@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*इजिप्सी,वाचल्याने होत आहे रे,,!*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
सध्या सर्वत्र सोशल मीडियाने धुमाकूळ घातला आहे. मग ते फेसबुक असो की व्हाट्सअप अथवा इतर प्रकार. मात्र या टोळधाडीत वाचनसंस्कृती कशी तग धरेल हा प्रश्नच आहे. मात्र हा प्रश्न जेवढा जटील आहे तेवढाच सोपा सुद्धा आहे. फक्त गरज असते ती एखाद्या प्रश्नाकडे डोळसपणे बघण्याची. सध्याचे मराठी चित्रपट असो की मराठी साहित्य, प्रेक्षक,वाचक आणि वास्तविकता यांना केंद्रस्थानी ठेवून काही केले तर हाती नक्कीच लागेल. अशाच पार्श्वभूमीवर मनोविकास प्रकाशनचे श्री रवि वाळेकर, पुणे लिखित 'इजिप्सी' हे रसाळ प्रवासवर्णनात्मक पुस्तक हाती लागले. कडाडून भूक लागलेल्याच्या हाती अचानकपणे पंचपक्वानाचे ताट लागावे अशीच काहीशी अवस्था हे पुस्तक हातात पडताच माझी झाली.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर इजिप्सी ला प्रवासवर्णन म्हणणं म्हणजे या पुस्तकावर अन्याय आहे. यात काय नाही,, भूगोल, इतिहास,धर्म,पर्यटन, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय विषयांना स्पर्श करत एक जागृत साहित्यकृती आपणास अनुभवता येते. विषय कोणताही असो, त्यात जिवंतपणा भरण्याची लेखकाची हातोटी आहे. केवळ डोळ्यांनी दिसतं तेवढंच लिहिणे नव्हे तर नजरेआड असणाऱ्या भावनांची दखल देत एखाद्या कलाकुसरीला, दगडांच्या मुर्ती,पुतळ्यांना बोलते करणं यात लेखकाचं कसब दिसून येतं.
फोर डेज फाईव्ह नाईट्स, पॅकेज टूर ही आपली पर्यटनाची गोड समजूत आहे. मात्र या कल्पनेला छेद देत वन मॅन शो, अर्थातच मनमुराद भटकने, ते सुद्धा वर्षभर त्या देशाचा अभ्यास करुन, कोणत्याही सिमारेषा अथवा काटेकोर बंधनात न अडकता केलेली भटकंती तुम्हाला जणुकाही आपण प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट दिल्याची जाणीव करून देते. या इजिप्सीच्या प्रारंभीच 'व्हिजा ते गीझा' लेखकाची झालेली दमछाक आपल्याला घरबसल्या घाम फोडते. इजिप्त आणि पिरॅमिड जवळपास पर्यायवाची शब्द आहेत परंतु अजुनही तिथली सरकारी यंत्रणा पर्यटकप्रेमी दिसत नाही. एखाद्या रूपगर्वीतेने मजनूंना दुर्लक्षित करावे इतपत तिथली एकंदरीत परिस्थिती दिसते.
अखेर एकदाचं द्राविडी प्राणायाम घालून लेखक इजिप्तवर स्वारी करण्यात यशस्वी होतात आणि आपण एका गुढ,रम्य,थरारक सफारीचे साक्षीदार होतो. त्यातही संपूर्ण इजिप्त पालथा घालतांना तिथला इतिहास 'फ्रॉम फेरोह बॅक टू कैरो' वाचकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. लेखकाची कैरो विमानतळावर उतरताच होणारी अनोळखी घुसमट ते परततांना ह्रद्य आठवणींनी मन गलबलून येणे या पर्वांनी आपण भावनिकदृष्ट्या ओलेचिंब होतोय. सर्वो डालो जान डालो अशी एक लुब्रीकंट तेलाची जाहिरात आहे. ही इजिप्सी लिहितांना सुद्धा लेखकाने आपल्या लेखनात जान टाकली आहे.
जवळपास साडेचार हजार वर्षांपासून अगम्य आणि अलिप्त असलेला ऐतिहासिक खजाना लेखनीबद्ध करणे येरागबाळ्याच काम नक्कीच नव्हे. अगदी सक्कारा येथील पहिला स्टेप पिरॅमिड ते गिझाच्या ग्रेट पिरॅमिडची गुंतागुंत, सोबतीला अद्भुत हायरोग्लिफ लिपीचे वर्णन वाचकांना मंत्रमुग्ध करते. आक्रमक अलेक्झांडर आणि त्याचा प्रभाव अलेक्झांड्रीया शहरावर प्रभावीपणे दिसून येतो. याच शहरातले बिब्लिओथेका अलेक्झांड्रीया हे सर्वात मोठे ग्रंथालय त्याची दिव्यता सांगून जाते. तसेच पोर्ट सैदचा सुएझ कालवा आपल्याला परत एकदा शालेय जीवनात घेऊन जातो. लाल सागर आणि भूमध्य सागराला जोडणारा हा मानवनिर्मित जवळपास दोनशे किमी अंतराचा कालवा आशिया आफ्रिका खंडातला दुवा आहे.
या भटकंतीत लेखकाला फेसबुक फ्रेंड रोझ, तिची नातेवाईक असलेली गाईड सारा आणि अचानक भेटलेला मदतनिस कम हरकाम्या अहमद जीवनाच्या आगळ्यावेगळ्या पैलूंचे प्रदर्शन घडवते. रोझ डेंटीस्ट असूनही तिला पारंपरिक पोषाखातून सुटका नाही, शिवाय पुरुषांना तपासण्याची तिला मुभा नाही हे ऐकून थोडे विचित्रच वाटते. तर 'माय नेम इज सारा' अशी ओळख करून देणारी चुणचुणीत सारा आधुनिक कैरोची प्रतिनिधित्व करते. छोटी हाईट मोठी फाईट असलेला अहमद गरिबीचे चटके लागलेल्या वास्तविक जीवनाचे दर्शन घडवतो. प्रवासादरम्यान स्थानिक मुळनिवासी किंवा आदिवासी जनजाती असलेली न्युबीयन लोकप्रजाती विस्थापित आणि दुर्लक्षित घटक म्हणून आपले लक्ष वेधून घेते.
अर्थातच इजिप्त केवळ कैरो अथवा पिरॅमिड पर्यंत मर्यादित नाही तर मेम्फिसचे उघडे संग्रहालय, बैलांचे अवाढव्य शवागार सेपेरियम, कार्नाक, लक्सोर मंदिरे पर्यटकांना भुरळ पाडतात. सोबतच इ.स.पूर्व १२४४/६५ चे अबू सिंबेल मंदिर आस्वान धरणामुळे टेकडी कापून दुसरीकडे वसवले आहे हे सांगून सुद्धा खरे वाटत नाही इतपत हुबेहुब बसवले आहे. ओबेलिक्सचा स्तंभ असो की हाइपोस्टाईल म्हणजेच मंदिरातले रोमन पद्धतीचे उंच खांब असो, आजचे विज्ञान त्यांच्या पुढे किती खुजे आहे याचा प्रत्यय येतो. त्यातही पुरातन राजे,फेरोह आणखीनच पर्यटकांना खेचून घेतात. अर्थातच मानव म्हटले की हेवेदावे,मग्रुरी,मिरवणे, कट कारस्थान यांचाही तिथे अपवाद नाही. मात्र मृत्यू नंतर जीवनासाठी त्यांनी ममी करण्याचा जो उपक्रम राबवला त्याला तोड नाही.
याच ममी च्या जतनासाठी भव्यदिव्य पिरॅमिड आणि किंग्ज व्हॅली, क्विन्स व्हॅली चे निर्माण झाले. या संरचना इतक्या अजस्त्र, अगम्य, अचंबित करणाऱ्या आहेत की त्या मानवनिर्मित आहेत यावर विश्वास बसत नाही. शिवाय या संरचना तुमच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या आहेत. अर्थातच लेखक दर्दी असल्याने अनेक संकटांवर मात करत तिथले जवळपास थेट प्रक्षेपण आपणास अनुभवून देतो. फेरोंची ओळखपाळख असो वा हायरोग्लिफ (चित्रलिपी) चे रहस्य उलगडणे असो, हा लेखनबद्ध चित्रपट सुरवातीपासून तुम्हाला खिळवून ठेवतो.
मुख्य म्हणजे लेखकाने या रोमांचक सहलीची सरळ सोप्या शब्दांत मांडणी केल्याने वाचन सुगम्य होते. मात्र खुफू,खाफ्रे, अखनातेन, तुतनखामेन, नेफेर्तीती, नेफेर्तरी, हॅटशेपसूत आदी वाचताना जीभेला चांगलाच व्यायाम होतो. तसेच महाकाय संरचनेची जटीलता डोकं खाजवायला भाग पाडते. महत्वाचे म्हणजे इजिप्त वर केवळ सैन्य आक्रमणे नव्हे तर समानांतर धार्मिक आक्रमणं सुद्धा झाली. त्याच्या परिणामस्वरूप मंदिर आणि इतरही वास्तुकलेचा विध्वंस पाहून मन विषण्ण होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांना तोंड देत पिरॅमिड, स्फिंक्स, मंदिर रचना आजही इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत.
इजिप्सीतील इंडीयन वॉर मेमोरिअलचा उल्लेख सरळ तुमच्या ह्रदयाला साद घालतो. १९२६ साली ब्रिटीशांकडून लढतांना जवळपास चार हजार भारतीयांचे रक्त जिथे सांडले ते स्थळ महत्प्रयासाने लेखकाने शोधून काढले. त्या पावन स्थळाची दुर्दशा पाहून मन हळहळते. शेवटच्या प्रकरणात तर लेखकाने पॉवर हिटींग केली आहे. पिरॅमिड, स्फिंक्स, तुतनखामेन सहीत इतरही गुढ, रहस्यमयी बाबींना वैज्ञानिक, पुरातत्वाच्या कसोटीवर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे केवळ प्रवासवर्णन न वाटता कधी हसतखेळत तर कधी खट्याळपणे विषयांना सुकर करत ज्ञान मनोरंजनाचा लंगर आपल्यापुढे लावला आहे. अर्थातच नो रिस्क नो गेन असल्याने लेखकाला एकदा लष्कराच्या तावडीत सापडण्याचाही प्रसंग गुदरला होता. अशा प्रसंगी काय खबरदारी घ्यायची याचा धडा आपल्याला मिळतो. केल्याने होत आहे रे च्या धर्तीवर वाचल्याने होत आहे रे हे समर्पकपणे पटवून देणारे इजिप्सी हे पुस्तक चोखंदळ वाचकांनी नजरेखाली घालायला हवे. खरेतर वाचकांच्या वाचनक्षमतेच्या कक्षा रूंदावणारे पुस्तक म्हणून इजिप्सीचा उल्लेख करावासा वाटतो.
धन्यवाद
**********************************
दिनांक १५ ऑक्टोबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment