Sunday, October 23, 2022

मेलबोर्नला विराटची रनत्रयोदशी,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *मेलबोर्नला विराटची रनत्रयोदशी*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
मेलबोर्न, सुपर संडेला झालेल्या ब्लॉकबस्टर सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकची नांगी ठेचत चित्तथरारक विजय मिळवला आहे. एखाद्या हॉरर शो सारख्या रंगलेल्या या लढतीत खरेतर 'कमजोर दिल वाले ना देखे' अशी आयसीसीने सूचना द्यायला हवी होती. न भूतो न भविष्यती अशा थरारक द्वंद्वात अखेर किंग कोहलीने रनत्रयोदशी साजरी करत पाकला हॅपी इंडेक्स मध्ये मागे पाडले आहे. नमनालाच घडीभर तेल सांडूनही टीम इंडियाने पाकच्या घशातून विजय खेचून आणला आहे.

झाले काय तर स्त्री च्या मनात आणि पुरुषाच्या भाग्यात काय लिहिले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. सामन्याच्या पुर्वार्धात अर्शदिपसिंगने तर उत्तरार्धात कोहलीने आपले भाग्याला विराट कलाटणी देत याची देही याची डोळी क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. चार सप्टेंबरला आशिया चषकात पाकविरूद्ध एक सोपा झेल सोडत अर्शदिपने क्रिकेट प्रेमींचा राग ओढवून घेतला होता. मात्र या पठ्ठ्याने हिंमत न हारता पुन्हा मैदानात उभा राहिला आणि आजच्या पाकविरूद्ध लढतीत विजयाची बीजे रोवण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता.

बाबर आझम, मोहम्मद रिझवान ही जोडागोळी म्हणजे पाकची दिल आणि धडकन आहे. मात्र आपल्या भन्नाट चेंडूने अर्शदिपने दोघांना दिवे लावण्याची संधी दिली नाही. निश्चितच अर्शदिपची फर्शसे अर्शतक ची कहानी कौतुकास्पद आहे. वास्तविकत: इथेच आपल्याला विजयाचे मधूर फळ चाखायला मिळण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यातच भुवीने धावांचा सेल बंद केल्याने भारतीय गोटात आनंदाचे वातावरण होते. तरीपण पाकची धावसंख्या हनुमानाच्या शेपटी सारखी लांबत चालली होती आणि अक्षर पटेलला इफ्तीखार अहमदने अक्षरशः धुवत सामना पाककडे झुकवला होता. अखेर मोहम्मद सामी ने ही कोंडी फोडली आणि भारतीयांच्या जीवात जीव आला. सामी पाठोपाठ भारतीय संघातील एक्स फॅक्टर म्हणजेच पांड्या ने वाहत्या गंगेत हात धुवून चक्क तीन बळी टीपले.

खरी मजा तर इंटरव्हल नंतर येणार होती. एकतर मेलबोर्नला खेळपट्टीवर गवत,पेस आणि बाऊन्स. पाठीशी १६० धावांचे चिलखत लाभताच पाकचे गोलंदाज मैदानात राडा करणार हे निश्चित होते. तसेही ते 'आज कुछ तुफानी करते है' मुडमध्ये असल्याने पाक गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजीत आन बान शान की लढाई होती. आपली सलामीची जोडी मागील टी ट्वेंटी विश्वचषकाच्या कटू स्मृतीने गारठलेली दिसत होती. अखेर राहुल रोहीतला त्या दु:स्वप्नाने ग्रासले आणि दोन्ही सलामीवीरांनी तुमचा संघ तुमची जबाबदारी करत तंबूची वाट धरली. मेलबोर्नला तसाही रात्रीचा सूर्य दिसत नाही तर मग तिथे सूर्यकुमार कसा काय तळपणार? भरीस भर म्हणून अक्षर पटेलने खेळपट्टीवर धावचीत होण्याची आत्महत्या करताच भारतीय पाठीराख्यांनी आभाळाला हात जोडले.

तसेही भारतीय पाठीराख्यांचे चुकले कुठे? प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी चंदेरी किनार असतेच आणि मैदानावर झालेही तसेच. चार बाद एकतीस वरून एकशे साठ धावा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. मैदानावर लाखो करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षा चेस मास्टर विराटवर अवलंबून होत्या. वर्षभरापूर्वी विराटचे प्रदर्शन पाहता तो संपल्यात जमा आहे असेच वाटत होते. परंतु त्याने फॉर्म इज टेंपररी बट क्लास इज पर्मनंट चा क्रिकेट जगताला साक्षात्कार घडवून दिला. बरं विराटच्या सोबतीला कोण होतं तर पांड्या आणि शेवटचा तज्ञ फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक, नंतर आनंदी आनंद होता. अशा बिकट अवस्थेत विराटसाठी एकशेसाठ धावांचा आकाशकंदील लावणे एक महत्कार्य होते.

विराट पांड्या जोडीने सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे चा मुलमंत्र जपत आगेकूच केली. हळूहळू 'कत्ल की रात' जवळ येत होती आणि यावेळी दोघांनीही शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ चा मार्ग अवलंबला. बाबर सेनेचा तोफखाना क्रुर शाहिन आफ्रिदी आणि तेजतर्रार हॅरीफ रौफने सांभाळला होता. तर आपल्या संताजी धनाजी जोडीचा डोळा पाक आक्रमणातील कच्चा दुवा फिरकीपटू मोहम्मद नवाज वर होता. मात्र मो.नवाजची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता. आफ्रिदी,रौफ सारख्या मुळावर घाव घातले की मो.नवाज सारख्या फांद्या आपोआप खाली येणार हे दोघांनी ताडले आणि अब की बार विराट सरकारचा नारा मेलबोर्नच्या रणांगणावर घुमू लागला.

खरेतर शाहिन आफ्रिदी आज पुर्णपणे लयात नव्हता, त्यातच पांड्या विराट जोडीचा चांगलाच वार्मअप झाला होता.  अठरा चेंडूत अठ्ठेचाळीस धावांचे गणित येताच दोघांनीही टॉप गिअर टाकत आफ्रिदीचा धुव्वा उडवत पहिले ठाणे जिंकून भारताच्या कुडीत प्राण ओतले. एकोणिसावे षटक हॅरिस रौफच्या वाट्याला आले आणि इथेच भारताच्या कित्येक वर्षांच्या भळभळत्या जखमेवर कोहली विराटलेप लावणार होता. आठवा जावेद मियांदादचा चेतन शर्माला हाणलेला तो षटकार. चीन च्या भिंतीपेक्षाही मजबूत होत विराटने हॅरीसला दोन सणसणीत षटकार ठोकले. त्यातला पहिला अविश्वसनिय षटकार केवळ कोहली अथवा देवंच मारू शकतो. दुसरा षटकार तर वेटरला टीप द्यावी एवढ्या सहजतेने मारला होता.  या दोन्ही षटकारांच्या भुकंप लहरी थेट लाहौर ते इस्लामाबाद पर्यंत जाणवल्याच्या बातम्या आहेत.

भारतियांनी दोन्ही ठाणी काबीज करताच अंतिम पाडाव दृष्टीपथात आला होता. गोलंदाजांच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघ सिंहाच्या जोडीपुढे मो.नवाज नावाचे कोवळे सावज होते. मात्र हे सावज नसून सापळा होता. पांड्या अलगद या सापळ्यात अडकला आणि पुन्हा एकदा काळीज वरखाली होऊ लागले होते. हातातोंडाशी आलेला घास पाक हिसकावून तर घेणार नाही ना अशी भीती वाटत होती. मात्र विराटने स्ट्राईक घेताच नवाजच्या सापळ्याची शेळी झाली. पहिले षटकार आणि नोबॉल नंतर वाईड बॉल. नंतर फ्री हिटवर तीन धावा काढताच विजयश्री माळ घेऊन टीम इंडियाकडे येऊ लागली. मात्र कहानी में ट्वीस्ट अजूनही बाकी होते.

अनुभवी दिनेश कार्तिक ऐनवेळी गोंधळला आणि परत एकदा भारतीयांची धडधड वाढली. अखेर रविचंद्रन अश्विनने शांतचित्ताने मो.नवाजला चुक करण्यास भाग पाडले. एक चेंडू वाईड जाताच पाकचे अवसान गळाले. उरलीसुरली कसर पुर्ण करत अश्विनने पाकच्या जखमेवर मीठ चोळले. अद्भुत, अवर्णनीय असा विजय साकारत टीम इंडियाने देशवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. विराटच्या बॅटींग क्लासला पाककडे तोड नव्हता. शेवटचे षटक फिरकीपटूला देऊन बाबरने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. जर या सामन्याचा थोडक्यात सारांश लिहायचा झाला तर अर्शदिपसिंगचे दोन बळी आणि विराटचे दोन षटकार सर्वाकाही सांगून जाते. तरीपण विराटचे हॅरीसला मारलेले दोन षटकार पाहून 'दो ही मारा लेकिन सॉलीड मारा' असे म्हणावेसे वाटते. भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
**********************************
दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, October 22, 2022

धूलो के शहर में है घर अपना,,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *धूलों के शहर में है घर अपना,,!*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
सध्या आपल्याकडे दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि पर्यावरण, प्राणीवाद्यांना ध्वनी वायू प्रदूषणाने भेडसावले आहे. निश्चितच सर्वसामान्य जनताही आता याबाबतीत जागरूक झाल्याने यांत संयम पाळला जात आहे. मात्र याबाबतीत नागपूरचा हिंगणा मार्ग थोडा कमनशिबी म्हणावा लागेल. कारण जवळपास तीन चार महिन्यांपासून या मार्गावर रस्ते बांधकाम सुरू असून धूळ, वाहतूक कोंडीने सर्वसामान्य जनतेचा जीव मेतकुटीला आला आहे. भुतो न भविष्यती अशा धूळ समस्येने सर्वांना हैराण केले असून या मार्गावर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

झाले काय तर हिंगणा मार्ग म्हणजे मिनी इंडीयाची झलक आहे. इथे काय नाही, नोकरी,रोजगार,व्यवसाय,शिक्षणाच्या दृष्टीने अखिल भारतीय बांधवांचा इथे संगम बघायला मिळतो. शैक्षणिक क्षेत्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन मोठे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये, गल्लोगल्ली उगवलेल्या लहान मोठ्या शाळा, इतर महाविद्यालय, मंगल कार्यालय, मोठमोठाले शॉपिंग कॉम्प्लेक्स, शासकीय कार्यालये, एसआरपीएफ कॅम्प, सीआरपीएफ कॅम्प, एमआयडीसी,कामगार वस्ती, झोपडपट्टी सोबतच आठवड्यात दोनदा भरणारा आठवडी बाजार. अर्थातच लोकसंख्येची घनता जबरदस्त आहे. शिवाय हा मार्ग हिंगणा तालुक्याच्या संपर्कासाठी प्रमुख मार्ग असल्याने बारामाही वाहतूकीची समस्या असते. याच समस्येवर तोडगा म्हणून हा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या मार्गाची स्थिती आणि गती पाहता भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची पाळी आली आहे.

निश्चितच एवढ्या प्रमुख मार्गाचे काम तातडीने होणे अपेक्षित होते. मात्र बांधकाम विभागाची गती आणि कासव यांत शर्यत लावली तर कासव १००% जिंकणार यात वादच नाही. त्यातच सणासुदीचे दिवस, विद्यार्थ्यांचा परिक्षांचा काळ पाहता या मार्गाच्या बांधकामाला न्याय दिल्याचे वाटत नाही. इथे पादचारी, दुचाकी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहने,ट्रक ट्रेलर्स सर्वकाही एकाच गतीने चालत असल्याने सर्वधर्मसमभावाचे तंतोतंत पालन केले जाते. नाही म्हणायला जनप्रतिनिधी असो की सामाजिक संस्था अथवा वाहतूक विभाग आपापल्या परीने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु जिथे आभाळच फाटले आहे तिथे ठिगळं लावणार तरी कुठे कुठे? उरलीसुरली कसर वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे पुर्ण केली जाते. यामुळे आपलाच अमूल्य वेळ, इंधनाचा अपव्यय होतो. मात्र समजतं पण उमजत नाही अशी परिस्थिती आहे.

या मार्गावर धूळीचे साम्राज्य असल्याने वैद्यकीय व्यवसायात बरकत आली आहे. नाक गळणे,नाक चोंदणे,डोळे लाल होणे,खोकला, छाती भरून दाटून येणे, आवाजात फरक जाणवणे,दम लागणे, अंगावर खाज सुटणे, अंगदुखी, कंबर मणक्यांचे दुखणे आदी आजारांची रेलचेल आहे. छोटयामोठ्या अपघाताशिवाय या मार्गाचा उल्लेख करणे चुकीचे ठरेल. तरीपण धुळीने कळत नकळत स्थानिक रहिवाशांना आयरन पुरवल्याने या भागात आयरन डेफीशिअंशी जवळपास नसल्यात जमा आहे. एवढेच कशाला या मार्गावर नियमित प्रवास करणारे आता आयरन मॅन ओळखले जाऊ लागले आहेत. तर शालेय विद्यार्थी आता विद्यार्थी न राहता त्यांना सन्मानाने धूल का फूल म्हटले जाऊ लागले आहे. या धूळीने गोरगरीब श्रीमंतांतील दरी बुजवली असून सगळ्यांचा रंग एकसारखा दिसत असल्याने आता इथे राधा क्यों गोरी मै क्यूं काला असं कुणीही म्हणत नाही.

वैद्यकीय व्यवसायाला या मार्गावर अच्छे दिन आले असले तरी किराणा आणि जनरल स्टोअर्स मधून पॉण्ड्स सारख्या फेस टॅल्कम पावडरची मागणी अचानक कमी झाल्याची चर्चा आहे. धुळीचे सर्वव्यापी रूप पाहता या भागांत लवकरच एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना धूळकन्या, धूळसम्राज्ञी, धूळश्री, धूळगौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात येण्याची शक्यता आहे. एवढेच कशाला धुळीचे महत्व, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम पाहता विमा कंपन्या पुढे सरसावल्या असून येत्या काही दिवसांत धूळ जीवन, धूळ आनंद सारख्या आरोग्य विमा योजना 'धूल के साथ भी, धूल के बाद भी' या कॅच लाईनसह विक्रीस उपलब्ध होतील अशी आशा आहे.

खरेतर या मार्गावरील धूळ पाहता धूळ चारणे, धूळीस मिळवणे, डोळ्यांत धूळ फेकणे,धूळ माथ्यावर लावणे, धूळधाण उडणे आदी वाक्प्रचार प्रचलित झाले असावे असे वाटते. यावेळी धूळीने या मार्गाची केलेली दुर्दशा पाहता खुद्द फटाके सुद्धा लोकलाजेखातर प्रदुषण करणार नाही असा विश्वास वाटतो. कदाचित या मार्गाची दुरावस्था पाहता हिंगणा तालुक्याचे नामकरण धुळे तालुका तर हिंगणा मार्गाला धूळमार्ग घोषित करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करु शकतात. निश्चितच एवढ्या गजबजलेल्या मार्गावर बांधकाम थोडे अवघड जरूर आहे मात्र अशक्य अजिबात नाही. सोबतच हिंगणा मार्गाला पर्याय म्हणून त्रिमुर्ती नगरच्या मंगलमुर्ती चौकातून जयताळा मार्गे जाण्याचा किंवा एमआयडीसी भागातून वाहतूक काही प्रमाणात वळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.मात्र या दोन्ही पर्यायी मार्गांची अवस्था पाहता आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखे आहे.

तरीपण बांधकाम विभाग तत्परता दाखवून सर्वासामान्यांना या जोखडातून लवकरच मुक्त करतील अशी अपेक्षा आहे. 'रोम वॉज नॉट बील्ट इन ए डे' हे जरी खरे असले तरी आजकालचे आधुनिक तंत्रज्ञान पाहता अशक्य असे काहीच नाही. गरज आहे ती सामान्य जनतेसोबतच लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी आणखी योग्य प्रकारे पाठपुरावा करण्याची. 'गाव करी ते राव काय करी' म्हणतात ते याचसाठी. अन्यथा आणखी काळासाठी जनतेला धुळीचा पाहुणचार टाळणे अपरिहार्य आहे. तसेच १९८१ च्या लव्ह स्टोरी या चित्रपटातील कुमार गौरव, विजेता पंडीत यांवर चित्रीत केलेलं, अमीत कुमार लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गित 'देखो मैने देखा है ये इक सपना, फुलों के शहर में है घर अपना' गाण्याऐवजी धूलों के शहर में है घर अपना म्हणण्याची आपल्यावर पाळी येईल असे वाटते.
*********************************
दिनांक २२ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Sunday, October 16, 2022

इजिप्सी, वाचल्याने होत आहे रे,,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *इजिप्सी,वाचल्याने होत आहे रे,,!*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
सध्या सर्वत्र सोशल मीडियाने धुमाकूळ घातला आहे. मग ते फेसबुक असो की व्हाट्सअप अथवा इतर प्रकार. मात्र या टोळधाडीत वाचनसंस्कृती कशी तग धरेल हा प्रश्नच आहे. मात्र हा प्रश्न जेवढा जटील आहे तेवढाच सोपा सुद्धा आहे. फक्त गरज असते ती एखाद्या प्रश्नाकडे डोळसपणे बघण्याची. सध्याचे मराठी चित्रपट असो की मराठी साहित्य, प्रेक्षक,वाचक आणि वास्तविकता यांना केंद्रस्थानी ठेवून काही केले तर हाती नक्कीच लागेल. अशाच पार्श्वभूमीवर मनोविकास प्रकाशनचे श्री रवि वाळेकर, पुणे लिखित 'इजिप्सी' हे रसाळ प्रवासवर्णनात्मक पुस्तक हाती लागले. कडाडून भूक लागलेल्याच्या हाती अचानकपणे पंचपक्वानाचे ताट लागावे अशीच काहीशी अवस्था हे पुस्तक हातात पडताच माझी झाली.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर इजिप्सी ला प्रवासवर्णन म्हणणं म्हणजे या पुस्तकावर अन्याय आहे. यात काय नाही,, भूगोल, इतिहास,धर्म,पर्यटन, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय विषयांना स्पर्श करत एक जागृत साहित्यकृती आपणास अनुभवता येते. विषय कोणताही असो, त्यात जिवंतपणा भरण्याची लेखकाची हातोटी आहे. केवळ डोळ्यांनी दिसतं तेवढंच लिहिणे नव्हे तर नजरेआड असणाऱ्या भावनांची दखल देत एखाद्या कलाकुसरीला, दगडांच्या मुर्ती,पुतळ्यांना बोलते करणं यात लेखकाचं कसब दिसून येतं.

फोर डेज फाईव्ह नाईट्स, पॅकेज टूर ही आपली पर्यटनाची गोड समजूत आहे. मात्र या कल्पनेला छेद देत वन मॅन शो, अर्थातच मनमुराद भटकने, ते सुद्धा वर्षभर त्या देशाचा अभ्यास करुन, कोणत्याही सिमारेषा अथवा काटेकोर बंधनात न अडकता केलेली भटकंती तुम्हाला जणुकाही आपण प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट दिल्याची जाणीव करून देते. या इजिप्सीच्या प्रारंभीच 'व्हिजा ते गीझा' लेखकाची झालेली दमछाक आपल्याला घरबसल्या घाम फोडते. इजिप्त आणि पिरॅमिड जवळपास पर्यायवाची शब्द आहेत परंतु अजुनही तिथली सरकारी यंत्रणा पर्यटकप्रेमी दिसत नाही. एखाद्या रूपगर्वीतेने मजनूंना दुर्लक्षित करावे इतपत तिथली एकंदरीत परिस्थिती दिसते.

अखेर एकदाचं द्राविडी प्राणायाम घालून लेखक इजिप्तवर स्वारी करण्यात यशस्वी होतात आणि आपण एका गुढ,रम्य,थरारक सफारीचे साक्षीदार होतो. त्यातही संपूर्ण इजिप्त पालथा घालतांना तिथला इतिहास 'फ्रॉम फेरोह बॅक टू कैरो' वाचकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. लेखकाची कैरो विमानतळावर उतरताच होणारी अनोळखी घुसमट ते परततांना ह्रद्य आठवणींनी मन गलबलून येणे या पर्वांनी आपण भावनिकदृष्ट्या ओलेचिंब होतोय. सर्वो डालो जान डालो अशी एक लुब्रीकंट तेलाची जाहिरात आहे. ही इजिप्सी लिहितांना सुद्धा लेखकाने आपल्या लेखनात जान टाकली आहे.

जवळपास साडेचार हजार वर्षांपासून अगम्य आणि अलिप्त असलेला ऐतिहासिक खजाना लेखनीबद्ध करणे येरागबाळ्याच काम नक्कीच नव्हे. अगदी सक्कारा येथील पहिला स्टेप पिरॅमिड ते गिझाच्या ग्रेट पिरॅमिडची गुंतागुंत, सोबतीला अद्भुत हायरोग्लिफ लिपीचे वर्णन वाचकांना मंत्रमुग्ध करते. आक्रमक अलेक्झांडर आणि त्याचा प्रभाव अलेक्झांड्रीया शहरावर प्रभावीपणे दिसून येतो. याच शहरातले बिब्लिओथेका अलेक्झांड्रीया हे सर्वात मोठे ग्रंथालय त्याची दिव्यता सांगून जाते. तसेच पोर्ट सैदचा सुएझ कालवा आपल्याला परत एकदा शालेय जीवनात घेऊन जातो. लाल सागर आणि भूमध्य सागराला जोडणारा हा मानवनिर्मित जवळपास दोनशे किमी अंतराचा कालवा आशिया आफ्रिका खंडातला दुवा आहे.

या भटकंतीत लेखकाला फेसबुक फ्रेंड रोझ, तिची नातेवाईक असलेली गाईड सारा आणि अचानक भेटलेला मदतनिस कम हरकाम्या अहमद जीवनाच्या आगळ्यावेगळ्या पैलूंचे प्रदर्शन घडवते. रोझ डेंटीस्ट असूनही तिला पारंपरिक पोषाखातून सुटका नाही, शिवाय पुरुषांना तपासण्याची तिला मुभा नाही हे ऐकून थोडे विचित्रच वाटते. तर 'माय नेम इज सारा' अशी ओळख करून देणारी चुणचुणीत सारा आधुनिक कैरोची प्रतिनिधित्व करते. छोटी हाईट मोठी फाईट असलेला अहमद गरिबीचे चटके लागलेल्या वास्तविक जीवनाचे दर्शन घडवतो. प्रवासादरम्यान स्थानिक मुळनिवासी किंवा आदिवासी जनजाती असलेली न्युबीयन लोकप्रजाती विस्थापित आणि दुर्लक्षित घटक म्हणून आपले लक्ष वेधून घेते.

अर्थातच इजिप्त केवळ कैरो अथवा पिरॅमिड पर्यंत मर्यादित नाही तर मेम्फिसचे उघडे संग्रहालय, बैलांचे अवाढव्य शवागार सेपेरियम, कार्नाक, लक्सोर मंदिरे पर्यटकांना भुरळ पाडतात. सोबतच इ.स.पूर्व १२४४/६५ चे अबू सिंबेल मंदिर आस्वान धरणामुळे टेकडी कापून दुसरीकडे वसवले आहे हे सांगून सुद्धा खरे वाटत नाही इतपत हुबेहुब बसवले आहे. ओबेलिक्सचा स्तंभ असो की हाइपोस्टाईल म्हणजेच मंदिरातले रोमन पद्धतीचे उंच खांब असो, आजचे विज्ञान त्यांच्या पुढे किती खुजे आहे याचा प्रत्यय येतो. त्यातही पुरातन राजे,फेरोह आणखीनच पर्यटकांना खेचून घेतात. अर्थातच मानव म्हटले की हेवेदावे,मग्रुरी,मिरवणे, कट कारस्थान यांचाही तिथे अपवाद नाही. मात्र मृत्यू नंतर जीवनासाठी त्यांनी ममी करण्याचा जो उपक्रम राबवला त्याला तोड नाही.

याच ममी च्या जतनासाठी भव्यदिव्य पिरॅमिड आणि किंग्ज व्हॅली, क्विन्स व्हॅली चे निर्माण झाले. या संरचना इतक्या अजस्त्र, अगम्य, अचंबित करणाऱ्या आहेत की त्या मानवनिर्मित आहेत यावर विश्वास बसत नाही. शिवाय या संरचना तुमच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या आहेत. अर्थातच लेखक दर्दी असल्याने अनेक संकटांवर मात करत तिथले जवळपास थेट प्रक्षेपण आपणास अनुभवून देतो. फेरोंची ओळखपाळख असो वा हायरोग्लिफ (चित्रलिपी) चे रहस्य उलगडणे असो, हा लेखनबद्ध चित्रपट सुरवातीपासून तुम्हाला खिळवून ठेवतो.

मुख्य म्हणजे लेखकाने या रोमांचक सहलीची सरळ सोप्या शब्दांत मांडणी केल्याने वाचन सुगम्य होते. मात्र खुफू,खाफ्रे, अखनातेन, तुतनखामेन, नेफेर्तीती, नेफेर्तरी, हॅटशेपसूत आदी वाचताना जीभेला चांगलाच व्यायाम होतो. तसेच महाकाय संरचनेची जटीलता डोकं खाजवायला भाग पाडते. महत्वाचे म्हणजे इजिप्त वर केवळ सैन्य आक्रमणे नव्हे तर समानांतर धार्मिक आक्रमणं सुद्धा झाली. त्याच्या  परिणामस्वरूप मंदिर आणि इतरही वास्तुकलेचा विध्वंस पाहून मन विषण्ण होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांना तोंड देत पिरॅमिड, स्फिंक्स, मंदिर रचना आजही इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत.

इजिप्सीतील इंडीयन वॉर मेमोरिअलचा उल्लेख सरळ तुमच्या ह्रदयाला साद घालतो. १९२६ साली ब्रिटीशांकडून लढतांना जवळपास चार हजार भारतीयांचे रक्त जिथे सांडले ते स्थळ महत्प्रयासाने लेखकाने शोधून काढले. त्या पावन स्थळाची दुर्दशा पाहून मन हळहळते. शेवटच्या प्रकरणात तर लेखकाने पॉवर हिटींग केली आहे. पिरॅमिड, स्फिंक्स, तुतनखामेन सहीत इतरही गुढ, रहस्यमयी बाबींना वैज्ञानिक, पुरातत्वाच्या कसोटीवर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे केवळ प्रवासवर्णन न वाटता कधी हसतखेळत तर कधी खट्याळपणे विषयांना सुकर करत ज्ञान मनोरंजनाचा लंगर आपल्यापुढे लावला आहे. अर्थातच नो रिस्क नो गेन असल्याने लेखकाला एकदा लष्कराच्या तावडीत सापडण्याचाही प्रसंग गुदरला होता. अशा प्रसंगी काय खबरदारी घ्यायची याचा धडा आपल्याला मिळतो. केल्याने होत आहे रे च्या धर्तीवर वाचल्याने होत आहे रे हे समर्पकपणे पटवून देणारे इजिप्सी हे पुस्तक चोखंदळ वाचकांनी नजरेखाली घालायला हवे. खरेतर वाचकांच्या वाचनक्षमतेच्या कक्षा रूंदावणारे पुस्तक म्हणून इजिप्सीचा उल्लेख करावासा वाटतो.
धन्यवाद
**********************************
दिनांक १५ ऑक्टोबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Wednesday, October 5, 2022

मन के हारे, इंदौर में हारे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *मन के हारे, इंदौर में हारे*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
भारतीय क्रिकेट संघाचा एक गुण कौतुकास्पद आहे. परदेशी संघाला शक्यतोवर ते रित्या हाताने परत पाठवत नाही. पाहुण्यांच्या हातात काही तरी द्यायची रित असल्यासारखे टी ट्वेंटीचा अखेरचा सामना आपण द.आफ्रिकेला बहाल केला. अर्थातच आपल्या गोलंदाजांनी आपल्या नावारुपाला जागत दी ग्रेट इंडियन बॉलर सेल लावला आणि द.आफ्रिकेने मिळालेल्या संधीचे सोने केले. खरेतर दसरा हा सण आपला परंतु प्रोटीयाज संघाने शेवटच्या सामन्यात अक्षरशः धावांची सोनेरी लयलूट करत त्यांच्यासाठी मालिकेचा शेवट गोड केला.

झाले काय तर भारतीय संघ मालिकेतील संपूर्ण सामने व्हायच्या आधीच जर मालिका जिंकत असेल तर उर्वरित सामने खेळण्यात ते नेहमीच नाखूष असतात. केवळ औपचारिकता म्हणून मारून मुटकून जबरदस्तीचा रामराम केल्यासारखी आपल्या संघाची मानसिकता असते. याउलट जर मालिकेत प्रारंभीच दणके बसले तर ते उर्वरित सामने जीव तोडून खेळतात. मालिका जरी जिंकली असली तरी अंगात चॅम्पियन बनायची रग भारतीय संघात फारशी दिसत नाही. याचाच जिवंत प्रत्यय इंदोरच्या अंतिम सामन्यात आला.

एकतर इंदौरचे मैदान छोटे, त्यातही रोहीत ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. तसेही रोहीत कडे काय करावे आणि काय करू नये याबाबत फारसे पर्याय नसतात. कारण दुसऱ्या टी ट्वेंटीत २३७ धावा करूनही द.आफ्रिकेने आपल्या संघाच्या तोंडाला फेस आणला होता. आपण पहिले गोलंदाजी घेतली काय नी नंतर केली काय, मार खाणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरं त्यातही मैदान बदलले, गोलंदाज बदलले तरीपण पळसाला पाने तीनच राहतात. वास्तविकत: बीसीसीआयने अटल पेंशन योजना राबवून भुवनेश्वर कुमार,रवी अश्विन आणि उमेश यादव सारख्या गोलंदाजांना सन्मानपूर्वक शाल श्रीफळ देणे अपेक्षित आहे.

 याचा अर्थ नवोदित गोलंदाज खुप चांगली कामगिरी करत आहेत असे नसले तरी त्यांचे वय,फिटनेस, अनुभव पाहता त्यांना माफ केले जाऊ शकते किंवा नया है वह म्हणून सोडून दिले जाऊ शकते. एकंदरीत काय तर भारतीय गोलंदाजी म्हणजे कागज के फूल आहेत. रंग ले आओगे, रुप ले आओगे, पर खुशबू कहांसे लाओगे कागज के फूल अशी आपली गोलंदाजी आहे. अशी भोंगळ गोलंदाजी आणि जोडीला गचाळ क्षेत्ररक्षण लाभल्यावर आपल्या विजयाचे स्वप्न म्हणजे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असल्यासारखे आहे. अगदी पहिल्याच षटकांत क्लिंटन डिकॉकला धावबाद करण्याची नामी संधी आपण गमावली. त्यानंतर डिकॉकने भारतीय गोलंदाजीचा कॉक मोकळा करताच रिली रोस्सोवने बादलीभरून धावा गोळा केल्या.

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या करत आपल्या गोलंदाजांनी चौकार, षटकारांचा भंडारा लावला. एवढे आदरतिथ्य केल्यावर द.आफ्रिकन फलंदाजांनी हर ओव्हर से चौका,छक्का निकलेगा याची पुरेपूर काळजी घेत दोनशेच्या वर धावांचे कर्ज आपल्या नावे केले. अर्थातच गोलंदाजांनी भरमसाठ कर्ज काढायचे आणि फलंदाजांनी टाचा घासत ते फेडायची ही आपली जिंकण्याची पध्दत. मात्र प्रत्येक वेळी फासे तुमच्या मनासारखे कसे काय पडणार. तसेही आफ्रिकन चीत्ते असो की गोलंदाज. त्यांचा वेग, चपळता आणि अचूकता वादातीत आहे.

दुसऱ्याच चेंडूवर क्रॉस सीम टाकत रबाडाने भारतीय फलंदाजीचा कबाडा करणे सुरू केले. त्यात भीत भीतच मैदानावर उतलेल्या श्रेयसला वेन पार्नेल ने बाऊंसरची भीती दाखवत पायचितात पकडले. भारतावर डबल स्ट्राईक होताच दिनेश कार्तिकला मैदानावर उतरवले. मात्र तुफान फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारला डावलून डीके ला वर पाठवण्याचे डावपेच अनाकलनिय होते. भारतीय फलंदाजी धापा टाकत असतांनाच पंतचा बेजबाबदारपणा उफाळून आला. याच मानसिकतेचे पुढच्या फलंदाजांनी तंतोतंत पालन केले. मग तो दिनेश कार्तिक असो की सूर्यकुमार असो. पंत, डीके आणि सूर्यकुमार संपूर्ण षटक चांगले खेळून अखेरच्या चेंडूवर सर्वस्व गमावून बसले.

प्रमुख पाच फलंदाज माघारी परतताच हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने गाडा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकच वेळी दोन गुजराती तुम्हाला तारुन नेईल याची शाश्वती नाही. प्रत्येकाने हातभार लावला तरच काम जमेल. जणुकाही आपल्या फलंदाजांना गरबा खेळण्याची घाई झाल्यासारखे सगळे झटपट परतत होते.अखेर धावांचे बहुमत आपल्याविरुद्ध असल्याने आपला पाडाव झाला. बरे झाले कायद्याने आता २६ आठवडे पर्यंत गर्भपाताला मान्यता दिली परंतु भारतीय फलंदाजीचा तर १९ व्या षटकांतच बोजवारा उडाला. पहिल्या षटकांत लागलेली गळती शेवटपर्यंत थांबली नाही. यापेक्षा मोदीजींनी आणलेल्या चीत्यांनी आपले काम चोखपणे बजावले. बहुतेक मादा चीत्ते प्रेग्नंट असल्याची बातमी आहे तर आपले फलंदाजीतील शेर आफ्रिकन चीत्यांसमोर ढेर झालेले आहेत.

खेळ म्हटले की हारजीत तर होणारच परंतु न लढता हार स्वीकारणे योग्य नव्हे. जणुकाही धावफलकावर दोनशे धावा दिसताच भारतीय फलंदाजांनी नांगी तर टाकली नाही ना असे वाटत होते. विशेषतः टी ट्वेंटीत अशक्य असे काहीच नाही. मात्र मन के हारे सब हारे, मन के जीते सब जीते असे असते. पहिले दोन सामने आणि मालिका जिंकल्याचे यश आपला संघ पचवू शकला नाही. तसेही धन पचवावे व्यापाऱ्याने, खुराक पचवावी म्हशीने आणि क्रिकेट चे यश पचवावे कांगारूंनी असे म्हणतात. एकतर टीम इंडिया अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली असावी किंवा त्यांना द.आफ्रिकेच्या हॅपी इंडेक्स ची काळजी असावी अथवा आपला देश खेळात सुद्धा असहिष्णू नाही असे जगाला दाखवायचे असावे यापलीकडे भारतीय संघाच्या पराजयाचे अन्य कोणतेही कारण सध्यातरी दिसत नाही. असो यानिमित्ताने का होईना, कांगारू आणि द.आफ्रिकेविरूद्ध दुहेरी मालिका आपण निर्भेळपणे जिंकू शकलो नाही याचे उराशी शल्य जरूर राहते.
********************************
दि. ०५ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...