Friday, October 29, 2021

क्रूझायण भाग ०३

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
              *"क्रूझायण" भाग ०३*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
मुंबई गोवा प्रवासाची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता होणार होती. मात्र जवळपास पंधराशे प्रवासी आणि त्यांचा व्याप सांभाळून क्रूझला मार्गस्थ व्हायला थोडा वेळ लागला. तोपर्यंत हाय टी ची वेळ झाली होती आणि फुडकोर्ट पुन्हा एकदा भोजनभाऊंनी गजबजून गेले होते. खरेतर दुपारचे जेवण आटोपून फार तर दिड दोन तास झाले असतील. तरीपण लोकांचे पोट इतक्या लवकर कसे काय खाली होते मला याचे आश्चर्यच वाटते. खाद्यपदार्थांनी गच्च भरलेली थाळी पाहता "पोट भरले पण मन नाही भरले" असे म्हणावेसे वाटते. कदाचित भुके पेक्षा पैसा वसूल करण्याचा यामागे उद्देश असावा असे माझे मत आहे. पुन्हा एकदा प्रवाशांची खाण्यासाठी तिच लगबग, तोच अधाशीपणा पाहून चिड येते. मात्र कोणी किती खावे, कितीदा खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याने याबाबतीत जास्त नाक न खुपसता आम्ही सरळ टॉप डेकचा मार्ग पकडला.

इथे बहामाध्वज आणि भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता. एव्हाना क्रूझने आपली वेस ओलांडून गोव्याच्या दिशेने प्रयाण करणे सुरू केले होते. एकतर संध्याकाळची रम्य वेळ, संगतीला बेभान वारा, हवेत गारवा असल्याने वातावरण गुलाबी झाले होते. मला तर थेट टायटॅनिक ची पोझ घेऊन फोटो काढायची इच्छा झाली. मात्र आपली केट विन्सलेट (टायटॅनिक ची नायिका) आपल्या सोबत नाही हे लक्षात येताच विचार बदलला. तरीपण विमानतळावर सेक्युरीटी चेकइन च्या नावाखाली बरेचदा ही पोझ दिली असल्याने मनाची समजूत घातली. तब्बल दहाव्या मजल्यावरून जेव्हा आपण खाली समुद्राकडे पाहतो तेव्हा गरगरल्या सारखे होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत आणि पुरेशा उंचीचे कठडे असल्याने धीर येतो. एखाद्या छोटेखानी शहरासारखे हे अजस्त्र क्रूझ वेगाने पाणी कापत पुढे जाते हे पाहून विज्ञान,यंत्रसामर्थ्य आणि मानवी मेंदूचे कौतुक वाटते.

टॉप डेकला मागच्या बाजुला रॉकवॉल क्लाइंबिंग ची सोय आहे. मात्र या वयात हाडे खिळखिळी करणे योग्य नसते. खरेतर पर्यटन म्हणजे केवळ मौजमजा,विमान आणि क्रूझप्रवास नव्हे तर तिथल्या विविध उपक्रमांचा उपभोग घेणे होय. मात्र त्याकरिता फिजीकल फिटनेस महत्वाचा ठरतो. नाही तर "दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही" अशी स्थिती होते. उतरणे,चढणे, धावणे अशा शारीरिक मुलभूत हालचालींना दम लागत असेल तर घरीच जपमाळ घेऊन बसणे सार्थकी ठरते. आयुष्यभर काबाडकष्ट करून संपत्ती जमवणे आणि आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर अखेरचे दिवस मोजण्यात काय फायदा. म्हणूनच हातपाय साथ देईपर्यंत, मन तरुण असेपर्यंत पर्यटनाचा आस्वाद घेतला तर उत्तम. आपल्याकडे केवळ बॅंक बॅलन्सला अवाजवी महत्त्व दिले जाते. मात्र यासोबतच फिजीकल,मेंटल आणि सोशल बॅलन्सचा योग्य मेळ घातला तर पर्यटन सुसह्य होते.

रॉकवॉल क्लाइंबिंगला दुरूनच हात जोडून आम्ही पुल डेक ला आलो तर सेलवे पुल पार्टी रंगात आली होती. डिजे च्या तालावर आबालवृद्ध फेर धरून नाचत होते. विशेषतः जोडप्यांचा, जुगाडांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आम्ही मात्र "जाने कहां गये वो दिन" म्हणत दिनवाने होऊन एवढ्या गर्दीतही पाहण्यासारखे काय आहे हे शोधत होतो. शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय तरी कोणता होता. आमचे दुरदर्शन चालू असतांनाच मित्रमंडळी व्याकूळ झाली होती. विशेषतः अशा निराधारांसाठी पुलबार सज्ज होता. क्रूझवर मल्टीपल बार आहेत आणि या जागी तुम्हाला खुपच दक्ष असावे लागते. एकतर डॉलर्स मध्ये व्यवहार, सोबतच तुम्ही कोणता ब्रॅण्ड मागीतला, किती मागीतला यात लक्ष नाही दिले तर दोन्ही जागी "मापात पाप" होण्याची शक्यता असते. मात्र आमच्या दर्दी मित्रांना ही हातचलाखी ओळखायला फारसा वेळ लागत नाही आणि प्रकरण तिथेच निपटवले गेले.

यानंतर आमची स्वारी वळली ती पाचव्या मजल्यावरील थिएटर कडे. हे थिएटर कमी आणि पंचतारांकित दालन वाटत होते. तळमजला आणि बाल्कनी धरून जवळपास सातशे ते आठशे लोकं सहजपणे इथे बसू शकतात. सिट व्यवस्था आकर्षक आणि वेगळ्या धाटणीची होती. पंजाबी वेडींग थीम असलेले नाट्य तिथे सादर केले जात होते. प्रेमविवाह आणि अरेंज मॅरेजची गुंतागुंत यात दाखवली जात होती. खरेतर लग्न म्हणजे धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी अवस्था असते. तुम्ही प्रेमविवाह करा की अरेंज मॅरेज करा, तुमची अवस्था "ना तू जमीं के लिये ना है आसमां के लिये, तेरा वजूद है सिर्फ दास्तां के लिये" असल्याने फारसा फरक पडत नाही. शिवाय बायको चांगली भेटली तर जिवन सुखी, अन्यथा तुम्ही एक चांगले मार्गदर्शक,तत्वज्ञानी म्हणून नाव जरूर कमावू शकता. याबाबतीत नवीन पिढी मात्र दोन्ही तबल्यावर हात ठेवून आहे. पहिले लफडी करायचे,नंतर ब्रेकअप करून अरेंज मॅरेज करायचे आणि दोन्ही घरांची धुळधाण करायची. बरे झाले बुवा आमच्या वेळेस अरेंज मॅरेज पद्धतीचा दबदबा होता, अन्यथा आम्हाला जन्मभर मारूतीरायांचे उपासक राहावे लागले असते.

अर्थातच हे नाट्य आमच्या पचनी पडले नाही आणि आम्ही लगेच थिएटर बाहेर निघालो. क्रूझचा पाचवा मजला क्रूझचे ह्रदयस्थान आहे. इथेच रिसेप्शन असल्याने कार्ड लोड करणे, माहिती मिळवणे, तक्रार नोंदवणे आणि इतरही कामांसाठी सतत वर्दळ असते. इथूनच क्रूझचे सर्वांगसुंदर नटलेले दृश्य बघायला मिळते. टायटॅनिक सारख्या पायऱ्या, त्याला मखमली गालीच्याची जोड, आकर्षक रंगबिरंगी लाईटींगच्या पार्श्वभूमीवर क्रूझचे सौंदर्य आणखी बहरून येते. इथे मोर्चा सांभाळून असलेल्या दोन मराठमोळ्या अधिकाऱ्यांशी आमची गट्टी जमली. श्रीयुत राजेश निगडे आणि त्यांचे बंधू हर्षद पडते, दोघेही चोखपणे आपले कर्तव्य बजावत होते. क्रूझवर मोठ्या प्रमाणात मराठी कर्मचाऱ्यांचा राबता होता. अधिकारी आणि कामगारवर्ग कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कार्डेलिया एम्प्रेस क्रूझच्या संपूर्ण टीमचा उल्लेख करावा लागेल. मुख्य म्हणजे सर्वच्या सर्व कर्मचारी एकदम फिट ॲंड फाईन कसे काय दिसतात याचे नवलच वाटले. साधे वेटर सुद्धा कडक कपड्यात, सुटसुटीत आणि तरुण वर्गातले आहेत.

संध्याकाळी क्रूझवर सर्वात जास्त आकर्षण असते ते कसिनो चे. अर्थातच तो एकप्रकारचा जुगार. मात्र षडरिपू पैकी एक असलेला मोह,लोभ (पैशांचा) कोणाला नाही. सहाव्या डेकवरील कसिनो बारमध्ये आम्ही थाटात प्रवेश केला. मात्र प्रेम असो की पत्ते, "हर बार हुआ इश्कमे निलाम अपुनका" असल्याने आम्ही शांतचित्ताने तिथली गंमत न्याहळत बसलो. रूलेट असो की कार्ड, एंट्री पंचविस हजारांची असल्याने तेवढ्या पैशात आपला महिनाभराचा खर्च सहज निघतो हे सरळ साधे गणित मनात आले आणि पाय आपोआप कसिनोच्या बाहेर निघाले. आमची धाव फारतर मित्रमंडळीत तिनपत्ती मध्ये शंभर ते दोनशे रुपयां पर्यंत असते. त्यातही ब्लाइंड खेळणारे आम्हाला सहज लुटतात. त्यामुळे अशा भानगडीत आम्ही फार पडत नाही.
क्रमशः
************************************
दि. ३० ऑक्टोबर २०२१
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...