@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०१*
***********************************
डिसेंबर २०१९, भुतो न भविष्यती अशा कोरोनाने पृथ्वीतलावर अवतार घेतला आणि अवघ्या जगाला लुळे पांगळे करून टाकले. याचा सर्वात पहिला आणि सर्वात जास्त फटका बसला तो पर्यटन क्षेत्राला. अर्थातच या कोरोनाच्या दणक्याने पर्यटन प्रेमींची चांगलीच मुस्कटदाबी झाली. तब्बल दोन वर्षे, दोन लाटेनंतर कोरोनाचा विळखा हळूहळू कमी होत आहे आणि याचीच प्रतिक्रिया म्हणून रिव्हेंज टुरीझम उदयास येत आहे. खरेतर अजूनही कोरोना महाशय या भुतलावरील आपला वारसाहक्क सोडायला राजी नसला तरी "डर के जीत है" याची प्रचिती सध्या येत आहे.
अर्थातच दोन वर्षानंतर पर्यटनाचा योग आल्याने आम्ही मित्रमंडळी जाम खुश असलो तरी एखाद्या स्थळाबद्दल नाव निश्चिती होत नव्हती. मात्र आमचे काम आर्यन शाहरुख खानने सोपे करून टाकले. एरवी फारशी चर्चेत नसलेली कार्डेलिया क्रूझ अचानक प्रकाशझोतात आली आणि भटकण्यासाठी टपून बसलेले आम्ही मित्र कार्डेलियाच्या नावावर सहमत झालो. खरेतर आर्यनच्या ड्रग्स केसमुळे "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये" अशी कार्डेलियाची गत झाली. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या क्रूझच्या दिनचर्येत काडीमात्रेचाही फरक पडला नाही.
कार्डेलिया मोहिमेची सुरुवात २३ ऑक्टोबरला नागपूर पासून विमानप्रवासाने झाली. अर्थातच तुम्ही कितीही वेळा विमान प्रवास केला असला तरी प्रत्येक वेळची मजा काही औरच असते. कधी उत्सुकता नवलाई, कधी भितीयुक्त आनंद तर कधी याच देही याच जन्मी पक्षांसारखे उडण्याची अनुभुती घेतल्यासारखे वाटते. मात्र कोणत्या वस्तू चेक इन मध्ये आणि कोणत्या वस्तू कॅबिन बॅग (हॅंडबॅग) मध्ये घ्यायच्या याबाबत गोंधळाची स्थिती असते.ऐनवेळी भरलेल्या बॅग उलटापालट करण्याची नामुष्की आमच्यावर बरेचदा आली आहे. इतरांना सोडून सेक्युरीटी टीमची वक्रनजर आमच्यावरच का असते हे मला कधीच कळले नाही. कधीकधी तर विमानात प्रवेश केल्याबरोबर हवाई सुंदरी आमच्याकडे पाहून एक औपचारिकता म्हणून कृत्रिम स्मित देतात की आमच्यावर हसतात याबाबत आम्ही साशंक असतो.
यावर तोडगा म्हणून आम्ही कधीच त्यांच्याशी नजरानजर करत नसतो. "पतली गली से निकल" प्रमाणे हळूच अंग चोरत आम्ही आमची बॅग सांभाळत प्रामाणिकपणे आपले आसन गाठतो. मात्र तिथेही कुणीतरी वरच्या कॅबिनमध्ये सामान ठास्सून भरले असल्याने आम्ही केविलवाणे होत इतरत्र सामानाची सोय करत असतो. मात्र आपल्याला बसायला नक्की कोणती सिट असावी यावर आमचे एकमत कधीच होत नाही. खिडकीजवळ बसावे तर सतत बाहेर डोकावण्याने दुसऱ्या दिवशी मान अकडून जाते. शिवाय आपण कोपऱ्यात बसलो असल्याने हवाई सुंदरी आपल्याकडे वंचित आघाडी सारखे दुर्लक्ष करतात. मधल्या सिटवरचे दुःख तर आणखी वेगळे असते. दोन्ही बाजुचे प्रवासी आपल्याकडे कशाला हे बुजगावणे प्रवासाला आले अशा नजरेने बघतात. सोबतच दोन्ही हात कुठे ठेवायचे हा यक्षप्रश्न असतोच. शिवाय आजूबाजूला महिला प्रवासी असल्या तर परिस्थिती आणखी गंभीर होते. शेवटी माझी व्यथा सांगू कुणाला म्हणत डोळे मिटून घ्यावे लागतात.
आयलच्या सिटची वेगळीच कहानी असते. सतत तुम्हाला कोणतरी धक्के मारून जात असतात. विमानप्रवासात आपण विकत घेऊन काही न खायची शपथ घेतली असल्याने सहसा आम्ही माहिती पुस्तिका दोन तिनदा तरी वाचून काढतो. मात्र सहप्रवाश्यांची ऑर्डर नाकातोंडासमोरून जातांना आमचा चांगलाच जळफळाट होतो. अर्थातच सहप्रवाश्यांचे बरेवाईट अनुभव मुकाटपणे सहन करण्यातच आपले सौख्य सामावले आहे हे मानून आम्ही शांत बसतो. एरवी कोणाकडेही ढुंकूनही न पाहणारे विमानप्रवासी सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याची घोषणा होताच एअर होस्टेसकडे कान टवकारून, मान उंचावून, डोळे फाडून एकजात बघत असतात. मात्र यात सुरक्षा दृष्टी किती आणि सौंदर्य दृष्टी किती असते हे वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही.
खरेतर नागपूर ते मुंबई विमानप्रवासाला साधारणपणे एक सव्वा तास वेळ लागतो. मात्र सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मंदावली असल्याने आम्ही सकाळी एक तासाच्या आतच मुंबईला पोहोचलो. मुख्य म्हणजे प्रवासाच्या दरम्यान "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली. यात आझाद हिंद फौजेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी यांची २४ ऑक्टोबरला जयंती असल्याने त्यांना गो फर्स्ट एअरलाईन तर्फे मानवंदना देण्यात आली. सोबतच जयहिंदची घोषणा ऐकून ऊर भरून आला. आपल्या देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्यांना, खस्ता खाणाऱ्यांना उशीराने का होईना मानसन्मान देण्यात येऊ लागला ही समाधानाची बाब होती.
अखेर विमानाने मुंबई गाठताच आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा पार पडला होता. शनिवारचा दिवस असल्याने विमानतळ ते आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल पर्यंत जायला आम्हाला फार वेळ लागला नाही. क्रूझ बोर्डींगची वेळ दुपारी बारा पासून असल्याने आम्ही लगेच रांगेत लागलो. कारण या क्रूझची प्रवासी क्षमता १५०० असल्याने बोर्डींगला वेळ लागणारच होता. सोबतच प्रत्येक प्रवाशाला ओळखपत्र, कोरोना व्हॅक्सिनची दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र, ४८ तासाच्या आतील आरटीपिसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक होते.
आत जातांना एका हातात आपली बॅग तर दुसऱ्या हातात कागदपत्रे सांभाळून एकदाचे टर्मिनल गाठले. इथली सुरक्षा व्यवस्था सीआयएसएफच्या ताब्यात आहे. विमानतळाप्रमाणेच सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. क्रूझ वर कोणतेही पेय, खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असल्याने थोडीफार कुचंबणा होते. मात्र आपल्या प्रवाश्यांतील बेशिस्तीमुळे आणि त्यांच्या जनावरांनाही लाजवेल अशा सर्वत्र चरण्याच्या सवयी पाहता क्रूझचे नियम संयुक्तिक वाटतात. क्रूझवर सगळे आर्थिक व्यवहार अमेरिकन डॉलर्स मध्ये होत असल्याने पहिलेच आपले कार्ड इथे लोड करून घ्यावे लागते किंवा क्रूझवर सुद्धा लोड करू शकता. मात्र रुपया आणि डॉलर्सचा दुरावा पाहता चौकसपणे व्यवहार करावा लागतो. शिवाय क्रूझवरून उतरतांना कार्डमध्ये शिल्लक असलेली रक्कम एकतर खर्च करावी लागते अन्यथा क्रूझला दान करावी लागते यामुळे गरजेनुसार कार्ड लोड करणे आवश्यक असते.
क्रमशः,,,,
***********************************
दि. २७ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment