालून झोपले होते. अखलाख, तबरेजच्या वेळी कंठ दाटून येणाऱ्यांना बंगालच्या हत्याकांडाने गुदगुल्या होत होत्या. बॉलिवूड गॅंग सोबतच जेएनयूछाप लालमाकडे असो अथवा चोपूनचापून साडी नेसलेली बिंदी गॅंग असो बंगालबाबत कोणालाही सोयरसुतक नव्हते. केंद्रासाठी बंगालची परिस्थिती म्हणजे धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी झाली होती. अखेर भाजपला मतदान केल्याची फारमोठी किंमत हिंदूंना चुकवावी लागली होती.

कसेबसे बंगाल थोडेफार शांत झाले आणि तिथल्या हिंदूंनी निःश्वास सोडला. मात्र दोन-चार दिवस उलटले तोच इजरायल पॅलेस्टाईन संघर्षाची खबरबात इथे येऊन धडकली आणि तमाम पुरोगाम्यांचा कंठ दाटून आला. सेव्ह गाझाची भुताटकी पुन्हा एकदा उफाळून आली आणि देशात मानवतेचे ढोंगी पुजारी जीवंत आहे याची जनतेला खात्री पटू लागली. बंगाल प्रकरणी सुखात्मे असलेले अचानक दुखात्मे होऊन तडफडू लागले. यातच भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्वीटरवर आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. देशबांधवांचे अश्रू ज्यांना दिसले नाही त्यांना सातासमुद्रापार धर्मबांधवांचा टाहो लगेचच कानी पडला याचे आश्चर्यच वाटते.

अर्थातच अशी परिस्थिती अथवा असला दुटप्पीपणा पहिल्यांदाच अनुभवायला येतोय असे अजिबात नाही. देशविरोधात कट कारस्थाने करणारा याकुब असो वा अफजल गुरु, काश्मीरात लष्कर, पोलीसांवर हल्ले करणारे बुरहान वाणी असो वा रियाझ नायकू,, यांच्या आतंकी कारवाया लक्षात न घेता निव्वळ त्यांच्या धर्मापोटी त्यांचे निर्लज्ज समर्थन करणारे नराधम इथल्या मातीत निपजलेच कसे याची खंत वाटते.  बंगालमध्ये मानवतेची हत्या, धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या आणि सर्वधर्मसमभावाची खांडोळी होत असतांना जे तोंडात मिठाची गुळणी घेउन बसले होते तेच पॅलेस्टाईन प्रकरणी तोंड फाडून विलाप करताना पाहून यांची कळवळ किती तकलादू आहे याची खात्री पटते.

निश्चितच प.बंगाल असो की पॅलेस्टाईन अथवा गाझा पट्टी,,मानवतेची जपवणूक व्हायलाच हवी. त्यात धर्माधारीत भिंती यायला नको. मात्र केवळ एकांगी भूमिका घेऊन किंवा मानवतेच्या पारड्यात केवळ एका धर्मालाच झुकते माप देऊन कसे चालणार? अर्थातच आपल्याकडे धर्मांधांना कुरवाळणे म्हणजेच पुरोगामीत्व असले तरी बाकी देशांनी डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही. आतंकी असो वा कुरापत करणाऱ्यांना कशी ट्रिटमेंट द्यायचे याचे उदाहरण अमेरिका, इजरायल सातत्याने देत आहेत. यामुळेच पॅलेस्टाईन प्रकरणी पुतनेचा पान्हा फुटलेल्यांनी कमीतकमी धर्मबांधवांसोबतच देशबांधवांच्या वेदना जाणून घेतल्या असत्या तर ना ते एकटे पडले असते ना त्यांच्यावर टीका झाली असती.
*************************************
दि. १२ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...