@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अब दिल्ली दूर नहीं, भाग ०२*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
यावेळी उत्तरेला चंदीगढची मोहिम आखली होती. खरेतर थेट चंदिगढला जाता आले असते परंतु मार्गावर पानिपत आणि कुरूक्षेत्र या दोन ऐतिहासिक, जिव्हाळ्याचा स्थानांना यावेळी नक्कीच भेट द्यायची असल्याने प्रवास दिल्लीमार्गे ठरला होता. नागपूर ते दिल्लीचे अंतर जरी एक हजार किमी.असले तरी या मार्गावर एकूण विमानांच्या फेऱ्या आणि प्रवासाला लागणारा अवघा दिड तासांचा कालावधी पाहून अब दिल्ली दूर नहीं असे वाटते. बोर्डींग पास आणि सुरक्षा तपासणी झाली की विमानप्रवासाचा पहिला टप्पा जिंकल्याचा आनंद होतो. बोर्डींग पास प्राणपणाने जपत पाऊले आपोआप विमानाची वाट धरु लागतात.
खरी गंमत तर सुरवातीलाच येते. चकचकीत आणि निटनेटक्या एअर होस्टेस स्मितवदनाने आपले वेलकम करतांना पाहून मन भारावून जाते. हे हास्य कृत्रिम असते हे माहित असूनही मनाला अजीमो शान शहंशाह असल्याचा भास होते. शेवटी काय तर मनाचे समाधान जरूरी असते. पलभर के लिये कोई हमें प्यार कर दें, झुठा ही सही, हे उगाचंच नाही म्हटलं गेलं. हे तर काहीच नाही,जर बिझनेस क्लास असेल तर या रावजी बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजीची फिलींग येते. याऊपरही आणखी एक म्हणजे जन्नत क्लास असतो. मात्र त्यासाठी तुम्ही विजय माल्या असणे गरजेचे आहे. आपली धाव फारतर इकॉनॉमी क्लास पर्यंत! म्हणून काय झाले, बिझनेस क्लास इज टेंपररी बट इकॉनॉमी क्लास इज पर्मनंट म्हणून मनाला समजवायचे. अथवा काळजाच्या झुंबराला माझं आर्थिक दुःख मी टांगलं म्हणून विषय संपवायचा. इकॉनॉमी क्लास आणि कॉम्पीमेंटरी नाश्ता देणारी एअर होस्टेस पाहून तू ही तो मेरी जन्नत है म्हणायचे. यानंतर वेळ येते अंग चोरत जायची. एकतर खुर्च्यांच्या दोन रांगांमध्ये फार कमी अंतर असते. त्यातही एखादा लठ्ठ भारती किंवा ओझेवाहू गाढव तुमची अडवणूक करत असतो. एवढे मोठे सामान घेऊन लोकं कसेकाय प्रवास करतात हे कळतच नाही. कसेबसे आडवे तिरपे होत एकदाचे आपल्या जागेजवळ येतो आणि समाधानाचा सुस्कारा सोडतो.
प्रवासाला जातांना सोबत सुटसुटीत सामान असण्याकडे माझा कल असतो. तसेही मुल्यवान वस्तू, ऐवज आपल्याकडे नसल्याने बॅग जागेवरच असली काय अन गहाळ झाली काय, नो प्रॉफिट नो लॉस असते. मात्र आपल्या सीटच्या वरची बॅग कॅबीन हमखास कचकचून का भरली असते हे एक कोडेच आहे. अखेर कुठेतरी थोडक्या जागेत बॅग कुचकून (ठासून) दोन्ही हात मोकळे झाल्याचे समाधान लाभते. उड्डाणाला वेळ असल्यास आतील प्रवाशांची लगबग पाहण्यासारखी असते. हौशे नवशे गवशे सेल्फीप्रेमी विविध,वेडेवाकडे चेहरेचाळे करून सेल्फी घेण्यात व्यस्त असतात. काही अनस्टेबल व्यक्ती मिनिटा मिनिटाला आपली बॅग जागेवरच आहे की नाही हे सतत उठून पाहत असतात.
सर्वात शांत, स्थिर चित्त असतात तर ते फ्रिक्वेंट फ्लायर्स. इतरांच्या माकडचाळ्यांना दुर्लक्षित करून, हे कधी सुधरणारे प्राणी नाही हे समजून स्वस्थ बसतात. सगळ्यात वैताग आणतात बचर बचर खाणारे आणि टॉयलेट कडे धावत सुटणारे. काही महाभाग तर जणुकाही सोनोग्राफी केंद्रातून ब्लॅडर फुल्ल करून आल्यासारखे सतत येरझाऱ्या घालत असतात. तर बकासुराच्या वंशजांना काळ वेळेचे काही भान नसते. त्यांना पाहून अचाट खाणे, मसणात जाणे ही म्हण तंतोतंत लागू पडते. एवढ्यात बोर्डिंग कंम्प्लीटेडची घोषणा होते आणि प्रवासाच्या उंच टप्प्याला सुरूवात होते.
खरेतर मला विमान प्रवास जेवढा आवडतो, तेवढीच भीती पण वाटते. मात्र डर के आगे जीत है समजून पुन्हा प्रवासाला लागतो. टेक ऑफ करतांना पोटात गुदगुल्या झाल्या की समजायचे आता आपला जमिनीशी संपर्क नाही. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों म्हणत शांत बसायचे. टाईमपास म्हणून मेनूकार्ड वाचायचे, किंमती तपासायच्या आणि आपल्याला परवडेबल नाही म्हणून पाणी मागून मोकळे व्हायचे. ते सुद्धा यासाठी की मधातून फिरणाऱ्या फुड ट्रॉलीजमुळे तुमची इच्छा असो वा नसो, अन्नापदार्थांच्या सुवासाने पोटात कावळे ओरडले नाही तरी चिमण्या तरी चिवचिवाट करतातच. तसेही भुक लागणे यांत नर्व्हस, केमिकल आणि फिजीकल अशा तिन्ही बाबींचा अंतर्भाव असतो. (अन्नपदार्थांच्या गंध, स्मरणाने, दर्शनाने, चघळण्याने, जठरात अन्नाच्या उपस्थितीने पाचक रस स्त्रवतात). एकंदरीत काय तर आजुबाजुच्या खादाडखाऊंच्या खाण्याने आपोआप सहप्रवाशांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
एव्हाना विमानाला दिल्लीचे वेध लागले असते आणि हळूहळू कधी उजवीकडे तर कधी डावीकडे कुस पलटवत ते उतरण्याच्या तयारीत असते. खरेतर टेकऑफ आणि लॅंडीग ह्या विमान प्रवासातील प्रमुख बाबी असतात. याच वेळी सर्वात जास्त दक्षता घेतली जाते. इथेच वैमानिकांचा कस लागतो. आपण जास्त विचार करायचा नाही, तशरीफ ला जोर का झटका धीरे से बसला की लॅंडीग झाले म्हणून समजायचे आणि विधात्याचे दोन्ही हात जोडून आभार मानायचे, तसंही आपल्या हाती इतकंच असतंय. स्मुथ लॅंडीग हा अफलातून प्रकार आहे. काही वैमानिक इतके निष्णात असतात की जणुकाही गुलाबी गालांवरून हळुवारपणे मोरपीस फिरवावे इतक्या नाजुकपणे लॅंडींग करतात, पोटातले पाणी सुद्धा हलत नाही.
दिल्ली हे ठाणे सहज काबीज केल्यावर आता पुढचा जवळपास २५० किमी. चंदिगढ पर्यंतचा प्रवास टॅक्सीने करण्याचा निर्णय झाला. याकरिता पहिलेच दोन टॅक्सी बुक केल्या होत्या. मात्र दिल्लीत सकाळी दहाला पोहचुनही टॅक्सी वाले आत्ता येतोय, जवळच आहे असे करता करता बारा वाजवले आणि यांतच महत्वाचे दोन तास वाया गेले. शेवटी दुपारी बाराच्या सुमारास आम्ही मार्गस्थ झालो परंतु हाती निराशाच आली. इकडची रहदारी म्हणजे एकदम बेक्कार! जिकडेतिकडे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. जागोजागी, चौकाचौकात वाहतुक सिग्नल तर कधी लष्करी भागातून जातांना वेगमर्यादेचे पालन करावे लागल्याने आणि गर्दीने प्रवासाची मजा निघून गेली. त्यातच कसेबसे ट्रॅफिक जॅम मधून सुटका होताच टॅक्सीने वेग पकडला आणि कर्नाल बायपास ने आम्ही निघालो. बराच वेळ झाला तरी दुसरी टॅक्सी नजरेत पडत नव्हती. तिचा घोळ झाला होता, ती कर्नाल बायपास ऐवजी गाझीयाबादला वळल्याने आणखी खेळखंडोबा झाला.
इकडे सूर्य देवता माथ्यावरून वेगाने सरकत आपल्या गंतव्यास निघाला होता तर दुसरीकडे पानिपतचे रणमैदान चुंबकासारखे आपल्याकडे आकर्षित करत होते. पानिपत शहरात पोहचताच पुन्हा रहदारीचे तेच रडगाणे! कधी उड्डाणपूलाचे बांधकाम तर कधी अरूंद रस्ते, अस्ताव्यस्त रहदारीने वैताग आणला होता. त्यातच गुगल मॅपचा चकवा भंडावून सोडत होता. दिवे लावणीची वेळ झाल्याने आपल्याला काही बघायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अब्दालीचे कंदहार ते पानिपत आणि नागपूर ते पानिपत अंतर जवळपास एकसारखेच आहे, ते म्हणजे अंदाजे अकराशे किमी.
सायंप्रकाशात अखेर महामार्गाला तिनदा चक्कर मारल्यावर शहरापासून सात किमी.अंतरावर पुर्वेस असलेले पानिपतचे रणतीर्थ दृष्टिपथात आले आणि मन गलबलून गेले. मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ, श्रीमंत विश्वासराव, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे आणि ज्ञात अज्ञात मराठी वीर हिंदुस्थानच्या माती साठी धारातीर्थी पडले, केंव्हा एकदा त्या पावनभूमीला जवळ करतो असे झाले होते. त्या वीरभूमी परिसरात जवळपास अंधार झाला होता आणि त्या अंधूक प्रकाशातही मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकत असल्याचा भास होत होता. आश्चर्य म्हणजे त्या अंधाराला चिरत दोन उमदे अश्व माझ्याकडे नजर रोखून होते. आणखी डोळे फाडून पाहले तर ते अगदी ओळखीचे निघाले. उजव्या बाजूला विश्वासरावांचा दिलपाक अश्व तर डावीकडे सदाशिवराव भाऊंचा आवडता चंद्रसेन अश्व! मात्र दोघांच्याही डोळ्यातून गंगाजमूना वाहत होत्या, दोघेही मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते.
मी मात्र अवाक् होऊन जागच्याजागी खिळलो होतो. तेवढ्यात जमीनीवर दणदणीत पाऊले टाकत काळाकभिन्न, प्रचंड देहाचा ढालगज आपल्याच ऐटीत चालत येत होता. कोण होता तो? अरे हा तर शिंद्यांचा मानबिंदू जव्हारगंज हत्ती होय. पण याच्या अंगावर भाले, तलवारींच्या जखमा आणि एवढे साखळदंड का? कोणी केली याची ही दुरावस्था? काही कळायला मार्ग नव्हता, अस्वस्थपणे बघत मी निरूत्तर झालो होतो. वेळ साधत दोन्ही अश्वांनी माझ्या खांद्यावर मान टेकवली, जव्हारगंज ही पुढे सरसावला, त्याची जखमी सोंड आशिर्वाद रुपी शिरावर विसावली, अवघे विश्व नि:शब्द झाल्याची स्थिती होती, काय भावना असतील त्यांच्या? काय संदेश दिला असेल या मुक्या प्राण्यांनी,,,?
क्रमशः,,,
*********************************
दि. ०६ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment