@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*आर्यन बन गया जंटलमॅन*
*************************************
०२ ऑक्टोबर, खरेतर हा दिवस ड्राय डे असतो मात्र यावर्षी हा दिवस ड्रग्जच्या एका अप्रिय घटनेचा साक्षीदार ठरला. झाले काय तर बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुखचा पुत्र अमली पदार्थांच्या जाळ्यात फसला आणि देशभरात एकदम हायतौबाचे वातावरण तयार झाले. मुख्य म्हणजे यात मौका मौका करणारी बॉलिवूडची खानावळ आणि त्यांची पिलावळ यांची अवस्था पाहण्यासारखी होती. शाहरुख म्हणजे जणुकाही नैतिकता, आध्यात्म, आदर्शाचा अमर्त्य पुतळा असून जर तो चुकू शकत नाही तर त्याच्या राजपुत्राला भारतीय कायदेकानून कसे काय लागू होतात यासाठी काहींनी जिवाचा आटापिटा सुरू केला. मग तो बिईंग ह्युमन असलेला सलमान असो की खलनायक संजय दत्त असो अथवा ३७० छाप मेहबूबा मुफ्ती असो.
खरेतर यात केवळ आर्यन खान नव्हे तर डझनभर नशेबाज पकडले गेले. मात्र कानून के लंबे हात गुन्हेगारांपर्यंत पोहोचताच नेहमीप्रमाणे जातपातधर्माची भुताटकी कबरीतून बाहेर आली. काय म्हणे तर आर्यन निर्दोष असून त्याला त्याच्या धर्मामुळे गुंतवण्यात आले. काय म्हणावे या अधम पणाला. आर्यनच्या धर्मासाठी टाहो फोडणाऱ्यांनी अटकेत असलेले इतर दोषी धर्म पाहून अडकले की गुन्ह्यामुळे अडकले यावर विचार करायला पाहिजे. पापं करतांना, मस्तीत हुंदडतांना कानूनकायदे पायदळी तुडवायचे आणि बेड्या पडताच धर्माची आठवण कशी काय होते? आर्यनचे पाय पाळण्यात असतांनाच शाहरुखने एका मुलाखतीत माझ्या मुलाने उलाला उलाला करावे, बिनधास्त जगावे सारखी मुक्ताफळे उधळली होती. मात्र हिच अधर्माची उधळी स्वतःचे घर पोखरायला लागली तर मिरची का झोंबली असावी ?
अर्थातच आपण बॉलिवूडचे बादशाह आहोत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही या गुर्मीत किंग खान होता. मात्र कायद्याच्या दृष्टीने बडे मियां असो की छोटे मियां असो, गुन्हेगार तो गुन्हेगारच असणार आणि झालेही तसेच. वास्तविकत: धर्माचा बागुलबुवा उभा करून नामानिराळे राहण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुलं पालकांचं अनुकरण करतात. पालक काय सांगतात यापेक्षा पालक कसं वागतात याचा प्रभाव मुलांवर जास्त पडत असतो. ज्या वयात आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावे, त्या वयात शाहरुखने आपली मध्ययुगीन जनानखानी मानसिकता आर्यनबाबत बोलून दाखवली होती. मग जे पेराल तेच उगवले तर इतकी आदळआपट करण्यात काय फायदा?
चिड या गोष्टीची येते की एका अपराध्याला सावरण्यासाठी बॉलिवूड आणि इतरही फुटकळ नेते आपली ताकद का खर्च करत आहे? नवाब मलिकांसारखे नेते तर चक्क एनसिबीच्या कारवाई वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र भक्कम पुरावे असल्याशिवाय एवढी धडक कारवाई शक्य नाही. आता तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. निश्चितच एक पिता म्हणून शाहरुखचे दुःख शाहरुखलाच माहीत असणार. मात्र आपल्या लाडक्यासाठी मन्नत ते जन्नत चा जो मार्ग त्याने निवडला तो व्हाया एनसिबी कोठडीतून जातो हे एव्हाना त्याला कळून चुकले असेल. शिवाय यापुढे धर्माची ढाल घेऊन कायद्याला वाकुल्या दाखवता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. एवढेच कशाला धर्माचा फाजिल उदोउदो केला तर अमेरिकेत विमानतळावर उबडे करून घुबडे ठेचण्यात येतात हे शाहरुखशिवाय आणखी कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकणार नाही.
शाहरुखने आर्यनला जी शिकवणी दिली ते पाहता "बापू सेहतके लिये तू तो हानिकारक है" असे आर्यन नक्कीच म्हणत असणार. आर्यन बेटा तुला भाटमंडळी जरी जंटलमॅन ठरविण्याचा प्रयत्न करत असतील तरी तुझे निर्दोष असणे एक 'चमत्कार' ठरेल. 'किंग अंकल'चा तू 'रईस' बेटा असल्याने बहुदा 'चलते चलते' या कटकटीतून बाहेर पडशील. मात्र बाजीगरचा जमाना दिवाना आहे, तुला स्वदेश असो की परदेश, आपल्या कृत्याबद्दल कभी खुशी कभी गम वाटणारच. यापुढे ड्रग्जचे नाव काढले तरी जोश मध्ये येऊ नको. कॉर्डेलिया असो की चेन्नई एक्सप्रेस, तू दिल से ड्रग्जला नकार दे. भलेही तुझे मन कभी हां कभी ना म्हणेल, मात्र आजची तुझी अवस्था दिल तो पागल है सारखी झाली आहे.
कदाचित तुला अटक होताच कित्येकांनी मै हूं ना म्हणून धीर दिला असेल परंतु हे डुप्लीकेट लोक प्रकरण अंगावर येताच वन टू का फोर झाले असणार. अर्थातच या दैन्यावस्थेत तू आणि तुझे कुटुंबीय कितीही ओम शांती ओम म्हणत असतील तरी जब तक है जान पर्यंत हे ड्रग्जचे लचांड तुझी पाठ सोडणार नाही. भलेही शाहरुखचे दिलवाले फॅन त्याच्यावर कितीही मोहोब्बते करत असतील तरी दिलवाले ड्रग्ज ले जायेंगे हे ना डॉन ला पसंत आहे ना बिल्लू बार्बरला. राम जाने तुझे हे नष्टचर्य केंव्हा संपेल परंतु कल हो ना हो तू यातून जरूर बाहेर पडशील. खरोखरच तुझ्या पालकांनी तुला योग्य वळण लावले असते तर आज तुरुंगात पालक भात खायची वेळ तुझ्यावर आली नसती. तुला अटक झाली आणि ड्रग्जची भयानकता जनतेसमोर आली अन्यथा या विषवल्ली ने घर घरसे आर्यन निकलेगा अशी स्थिती निर्माण झाली असती.
शेवटी काय तर तुझ्या कृत्याचा काय अंजाम होईल हे कळण्याइतपत तुझं वय नक्कीच होतं. मात्र माय नेम इज खान ने त्यावर पांघरूण घातले होते. तरी पण तुझ्या साठी डिअर जिंदगी आजही हात पसरून उभी आहे. तुझ्या सारखे कित्येक करण अर्जून यात लिप्त आहेत. मात्र आयुष्याचा कोयला करण्यापेक्षा आलेल्या संकटाला यस बॉस म्हणून तू सामोरे जा. झालेल्या चुका टाळून तुझ्या आयुष्यात हॅपी न्यू इयर नक्कीच येईल. तोवर रिल लाईफ आणि रिअल लाईफ यातला फरक तू समजून घे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, मात्र यातून सावरत, सुधरत तू फिर भी दिल है हिंदुस्तानी जरूर दाखवू शकतो. शाहरुखच्या राजूप्रमाणे, आर्यन तू सुद्धा जंटलमॅन बनू शकतो.
*************************************
दि. १२ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment