Friday, March 10, 2023

दी सिटी ब्युटीफूल, भाग ०३

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *दी सिटी ब्युटीफूल, भाग ०३*
               *डॉ अनिल पावशेकर*
********************************
पानिपताहून निघतांना उशीर झाल्याने वाटेत कुरुक्षेत्र पाहणे शक्यच नव्हते. एकतर रात्रीचा वेळ आणि त्यात पुन्हा रहदारीने खोडा घातल्याने अखेर चंदीगड गाठता गाठता रात्रीचे साडेनऊ वाजले. अर्थातच अशावेळी कुठे काही जाण्यासारखे, पाहण्यासारखे नसल्याने पहिला दिवसाचा शो जवळपास संपल्यात जमा होता. मात्र तिथे कुणी स्वागताला असो वा नसो, कडाक्याच्या थंडीने सर्वांचे स्वागत केले. त्यातही मुक्काम चंदीगढ ऐवजी पंचकुला इथे असल्याने थंडीला आणखी धार चढली होती.

चंदीगडच्या जन्माची कथा रंजक आहे. रॅडक्लिफ रेषेने भारताच्या फाळणीसोबतच पंजाब प्रांताचे सुद्धा दोन भाग केले. पाकिस्तानच्या पंजाबला लाहोर ही आयती राजधानी मिळाली परंतु आपल्या पंजाबला नवीन राजधानीसाठी वाट बघावी लागली. अखेर इ.स. १९५२ ला फ्रेंच वास्तुरचनाकार ली कार्बुजीयर यांनी चंदीगड या शहराला मुर्तरुप दिले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात पहिले योजनाबद्ध शहर म्हणून चंदीगड ओळखले जाते. हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असलेले हे शहर भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. चंदीगड राजधानी क्षेत्रात मोहाली, पंचकुला आणि जिरकापूर का भागांचा समावेश होतो. सुंदर नगररचना, रहदारीचा विचार करून चौकांची गोलाकार रचना, सेक्टर नुसार विभाग आणि रहिवासी,व्यापार व्यवसायानुरुप इमारतींच्या रचनेने या सुटसुटीत शहराला द सिटी ब्युटीफूल म्हटले जाते.

चंदीगड प्रमाने पंचकुला सुद्धा नियोजनबद्ध शहर आहे. खरेतर पंचकुलाला रात्री पोहोचल्याने फारकाही निसर्गाचे दर्शन झाले नाही. मात्र सकाळी उठताच पंचकुलाचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने खुलून गेला होता. गुलाबी थंडी, प्रदुषण विरहीत शुद्ध स्वच्छ वातावरण, मनमोहक पर्वतांनी नटलेला परिसर पाहून मन प्रसन्न होते. त्यातच सकाळचे कोवळे ऊन हवेहवेसे वाटते. थोड्याच वेळात चंदीगडला सेमीनारमध्ये जायचे असल्याने नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंट गाठले. खरेतर सकाळचा नाश्ता म्हणजे आपली धाव पोहे, उपमा, सॅन्डविच, इडली पर्यंत. मात्र इथेतर नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे आलू पराठा. तेलातुपात चिंब भिजलेला जाडजूड आलू पराठा आणि सोबत लोण्याने भरलेली वाटी पाहताच ब्ल्यू आईज हिप्नोटाइझ तेरी करती है मैनू ची आठवण झाली.

कारण इतकं तेलतूप पाहून डोळ्यांवर अंधारीच येते, भरगच्च खाद्यपदार्थ पाहून मन गांगारुन जाते. इथले अन्नपदार्थ तेल,तूप, दही, दुध, पनीर, लोण्याने अलंकृत केले असल्याने शरीरातील चरबीची ऐसी की तैसी होऊन जाते. एवढेच कशाला दोन चार दिवस असाच आहार घेतला तर चेहऱ्यावर तेलातुपाचा तवंग आल्यासारखे दिसते. गंमत म्हणजे मसाला पापड मागवला तर आणखी मजा आली. तो फक्त नावालाच मसाला पापड होता कारण त्यावर इतकं सलाद आणि पनीर टाकलं होतं की पापड बिचारं त्यांच्या ओझ्याने खाली मलूल होऊन पडलं होतं. अखेर दोन जणांनी मिळून एक डिश संपवली तेव्हा कुठे जीवात जीव आला. अखेर अन्न गळ्यापर्यंत येण्याच्या भीतीने नाश्ता नावाचा प्रकार आटोपला.

चंदीगडला संपूर्ण दिवस आणि संध्याकाळ सेमिनार मध्ये गुंतल्याने बाहेर पडता आले नाही. मात्र जेव्हा बाहेर पडलो तेव्हा सर्वत्र शुकशुकाट झाला होता. रात्री आठच्या सुमारास इथली बहुतांश दुकानं बंद झाली होती. त्यामुळे शॉपिंगोत्सुक मित्रांचा हिरमोड झाला होता. मला तर शॉपिंग अतिशय कंटाळवाणा, रटाळ प्रकार वाटतो. शिवाय आजकाल सगळीकडे सर्वकाही मिळत असल्याने तसेच ऑनलाईनची सोय असल्याने त्यातला उरलासुरला इंटरेस्ट निघून गेला. तसेही फॅशन, लॅटेस्ट ब्रॅण्ड, ट्रेंडींग, सॅम्पल पीस हे शब्द माझ्या डिक्शनरीत नसल्याने मी शॉपिंग च्या दोन हात दूरच राहतो. अर्थातच शॉपिंग नाही तर जाणार कुठे? मात्र इच्छा तिथे मार्ग असतोच.

शेवटी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असणारे स्थान म्हणजे पब. त्यातही तिथलं हसोड, ए स्टेट ऑफ डान्स म्हणजे पब प्रेमींसाठी पर्वणीच. तिथलं फुड, म्युझिक, ॲम्बीअन्स आणि सर्व्हिस एकदम क्लासी. मात्र तिथे माझी अवस्था नाचता येईना अंगण वाकडे सारखी होती. कारण गणित, चित्रकला आणि नृत्यकला ह्या तिन्ही विषयात आमची नेहमीच वंचित आघाडी व्हायची. गणिताने तर इतक्यांदा पाठ शेकल्या गेली आहे की लहानपणी मला आपण कासव असतो तर किती बरे झाले असते असे वाटायचे. तिच कहानी चित्रकलेची. अक्षर चांगले काढता येऊनही चित्र काढलं की रंगाचा बेरंग होत असे. 

नृत्यकला तर पप्पू कान्ट डांन्स अशी आहे. अर्थातच नाच गाण्याला कुठे वयाचं बंधन नसतेच. मात्र तिथले एकंदरीत उत्साही, जल्लोषाचे दणदणीत वातावरण पाहता तुमचे पाय आपोआप थिरकल्याशिवाय राहत नाही. तिथल्या भिंतीवरील ट्रस्ट अस यू कॅन डान्स आणि शटअप ॲन्ड डान्स ह्या ओळी तुम्हाला कंबर हलवण्यास उद्युक्त करतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे उमर पचपन की दिल बचपनका असलेले आणि इतरही कमी जास्त वयाच्या सर्वांची पाऊले डान्स फ्लोअर कडे वळतात.

खरेतर आपली ध्वनी ऐकण्याची क्षमता वीस हर्ट्झ ते वीस हजार हर्ट्झ इतकी आहे. हर्ट्झ हे ध्वनी फ्रिक्वेंसी मोजण्याचे एकक तर डेसिबल हे इंटेंसीटी लेव्हल मोजण्यासाठी वापरतात. मात्र पब मधले वातावरण पाहता ह्या दोन्ही गोष्टींचा इथे काही संबंध होता असे वाटत नव्हते‌ मात्र हौस, उत्साह, जल्लोषापुढे कोणाचे चालणार? सुरवातीला थोडं कठीण जात परंतु काही वेळातच तिथलं वातावरण सात्म्य होतंय. इतर मित्रांना तिथे आनंदात न्हाऊन पाहतांना आपणही आनंदी व्हायचे आणि आपणही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचे. उगाच आडवंतिडवं नाचून कशाला आपली हाडे लचकवून घ्यायची असा विचार करून आपल्या आवडीचे खाणे सुरू केले.
क्रमशः,,,
*********************************
दि. १० मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...