@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा, उत्तरार्ध*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
दि. १४ नोव्हेंबर २०२१, आपल्याकडे "बालकदिन" साजरा होत होता तर दुबईच्या वाळवंटात दोन शेजारी संघ बॉल बॅटने इतिहास रचायला आतूर होते. ऑस्ट्रेलिया आयसीसी स्पर्धांचा शहेनशहा होता तर न्यूझीलंडच्या खात्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी विजेतेपद होते. ॲलन बॉर्डर पासून कांगारूंची क्रिकेट जगतावर आजतागायत काही अपवाद वगळता जबरदस्त पकड आहे. तरीपण २००७ पासून टी ट्वेंटीत त्यांचा दुष्काळ काही केल्या संपत नव्हता. अखेर दुबईची संध्याकाळ त्यांच्यासाठी सोनेरी पहाट ठरणार होती.तर किवी संघ अंतिम सामन्यातील आपले अपयश खोडून काढायला तत्पर होता. अर्थातच भारत पाक लढतीसारखा हा सामना हाय व्होल्टेज नसला तरी दोन्ही संघ परंपरागत प्रतिस्पर्धी असल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली होती.
किवी संघाला पाऊने दोनशेच्या आत गुंडाळून कांगारुंनी अर्धी लढाई तर जिंकली होती. शिवाय पाकविरूद्ध अटीतटीच्या सामन्यात मिळालेला विजय त्यांचे मनोबल उंचावून गेला होता. पाठलाग सुरू होताच दोन्ही संघ एकमेकांवर दबाव टाकण्यास उत्सुक होते. याचीच परिणती म्हणून ॲरोन फिंचने ट्रेंट बोल्टला उचलले. मात्र त्याचा हा प्रयत्न अंगलट आला आणि तो स्वस्तात बाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर मिशेल मार्श येताच अनेकांच्या भुवया वर झाल्या. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात, स्टीव्ह स्मिथ ऐवजी त्याला पाहून किवी संघाने समाधानाचा सुस्कारा सोडला असेल. मात्र साधाभोळा दिसणारा मिशेल "लायसन्स टू किल" घेऊन आला होता. शिवाय त्याने फिंचचा बळी गेला म्हणून विधवाविलाप न करता मिलनेला चांगलेच धुवून काढले. हिच प्रतिहल्याची मानसिकता कांगारू संघाला चॅम्पियन बनवत असते.
फिंचच्या जाण्याचा फार बागुलबुवा न करता,"गई बात गणपतके साथ" म्हणत वॉर्नर, मिशेल जोडीने किवीचा बॅंड वाजवणे सुरू केले. त्यातच उजव्या डाव्या हाताच्या फलंदाजांमुळे किवी गोलंदाज आपली लय गमावून बसले. वेगवान गोलंदाज असो की फिरकीपटू या दोघांच्या तडाख्यातून कोणीही सुटले नाही. कदाचित किवी संघाने फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेलचा अभ्यास केला असावा परंतू चुकीने त्यांना मिशेल मार्शचा पेपर आला आणि त्यांचे सगळे समीकरण बिघडले. वॉर्नर तर जणुकाही विलियम्सला समोर पाहून सनराईझर्स हैदराबाद चा हिशोब चुकता करायला बसला होता. दोन महिन्यांपूर्वी ज्या फलंदाजाला हैदराबादने संघाबाहेर करण्यात आले होते, त्या वॉर्नर ने न्यूझीलंडला "जिगरमा बडी आग है" हे दाखवून दिले.
त्याच्या प्रत्येक फटाक्यांवर बदल्याची आग स्पष्टपणे झळकत होती. अखेर बोल्टने त्याचा झंझावत रोखला. मात्र यानंतर किवी ची स्थिती "आगीतून निघून फोफाट्यात" जाण्यासारखी झाली. वॉर्नर कमीतकमी क्रिकेटींग स्ट्रोक्स तरी मारत होता. परंतु ग्लेन मॅक्सवेल म्हणजे फलंदाजीतली रम्य भुताटकीच आहे. कोणत्याही चेंडूला कुठेही भिरकवणे हा त्याच्या डाव्या हाताच मळ आहे. शिवाय सद्यपरिस्थितीत गोलंदाजांना इतकं बेक्कार त्याच्याशिवाय कोणीही मारू शकत नाही. खरेतर याकरीता जागतिक गोलंदाज आघाडीतर्फे त्याच्यावर आयसीसी कडे अब्रूनुकसानीचा दावा करायला हरकत नाही.
मिशेल मॅक्सवेल जोडीने किवी गोलंदाजांची चटणी केली. बिचारे गोलंदाज "इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा" करत हतबल झाले होते. त्यातच मॅक्सवेलच्या बॅटला चेंडू रक्ताची चटक लागताच किवींपुढे सपशेल शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर १९ व्या षटकात रिव्हर्स स्विप मारुन मॅक्सवेलने विजयावर शिक्कामोर्तब केले. तब्बल १४ वर्षांच्या घोर तपस्येनंतर जेतेपद हाती लागताच कांगारू ड्रेसींग रूममध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. विशेषतः वॉर्नर,फिंच, मिशेल आणि मॅक्सवेलचा जल्लोष पाहण्यासारखा होता.
मात्र कित्येकांना कांगारूंचे सेलिब्रेशन खटकले आहे कारण मॅथ्यू वेड,मार्कस स्टोईनिस आणि ॲरोन फिंच यांनी चक्क बुटामधून बिअर पिली. या प्रकाराला "शूई" म्हणतात आणि याची सुरुवात १८व्या शतकात झाली होती. विशेषतः फॉर्म्युला वन रेसर, सुपरकार विजेते यांचे हे आवडते सेलिब्रेशन.अर्थातच विजयाने बेधुंद झालेल्या खेळाडूंना आवरणार तरी कोण. शिवाय कोणी कसे सेलिब्रेशन करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. इंग्लिश संघाने तर ॲशेस मालिका जिंकताच मद्यपान करून थेट खेळपट्टीवर मुत्र विसर्जन केले होते. बांगलादेश संघाचा नागीण डान्स, विंडीजचा गंगनम डान्स कोण विसरू शकेल. मात्र या धडाक्यातही जिंकल्यानंतर किवी संघाची विनम्रता आणि टीम इंडियाचा संयमता उठून दिसते.
एक मात्र खरे, कांगारू कर्णधार ॲरोन फिंचची या स्पर्धेतील कामगिरी विशेष नसली तरी "करून गेल गावं, झालं माझं नाव" अशी त्याची स्थिती आहे. केवळ चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे सामना जिंकणे नव्हे तर त्यामागे प्रबळ संघभावना आणि खेळात किलर इंस्टींक्ट असणे गरजेचे असते. उपांत्य फेरीत वेडचे लागोपाठ तिन षटकार ठोकणे असो की अंतिम फेरीत फिंच, वॉर्नर बाद झाल्यानंतर कांगारूंनी प्रतिहल्ला चढवणे असो, दोन्ही जागी ते प्रतिस्पर्धी संघाला पुरून उरले. बहुदा कांगारूंच्या याच मानसिक खंबिरतेचा अभाव इतर संघात दिसून येतो. न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात त्यांचा फियास्को का होतो याचा विचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आयसीसीला त्यांच्यासाठी पर्मनंट रनर अपचा अध्यादेश काढावा लागेल. यानंतर लगेच किवी संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे आणि हे दोन्ही संघ विश्वचषकातले अपयश खोडून नवीन कहानी रचायला उत्सुक असणार. टीम इंडिया नवीन संघनायकासह किवींना कसे सामोरे जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही संघाला उभय मालिके करीता शुभेच्छा.
************************************
दि. १६ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment