Monday, March 13, 2023

हिमाचल की गोद में, भाग ०४

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *हिमाचल की गोद में, भाग ०४*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
तीन दिवसीय प्रवासाच्या अखेरच्या दिवशी हिमाचल प्रदेशच्या कसौलीला जाण्याचे ठरले. चंदीगड ते कसौली अंतर फार तर साठ किमी. बस यूं गये और यूं आऐ असे वाटले होते. मात्र असे अजिबात झाले नाही. चंदीगड समुद्रसपाटीपासून एक हजार फुट उंचीवर तर कसौली जवळपास सहा हजार फुट उंचीवर. त्यातही हिमालय पर्वतरांगांना वळसा घालून चढणे म्हणजे आणखी एक दिव्य प्रवास. एका बाजूला काळजाचा थरकाप उडवणाऱ्या खोल दऱ्या तर दुसरीकडे उंच उंच पर्वत रांगा. सोबतच चंदीगड शिमला महामार्गावरून कसौली कडे डावे वळण घेतले की रस्ता दुपदरी असल्याने वाहनांच्या वेगाला मर्यादा येतात.

सकाळी कितीही लवकर उठून निघतो म्हटले तरी कडाक्याच्या थंडीने दहाच्या पहिले निघणे कठीण होते. अखेर स्वेटर जॅकेट घालून कसौलीच्या दिशेने निघालो. कसौलीला मिनी शिमला म्हणतात. हिमाचल प्रदेशाच्या सोलन जिल्ह्यातील हे एक हिल स्टेशन आणि छावणी नगर आहे. शिमल्याच्या दक्षिणेस असलेले आणि हिमालयाच्या खालच्या भागात स्थित हे स्थान देवदारच्या जंगलांनी घेरलेले आहे. कसौली या नावावरून बरेच मतप्रवाह आहेत. इथे वर्षभर फुलांचा मौसम  असल्याने कुसमावली, कुसमाली यावरून कसौली हे नाव पडल्याचे मानतात. तर काही कसुम या गावावरून किंवा इथे उगवणाऱ्या कसूम या फुलावरून कसौली हे नाव निश्चिती झाल्याचे मानतात.

अर्थातच नामकरणाचे कारण काहीही असले तरी कसौलीचे सौंदर्य अफलातून आहे. मुख्य म्हणजे इथले वातावरण कधी ढगाळ तर कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, असे क्षणाक्षणाला बदलू शकते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कसौलीला आठ ते दहा टुरिस्ट प्वाईंट्स आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात. यात प्रामुख्याने क्राईस्टचर्च, मंकी प्वाईंट, सनसेट पॉईंट, मॉल रोड, भगवान श्रीकृष्ण मंदिर, श्री गुरू नानक जी गुरूद्वारा, गोरखा किल्ला आदींचा समावेश होतो. पर्यटनासोबतच इथे रोप वे, रायडींग, ट्रेकिंग, लॉंग ड्राईव्ह आपल्या आनंदात भर घालतात. इथले रोमांचक, रोमॅंटीक वातावरण पाहता कोई मिल गया सहित अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

कसौलीला जगाच्या पटलावर आणण्याचे काम केले ते ब्रिटीशांनी. इ.स. १८३९ ला महाराजा रणजितसिंह यांच्या मृत्यूनंतर ब्रिटीशांना पंजाबवर कब्जा करायचा होता आणि याकरिता सैन्यछावणी, सैन्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कसौलीला पसंती दिली. अर्थातच व्यापार, राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमण करत त्यांनी इ.स. १८५३/५४ ला एन्जलिकन चर्चची स्थापना केली. सेंट बरनबास आणि सेंट फ्रान्सिस यांच्या स्मरणार्थ निर्मित या चर्चचे पुढे ख्राइस्टचर्च असे नामांतर झाले.  गॉथिक शैलीत निर्मित हे चर्च हिमाचल प्रदेशातील सर्वात जुने चर्च आहे. या चर्च मधील खिडक्यांना लागलेली कांच इंग्लंडहून मागवली गेली होती. काचेच्या खिडक्यांमुळे चर्चच्या देखणेपणात आणखी भर पडते.

मंकी प्वाईंट हे कसौलीचे सर्वात ऊंच स्थान आहे. इथून संपूर्ण कसौलीचे मनोहारी दर्शन होते. साडेसहा हजार फुट उंचीवर हे स्थान बर्फाच्छादित आणि पाऊलाच्या आकाराचे आहे. अशी दंतकथा आहे की रामायण युद्धात लक्ष्मणाला जेव्हा मुर्छा आली तेव्हा हनुमानाने संजीवनी बुटी आणतांना पर्वत उचलतेवेळी एक पाऊल इथे ठेवले होते. त्यालाच मंकी प्वाईंट म्हणतात. इथे हनुमंताचे प्राचीन मंदिर आहे. पण सध्यातरी ह्या संपूर्ण परिसरावर भारतीय वायुसेनेचे नियंत्रण आणि नियमन आहे. याशिवाय कसौलीला गोरख्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेला गोरखा किल्ला आहे, जो पर्यटकांचा आकर्षण बिंदू आहे. सुबाथू पहाडावरील, निलगिरीच्या जंगलातील या किल्ल्याचे निर्माण गोरखा सेनापती अमर सिंह थापा यांनी एकोणविसाव्या शतकात केले होते. मात्र इ.स. १८५७ च्या युद्धात ब्रिटीशांनी हा किल्ला गोरख्यांकडून आपल्या ताब्यात घेतला. सध्या इथे भारतीय सेनेचे प्रशिक्षण केंद्र आहे.

खरी मजा तर कसौलीला कारमधून बाहेर पाऊल टाकताच आली. तसे तर चंदीगडहून निघताच हॉटेल मॅनेजर ने सांगितले होते की कसौलीला खूप थंडी असते, गरम कपडे सोबत घेऊन जा आणि तिथे मुक्काम करू नका. मात्र स्वेटर आणि जॅकेट समोर थंडी किस बला का नाम है, हे समजून आम्ही बिनधास्तपणे तिथे पोहोचलो. आतापर्यंत बोचरी थंडी, कडाक्याची थंडी, हाडं गोठविणारी थंडी असे ऐकले होते. कसौलीला परिस्थिती अगदी विचित्र होती. जणुकाही अंगावर कोणी बर्फाचे पाणी टाकले आहे अशी ओली थंडी होती. क्षणभरासाठी तर कशाला इतक्या थंडीत इथे आलो असे वाटले. कसौलीला पोहोचल्यावर सर्वात पहिले तुमचे वाहन पार्किंग ला ठेवावे लागते आणि इतर प्रेक्षणीय स्थळांना एकतर स्थानिक टॅक्सीने अथवा पैदल (पायदळ) जावे लागते. 

पार्किंग समोरच ख्राइस्टचर्च असल्याने कुडकुतच तिथे गेलो. आजुबाजुला ऊंचच उंच हिरवीगार झाडी आणि ‌थंडगार वाऱ्याने परिसर आणखीनच गारठला होता. कसेबसे चर्च पाहून बाहेर पडलो आणि परत पार्किंगला आलो. थोडी उष्णता मिळावी म्हणून ऊन्हात उभे राहीलो परंतु काही केल्या थंडी कमी होत नव्हती. तिथून मंकी प्वाईंट अंदाजे साडेतीन किमी. दूर होते. त्यातही टॅक्सी मंदिराच्या पायथ्याशी सोडणार आणि वर मंदिरात जायला यायला कमीतकमी एकदिड तास लागणार होता. आधीच जीवघेणी थंडी आणि त्यात हे साहस, वरून संध्याकाळी साडेसहाला शताब्दी एक्सप्रेसने दिल्लीला परतायचे होते. वेळेचे गणित पाहता इतर स्थळे पाहता येणार नाही म्हणून आम्ही सर्वांनी कसौलीला तिथेच रामराम करणे इष्ट समजले. खरेतर कुठलेही पर्यटन स्थळ असो, तिथली संपूर्ण माहिती, वातावरणाचा अंदाज आणि वेळेचा ठोकताळा मांडून नियोजन केले तर उत्तम. अन्यथा प्रवासात आणि पर्यटन स्थळांवर गोंधळ उडतो, इच्छा असूनही वेळेअभावी संपूर्ण परिसर पाहता येत नाही.
क्रमशः,,,
**********************************
दि. १३ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...