चिखलदरा टुर, "दिल ढुंढता है फिर वही", भाग ०१
***************************************
सध्या देशभरात वरूणराजाची तुफानी बॅटींग सुरू आहे आणि पावसाळी पर्यटनाला उधान आलेले आहे. कुठे रिमझीम तर कुठे संततधार बरसत पावसाने यहाके हम सिकंदर हे सर्वांना दाखवून दिलेले आहे. सध्या विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने विदर्भाचे काश्मिर असलेल्या चिखलदराकडे आम्हा मित्रांची पावले कळत नकळत ओढली गेली. अर्थातच हवाहवासा वाटणारा पाऊस, जवळपास ३३ वर्षांपासून असलेले चिरतरुण मित्र-मैत्रिणी आणि जोडीला विकेंड म्हणजेच दुग्धशर्करा योग.
खरेतर प्रत्येक मित्र स्वत:च्या संसारात रमलेले आहेत, व्यवसायात आकंठ बुडालेले आहेत, जबाबदाऱ्या आणि आव्हाने पेलता पेलता २४×७ व्यस्त आहेत, मात्र मैत्री हा समान धागा या सर्वांना जगाच्या गुंतागुंतीतून अलगद सोडवण्यासाठी रामबाण उपाय ठरला. भलेही या सहलीची तयारी एक महिन्यापासून सुरू आहे मात्र शेवटपर्यंत किती येतील हे कोडेच होते. अखेर हो, नाही करता करता २५ जण तयार झाले आणि एकदाचे गंगेत घोडे न्हाले.
सेमाडोह करीता सकाळी सहाला सर्वांनी निघायचे ठरले होते आणि याकरिता उगाच वेळेवर धावपळ नको म्हणून काही मित्र जयपूर, भोपाळ, कल्याण तसेच नांदेड वरून एकदिवस अगोदरच आलेले होते. शनिवारला सकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली आणि इकडे आमची धावपळ शिगेला पोहोचली. जसजसे एकेक मित्र गोळा होत होते तसतसे प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि यात नवल ते काय ,, कारण बऱ्याच कालावधीनंतर तारे जमी़पर एकत्र होत होते. शुभारंभासाठी नारळ फोडताच सहलीची सुरुवात झाली आणि दिलखुलास, रोमांचक, भावनिक वादळाचे थैमान सुरू झाले.,,,
No comments:
Post a Comment