Thursday, April 13, 2023

बाली टूर, भाग ०३


     बाली टुर भाग ३ "झंडा ऊँचा रहे हमारा"
**************************************
बाली टुरमधील पहिले दोन दिवस विमानप्रवासात गेल्याने खऱ्या अर्थाने आमच्या टुरची सुरवात १५ ऑगस्ट पासून झाली. अर्थातच १५ ऑगस्ट हा तमाम भारतीयांसाठी राष्ट्रीयत्व जागवण्याचा आणि देशाभिमानाने ऊर भरून येण्याचा हक्काचा दिवस असल्याने सकाळपासून आम्ही लगबगीने तयारीला लागलो. ब्रेकफास्टची व्यवस्था मुक्कामी हॉटेलमध्येच असल्याने फार चिंता नव्हती. मात्र पोहे, उपमा, समोसा, कचोरी, सांभारवडा, दोसा सारख्या खमंग आणि चटपटीत पदार्थ खाणाऱ्यांचा इथे चांगलाच हिरमोड होतो. पोर्क, बीफ, फिश आणि चिकनच्या भाऊगर्दीत व्हेज डिश शोधतांना खरोखरच नाकीनऊ येते. शेवटी आमलेटचे काऊंटर पाहून जीवात जीव येतो.  व्हेजप्रेमीं मित्रांना पुलाव, भाजी आणि एका घासाच्या आकाराच्या नान वर समाधान मानुन ब्रेकफास्ट उरकावे लागले.

दिवसाचे आकर्षण हे बेनोव्हा वॉटर स्पोर्ट्स होते आणि एका तासाच्या अंतरावर होते. यामार्गात समुद्रात भर घालून उभारलेले उड्डाणपुलाचे जाळे हे तिथले प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. बेनोव्हाला येताच आम्ही सर्वांनी मिळून सोबत आणलेला तिरंगा फडकवला. वॉटर स्पोर्ट्स म्हटले की रिस्क आलीच. इथे पॅरासेलींग, डायव्हिंग, ओशियन वॉटर, जेट स्की, फ्लायफिश, डोनट, फ्लायबोर्ड, बनाना बोट, स्नोर्केलींग, वेव्ह बोर्ड आणि निबोर्ड सारखे थरारक खेळ होते. आम्ही पहिल्यांदाच पाच मित्र डोनट मध्ये बसलो आणि ज्याप्रकारे ती बोट सागरी पाण्यावर आदळआपट करत उसळते ते पाहून पुन्हा कधी तिच्या वाट्याला न जाण्याचा निर्णय घेतला. कारण संपूर्ण शरीरासोबत मनालाही शेकून काढणारा अनुभव परत एकदा नकोसा होता. अर्थातच वय, जोखीम आणि फिजीकल फिटनेस याबाबतीत महत्वाचे घटक ठरतात. ह्रदयरोगी किंवा कमजोर व्यक्ती आणि पाण्याची भिती बाळगणाऱ्यांनी दोन हात दुर राहिलेलेच बरे. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते आणि आमची पाऊले लंचकरीता "दिर्घायु" या भारतीय रेस्टॉरंट कडे वळली. इथेही अगदी प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची विधीवत पुजा केलीली विलोभनिय मुर्ती पाहूनन दोन्ही हात आपोआप जोडले गेले. इथे भारतीय कर्मचारी असल्याने जेवणाची चांगली सोय झाली. 

यानंतर आम्ही प्रसिद्ध "बालीहिंदू उलुवाटू मंदिराकडे निघालो. मात्र वाटेत लागणारा "ड्रिमलँड बिच" पाहण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. शुभ्रवाळुचा किनारा, फेसाळत्या लाटा, अंगाशी झोंबणारा सुसाट वारा पाहुन मनाने पुन्हा एकदा वयाचे बंधन झुगारून पाण्यात उतरवले. आमचा कंपु म्हणजे "मस्ती की पाठशाला" असल्याने पाण्यात हुंदडण्यात दोन तास कसेकाय गेले हे कळलेसुद्धा नाही. विशेषतः सर्फिंग आणि सनसेट करीता हा बिच पर्यटकांना आकर्षित करतो. अखेर वेळेचे बंधन पाळत, लाटांचा निरोप घेत आम्ही उलुवाटू मंदिराकडे प्रस्थान केले.
अंदाजे अकराव्या शतकात उभारले गेलेले हे मंदिर समुद्रकिनारी अत्यंत उंच अशा पहाडावर वसले असुन रूद्रपुजा, मोक्ष आणि इतर धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध आहे. पहाडाच्या कडेकडेने मंदिराकडे वर चढतांना सागराच्या अथांग रुपाचे दर्शन होते. मात्र वाटेत मकाऊ बंदरांना सांभाळून वर चढावे लागते. विशेषतः पर्स, मोबाईल, कँमेरा किंवा हातातली पिशवी अथवा कोणतीही वस्तु पळवण्यात हे बंदर पटाईत आहेत. मंदिर चांगल्या उंचीवर असल्याने सनसेट पाहण्यासाठी इथे विशेष गँलरी बांधलेली आहे. मात्र पर्यटकांच्या तुफान गर्दीने कधी एकदाचे इथुन बाहेर पडतो असे वाटायचे. या मंदिरात सुद्धा मुख्यभाग पुजा आणि इतर धार्मिक विधींसाठी बंद असल्याने पुर्ण दर्शन होऊ शकले नाही. मात्र विविध नटलेली शिल्प, रम्य वातावरण आणि पहाडी सौंदर्याने मन प्रफुल्लित होते.

परतीच्या प्रवासात आमचा सामना ट्रॅफिक जामशी झाला. मात्र कुठेही कर्णकर्कश हॉर्न नाही की ओव्हटेकींगची लुडबुड नाही, की चेहऱ्यावर वैतागवाडी नाही. ,,, खरोखरच इथले ड्रायव्हर हे संयमाचे महामेरु असावेत. झुकझुकगाडी प्रमाणे आम्ही जवळपास तिन तासांनी आपल्या मुक्कामी पोहोचलो परंतु ड्रायव्हिंग करतांना किती आणि कसा संयम बाळगावा याचा धडा घेऊनच....
क्रमशः......
**************************************
दि. २३ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो 9822939287
anilpawshekar159@gmail.con
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...