Saturday, March 18, 2023

राहुलची अमृत महोत्सवी खेळी!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *राहुलची अमृत महोत्सवी खेळी!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
स्थळ वानखेडे स्टेडियम मुंबई, निमित्त होते रात्रीस खेळ चाले क्रिकेटचे आणि प्रसंग बाका होता भारतीय विजयाचा. मैदानात मिचेल स्टार्च चे डावेखुरे वादळ घोंघावत होते. कोहली आणि सूर्य कुमार यादव नावाच्या दोन महारथींना लागोपाठच्या दोन चेंडूत गारद करत स्टार्च पुढचे भक्ष्य गिळंकृत करायची वाट बघत होता. अर्थातच राहुलला पाहताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि इकडे तमाम क्रिकेटप्रेमी देव पाण्यात घालून बसले होते. कारण संकटकाळी सोडून जातो तो राहुल अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र यावेळी राहुल आपल्या क्रिकेट धर्माला जागला. झिरो से हिरो कामगिरी करत राहुलने अप्रतिम फलंदाजी केली आणि ऑसी संघाकडून सामना हिसकावून घेत संभाव्य पराभवाला विजयात रुपांतरीत केले.

झाले काय तर कसोटी मालिकेत कांगारुंनी पलटवार करत भारतीय संघाला चांगली टक्कर दिली होती. मात्र पहिल्यावहिल्या एकदिवसीय सामन्यात मो.सिराज, मो. शमीच्या वेगवान जोडीने त्यांना दोनशेच्या आंत गुंडाळून आपल्या फलंदाजांसाठी पायघड्या अंथरूण ठेवल्या होत्या. पण बरेचदा लो स्कोअरींग सामन्यात पाठलाग करणाऱ्या संघाची फसगत होते आणि छोटी धावसंख्या सुद्धा डोंगराएवढी भासते. या सामन्यात सुद्धा तेच झाले. पन्नास षटकांत जिंकण्यासाठी १८९ धावा म्हणजे सोप्पा पेपर. मात्र दिसते तसे नसते म्हणून जग फसते अशी अवस्था झाली. मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोईनिसने अवघ्या पाच षटकांत सोळा धावांत टीम इंडियाचे ईशान किशन,कोहली आणि सूर्या हे महत्त्वाचे मोहरे तंबूत परतवले होते.

त्यातच स्टार्कचा तिखट मारा बघण्यासारखा होता. फलंदाजांनी चेंडू खेळतो म्हटले तर स्लीपमध्ये झेल जाणार आणि सोडला तर पायचितात सापडणे होते. थोडक्यात काय तर स्टार्कला धरलं तर चावते सोडलं तर पळते असं होतं. त्यामुळेच विराट, सूर्याला घाम फोडणाऱ्या स्टार्कला अपयशीचा ठप्पा लागलेला राहुल कसाकाय सामोरा जातो हे बघणे औत्सुक्याचे होते. त्यातही राहुलचा गत वर्ष दोन वर्षाचा ताळेबंद पाहता, राहुल इज पर्मनंट बट परफॉर्मन्स इज पुअर अशी कहानी होती. त्यातही त्याला कसोटीत डच्चू देण्यात आला होता. अखेर अनुकंपा तत्त्वावर त्याला यावेळी संघात स्थान देण्यात आले होते.

अर्थातच राहुल साठी करा अथवा मरा अशी परिस्थिती होती. त्यातही स्टार्कची हॅटट्रिक थोपवण्याचे संकट त्यांच्यासमोर आ वासून उभे होते. अखेर सर्व शंका कुशंकांना विराम देत तो मैदानात आपल्या खऱ्या रुपात अवतरला. तिकडे अर्धा संघ ८३ धावांत गुंडाळून कांगारू सामन्यात वरचढ झाले होते. समाधानाची बाब म्हणजे त्याच्या हाताशी जडेजा नावाचा लढवय्या साथीदार होता.यावेळी जास्त जोखीम न पत्करता या दोघांनी कांगारूंना ठंडा करके खाओ मोहिम राबविली. मात्र या जोडीचा जम बसताच त्यांनी कांगारूना धारेवर धरले. राहुलने प्वाईंट, थर्डमॅनला प्रेक्षणीय फटकेबाजी करत आपला बॅकलॉग भरून काढला. तर जडेजाच्या मुक्त खेळीला कांगारू लगाम घालू शकले नाही. 

या दोघांनी फलंदाजीत जबरदस्त युती करत ऑसी गोलंदाजांना वैतागून सोडले. सेना भाजप पेक्षाही बळकट या युतीने प्रचंड आशावादी असलेल्या कांगारूंची शेवटपर्यंत दाळ शिजू दिली नाही. शत प्रतिशत विजयाचं ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या राहुलने जडेजाला हाताशी घेत ७५ धावांची अमृत महोत्सवी खेळी केली. मुख्य म्हणजे या दोघांची भागिदारी टाटा नमक सारखी फ्री फ्लोवींग होती. कुठेही बीट न होता, न अडखळता या दोघांनी अशक्यप्राय आव्हान शक्य करून दाखवलं. या दोघांच्या अभेद्य भागिदारी पुढे स्टार्क, स्टोईनिस ॲन्ड कंपनीने अखेर नमते घेतले. खतरनाक स्टार्क दुसऱ्या स्पेलमध्ये शुद्ध शाकाहारी गोलंदाज झाला होता.

निश्चितच फलंदाजीतील राहुल, जडेजाचे योगदान विसरता येणार नाही परंतु तत्पूर्वी शामी, सिराजचे गोलंदाजीतील योगदान महत्त्वाचे ठरले होते. मिचेल मार्शच्या झंझावाती ८१ धावांनी ऑसी संघाने चांगले बाळसे धरले होते. एकावेळी त्यांनी तेविस षटकांत एकशे चाळीस धावांपर्यंत मजल गाठली होती. पण अठ्ठावीसव्या षटकापासून मो.शामीचा गोलंदाजीतील धडाडा सुरू झाला. त्याने जोश इंग्लीस, कॅमेरून ग्रीन आणि स्टोईनिसचा काटा काढत कांगारूंच्या मोठ्या धावसंख्येला आवर घातला. पाठोपाठ सर जडेजाने खतरनाक ग्लेन मॅक्सवेलला बाद करत त्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या होत्या.

पहिला सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. टीम इंडिया द्विपक्षीय मालिकेत उत्तम कामगिरी बजावतो मात्र आयसीसी स्पर्धात माघारतो ही वस्तुस्थिती आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक हाकेच्या अंतरावर आहे. शुभमन गील, राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर सारख्यांना लय सापडणे गरजेचे आहे. ओल्ड इज गोल्ड रोहीत आणि विराट कुठपर्यंत संघाचा भार वाहणार आहेत? तसेच पांड्या, जडेजा, शार्दुल, वॉशिंग्टन सुंदर आदी अष्टपैलूंनी सातत्य राखणे तेवढेच जरुरी आहे. गोलंदाजीत शामी, सिराजच्या तोडीचे आणखी दोनतीन गोलंदाजांची येणाऱ्या काळात गरज भासणार आहे. अर्थातच अशा दुहेरी मालिकांतून योग्य खेळाडूंची चाचपणी करणे शक्य आहे. तुर्तास राहुलला सापडलेला फॉर्म अल्पजीवी न ठरो म्हणजे कमावले म्हणून समजा. नाही तर संघातली एक जागा वाया घालवल्याचे पातक त्याच्या वाट्याला येईल.
**********************************
दि. १८ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...