Thursday, April 13, 2023

चिखलदरा प्रवास वर्णन भाग ०२


 चिखलदरा, श्रावणात घन निळा बरसतो, भाग ०२
***************************************
सकाळी आठच्या सुमारास आम्ही नागपूर सोडले आणि सेमाडोहच्या दिशेने निघालो. नागपूर ते अमरावती हा प्रवास आता चौपदरी महामार्ग झाल्याने अत्यंत सुखकर झालेला आहे. वाटेत तिन टोलनाके जरूर लागतात परंतु तुम्हाला सुखसुविधा हव्या असतिल तर एवढी किंमत मोजने क्रमप्राप्तच आहे. आता बसमध्ये दर्दी मित्रांची गर्दी होती तर आभाळात आमच्या मैत्रीचा हेवा वाटल्याने ढगांची गर्दी वाढली होती. श्रावणात घन निळा बरसतो म्हणजे काय असते ते आम्ही सर्वांनी त्या दिवशी याची देही याची डोळी अनुभवले.

प्रवासात प्रशस्त रस्ते, सभोवताल निसर्गाच्या हिरव्याकंच शालूचे मनमोहक दर्शन, आभाळातून होणारी तुषारवृष्टी सोबतच बसमधला हास्यकल्लोळ यामुळे हा प्रवास कधी संपुच नये असे वाटत होते. अमरावती पर्यंतचे दिडशे कि.मी. चे अंतर चुटकीसरशी पार केले असे वाटत होते. अमरावतीला आणखी दोन मित्रांची भर पडली आणि पुन्हा एकदा दंगामस्तीला उधान आले. सोबतच फराळाकरीता अमरावतीवरून मित्रांनी गरमागरम समोसे आणल्याने आनंदात आणखी भर पडली. अर्थातच आधी पोटोबा मग विठोबा चे धोरण आम्ही मित्र कुठेही गेलो तरी कटाक्षाने पाळतच असतो. क्षणार्धात समोस्यांचा फडशा पाडून पुन्हा एकदा गोंगाटात हरवून गेलो. इतके वर्ष दडपलेल्या भावनांना आउटगोइंग फ्री झाल्याने सर्वांची जाम शाब्दिक धुलाई झाली. टिका, टोमणे आणि शाब्दीक चिमट्यांनी सर्वांना समपातळीत आणल्याने कधी एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणारे अगदी जिवलग मित्र असल्यासारखे गप्पागोष्टीत रमून गेले होते. जो तो काहीतरी अव्यक्त भावनांना मुर्तरूप देण्याचा प्रयत्न करत होता, सर्वांना खुपकाही बोलायचे असल्याने ऐकण्यापेक्षा बोलणाऱ्यांचीच संख्या जास्त झाली होती. कॉलेजच्या गमतीजमती, दोस्तीचे किस्से, एकमेकांची केलेली थट्टामस्करी यात परतवाडा कधी आले ते कळलेच नाही.

परवाड्याला एका मित्राकडे आम्ही चहाकरीता थांबलो आणि लगेचच मग सेमाडोहकडे निघालो. आतापर्यंत सुतासारखा सरळ असणाऱ्या  मार्गाने नागमोडी रूप धारण केल्याने बसचा वेग मंदावला परंतु सोबतच आपण निसर्गाच्या कुशीत आल्याचे जाणवले. कधी चढाई तर कधी उतार, बस सतत उजवीकडे किंवा डावीकडे वळणे घेत असल्याने अशा प्रसंगी कोणालाही मळमळ, उलटीचा त्रास होऊ शकतो. याकरीता पोट हलकेच ठेवणे किंवा पहिलेच औषधी घेतल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. अर्थातच घाटाचा रस्ता म्हटलें की अशा गोष्टी ठरलेल्या असतात. मात्र ज्यांना निसर्ग अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी असा प्रवास म्हणजे आनंदाची पर्वणी असते.  भरभरून वाहणारे पावसाळी ओहोळ, नदी नाले, खोल दऱ्या, कुठे धबधबे तर कुठे धोकादायक वळण पाहुन प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. जवळपास दिड तासाच्या अंतराने आम्ही आमचा पहिला पाडाव असलेल्या सेमाडोहला पोहोचलो आणि प्रवासाचा पहिला टप्पा पार पडला.
क्रमश,,,,,,

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...