वंदे मातरम, भारत माता की जय, भाग ०४
************************************
तिन दिवस पटायात मनसोक्त हुंदडल्यावर आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा बँकाॅक होता. मात्र पटायाने आमच्यावर अशी काही मोहिनी घातली होती की तिथचे गुलाबी, रोमँटिक वातावरण सोडून रूक्ष बँकाॅकला जायला मनोमन कोणीच तयार नव्हते. तरीपण अति सर्व व्यर्जयेत प्रमाणे आम्ही पटाया सोडून बँकाॅकची वाट धरली. पटाया ते बँकाॅक दोन अडीच तासाचा प्रवास अत्यंत सुखकर झाला. मोठमोठे चकचकीत महामार्ग, शिस्तबद्ध वाहतूक, भन्नाट स्पिडने धावनारी वाहने पाहतांना अलगच थ्रिल अनुभवायला येते.
बँकाॅक ही थायलंडची राजधानी आहे आणि या शहरात येताच त्याची जाणीव तेथील वातावरणातून येते. टोलेजंग इमारती, गतिमान वाहतूक, पादचाऱ्यांसाठी जागोजागी फुटओव्हर ब्रिज, प्रशस्त हाॅटेल्स, विविध कंपन्यांची शोरूम्स बँकाॅकच्या भव्यतेची साक्ष देतात.
१) टेम्फल आँफ गोल्डन बुद्धा
टेम्पल ऑफ गोल्डन बुद्धा हे बँकाॅकचे प्रमुख आकर्षण आहे. अत्यंत सुबकतेने बांधलेली ही वास्तू पाहताक्षणीच पसंतीला उतरते. इथे भगवान गौतम बुद्धाची साडेपाच टनाची भव्यदिव्य मुर्ती पाहतांना मन हरखून जाते. अर्धनिद्रिस्त असलेल्या स्वर्णमुर्तिकडे पाहून आपले डोळे आपोआप मिटले जातात आणि मनोमन स्वर उमटतात बुद्धं शरणं गच्छामी. खरोखरच काही क्षणापुरता तरी मी संसारीक सुखदुःख विसरुन ध्यानस्थ झालो. अथांग मनःशांती लाभल्याचे चेहऱ्यावर समाधान होते. इतिहासात डोकावले तर ही मुर्ती तेरा,,चौदाव्या शतकातली मानली जाते. अंडाकृती चेहरा असलेल्या या मुर्तिला भारतीय कलाकुसरीचे कोंदण आहे. मात्र आक्रमकांच्या,चोरांच्या भीतीने, क्षतिग्रस्त होऊ नये किंवा अन्य कारणाने या मुर्तिला प्लॅस्टर चढवण्यात आले होते ...ते कित्येक शतके कायम होते. १९५४-५५ ला ही मुर्ती स्थापित करतांना ते प्लॅस्टर निघाले आणि आतिल सुवर्णमुर्ती जगासमोर आली. ही मुर्ती नऊ भागांची बनली असून अगदी सफाईने जोडली गेलेली आहे. मुर्तीखाली "असेंबल की" असून याद्वारे ही मुर्ती एकसंध राखली गेलेली आहे. २०१० पासुन सध्याच्या मंदिरात ही मुर्ती स्थानापन्न असून देशी विदेशी पर्यटकांची ती पहिली पसंती आहे.
२) टेम्पल आँफ सिल्व्हर बुद्धा
मला सर्व धर्मातील उपासना पध्दती, प्रार्थनास्थळे, चालीरीती यांचे मला कायमच आकर्षण असते म्हणूनच भटकंती करतांना कोणत्याही धार्मिक स्थळाची भेट घ्यायला मी विसरत नाही. मग ते गोव्याचे मंगेशी मंदीर, चर्च असो, दिल्लीचे अक्षरधाम मंदीर, जामा मस्जिद, श्रीनगरचे हजरतबाल दर्गा असो की मनालीचे हिडींबा टेंपल, बौद्ध डायनेस्टी,,,धार्मिक स्थळे नेहमीच माझ्या प्रायोरीटीवर असतात. बँकाॅकचे टेम्पल ऑफ सिल्व्हर बुद्धा हे मुख्यतः मेडिटेशन साठी प्रसिद्ध आहे. १९७० ला स्थापन झालेल्या या मंदिरात बुद्धमूर्ती अनेकविध भावमुद्रांमध्ये स्थापित केल्या गेल्या आहेत. प्रत्येक मुर्तीखाली त्या भावमुद्रेचा सारांश लिहीलेला आहे. अभ्यासू विद्यार्थी आणि भाविकांसाठी हमखास भेट देण्याजोगी ही जागा आहे. World peace through inner peace पडतचा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतो. या दोन्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही रमाडा इंटरनॅशनल हाँटेलवर मुक्कामासाठी पोहचलो. एक दोन तास आराम केल्यानंतर आम्ही फ्रेश होत संध्याकाळच्या क्रुझ करता तयार झालो.
३) चाओ फ्राया रिव्हर क्रूझ बँकाॅक
अर्थातच संध्याकाळी क्रूझ डिनर असल्याने सर्वच आनंदात होते. अगदी वेळेवर म्हणजेच संध्याकाळी सहाला आम्हाला घ्यायला व्हॅन आली. इथले ड्रायव्हर सुद्धा कमालीचे वक्तशीर आहेत. क्रूझसेंटरवर पोहोचताच तुमचे स्वागत अत्यंत देखण्या, नखशिखांत सजलेल्या आणि टापटीप असलेल्या सुंदर तरूणी पुष्पगुच्छ देऊन करतात. मात्र इतक्या जवळ येऊन आणि जिव्हाळ्याने सोबत फोटो काढतात की परत एकदा बोहोल्यावर चढल्याची फिलिंग येते. अर्थातच हे फोटो मग तिनशे रुपयात तुम्हाला घ्यायला भाग पाडतात. मात्र घरी परतल्यावर उगाचच झंझट नको म्हणून आम्ही सर्वांनी ते टाळले.
क्रुझवर वेलकम ड्रिंक्सने स्वागत केले जाते. सुरक्षा नियमांची उदघोषणा संपताच म्युझिक पार्टीला सुरवात होते. आमच्या डेकवर भारतीयांचे प्राबल्य होते तर मधल्या डेकवर श्रीलंकन आणि वरच्या डेकवर माॅरीशसचा गृप होता. मात्र खरी धमाल आणली ती आमच्या गृपने. प्रत्येक गाण्यावर तुफानी डान्स करत आमच्या ग्रुपने सर्वांची वाहवा मिळवली. पप्पु कान्ट डान्स प्रमाणे मला नाचण्यातले फारकाही कळत नसल्याने मी शिट्ट्या वाजवून मित्रांना प्रोत्साहन दिले. नाचगाणे सुरु असतांनाच इतरांसाठी डिनरची सोय केलेली होती. डिनरमध्ये सी फुड, नाॅनव्हेजची रेलचेल असल्याने दर्दींना चांगली मेजवानी मिळाली. डिनर आणि संगीत नृत्याचा आनंद घेतांना एकदिड तास कधी निघून गेला ते कळलेच नाही. क्रूझमधून रंगबिरंगी प्रकाशात पहुडलेल्या बँकाॅक शहराचे नयनरम्य दर्शन घडले.
क्रूझमधून उतरतांना मात्र अविश्वसनीय, अकल्पनीय आणि अवर्णनीय घडले. अचानक आसमंत वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणेणे दुमदुमून गेले. क्षणार्धात काय होत आहे ते कळत नव्हते. मात्र अचानक एड्रीनॅलीन रश वाढल्याने श्वास वाढू लागला, छातीची धडधड वाढली, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अंगात तुफानी जोश संचारला आणि काहीही बोलले तरी तोंडातून एकच वाक्य निघत होते,,,, वंदे मातरम,,भारत माता की जय. खरोखरच या गगणभेदी घोषणांनी अख्खा परिसर दणाणून गेला, कोणत्याही डेसिबलच्या सिमा तोडणाऱ्या या गर्जनांनी उपस्थित सर्व भारतीयांना एकत्र केले. जात, पात, धर्म आणि प्रांताच्या बेड्या एका झटक्यात तोडत या घोषणांनी वातावरण भारतीय रंगात रंगवून टाकले. उपस्थित तमाम भारतीय देशप्रेमाने ओलेचिंब झाले. खरेतर या घोषणांनी मातृशक्ती, मातृभूमी आणि देशाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वंदनच केले होते. यासोबतच मोदी मोदी च्या घोषणा सुरु होताच भारतीयांनी परत एकदा परिसर डोक्यावर घेतला. विदेशात होणारा मोदींचा गजर हा प्रकार नेहमीचाच,,,, मात्र तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा थरार काही औरच आहे. इमानदारीने सांगायचे झालेच तर गत पंधरा मिनीटात घडलेल्या प्रसंगाने टुरचा पुरा पैसा वसूल झाल्याचे समाधान झाले.
क्रमशः,,,,,,,
**************************************
दि. ०४ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment