Thursday, April 13, 2023

बॅंकॉक सफारी वर्ल्ड, भाग ०५


          बँकाॅक सफारी वर्ल्ड, भाग ०५
************************************
आदल्या दिवशीच्या क्रूझवरील धमाल मस्तीमुळे दमल्याने आणि देशभक्तीचा हँगओव्हर दीर्घकाळ राहल्याने आम्ही सर्व पाचव्या दिवशी उशीरा उठलो. मात्र पाचव्या दिवसाच्या टुरची सुरवात सकाळी नऊ वाजता बँकाॅक सफारी वर्ल्डने होणार असल्याने आम्ही धावतपळत जाऊन ब्रेकफास्ट आटोपला. जवळपास एक तासात आम्ही सफारी वर्ल्डला पोहोचलो. मात्र कितीही धावपळ केली तरी इंडीयन स्टँडर्ड टाइमनुसार आम्ही लेटलतीफ झालोच. शेवटी याचा फटका आम्हालाच बसला. अत्यंत प्रेक्षणीय असा ओरांगऊटान शो आम्हाला बघता आला नाही.

 बँकाॅकचे सफारी वर्ल्ड हे १९८८ ला आकारास आले असून  जवळपास पाचशे एकरमध्ये पसरले असून यात मरीन पार्क आणि सफारी पार्क असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहे. मरीन पार्क जे अंदाजे १८० एकरमध्ये पसरले आहे त्यात ओरांगऊटान शो, सी लाॅयन शो, बर्ड शो, एलीफंट शो, काऊबाॅय शो, डाॅल्फीन शो असे एकसे बढकर एक शो सामील आहेत. तर सफारी पार्क हे अंदाजे ४८० एकरवर पसरले आहे. सफारी पार्क हे एक प्रकारचे खुले प्राणीसंग्रहालय असून यात पक्षी, शाकाहारी प्राण्यांसोबत हिंस्त्र श्वापदांचा पण मुक्त विहार आढळतो.

१) सी लाॅयन शो
सी लाॅयन सस्तन प्राणी असून हातापायाऐवजी त्याला फ्लिपर्स असतात. समोरचे मोठे तर मागचे फ्लिपर्स छोटे असतात, मात्र याद्वारे तो उड्या मारत चालतो. सरासरी आठ फुट लांब आणि दीडशे किलो वजनाचे सी लाॅयनचे आयुष्य विस ते तिस वर्षाचे असते. स्वभावाने अत्यंत खादाड असलेला हा प्राणी एकावेळेस पंधरा किलोपर्यंत खाद्य सहज पचवतो. ट्रेनिंग दिलेले असल्याने यांच्या पाणी आणि पाण्याबाहेर कलाबाजी पाहताना खुप चांगले वाटते. इतर सी लाॅयन प्रदर्शन करत असतांना बाकीचे सी लाॅयन आपल्या फ्लिपरद्वारे टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देतात. आपले अजस्त्र शरीर सांभाळून ज्याप्रमाणे ते उड्या मारत खेळ दाखवतात  ते आवर्जून पाहण्यासारखे आहे. 

२)बर्ड शो
सी लाॅयन शोनंतर जवळच बर्ड शो आयोजित केलेला असतो. मात्र सध्या त्याऐवजी आम्ही बर्ड सेक्शनला रंगबिरंगी पोपटांसोबत   खेळणे जास्त पसंद केले. पोपटांचे फुड (अर्थातच बी) घेऊन तुम्ही ते हातावर, कॅपवर किंवा जवळच्या बॅगवर टाकले असता ते स्वतः उडत येऊन बसतात आणि दाणे टिपतात. मात्र दाणे संपले की त्यांची मैत्री संपून ते भुर्रकन उडून जातात. यावेळी चिऊ ये काऊ ये चारा खा पाणी पी आणि भुर्र उडून जा ची हमखास आठवण येते.

३) काऊबाँय शो
ज्यांना ढिशूम ढिशूमची आवड आहे अशांना हा शो नक्कीच आवडेल. एखाद्या हाॅलीवुडपटाला शोभेल असा तंतोतंत सेट उभारला असतो. व्यवसायीक कलाकारांद्वारे तुफानी हानामारीसोबत काॅमेडी सिन्सपण उत्तम रंगवले जातात. दे दणादण फायटींग, बेछूट गोळीबार, अधून मधून होणारे बाँबस्फोट यामुळे आपण प्रत्यक्ष रणभूमीवर असल्याचा भास होतो. जवळपास अर्धा पाऊन तास चालणारा हा ॲक्शन पॅक्ड शो खरोखरच पैसे वसूल करून देतो. 

४) डाँल्फीन शो
काऊबाॅय शोच्या अगदी लागूनच डाॅल्फीन शो असतो. उत्क्रांतीत मानवाने जरी बाजी मारली असली तर मानवापाठोपाठ पोपट आणि डाॉल्फीन यांच्या मेंदुंचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. सुदैवाने या दोन्ही जीवांना जवळून बघायला मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला होता. प्रशिक्षित डाॅल्फीनद्वारे विविध खेळ दाखवले जातात. विशेषतः कॅट वाॅक, रिंग मधून उडी मारणे, हाय जंप घेऊन बलूनला स्पर्श करणे, आपसात रेस लावणे, ट्रेनरला डोक्यावर घेऊन धावने इ.  डाॉल्फीनचे स्वच्छंद बागडने, भन्नट स्पिडने पोहने,  मनमोहक कसरती, त्यांची हुशारी आणि मुक्त वावर पाहून पुढच्या जन्मी नक्कीच डाॅल्फीन व्हावे असे वाटून जाते. विशेष म्हणजे ट्रेनरने इशारा करताच डाॅल्फीन द्वारे जे बर्थडे साँग गायले जाते ते पाहून आश्चर्याने तोंडात बोटे जातात. 

 डाॅल्फीनचा शो म्हणजे बच्चेकंपनीसाठी एकप्रकारची धमाल असते. शो संपल्यावर तुम्ही तिथे डाॅल्फीन सोबत फोटोसुद्धा काढू शकतात. 
यानंतर वेळ असते ती आपल्या पुर्वजांना भेटायची. अर्थातच मानव, गोरीला, चिंपांझी आणि ओरँगऊटान हे एकाच वंशावळीतील असल्याने ओरँगऊटानला भेटने म्हणजे कबके बिछडे हुऐ हम आज यहा आके मिले सारखे होते. सफारी वर्ल्डला सुरवातीलाच ओरँगऊटानची जोडी तुमची वाट बघत असते. अत्यंत खट्याळ आणि खोडकर असलेल्या या प्राण्यासोबत फोटो काढणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच होते. मात्र त्यांचे हे रोजचेच काम असल्याने ते अगदी सराईतपणे तुमच्यासोबत वावरतात. मात्र त्यांचे तुम्हाला किस करणे, गुदगुल्या करणे, पक्की मिठी मारणे यामुळे अवघडल्यासारखे होते. जवळच सहाशे बाथ (बाराशे रुपये) देऊन तुम्ही वाघाच्या बछड्याला दुध पाजू शकता. एव्हाना दुपार झालेली असते आणि टाईमटेबल पाळत आम्ही इंडीयन रेस्टॉरंटमध्ये जेवन करणे पसंत केले.

५) सफारी पार्क
मरीन पार्कपासून पाच मिनीटाच्या अंतरावर सफारी पार्क आहे. ओपन झू असलेल्या या पार्कचा फिरण्याचा मार्ग आठ कि.मी. एवढा आहे तर निर्धारित पंचेचाळीस मिनीटाची ही सफारी डोळ्याचे पारणे फेडून जाते. अगदी सुरवातीलाच पाणवठ्यावरील विविध प्रकारचे पक्षी तुमचे लक्ष वेधून घेतात. पक्षांच्या विविध प्रजाती न्याहळतांनाच तुम्हाला शहामृग, झेब्रा, जीराफ, हरीण, गेंडा इ. प्राणी सहज नजरेला पडतात. यानंतरच्या भागात आपल्याला सिंहाचा कळप नजरेस येतो. अत्यंत निवांतपणे बसलेले वनराज पाहून व्हॅनचा वेग कमी केला जातो,, इथे तुम्ही आत बसूनच फोटोग्राफी करू शकता. यापुढच्या भागात मात्र आश्चर्यकारक दृष्य दिसले. सिंह हे नेहमीच कळपात असतात तर वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे. मात्र या विभागात चक्क दहा ते बारा वाघोबा एकत्र बसलेले आढळले.

५) इंद्रा मार्केट शाँपींग
सफारी वर्ल्ड संध्याकाळच्या पहिलेच आटोपल्याने हाॅटेलवर परतताच मित्रांनी इंद्रा मार्केटला शाॅपींगचा बेत आखला. खरेतर घरी परतल्यावर रिमांडच्या भितीने म्हणा की वहिनीसाहेबांच्या आदेशाची तालीम करायला सर्व मित्र निमुटपणे शाॅपींगच्या मार्गाला लागले. मला मात्र शाँपींगमधले फारकाही कळत नसल्याने म्हणा की सुरवातीपासूनच शाॅपींगचा तिटकारा असल्याने हाॅटेलवरच थांबायचा निर्णय घेतला. मात्र मित्रांच्या आग्रहाखातर मला माझा निर्णय बदलावा लागला.

 हाॅटेल रमाडा इंटरनॅशनलपासून इंद्रा मार्केट हाकेच्या आंतरावर असल्याने आम्ही पायीच आपल्या निर्धारित स्थळी पोहचलो. इंद्रा मार्केट हे बँकाॅकचे प्रसिद्ध मार्केट असून इथे रेडीमेड कपडे, ज्वेलरी, काॅस्मेटीक्स, इलेक्ट्रॉनिक गुडस्, फुटवेअर, टाॅईज, वाॅचेस, लगेज, बॅगेज, मोबाईल, आयपाॅड, माईक, स्पिकर्स आणि अन्य जीवनोपयोगी वस्तूंची जवळपास तिनशे दुकाने आहेत. तिन फ्लोअरचे हे मार्केट स्वस्त आणि मस्त वस्तूंकरीता प्रसिद्ध आहे. मात्र खरेदी करतांना तुम्हाला मोलभाव करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही हातोहात नागवले जाऊ शकता. विशेष म्हणजे या मार्केटला सेल्सगर्ल म्हणून नेपाळच्या सुंदर आणि आकर्षक तरुणी असतात. आपल्या गोड आणि लाघवत्या शैलीत त्या तुम्हाला हमखास जास्तीची खरेदी करायला भाग पाडतात. त्या मराठी, हिंदी आणि इतर भारतीय भाषा इतक्या सफाईने बोलतात आणि समजतात की आपण काही क्षणाकरीता स्तब्ध होऊन जातो. 

आमच्या अष्टप्रधान मंडळात काही सुरेल गळ्याचे तर काही जन्मजात कृष्णाचे अवतार असल्याने बऱ्याच जागी दुकानात खरेदी ऐवजी संगीतमय गोकुळ तयार होत असे. अर्थातच तिथे भारतीय ग्राहक बहुसंख्य असल्याने आमचा गृप त्यांच्या मनोरंजनात कुठेही कमी पडत नसे. "व्यापारा"ऐवजी मित्रमंडळी "प्यार" मध्ये(बोलण्यात) गुंतल्याने बरेचदा त्यांना आपण शाॅपिंगला आल्याचे सांगून भानावर आणावे लागत होते. यातील गमतीचा भाग जरी सोडला तरी खरेदी करतांना गोड,गोड बोलण्याला आपण जास्त फसू नये एवढाच सांगण्याचा उद्देश आहे. मात्र या मार्केटला लागूनच संध्याकाळी फुटपाथ बाजार भरतो आणि तिथे त्याच वस्तू आणखी कमी किमतीला मिळतात. खिशातले बाथ (रुपये) संपल्याचे ध्यानात आल्यावर मित्रमंडळींनी खरेदी थांबवली. दिवसभराची भ्रमंती आणि शॉपींगमधून उसंत मिळताच आम्ही स्वागत इंडीयन रेस्टॉरंटमध्ये डिनर आटोपले आणि हाॅटेलला परतलो. 
क्रमशः,,,,,,,
*************************************
दि. ०५ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...