Thursday, October 28, 2021

कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
       *कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०२*
************************************
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल वर सुरक्षा तपासणी करून आत प्रवेश करताच मित्रमंडळींच्या डोळ्यात एक आगळीवेगळी चमक दिसली. एक अनामिक ओढीने सगळे एकामागोमाग आयटीडीसी,फ्लेमींगो दुकानात दाखल झालो. मात्र तिथे सर्वांचाच हिरमोड झाला. कारण ती दुकाने जरी ड्युटी फ्री असली तरी केवळ आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांसाठीच होती. मात्र हे दुःख लगेच पचवत आम्ही पुढे गेलो तर आश्चर्याने तोंडात बोटे टाकावी असा नजारा समोर होता. अजस्त्र, अवाढव्य, चकचकीत आणि मुंबई गोवा प्रवासाची पट्टराणी असलेली कार्डेलिया एम्प्रेस आमच्या स्वागताला सज्ज होती. "ती पाहताच बाला कलेजा खलास झाला"अशी आमची मनोवस्था झाली होती. डोळे विस्फारून आम्ही तिचे राजेशाही रुप डोळ्यात साठवू लागलो. मग लगेचच तिच्यासमवेत फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही.

पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची तपासणी होऊन आत शिरलो. तिथे दोन जलसुंदरींनी (जलवंती,फुलवंती) दोन्ही हात जोडून आमचे स्वागत केले. मात्र इथे त्या मनःपूर्वक आदरतिथ्य करत असल्याची जाणीव झाली. आम्हीसुद्धा बरेच वर्षांनी कोणीतरी भाव दिला म्हणून खुश झालो. खरेतर "शितावरून भाताची परिक्षा" का म्हणतात ते यावेळी कळले. अगदी सुरुवातीलाच जी विनम्रता आणि विनयता क्रूझवर दाखवली गेली ती एखादा अपवाद वगळता सर्वत्र पाळली गेली. अर्थातच आम्ही "शांती मे क्रांती" चे पाईक असलो तरी जिथे कुठे आम्हाला जाणीवपूर्वक अंडरइस्टीमेट करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे आम्ही हाडाचे दंगेबाज असल्याने हिशोब चुकता करत असतो. यामुळेच आमचे मित्र आम्हाला उपरोधाने "उशिरा जन्मलेला स्वातंत्र्य सैनिक" म्हणत असतात.

खरेतर कार्डेलिया एम्प्रेस क्रूझ ही नावाला जागत तुम्हाला पहिल्या नजरेत इम्प्रेस करते. ही भारताची एकमेव आंतरराष्ट्रीय क्रूझ आहे. १९९० ला जलावतरण केलेल्या या जहाजराणीला पहिले "दी नॉर्डीक एम्प्रेस" नावाने ओळखले जात होते. बहामा, कॅरेबियन समुद्रावर मनसोक्त बागडल्यावर एम्प्रेस ने भारतीय पुर्व पश्चिम किनाऱ्यावर आपले बस्तान मांडले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्यटनाचे अधिराज्य गाजवत ही जलपर्यटकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आपल्या उदरात, अंगाखांद्यावर प्रवाशांना घेऊन ही मुंबई, दिवू,गोवा, लक्षद्वीप,कोची, चेन्नई,त्रिंकोमाली एवढेच नव्हे तर लंकेतील कोलोंबो, कंकासंतुरीसह गाले इथपर्यंत भ्रमंती करत असते.

प्रवासाकरीता तिन प्रकारचे तिकिट असते. सर्वात कमी तिकिट इंटेरीअर कॅबीनचे असते. यात तुम्हाला बाहेरचे दृश्य न्याहाळता येत नाही. ओशन व्ह्यू मध्ये तुमच्या खोलीतुन समुद्राचा, बाहेरील दृश्यांचा आनंद घेऊ शकता. यापुढील बाल्कनी आणि सुट आणखी जास्त सुविधायुक्त असतात मात्र त्यासाठी आपला खिसा हलका करावा लागतो. आम्ही ओशन व्ह्यू ला पसंती दिली होती. या छोटेखानी रुममध्ये दोन व्यक्तींना पुरेशी सुविधा उपलब्ध होती. प्रत्येक जागी निट नेटकेपणा आणि कलाकुसर क्रूझच्या सौंदर्यात भर घालत होती. इथले इंटेरीअर डिझाईन आणि रंगसंगती अफलातून आहेत. आपण एखाद्या राजमहालात वावरत आहोत असा भास होतो. मध्यभागी समोरासमोर असलेल्या चार लिफ्ट, सोबतच पायऱ्यांची गुंफण तुम्हाला आकर्षित करते. स्वच्छतेच्या बाबतीत तर इथले वातावरण दृष्ट लागण्यासारखे आहे. क्रूझ व्यवस्थापनाने "कचरा दाखवा आणि हजार रुपये मिळवा" ही योजना जरी लागू केली तरी कोणी जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे.

मुख्य म्हणजे इथे जेव्हा कोणत्याही प्रकारची घोषणा होते तेव्हा तुम्हाला गेस्ट म्हणून आदरार्थी संबोधन केले जाते. चेक इन ते रुम पर्यंतच्या प्रवासाला जवळपास दिड तास लागला होता. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते आणि पोटात कावळे ओरडू लागल्याने आम्ही टॉप डेक ला असलेल्या फुडकोर्टकडे धाव घेतली. अर्थातच आम्ही "जगण्यासाठी खाण्यापेक्षा, खाण्यासाठी जगत असतो" या नियमाचे नेहमीच पालन करत असतो. यामुळेच आमच्या पुढ्यात अन्नपदार्थ दिसताच आम्ही पोटाचे गुलाम झालो. मुख्य म्हणजे इथे शाकाहारी,मांसाहारी पदार्थांसोबतच सी फुड, जैन फुड आणि गोड पदार्थांची रास लागली असल्याने काय खाऊ, किती खाऊ हे समजतच नव्हते. मात्र "डू नॉट वेस्ट फुड" चे जागोजागी लागलेले फलक पाहताच आम्ही हात आटोपते घेतले. घरचे अन्न सोडले तर इथल्या अन्नपदार्थांची चव, गुणवत्ता आणि दर्जा मी आजपर्यंत कुठेही अनुभवला नाही इतके ते रूचकर आणि स्वादिष्ट होते. साधे पापड सुद्धा एवढे चवदार होते की दोन्ही हातांनी खायचा मोह मला आवरला नाही.

इथले एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे एकदा तुम्ही थाळी घेतली की ती थाली तुम्हाला परत वापरता येत नाही. प्रत्येक वेळी अन्नपदार्थ घेण्यासाठी नवीन थाळी घ्यावी लागते. कारण जोपर्यंत थाळीतील अन्नपदार्थ बाहेर लटकत नाही तोपर्यंत आपण ती भरून घेत असतो, पुन्हा अन्न मिळेल की नाही याची अनामिक भिती सर्वांनाच असते. शिवाय आजूबाजूच्या लोकांना आपल्या थाळीने त्यांच्या कपड्यांवर डाग उमटवणे यात काही लोकांना मोठेपणा वाटतो.  बहुदा याच कारणाने "प्रत्येक वेळी नवीन थाळी" ची संकल्पना जन्माला आली असावी असे वाटते. इतके असूनही आपले बकासूर अन्ननासाडीचे काम इमानेइतबारे करतांना पाहून आपण ओशाळून जातो. फुडकोर्ट  सुंदर सजवले आहे आणि सेवा देण्यासाठी "वेटर नेहमीच तत्पर" असतात. कुठेही घाई, त्रागा नाही की कटकट नाही. डोक्यावर बर्फ ठेऊन ही मंडळी "वर्क इज वर्शिप" चे पालन करत असतात. 

जेवनाचा मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही वामकुक्षी साठी रुममध्ये दाखल झालो. मात्र व्यवस्थापनाद्वारे वारंवार दिल्या जाणाऱ्या घोषणांनी झोपेचा रसभंग होत होता. आंतरराष्ट्रीय सागरी नियमानुसार तुम्हाला क्रूझवर चढल्यावर सुरक्षा ड्रिलला उपस्थित राहणे बंधनकारक असते. मात्र आम्ही रूममध्येच पेंगुळत सुरक्षा नियमांना समजून घेतले.सात छोट्या आणि एक मोठी अलार्म वाजली की मस्टर स्टेशनकडे धाव घ्यायची एवढेच आम्ही ध्यानात ठेवले. शिवाय कपबोर्ड मध्ये लाईफ जॅकेट असतात याची खात्री करून घेतली आणि यानंतर डुलकी लागल्याने पुढील घोषणा आम्ही ऐकू शकलो नाही. जवळपास एक तासाने खाण्याची गुंगी उतरल्यावर आम्ही क्रूझ दर्शनाचा विचार केला आणि तयारीला लागलो.
क्रमशः
************************************
दि. २८ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...