Saturday, March 4, 2023

स्वच्छ इंदूरात फलंदाजीचा कचरा!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *स्वच्छ इंदूरात फलंदाजीचा कचरा.*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
स्वच्छता सर्वेक्षणात सतत सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर शहरात टीम इंडियाने फलंदाजीत अक्षरशः कचरा करून तिसरा कसोटी सामना घालवला आहे. पहिल्या दोन कसोटीत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय संघ ऑसी फिरकीपुढे गळपटला आणि मालिकेतील महत्वपूर्ण आघाडी गमावून बसला. ज्या फिरकीच्या भरवशावर टीम इंडियाची दादागिरी चालायची, त्याच फिरकीच्या चक्रव्यूहात भारतीय फलंदाजांचा अभिमन्यू झाला. देशांतर्गत फिरकीचे ब्रह्मास्त्र वापरून विरोधकांना नामोहरम करणारा आपला संघ यावेळी स्वतःच्या रचलेल्या जाळ्यात फसला. थोडक्यात काय तर शिकारी खुद यहाँ शिकारी बन गया असे म्हणावेसे वाटते.

झाले काय तर नागपूर, दिल्ली पाठोपाठ इंदूरची खेळपट्टी पाहून बॅटर तेरी कब्र खुदेगी स्पिनिंगवाली पीचपर अशी स्थिती होती. त्यातच पुर्वीच्या दोन कसोटीत नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या महाआघाडीने वारंवार प्रयत्न करूनही रोहित सरकार कोसळले नव्हते. याचाच अतिआत्मविश्वास भारतीय संघाला नडला. मात्र यावेळी कांगारूंना स्टीव्ह स्मिथ नावाचा खडूस, कावेबाज आणि चाणाक्ष कर्णधार लाभला होता. पहिल्या दोन कसोटीत पॅट कमीन्सने त्यांचे नेतृत्व केले होते. तरीपण कमीन्स कर्णधार पदाच्या दृष्टीने कधीच कम्फर्टेबल नव्हता. नवा गडी नवा राज येताच ऑसी गोलंदाज शिस्तीत वागले आणि त्याचे फळ त्यांना लगेच मिळाले.

फिरकीचे भूत गाडण्यासाठी कर्णधार रोहित पुढे सरसावला खरा परंतु यावेळी टॉड मर्फीने त्याला चकवले. रोहितचा बळी जाताच टीम इंडियाच्या साम्राज्याचा पाया खचू लागला. कोरोनाच्या साथीपेक्षा फिरकीच्या साथीत एकापेक्षा एक धुरंदर फलंदाज शरण जाऊ लागले. त्यातच सर्वांच्या फलंदाजीतील दोष आपल्या माथी घेणारा के एल राहुल संघात नसल्याने खापर फोडावे तरी कोणाच्या नावावर हा सुद्धा प्रश्नच होता. अर्थातच यापूर्वी फलंदाजीत वस्त्रहरण होऊ लागताच अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल प्रयत्नांची शर्थ करून लाज राखायचे. मिले सूर मेरा तुम्हारा करत हे तिघेही फलंदाजीत सुगम संगीत गायचे.

मात्र चमत्कार वारंवार होत नसतात. सूर की नदीयां हर दिशासे बहते सागर में मिलें असं असतंय ते. तेंव्हाच कुठे जय हे, जय हे, जय हे असतं! इथे तर फलंदाजीचे सूर बेसूर झाल्याने पराजय है, पराजय है हे ठरलंच होतं. त्यातही कांगारूंनी ८८ धावांची महत्वाची आघाडी घेतली होती. झालं गेलं विसरून दुसऱ्या डावात कमीतकमी दीडशेच्या वर आघाडी घेतली असती तर काही आशा होती. पण तिथेही मन के हारे सब हारे होते. अकेला देवेंद्र क्या करेगा हे राजकारणात ठीक आहे परंतु एकटा पुजारा किती बॅटपूजा करणार? त्याने एकाकी खिंड लढवली परंतु त्याचे प्रयत्न थिटे पडले.

पहिल्या डावात टीम इंडिया एक बाद सत्तावीस ते सर्वबाद एकशे नऊ अशी गडगडल्याने ऑसीं फिरकीपटूंचा आत्मविश्वास दुणावला होता. मॅथ्यू कुहनेमन ने भारताची अर्धी फळी कापली तर या मालिकेत आतापर्यंत निद्रिस्त असलेला नॅथन लायन जागा होऊ लागला होता. टॉड मर्फी, कुहनेमन त्याच्या कानामागून येऊन तिखट झाले होते. त्यातच ८८ धावांची आघाडी मिळताच नॅथन मधला लायन जागा झाला. एकच लॉयन नॅथन लायन करत त्याने दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांचा फडशा पाडताना तब्बल आठ बळी घेतले. रोहित सरकार कोसळवत त्याने अब की बार लायन सरकारचा दावा केला. त्याला फक्त मुकद्दर का सिकंदर पुजाराने थोपविण्यासाठी प्रयत्न केले. बाकी सगळे रोते हुए आते है सब होते.

कांगारूनी केवळ टीम इंडियाला पराभूतच केले नाही तर आपल्या संघाने एक लाजिरवाणा पराक्रम सुद्धा केला आहे. देशांतर्गत कसोटीत यापूर्वी भारतीय संघ १९५१-५२ साली इंग्लंडविरुद्ध १४९५ चेंडूत हरला होता. यावेळी तो ११३५ चेंडूत! प्रश्न हरण्याचा नाही तर त्यातून बाहेर येण्याचा आहे. नुकतेच इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने न्युझीलंडला फॉलोऑन दिला. मात्र किवीज संघाने जबरदस्त उसळी मारत कसोटी रंगतदार केली आणि इंग्लंडला एका धावेने पराभूत केले. अर्थातच हीच अपेक्षा क्रिकेट रसिकांना टीम इंडियाकडून असणार.

राहिली बाब ऑसी फलंदाजांची तर उस्मान ख्वाजाला भारतीय खेळपट्ट्या मानवलेल्या दिसतात तर ट्रॅव्हिस हेड, लाबूशेन आणि स्मिथ आपला दर्जाशी इमान राखून खेळतात. भलेही त्यांच्या फार मोठ्या वैयक्तिक धावा झाल्या नसतील परंतु उपयुक्त खेळ्या करतातत. मात्र खरी कमाल केली ती त्यांच्या फिरकीपटूंनी. पुर्वीच्या दोन कसोटीत अपना भी टाईम आयेगा म्हणून शांत बसलेला नॅथन लायन निर्णायक क्षणी टीम इंडियावर तुटून पडला. या कसोटीत रोहितचे नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणे म्हणजे हात दाखवून अवल‌क्षण करण्यासारखे झाले. मध्यफळीत श्रेयस अय्यरने निराश केले तर शुभमन गील साठी ही कसोटी शुभ समाचार घेऊन नाही आली.

आपले फलंदाज ढेपाळल्याने त्याचा मानसिक दबाव गोलंदाजांवर आला. त्यातच गोलंदाजीत टप्पा आणि दिशा भरकटल्याने काम कठीण झाले होते. जडेजाची नोबॉल वर विकेट घेण्याची कला टीम इंडियाच्या चिंता वाढवित आहे. पण ओल्ड इज गोल्ड उमेश यादवने कांगारूंचा पहिला डाव गुंडाळून सामन्यात थोड्याफार आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावातही आपली फलंदाजी कोमेजल्याने विजयाचा गुलाब ऑसीच्या कुंडीत उगवला. मालिकेचा एकतर्फी निर्णय लागता लागता आता लढत बरोबरीत यायची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या संघाच्या फायद्यासाठी फिरकीचे जाळे विणले गेले. मात्र हे जाळे कांगारूंनी भेदले आहे. आता खेळपट्ट्यांच्या नावाने बोंबा ठोकण्याचे कारण नाही. थोडक्यात काय तर,,जब अपनी हो जाए बेवफा तो दिल टुटे, जब दिल टुटे तो रोये क्यूँ? शेरास सव्वाशेर कधीतरी मिळतोच! फक्त यावेळी अश्विन जडेजाला कुहनेमन आणि नॅथन लायन मिळाले. बाकी फलंदाजीत दोन्ही संघ समसमान असले तरी खेळपट्ट्यांनी त्यांना दारिद्र्यरेषेखाली आणले आहे. मालिकेचा अंतिम सामना अहमदाबादला आहे, तिथे मालिका टीम इंडियाच्या नावे होते की कांगारूंचा संघ बरोबरी साधतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
*********************************
दि. ०४ मार्च २०२३
मो. ९८२२९२९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...