Thursday, April 13, 2023

जोर का झटका धीरे से, अंतिम भाग


     जोर का झटका धिरेसे ,अंतिम भाग
*************************************
अखेर २९ नोव्हेंबर उजाडले आणि बँकाॅकचा निरोप घ्यायची वेळ आली. पाच दिवस मौजमस्तीत घालवल्याने सगळे आनंदात होते. मात्र मायदेशी परतण्याची हुरहुर मनात असल्याने आम्ही सकाळी लवकरच उठलो. ब्रेकफास्ट आटोपून सर्वांनी सामानाची आवराआवर सुरु केली. परतण्यासाठी मुंबईचे फ्लाईट रात्री साडेआठला असल्याने दुपारी चारला आम्हाला घ्यायला व्हॅन येणार होती. दुपारी बाराला हाॅटेलमधून चेकआऊट केल्याने मधले चारतासाच्या फावल्या वेळात काहींना परत शाॅपींगचा मोह झाला. याकरिता आम्ही सर्वांनी आपापल्या बॅग्ज हाॅटेलच्या लगेज रुममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. बारा बॉग्ज जमा करून रितसर पावती घेऊन आम्ही जवळच्या इंद्रा मार्केटला निघालो. सर्वांनी शाॅपींग आटोपून साडेतिन पर्यंत वापस येण्याचे ठरवले होते.

साडेतिन पर्यंत सहा मित्र हाॅटेलवर परतले आणि सर्वांचे सामान एका जागी घेऊन उरलेल्या दोन मित्रांची वाट बघू लागले. घड्याळाचा काटा जसजसा समोर जात होता तसतशी आमची बेचैनी वाढत होती. ठरल्याप्रमाणे व्हॅन अगदी वेळेवर म्हणजे दुपारी चारला दारात हजर झाली. मात्र उरलेले दोन मित्र तब्बल दहा मिनिटे उशिरा आले आणि तिथेच मनात शंकेची पाल चुकचुकली. हिच दहा मिनीटे आपल्याला भारी पडणार असे उगाचच वाटून गेले. माझ्या मनातली ही शंका मी इतर मित्रांजवळ बोलूनसुद्धा दाखवली.  सिक्स्थ सेन्स म्हणतात ते बहुदा यालाच. अखेर एकदाचे सर्व बॅग्ज व्हॅनमध्ये कोंबून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मात्र वाहतूक कितीही शिस्तबद्ध असली तरी रश अवरचा फटका आम्हाला बसलाच. हाॅटेल ते एअरपोर्ट पर्यंतच्या प्रवासासाठी आम्हाला एक तास लागलाच. 

एअरपोर्ट वर पोहोचताच सर्वांनी लगबगीने आपापले सामान उतरवले. मात्र मोजले असता एक बॅग कमी आढळली. क्षणार्धात अंगावरून काटा सरसरून गेला. एका मित्राची बॅग हाॅटेलवर राहील्याने रंगाचा भंग झाला. शेवटी वेळ न घालवता दोन मित्रांनी बॅगसाठी परत हाॅटेलवर जाण्याचा निर्णय घेतला. खरेतर बॅगमध्ये मौल्यवान काहीच नसल्याने कुरीयरने किंवा पार्सलने ती बॅग सहज परत आणता आली असती. मात्र वेळेवर सर्वच भांबावून गेल्याने कोणालाही काही सुचले नाही. मात्र मनोमन आता हे दोघे आपल्यासोबत परत येऊ शकणार नाही याची खात्री होऊ लागली होती. 

इकडे आम्ही सर्वांनी एअर इंडीयाच्या काऊंटर वर जाऊन त्यांना परिस्थिती ची कल्पना दिली आणि इतर मित्रांसाठी वाट बघण्याची विनवणी केली. एअर इंडीयाच्या स्टाफने पण वेळ पाहून मदत करण्याचे ठरवले मात्र  Time & Tide waits for no man हे विसरून चालणार नव्हते. इकडे आमचा जीव खालीवर होत होता आणि तिकडे दोन मित्र ट्रॅफिक जाममध्ये फसून वैतागले होते. शेवटी पहिली टॅक्सी सोडून ते दुसऱ्या टॅक्सीत बसले परंतु दुर्दैवाने ना यांची भाषा त्याला कळत होती ना त्याची भाषा यांना. शेवटी कंटाळून दोन मित्रांनी हाॅटेलचा रस्ता विचारून पैदल जाणे पसंद केले. मात्र आजचा दिवस त्यांचा नव्हताच मुळी. दोघेही अगदी हाॅटेलच्या विरूद्ध दिशेने धावत निघाले होते. अखेर एका सदग्रुहस्थाने त्यांना हाॅटेलचा व्यवस्थित पत्ता सांगीतला आणि बायकर्सची पण सोय उपलब्ध करुन दिली. 

इकडे आम्ही सर्वजण देवाकडे यांच्या एअरपोर्टवर वेळेवर पोहचण्यासाठी धावा करू लागलो होतो. अखेर हाॅटेलवर बॅग मिळताच मित्राच्या जीवात जीव आला होता. परंतु खरा खेळ तर आता सुरू झाला होता. आता लक्ष होते वेळेच्या आत एअरपोर्ट वर पोहोचणे. दरम्यान आम्ही मित्रांना बॅगच्या नादी न लागता परत येण्याचा सल्ला दिला होता परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

 बायकर्सपेक्षा मेट्रोने लवकर पोहोचता आले असते. परंतु नवख्या शहरात आणि इथली मेट्रो, टिकीटींग संपूर्णतः काॅम्प्युटराईज्ड असल्याने शिवाय नक्की कोणत्या मार्गाने जायचे, कोणत्या फ्लोअरला जायचे याचा ताळमेळ नसल्याने मेट्रोचा जाण्याचा निर्णय म्हणजे आगीतून निघून फोफाट्यात जाण्यासारखे होते. अखेर धुम स्टाईलने दोघेही मित्र दोन बायकर्ससोबत निघाले.
कर्मधर्मसंयोगाने दोघेही मित्र सव्वासातला एअरपोर्ट वर पोहचताच आमच्या जीवात जीव आला आम्ही देवाचे शतशः आभार मानले. एव्हाना आम्ही इमीग्रेशन, सेक्युरीटी पास करून पुढे सरकत होतो. 

बँकाॉक स्वर्णभुमी एअरपोर्ट हे सात बिल्डिंग चे असून प्रत्येक बिल्डिंग चार मजल्याची आहे. ए, बी बिल्डिंग डोमेस्टिक साठी तर सी, डी, ई, एफ, जी बिल्डिंग इंटरनॅशनल फ्लाईट करता वापरली जाते. खरा घोळ इथेच झाला. दोन्ही बायकर्सनी दोन्ही मित्रांना वेगवेगळ्या फ्लोअरवर उतरवल्याने दोघांची चुकामुक झाली. वेळ वाळुसारखा हातातून निघून जात असल्याने दोघेही गोंधळले होते.

दोन्ही मित्रांकडे मोबाईल आणि लोकल सिम होते परंतु एकाचा मोबाईल चार्ज नसल्याने सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. या दोघांची ताटातूट होताच आम्ही मात्र इकडे चांगलेच घामाघूम झालो. शेवटी साडेसात वाजले, एअर इंडीयाचे काऊंटर बंद झाले आणि या दोघांचा आमच्या सोबत परतण्याचा मार्ग बंद झाला. मात्र खरी चिंता होती ती मित्र मिसिंग झाल्याची. कारण मिसिंग झालेल्या मित्राजवळ ना पुरेसे पैसे होते, ना पासपोर्ट होता, ना संपर्क करण्याचे कोणतेही साधन. अखेर मित्राच्या नावाची उदघोषणा पण करण्यात आली मात्र काहीही फायदा झाला नाही... एअरपोर्टच्या गोंगाटात कोणालाच काही कळत नव्हते. इकडे वेळ झपाट्याने निघून जात होती. मिसिंग मित्र डायबेटीक असल्याने हाइपोग्लाइसेमीया तर झाला नाहीना किंवा इतर काही प्राॅब्लेम अथवा दगाफटका तर झाला नाहीना असे असे नानाविध बरेवाईट विचार मनात गोंधळ घालत होते. मनी चिंतते ते वैरी न चिंतते म्हणतात ते याचसाठी. शेवटी टेक ऑफची घोषणा झाली आणि आम्ही अपराधी भावनेने देवाकडे यांच्या सुखरूपतेची प्रार्थना करत मुंबई कडे निघालो. 

परतीच्या प्रवासात अजिबात मन लागत नव्हते. कारण जातांना आठजण आणि येतांना सहाजण हे कधीच पटण्यासारखे नव्हते. नागपूरला गेल्यावर कोणाकोणाला काय उत्तर देणार हे कळत नव्हते. जास्तीत जास्त देवाचा धावा करण्यावाचून पर्याय नव्हता. मध्यरात्री नंतर मुंबई एअरपोर्ट वर पोहोचताच व्हाट्सअपवर दोघांच्या मिलनाचा मेसेज झळकला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तब्बल १४ वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्रांची भेट घेऊन जेवढा आनंद भरताला झाला नसेल तेवढा आनंद या दोघांसोबत आम्हालाही झाला.

खरेतर दोन्ही बायकर्सनी दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी उतरवल्याने हा घोळ झाला. परंतु सुरवातीलाच जो दहा मिनिटे उशीर झाला तोसुद्धा महत्त्वाचा होता. सगळे वेळेवर हाॅटेलवर जमा झाले असते तर नक्कीच सर्वांना आपापली बॅग चेक करायची संधी मिळाली असती. शिवाय ज्या वस्तूच्या शाॅपींगमुळे दोन मित्र उशीरा आले नेमकी ती वस्तू या सर्व भानगडीत कुठे राहून गेली हे शेवटपर्यंत कळलेच नाही. एरवी बसस्थानक किंवा रेल्वे स्टेशनवर मायेनी बोलणारी माणसे एअरपोर्टवर आल्यावर अकडून का जातात हे मला अजुनही कळले नाही. मिसिंग च्या धावपळीत दोन्ही मित्रांना एअरपोर्टवर सहप्रवाश्यांचा फारसा चांगला अनुभव आला नाही. 

भाषेच्या समस्ये सोबतच अडचणीत सापडलेल्यांशी असलेली इतरांची अनास्था चिंताजनक आहे. Time is money का म्हणतात याची चांगलीच खात्री पटली. शेवटी प्रवास करतांना इतरांवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरले. काहीही असो शेवटी हॅपी एंडींग झाल्याने मनावरचे दडपण कमी झाले. झालेल्या प्रसंगातून शहाणे होत पुढच्या वर्षी आणखी परदेशवारीचा बेत आखून आम्ही आपापल्या घरी परतलो. उर्वरित दोन मित्र दुसऱ्या दिवशी कोलकातामार्गे नागपूरला पोहोचताच सर्वांनी देवाचे परत एकदा आभार मानले. मौल्यवान वेळेबद्दल फारतर एवढे म्हणता येईल.....।
वक्तको जो ना समझ सका, वो मिट गया
तलवारसे तो बच गया, लेकीन फुलसे कट गया
तेंव्हा मित्रांनो सर्व करा पण वेळेचा आदर नक्की करा.
प्रवासवर्णन समाप्त.
धन्यवाद.
*************************************
दि. ०६ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...