@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*दुसऱ्या कसोटीत डीन एल्गरचा एल्गार*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
वान्डरर्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिका संघाने वंडरफुल कामगिरी करत भारतीय संघाला धुळ चारली आहे. पहिल्या कसोटीत अजेय ठरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत सहज मात देत द.आफ्रिका संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. चौथा डाव आणि दोनशेच्या वरचे लक्ष्य म्हणजे हाराकिरी करणे नव्हे हे डीन एल्गरने भारतीय संघाला दाखवून दिले आहे. शामी, बुमराह, सिराज, अश्विन आणि शार्दुल ठाकूर विरोधात द.आफ्रिकेच्या कर्णधाराने एल्गार पुकारत त्याचा संघाला विजयपथावर आणले आहे. डीन एल्गरच्या अनोळखी खेळाडूंनी भारतीय संघाच्या नावाजलेल्या खेळाडूंना दणका देत "जो है नामवाला वहीं तो बदनाम है" हे दाखवून दिले.
खरेतर द.आफ्रिकेचा सध्याचा संघ म्हणजे भारतीय संघासमोर कच्चा निंबू आहे. त्यातही त्यांच्या संघातील अकरा खेळाडूंचे नाव कोणी एका दमात आणि स्पष्ट उच्चारात घेईल अशी परिस्थिती नाही. तरीही या संघाने भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत नाक रगडायला भाग पाडले. याला कारणीभूत भारतीय संघाची "लहानात लहान,थोरात थोर" ही मन:स्थिती आहे. भारतीय संघ वेळ पडली तर कोणत्याही बलाढ्य संघाला त्याच्या अंगणात जाऊन बुकलून काढतो किंवा लिंबूटिंबू संघासमोर लटपट कापतो. शिवाय पहिली कसोटी जिंकून दुसरी कसोटी हरण्याचा कपाळकरंटेपणा केवळ आपलाच संघ करू शकतो.
हा पराभव भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र यात दुःख कमी आणि राग,उद्वेग जास्त आहे. या पराभवाचे पोस्टमॉर्टेम करायचे झाले तर संघनिवड हे प्रमुख दुखणे आहे. एकतर विराटचे दुसऱ्या कसोटीत न खेळणे असो की पुजारा रहाणेचे संघात असून नसणे असो. पुजारा रहाणे ही पस्तिशीकडे झुकलेली जोडी संघासाठी पांढरा हत्ती ठरत आहे. "असून अडचण नसून खोळंबा" ठरलेल्या या दोघांनी मध्यफळीचा नुसता विचका केला आहे. निश्चितच या खेळाडूंनी भुतकाळात चांगली कामगिरी केली आहे. मात्र भुतकाळाच्या कामगिरीवर या दोघांचे आणखी किती लाड करावे याला मर्यादा असल्या पाहिजेत.
वास्तविकत: ही जोडी म्हणजे भारतीय संघाचे हळद कुंकू आहे. मात्र सध्यातरी हळदही रुसली, कुंकूही रुसले असल्याने भारतीय संघावर संक्रांत आली आहे. या दोघांनी यापुढेही हाच नन्नाचा पाढा चालू ठेवला तर येत्या संक्रांतीपर्यंत या दोघांना शाल श्रीफळासहित निरोप समारंभ मिळू शकतो. याउलट यांच्याच वयाच्या डीन एल्गरने या दोघांपेक्षा कमी कसोटी खेळण्याचा अनुभव असूनही संघाला एकहाती तारले आहे. पहिल्या डावात तर पुजारा रहाणेची उडालेली दैना पाहता हे दोघे मिळून जवळपास पाऊने दोनशे कसोटी खेळले असतील यावर विश्वास बसत नाही. दुसऱ्या डावात लोकलाजेखातर या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या मात्र त्या "वाळवंटात मुतलं, ना ओहोळ ना ठिगळ" या प्रकारच्या ठरल्या.
या दोघांचे यापुर्वीही एखादे अर्धशतक, शतक ठोकायचे आणि पुढील सामने गाभण करायचे हा प्रकार आपण अनुभवला आहे. मात्र "एका पिसाने (अर्धशतकाने) मोर होता येत नाही" हे राहुल द्रविडने या दोघांना सांगायला हरकत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जोपर्यंत खेळाडू आपलं सर्वस्व झोकून उत्तम प्रदर्शन करत नाही तोपर्यंत तुम्ही साक्षात ब्रह्मदेवाला जरी प्रशिक्षक केले तरी काही फरक पडणार नाही. शिवाय प्रदर्शनावर आधारीत संघनिवड होत नाही तोपर्यंत वरिष्ठ खेळाडू सामन्यात असाच खेळ खंडोबा करत राहणार. यापुढे या दोघांची निवड कामगिरीवर असावी, अर्धशतकाच्या व्याजावर नव्हे, इतके तरी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
इतर फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर सध्यातरी मयंक, राहुलने समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र पुजारा,रहाणे सोबतच रिषभ पंतच्या बेजबाबदारपणाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. सोबतच कमी संधी मिळालेल्या हनुमा विहारीला तिस चाळीस धावांची वेस ओलांडून "शतकी विहार करावा लागेल". अश्विन, शार्दुलला त्यांच्यात दडलेल्या फलंदाजाला खुलवावे लागेल तरच कुठे भारतीय संघ समाधानकारक धावसंख्या उभारू शकेल. अन्यथा दोनशे अडीचशे धावांचा पाठलाग द.आफ्रिकेचा संघ सहज करू शकतो हे या कसोटीत दिसून आले आहे.
भारतीय संघाची गोलंदाजी, फलंदाजी पेक्षा नक्कीच उजवी आहे. मात्र चौथ्या डावात ती भेदक दिसली नाही. अडीचशेच्या आतले आव्हान टिकवणे भारतीय गोलंदाजांना जमले नाही. पंजाबात ज्या सहजतेने मोदींचा ताफा रोखला गेला, त्यापेक्षाही सरसपणे डीन एल्गरने भारतीय मारा थोपवला. वरुणराजाने भारतीय संघाला थोडासा दिलासा जरूर दिला मात्र दोन दिवसांचा खेळ बाकी असल्याने व.आफ्रिकेला आरामशीर विजय मिळवता आला. एल्गरच्या गोलंदाजांनी विशेषतः रबाडा, एनगीडीने आपल्या नवख्या सहकाऱ्यांसह अप्रतिम मारा करत भारतीय फलंदाजांना वेसण घातले होते.
तीन कसोटी सामन्यांची ही मालिका आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अंतिम कसोटीत भारतीय सलामीवीरांसोबतच पुजारा रहाणे जोडीला लौकिकाला साजेशी कामगिरी करणे जरुरी आहे. रिषभ पंतने अजूनही आपण पाळण्यातले खेळाडू आहो या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यात पुसटशी रेषा असते याचे त्याला भान ठेवावे लागेल. तर हनुमा विहारीला भारतीय फलंदाजीचे शेपूट "हनुमानाच्या शेपटी सारखे" कसे वाढवता येईल याचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे भारतीय गोलंदाजांना पुरेशी संधी देण्याइतपत फलंदाजांनी धावा करणे क्रमप्राप्तच आहे. तरच कुठे आपण द.आफ्रिकेचा आतापर्यंत अजेय असलेला किल्ला सर करू शकतो. अन्यथा "बडे बेआबरु होकर तेरे कूचे से हम निकले" असे म्हणायची भारतीय संघावर पाळी येऊ शकते.
*************************************
दि. ०७ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment