@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*वो इस काबील थे ही नहीं*
************************************
दि. १७ ऑक्टोबर २०२१, रविवार, स्थळ होते अल अमीरात क्रिकेट मैदान,ओमान आणि निमित्त होते स्कॉटलंड विरूद्ध बांगलादेश टी ट्वेंटी लढतीचे. सुपर फेरीत पोहचण्याकरीता बांगलादेशला हा सामना जिंकून स्पर्धेत पुढील प्रवास सुखकर करता आला असता. मात्र नवख्या स्कॉटीश संघाने बांगलादेशच्या नाकी नऊ आणत जोरका धक्का धिरे से दिला आहे. "स्कॉटीश सुरी ने ढाक्याची मलमल" अवघ्या सहा धावांनी कापत या विश्वचषकातला मोठा उलटफेर घडवून आणला आहे. मायदेशी आखाडा खेळपट्टीवर कांगारू, किवी संघाला लोळवत जे पुण्य बांगलादेश संघाने कमावले होते, ते अचानकपणे या सामन्यात गमावले आहे.
खरेतर कोणताही खेळ म्हटले की हारजीत तर आलीच. मात्र विजयी होताच बांगलादेश संघात, त्यांच्या पाठीराख्यांत उन्माद आणि कुरापतखोरपणा उफाळून येतो. यामुळेच हा संघ कुठेही पराभूत झाला तर भारतीय क्रिकेटरसिकांचे मन उचंबळून येते. विशेषतः टीम इंडियाला बांगलादेशी संघाच्या गैरवर्तनाचा अनेकदा फटका बसला आहे. या वादाची सुरूवात २००७ ला विंडीजच्या विश्वचषकात झाली होती. टीम इंडियाला साखळी सामन्यात बांगलादेशने पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र यानंतर त्यांचा तत्कालीन कर्णधार हबीबूल बशरने टीम इंडियाबाबत जे मुजोर वक्तव्य केले होते, ते भारतीयांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.
टीम इंडियाच्या पराभवाबाबत हबीबूल बशरने म्हटले होते की "वो इस काबील थे ही नहीं". एका विजयाने बांगलादेशचे विमान हवेत उडले होते. मात्र यानंतर भारतीय संघानेही बांगलादेश संघाला "उठता लाथ बसता बुक्की" दिलेली आहे. मात्र या संघाचे नेहमीप्रमाणेच "गिरे भी तो टांग उपर" राहीली आहे. २०१५ ला ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात रोहीतला नाबाद देताच बांगलादेश संघाने बरीच आदळआपट केली होती. एवढेच नव्हे तर यानंतर बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंचे अपमानास्पद होर्डींग्ज पण जागोजागी लावले होते. धोनीचे शीर हातात घेऊन असलेला वेगवान गोलंदाज टस्कीन अहमदचे होर्डींग्ज हे तर त्यांच्या निचपणाचा कळस होता. शिवाय भारतीय पाठीराख्यांना मारहाण पण करण्यात आली होती.
२०१८, श्रीलंका इथल्या निडहास चषकात बांगलादेश संघाचा हिडीसपणा अवघ्या जगाच्या नजरेखालून गेला होता. लंकेविरूद्ध भर सामन्यात पंचांविरुद्ध राडा करणे असो की नागीन डान्स करणे असो. बरे झाले अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने धुंवाधार फलंदाजी करत या नागीनला ठेचून काढले होते. जय पराजयाच्या आडून आपला उर्मटपणा आणि बेशिस्तीमुळे हा संघ नेहमीच खेळभावनेचा अनादर करत राहीला आहे. मग ते मुस्तफिजूर रहमानने धोनी आणि भारतीय संघाची खिल्ली उडवणे असो की ज्युनिअर विश्वचषकात भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून जाणे असो. नुकत्याच झालेल्या ढाका प्रिमीअम लिगमध्ये आयसीसी टॉप रॅंकींगच्या शाकीब अल हसनने मनाविरुद्ध निकाल मिळताच स्टंपला लात मारणे, पंचांना शिविगाळ करण्याचा अधमपणा केला होता.
वास्तविकत: तुम्ही किती गुणवंत आहात, किती डिग्र्यांचे भेंडोळे तुमच्याकडे आहे, मैदानावर किती कौशल्य दाखविता, जोपर्यंत तुमच्या कामगिरीला विनयाची जोड नाही तोपर्यंत सगळे मातीमोल आहे. "विद्या विनयेन शोभते" म्हणतात ते याचकरीता. याबाबतीत सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे आदर्शाचे मुर्तिमंत उदाहरण आहेत. २०१८ ला रशियातल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात जेतेपद जरी फ्रांस संघाने जिंकले असले तरी जपान संघाने सर्वांची मने जिंकली होती. जपानचा संघ असो की त्यांचे पाठीराखे असो, आपली सभ्य वर्तनुक,आपले वास्तव्याचे ठिकाण आणि सामन्यानंतर मैदानात त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून इतरांना सामाजिक आदर्श वर्तनुकीचा परिपाठ दिला होता.
बांगलादेश समोर स्कॉटलंड हा लिंबुटींबू संघ होता. स्कॉटलंड संघाची केवळ जर्सी सुंदर आहे म्हणून त्या संघाला हसण्यावरती नेण्यात आले होते. मात्र स्कॉटिश संघ आपल्या ध्येयाप्रती समर्पित होता. प्रथम फलंदाजी करतांना उण्यापुऱ्या पन्नास धावांत अर्धा संघ गारद झाला होता. तरीपण ख्रीस ग्रीव ने हार न मानता ४५ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला सम्मानजनक स्थितीत पोहचवले होते. बांगलादेशची फलंदाजी पाहता दिडशेच्या आतील आव्हान त्यांच्यासाठी अशक्य असे नव्हतेच. मात्र स्कॉटिश संघाचा जबरदस्त फिटनेस, धारदार गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापुढे बांगलादेश संघ ढेपाळला. "युं गए और युं आए" करत त्यांच्या फलंदाजांनी केवळ सहा धावांसाठी स्कॉटलंड समोर शरणागती पत्करली. "शिकारी खुद यहाँ शिकार" झाला होता. स्कॉटीश युनीकॉर्नसमोर बांगलादेशी वाघ गळपटला होता.
सामना संपताच दुनिया गोल आहे, इथल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात याचा प्रत्यय आला. बांगलादेश कर्णधार महमदुल्लाह पत्रपरिषदेत बोलत असतांनाच स्कॉटिश संघ आनंदाने बेभान झाला होता. त्यांच्या जल्लोषात महमदुल्लाहला आपले बोलणे चक्क २० सेकंदांसाठी थांबवावे लागले. समाधानाची बाब म्हणजे बांगलादेश कर्णधाराने यावेळी कमालीचा संयम दाखवला. मात्र "खट्याळ स्कॉटलंड संघाने नाठाळ बांगलादेश संघाला" चांगलाच कडू डोझ पाजला होता. झालेल्या प्रकरणी क्रिकेट स्कॉटलंड ने पुढच्यावेळी आवाज, जल्लोष कमी राहील याची प्रांजळपणे कबूली दिली आहे.
एक मात्र खरे एखाद्या विजयाने स्कॉटिश संघ काबील होत नाही किंवा अनपेक्षित पराभवाने बांगलादेश संघ ना काबील होतो असेही नाही. जवळपास चौदा वर्षापुर्वी भारतीय संघाची काबीलीयत काढणाऱ्या हबीबुल बशरला ताज्या स्कॉटिश तडक्याने नक्कीच ठसका लागला असणार. हिच बाब नेमकी बांगलादेशी संघ आणि त्यांच्या उतावळ्या पाठीराख्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. प्रतिस्पर्धी संघाचा,खेळाचा सन्मान करणे बांगलादेशी संघाला शिकावे लागेल. अन्यथा स्कॉटिश संघासारखे नवोदित कधी त्यांचा बॅंड वाजवून चालले जातील हे त्यांना कळणार सुद्धा नाही. काबील, ना काबील च्या भानगडीत न पडता जो संघ चांगले प्रदर्शन करील तोच संघ विजयी होईल यावर विश्वास ठेवाला लागेल. मैदानावर खेळाडू आणि मैदानाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी संयम दाखवणे त्यांच्या प्रतिमेसाठी अत्यंत जरुरी आहे.
************************************
दि. १९ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment