Thursday, April 13, 2023

बाली टूर, भाग ०४


बाली टुर भाग ४, रौद्र किंटामणी ज्वालामुखी
**************************************
टुरच्या चौथ्या दिवसाचे प्रमुख आकर्षण होते "किंटामणी" पर्वतावरील "बाटुर" ज्वालामुखी. कुटा शहरापासून जवळपास पन्नास किमी अंतरावर असलेले निसर्गाचे रौद्ररूप पाहण्यासाठी आम्ही सर्वच उत्सुक होतो. मात्र वाटेत जेम्स गॅलरी आणि हँडीक्राफ्ट गॅलरी बघण्याची विनंती ड्रायव्हरने केली. अर्थातच पर्यटन हे इथले उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असल्याने असे मायाजाल तर असणारच. मात्र आम्ही या दोन्ही गॅलरीमध्ये केवळ फोटोसेशन करून काढता पाय घेतला. शिस्तबद्ध वाहतूक असली तरी रश अवर, पहाडी रस्ते यामुळे जवळपास अडीच तिन तासाने आम्ही नियोजित स्थळी पोहोचलो.

समुद्रसपाटीपासून १७१७ मिटर उंचीवर असलेला हा ज्वालामुखी सक्रिय असून अधुनमधून आपली ताकद, अस्तित्व याची जाणीव सतत करून देत असतो. मात्र याचे रौद्ररूप १८५० आणि २००० नंतर क्वचितच बघायला मिळाले. अंदाजे २९००० हजार वर्षाचे वयोमान असलेल्या या ज्वालामुखीचा बाहेरील भाग १०×१३.५ किमी तर आतील भाग ६.४×९.४ किमीचा आहे. याच्यालगतच "बाटुर व्होल्कॅनो लेक" हे "बिगेस्ट क्रेटर लेक" म्हणून ओळखले जाते. निसर्गाच्या या भव्यदिव्य रचनेकडे पाहता मानव हा निसर्गाच्या मानाने किती खुजा आहे याची प्रचिती येते. या ज्वालामुखीवर  ट्रेकिंगची पण सोय आहे. मात्र हे अत्यंत जोखमीचे काम असुन प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि फिजीकल फिटनेस या बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.

अर्धा तास या महाकाय ज्वालामुखीचे दर्शन घेतल्यावर आमचा मोर्चा कॉफी आणि मसाल्यांची बाग असलेल्या तिमेन या खेड्याकडे वळवला. अत्यंत हिरव्यागर्द असलेल्या डोंगर उतारावर ही बाग वसली असुन इथे पारंपरिक विधीने कॉफी तयार केली जाते. मुख्य म्हणजे बागेत जातांना कॉफी बिन, कोको आणि इतर दाटीवाटीने असलेल्या वृक्षवेलींतून पायवाटेने जातांना आपणही वृक्ष असतो तर किती बरे झाले असते असे सहजच वाटून जाते. शुद्ध हवा, गुलाबी थंडी, बोचरा वारा आपल्याला निसर्गाच्या कुशीत केंव्हा हरवून टाकतो हे कळतच नाही. 

इथे डचांनी कॉफीच्या लागवडीला सुरवात केल्याचा समज आहे. मांजर, मुंगूस सारखा दिसणारा सस्तन आणि निशाचर असलेला ल्युवॉक अथवा एशीयन पाम सिव्हेट ज्याला इंग्रजीत टोडीकॅट्स म्हणतात हा प्राणी कॉफी तयार करण्यात मुख्य भुमिका निभावतो. कॉफीबिन हे या प्राण्याचे आवडते खाद्य असुन तो कॉफी बिन चटकावतो आणि पाचन करुन मलावाटे बाहेर फेकतो. स्थानिक लोक या मलाला धुवून, वाळवून, साफ करुन कॉफी बिन अलग करतात आणि भाजुन, कुटून कॉफी तयार केली जाते. अर्थातच सिवेटच्या पाचनप्रक्रियेतून गेल्यावर नक्की काय "केमिकल लोच्या" होतो हे सांगणे कठीण असले तरी यामुळे कॉफी हलकी आणि सुगंधी आणि आणखी टेस्टी होत असल्याचा समज आहे. किंचित नाक मुरडुनच आम्ही सर्वांनी अशी कॉफी पिली मात्र फारकाही फरक जाणवला नाही. इथे कॉफीचे कमीतकमी पंधरा फ्लेवर विकसित केले असून विक्रिस पण उपलब्ध होते.

खरेतर कॉफी पिल्यानंतर तरतरी वाटण्याऐवजी कॉफी निर्माण करण्याचीच प्रक्रिया भेजाफ्राय करून गेल्याने सर्वांनी एकमेकांना धीर देत पुढे जाणे पसंत केले. इथली जनता प्रचंड उत्सवप्रिय आहे. वाटेतच आम्हाला एक अंत्ययात्रेला सामोरे जावे लागले. अत्यंत शांततेत, एकसारख्या पोषाखात आणि शोकाकुल वातावरणात रथावर निघालेली अंत्ययात्रा पाहून आम्ही दुरुनच हात जोडले आणि पुढे निघालो. परतिच्या मार्गावर परत एकदा ट्रॅफिक जामला फसल्याने मुक्कामी पोहोचायला आम्हाला उशीर झाला,,,, मात्र ऐवढा संयम ठेवणे इथे दोन दिवस राहून आम्ही नक्कीच शिकलो होतो.
क्रमशः,,,,,
**************************************
दि. २४ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...