सेमाडोह, "पल पल दिलके पास",, भाग ३
***************************************
साऱ्या आसमंतात जलधारा बरसत आहेत, वातावरणात गुलाबी थंडी आहे, टोलेजंग सागवानी वृक्षांनी तुम्हाला चोहोबाजूंनी घेरलेले आहे, हिरव्याकंच वनराईत तुम्ही गोड मित्रमैत्रिणी सोबत हरवलेले आहात, सोबत नवतरूणीसारखी खळखळून वाहणारी सिपना नदी तुमच्या वाटेने सोबत देत आहे,,, अशा रोमॅंटिक वातावरणात मन पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन यौवनात पोहचते आणि नकळत ओठांवर गित येते,,, पल पल दिलके साथ तुम रहती हो. अगदी अशीच भावना, असाच रोमांचक अनुभव सेमाडोह व्याघ्र प्रकल्पात दाखल होताक्षणी अनुभवाला येतो.
सेमाडोह कॉटेजेसला आम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग केले असल्याने दहा कॉटेजेसमध्ये आमची रहायची सोय झाली. इथे जंगल सफारीची व्यवस्था आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसाने आम्हाला सफारीचा बेत रद्द करावा लागला. परंतु आम्ही एवढ्या सहजासहजी हार थोडेच मानणार होतो. लगेच आम्ही दुपारचे जेवण आटोपले आणि उंचावर असलेल्या कोलकास या प्रेक्षणीय स्थळाकडे रवाना झालो. मुख्य म्हणजे सेमाडोहला लॅंडलाईन किंवा मोबाईलची रेंज नसल्याने खुपचं पंचाईत होते. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच विज आणि मोबाईल आपल्या मुलभूत गरजांत समाविष्ट झाल्याने वारंवार अडखळल्या सारखे वाटते.
पुन्हा एकदा सेमाडोह कोलकास प्रवासाला सुरुवात झाली आणि वरूणराजा अगदी जिवलग मित्रासारखा साथ देत होता. जवळपास एक तासाच्या अंतराने आम्ही कोलकासला पोहोचलो. कोलकासलासुद्धा कॉटेजेस आहेत आणि राहण्याची पण सोय आहे. इथला रिव्हर व्ह्यू पॉइंट पाहण्यासारखा आहे. अर्धचंद्राकार वळण घेत खळखळ वाहणारी सिपना नदी मन मोहून घेते. जणुकाही निसर्गाच्या कुशीतुन वेगाने सरपटणाऱ्या नागीनीसारखी तिची चाल पाहुन मन अचंबित होते. सोबतच आधी फोटोबा मग विठोबा असणाऱ्या मित्रांनी मनसोक्त फोटो काढून आपली हौस भागवून घेतली. इथे जवळच एक टी स्टाॅल आहे तिथे चहापाण्याची सोय आहे.
कोलकासला एक तास घालवल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मात्र परततांना संध्याकाळ झाली आणि पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. वाटेत एकट दुक्कट बंदराशिवाय कोणतेही प्राणी नजरेस पडले नाही. मात्र इतर जगाशी संवाद साधण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने सर्वच चिंतातुर झाले होते. अखेर बस चालकाने जवळच एका खेड्यात बस थांबवली आणि तिथे लॅंडलाईन ची व्यवस्था असल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दहा रुपये प्रती कॉल या दराने आम्ही आवश्यक तिथे संपर्क केला आणि परत एकदा सेमाडोहच्या कॉटेजेसमध्ये डेरेदाखल झालो.
No comments:
Post a Comment