Monday, February 27, 2023

सुहाना सफर और मौसम हसीं, भाग ०१

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *सुहाना सफर और ये मौसम हसीं*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
गेली दोन वर्षे कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. यात प्रामुख्याने नुकसान झाले ते पर्यटन क्षेत्राचे. अर्थातच भटकंती करणे हे रक्तातच असल्याने ही दोन वर्षे आमची किती घालमेल झाली असेल ते आम्हालाच माहीत. तरीपण कितीही अडचणी असल्या तरी कुठे ना कुठे मार्ग निघतोच आणि झालेही तसेच. कोरोनाने जगबंदी केल्याने आमचा मोर्चा देशी पर्यटनाकडे वळला होता‌. कारण युरोपात जातो म्हटले तर रशिया युक्रेन च्या रासायनिक बॉम्ब ची दहशत तर पुर्वेकडे चीनचा जैविक कोरोना बॉम्ब! मग मागच्या वर्षी कार्डेलीयाचे क्रुझायण आटोपले आणि यावर्षी चंदीगढची वाट धरली. खरेतर हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे होते. तरीपण समथींग इज बेटर दॅन नथिंग म्हणून आम्ही देशी पर्यटनाला सज्ज झालो.

आपल्या कडे पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा. कारण सगळीकडे थंडी असल्याने फारसे नवनवीन ड्रेस सोबत घ्यावे लागत नाही. एक स्वेटर किंवा जॅकेट अंगावर टाकले की झाली कपड्यांची खरेदी. मात्र उत्तरेला हिवाळ्यात पर्यटनाला जाणे म्हणजे खतरों के खिलाडी असावे लागते. काय ती बोचरी थंडी असते आणि धोकादायक धुके. हिवाळा खरेतर माझा आवडता ॠतू. झोप येवो अथवा न येवो थंडीमुळे अंथरुणात सापासारखे अंग चोरून पहुडण्यात मस्त मजा असते. मात्र प्रवासाचे विमान सकाळी असले तर झोपेचे खोबरे झालेच म्हणून समजा. त्यातही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असेल काही केल्या झोप येत नाही. अशावेळी आपण साक्षात घड्याळाच्या अलार्म पेक्षाही जास्त सतर्कतेने उठतो.

प्रवासाच्या दिवशी सकाळी उठणे म्हणजे झोप आणि प्रवास यात टू बी ऑर नॉट टू बी असा संघर्ष असतो. तसेही उठल्याबरोबर गरमागरम चहा म्हणजे दुग्धशर्करा योग असतो. त्यातही उपाशी पोटी थाईरॉइडची गोळी घेऊन अर्धा एक तास चहाची वाट पाहणं अत्यंत अवघड.या काळात झोपतो म्हटलो तर झोप येत नाही, जागतो म्हटलो तर डोळे चुरचुरतात. ना जीने देंगे ना मरणे देंगे अशी अवस्था असतो. ज्या दिवशी उठायचा अगदी आळस येतो नेमके त्याच दिवशी घरातले दुध संपले असते आणि डोळे चोळत जाऊन दुकानातून दुध आणणं म्हणजे आमच्या साठी सश्रम कारावास असतो. 

मात्र या दु:खातही प्रेमाची अनुभूती येते. होते काय तर गल्लीतली दहाबारा मोकाट कुत्र्यांची टोळी मालक अचानक कसेकाय सकाळी सकाळी बाहेर पडले म्हणून घर ते दुकाना पर्यंत सोबत देतात. त्यांच्या फुलप्रुफ संरक्षण गराड्यात चालतांना पाहून पुर्वीच्या जन्मी आपण राजे महाराजे अथवा एखाद्या संस्थानाचे मालक असावे असे उगाचच वाटून जाते.भलेही आजुबाजुची जनता माझ्याकडे कुत्सितपणे पाहत असते परंतु मला त्या टोळीबद्दल आपुलकी वाटते. खरेतर मी कट्टर श्वानप्रेमी वगैरे नाही परंतु त्यांचे निर्व्याज प्रेम पाहून मी गलबलून जातो. प्रेम केवळ आंधळच नसतं तर ते विश्वासू आणि इमानदार पण असतं असा माझा दावा आहे.

चंदीगढची स्वारी बॅचलर गॅंगसोबत असल्याने दे धमाल असणार यांत वादच नव्हता. मी दोन मित्रांसोबत नियोजित वेळेत म्हणजेच उड्डाणाच्या दोन तास पहिले विमानतळावर पोहोचलो. दोन मित्र २५ किमी दुर, कामठी वरून येणार होते. वाहतुकीचा खेळखंडोबा लक्षात घेता त्यांनी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयाने त्यांना गोंधळात टाकले. झाले काय तर ऑटोमोटीव्ह चौक ते विमानतळ असे तिकिट काढून ते रमतगमत बसले. मात्र नागपु‌रला एअरपोर्ट नावाचे तीन मेट्रो स्थानक असल्याने (एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट-चिंचभवन, साऊथ एअरपोर्ट-शिवणगाव) ते सर्वात शेवटच्या स्थानकावर पोहोचले.

इकडे आमची घालमेल सुरू झाली, नक्की हे मित्र कुठे आहे हे समजायला मार्ग नव्हता. कारण गरजेच्या वेळी नेटवर्क नसणे हा मोबाईल कंपन्यांचा स्थायीभाव झाला आहे. अखेर कसाबसा संपर्क झाला आणि दोन मिनिटांत पोहोचतो असा निरोप आला. दहा मिनिटे झाली तरी ही दुक्कल दर्शन देत नव्हती कारण जे तिकिट काढले ते मशिनद्वारे रीड होत नव्हते. अखेर मेट्रोचे कर्मचारी देवदुतासारखे धावून आले आणि या दोन मित्रांना आमच्या हवाली केले. एकदाची सर्वांशी गळाभेट झाली आणि चेक इन सोपस्कारासाठी निघालो. त्यातही अनेकांचा आधार कार्डाचा फोटो म्हणजे निखळ मनोरंजन असते. एखाद्या व्यक्तीचे बावळट रुप बघायचं असल्यास त्याचे आधार कार्ड जरूर बघावे. मी मात्र या प्रसंगातून अनेकदा गेल्याने पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवतो आणि लवकर सुटका करून घेतो.

या टप्प्यात अनेक घोळ असतात, कोणती वस्तू कॅबीन बॅग मध्ये आणि कोणती लगेज बॅगमध्ये यांत माझा हमखास गोंधळ उडतो. तसेही प्रत्येक विमानतळावर कोणते नियम लागू असतात याचा नेम नसल्याने तिथला गोंधळ पाचवीलाच पुजला आहे. दुसरा टप्पा सेक्युरीटी चेकइन म्हणजे आणखी दिव्य असते. एकतर पेन, घड्याळ, चष्मा, जॅकेट, कॅप, चिल्लर नाणी, बेल्ट आणि जोडे काढून ट्रे मध्ये वेगळे ठेवावे लागते. बाकी सगळं ठीक आहे परंतु कंबरेचा बेल्ट सोडणे म्हणजे फारच अवघड जाते. त्यातही रांग मोठी असली तर बेल्ट नसल्याने पॅंट गुरूत्वाचे नियम पाळायला सुरुवात करते आणि हळूहळू खाली सरकत जाते. कसेबसे पॅंटमध्ये कोंबलेले शर्ट, पॅंटशी फारकत घेऊन बाहेर डोकवायला लागते. त्यातच दोन्ही हातात सामानाचा ट्रे असल्याने असहाय स्थिती उत्पन्न होते. जेंव्हा स्लाईडींग बेल्ट वर ट्रे ठेवला जातो तेव्हा कुठे या दिव्यातून सुटका होते.

यानंतर खरी गंमत मेटल डिटेक्टर तपासणीच्या वेळी येते. तिथेही टायटॅनिकच्या केट विन्सलेट सारखी दोन्ही हात पसरवून उलट सुलट पोझ द्यावी लागते. यामुळे होते काय तर उरलेसुरले शर्ट हक्काने पॅंटबाहेर पडते आणि कसेतरीच वाटते. मात्र नाईलाज असतो. झाडाझडतीतून बाहेर पडून पुन्हा एकदा आपला ट्रे पकडून सामानाची आवराआवर करावी लागते. बाहेर सुटलेले पोट पुन्हा बेल्टने बांधून आत टाकावे लागते.आधीच आम्ही लंबोदर, त्यात सर्वांसमोर पोटाचे आतबाहेर करणे अजिबात आवडत नाही. मात्र पोटाला दोष देऊन काय फायदा? जगण्यासाठी खाण्यापेक्षा, खाण्यासाठी जगणे हे आमचे ब्रीदवाक्य असल्याने पोट खाल्लेल्या मिठाला, मिठाईला जागत असते. शेवटी आपलेच ओठ आपलेच पोट अशी मनाची समजूत घालून नियोजित विमानप्रवासाला सज्ज होतो.
क्रमशः,,,,
*********************************
दि. २७ फेब्रुवारी २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...