@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*मुंबई इंडियन्स चे वरातीमागून घोडे*
***********************************
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्रीयुत शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी कांग्रेस बाबत एक सुचक आणि खोचक विधान केले होते. त्यांच्यानूसार इंडीयन नॅशनल काँग्रेसची अवस्था म्हणजे रया गेलेल्या हवेलीच्या जमिनदारासारखी आहे. अगदी अशीच स्थिती मुंबई इंडियन्स संघाची झाली आहे. कधीकाळी आयपीएल मध्ये दबदबा आणि ग्लॅमरस असलेला हा संघ यावेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेला आहे. तब्बल पाचवेळा आयपीएल चषक आपल्या नावे करणाऱ्या या संघाला या मौसमात लिंबूटिंबू संघांनी पाणी पाजत स्पर्धेबाहेर केले आहे. अर्थातच साखळी स्पर्धेच्या अंतिम लढतीत मुंबई संघाला प्लेऑफ साठी शेवटची संधी होती. मात्र तिथे पण नेट रन रेट ने त्यांची "अटकली खुटी तर जाशील कुठी" अशी अवस्था केल्याने चारमिनार एक्स्प्रेसने मुंबईची गाडी रुळावरून घसरवून टाकली.
खरेतर मुंबईचा संघ पोलार्ड सारखा मस्कूलर, पांड्या बंधूंसारखा पॉप्युलर, रोहीत प्रमाणे स्पेक्टॅक्युलर आहे. सोबतच ईशान सारखा बॅचलर असून क्रिकेट फॅन्समध्ये मुंबई इंडियन्सची प्रचंड क्रेझ आहे. दिमतीला बोल्ट, बुमराहची तेज गाडी पण आहे. मात्र एवढे असूनही मुंबई इंडियन्सची "पप्पू कान्ट डांस साला" अशीच परिस्थिती झाली आहे. वास्तविकत: टी ट्वेंटी विश्वचषकात मुंबई इंडियन्सच्या जवळपास सहा खेळाडूंची निवड झाली आहे. यात गुणवत्ता,फॉर्म, फिजीकल फिटनेस हे निषक निवडीकरता वापरले गेले म्हणणे धाडसाचे ठरेल. इतर गुणी खेळाडूंना वगळून निवड समितीने मुंबई संघावर जी मेहेर नजर दाखवली ते पाहता "घोडे खांऐ घांस, गधे खांऐ च्यवनप्राश" असे म्हणावेसे वाटते.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विश्वचषकात निवड होताच मुंबई संघात शैथिल्यता उत्पन्न झाली. मग आयपीएल चषकाचे कितीही शिलाजीत वापरले तरी खेळाडूंच्या डोक्यात भरलेले वारे काही केल्या कमी झाले नाही. सोबतच आयपीएलच्या काजव्यांची वर्ल्ड क्लास क्रिकेट सूर्यांशी तुलना केली गेल्याने होत्याचे नव्हते झाले. पांड्या बंधू, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव मध्यंतरी आपली लय गमावून बसले. त्यामुळे वर फलंदाजीत रोहीत आणि खाली गोलंदाजीत बुमराह असुनही मुंबई संघ "उपरसे टामटूम अंदरसे रामजाने" झाला. क्लिंटन डिकॉक आणि पोलार्डची कामगिरी कभी खुशी कभी गम सारखी होती. एकंदरीत काय तर आयपीएलच्या उत्तरार्धात मुंबई संघाची खिचडी शिजलीच नाही.
जशी प्लेऑफची शर्यत रंगात आली आणि मुंबईच्या नाकातोंडाशी पाणी आले, रोहीत चे झोपी गेलेले शिलेदार खडबडून जागे झाले. अंतिम साखळी लढतीत ईशान किशन, सूर्यकूमारचे अश्व चौखूर उधळले, मात्र ते वरातीमागून घोडे ठरले. सर्वात जास्त निराशा पांड्या बंधूंनी केली. "आज करून आलो" यापेक्षा आज खेळून आलो यावर या दोघांनी जास्त लक्ष दिले असते तर मुंबई संघावर ही नामुष्की आली नसती. हे दोघेही खेळण्यासाठी मैदानावर येतात की दिसण्यासाठी मैदानावर येतात हेच कळायला मार्ग नाही. हे दोघेही खेळाडू मुंबई संघासाठी खायला काळ आणि भुई ला भार ठरले आहे.
दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या वादाचे पडसाद रोहितच्या खेळावर दिसून आले. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला रोहित या मौसमात भुले बिसरे गीत सारखा वावरत होता. निश्चितच याचा फटका संघप्रदर्शनाला बसला. शाहरूखचा आर्यन बाळ असो की रोहितचे सुस्तावलेले खेळाडू असो, फाजिल लाडाने दोन्ही कडे प्रचंड नुकसान झाले. पांड्या बंधू तर क्रिकेट ऐवजी दांडीया किंवा फॅशन शो मध्ये चांगले प्रदर्शन करू शकले असते. एक से बढकर एक खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ चिकाटी, लय, सातत्य राखण्यात कमी पडला. या संघातील बहुतेक खेळाडूंचा "तोरा विराट सारखा होता मात्र कामगिरीत ते वाजले की बारा" ठरले.
प्लेऑफच्या चार संघांनी मात्र वाखाणण्याजोगी कामगिरी केली. कच्चा निंबू म्हणून हिनवल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अक्षरशः डोळे दिपवून टाकणारी कामगिरी केली. सोबतच "हर छोटा एकदिन बडा होता है" हे आपल्या खेळाने दाखवून दिले. माहीचा चेन्नई संघ अजुनी यौवनात मी प्रमाणे वागत आहे. वयाला चकवा देत धोनीचे यष्टीरक्षण आणि नेतृत्व दिवसेंदिवस बहरत आहे. धोनी भले ही फलंदाजीत कोणत्याही संघाच्या अकराव्या खेळाडू सारखा फलंदाजी करतो मात्र त्याचे क्रिकेटींग ब्रेन कोणत्याही सामन्याला कलाटणी जरुर देऊ शकते.
कोलकाता संघ आपल्या वैविध्यपूर्ण फलंदाजी आणि गोलंदाजीने नटला आहे. त्यातच आंद्रे रसेल नावाचा सुप्त ज्वालामुखी जागृत झाल्याने तो इतर संघाना भाजण्यास उत्सुक असेल. "नाव मोठं लक्षण खोटं" म्हणून नावाजलेल्या विराटच्या संघाने यावेळी प्रचंड मुसंडी मारत प्लेऑफला तिसरे स्थान पटकावले आहे. आरसीबी चा संघ "लांडगा आला रे आला" म्हणून ख्याती प्राप्त आहे. मात्र कोहलीच्या संघात यावेळी ग्लेन मॅक्सवेल नावाचा विराट योद्धा सामिल झाल्याने आरसीबी संघाला हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करणार नाही.
यंदाच्या आयपीएल हंगामात काही गुणवंत खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने चाहत्यांना मोहित केले आहे. विशेषतः चेन्नईचा ऋतूराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, वरूण चक्रवर्ती, आवेश खान, अर्शदिपसिंग, व्यंकटेश अय्यर आणि तुफानी गोलंदाज उमरान मलिकने मैदानावर आपला ठसा उमटवला आहे. अर्थातच या गुणवंतांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर टीम इंडियाचे दरवाजे त्यांच्यासाठी नक्कीच उघडू शकतात. मात्र याकरीता त्यांना "आयपीएल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात असणारी दरी" समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
************************************
दि. ०९ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment