Thursday, April 13, 2023

बाली टूर भाग ०२


बाली टुर भाग २, बेजोड हिंदू संस्कृतीचे दर्शन
**************************************
मध्यरात्री हैद्राबादवरून निघालेले विमान चार तासांच्या अवधीनंतर मलेशियाची राजधानी असलेल्या क्लालालंपुरला पोहोचले. वैमानिकाने जेव्हा लँडिंग ची घोषणा केली तेव्हा अर्धवट पेंगुळल्या अवस्थेत खिडकीतून बाहेर डोकावताच रात्रभराचा थकवा क्षणात नाहीसा झाला.  सागरकिनारी वसलेले विमानतळ गर्दहिरव्या वनराईने वेढलेले असुन आकाशात घिरट्या घालत विमान जेव्हा मखमली हिरव्याकंच बॅकग्राउंडवर खाली झेपावत येते तेंव्हा सहजच पंछी बनू उडके फिर आज गगणमे या गिताची आठवण येते.

 मलेशिया हे मुस्लिमबहुल राष्ट्र आहे आणि याची प्रचिती विमानतळावर लगेच येते. विशेषतः महिला सुरक्षारक्षक, कर्मचारी आणि प्रवासी महिला ह्या डोक्याला स्कार्फ बांधून दिसतात. क्वालालंपुरचे विमानतळ हे जगाच्या पुर्वेकडील राष्ट्रांना जोडण्याचा महत्वपूर्ण स्थान असल्याने जवळपास आठ विमान कंपन्याची इथे सतत वर्दळ असते. आमचे मात्र एअर एशियाचेच विमान पुढील प्रवासाकरीता असल्याने आम्हाला थेट एअर एशियाच्याच टर्मिनलवर उतरावे लागले. 
परत एकदा सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन आटोपून आम्ही बालीकरीता तयार झालो.

 मलेशियाचे चलन रिंगीट आहे आणि भारतीय चलनानुसार सतरा रूपयाचा एक रिंगीट होतो. आमच्याकडे फक्त युएस डॉलर्स आणि आयडीआर अर्थातच इंडोनेशियन रूपये असल्याने कॉफी प्यायची पंचाईत झाली मात्र एका मित्राकडे इंटरनॅशनल डेबिट कार्ड असल्याने ही अडचण दुर झाली. एक हजार रूपयात चार कप कॉफी पिऊन आम्ही बालीकरीता निघालो. सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंतचा विमानप्रवास आम्ही घरगुती ड्रायफ्रुट अर्थातच चकली, खाकरा, चिवडा, शंकरपाळे यावर उरकवला.

दुपारी दोनला बाली इंटरनॅशनल विमानतळावर आम्ही उतरलो आणि प्रवासाचा तिसरा टप्पा पुर्ण झाला. इथले विमानतळ समुद्राच्या अगदी काठीच वसले असल्याने लँडिंग करतेवेळी विमान थेट समुद्रातच उतरण्याचा भास होतो.बाली बेटावरचे हे एकमेव विमानतळ असुन यालाच डेन्पासार किंवा आयएनआर इंट. एअरपोर्ट म्हणून ओळखले जाते. खरेतर जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त मुस्लिम हे इंडोनेशियाला राहतात आणि त्यांचे प्रमाण इंडोनेशियात ८७.२% इतके आहे. मात्र बाली इथली जनता ८५% हिंदू धर्मीय असुन हिंदू संस्कृतीची प्रचिती आपल्याला पदोपदी येते. विमानतळाच्या प्रवेशद्वाराचे डिझाइन हे मंदीराच्या, स्वर्गाच्या प्रवेशद्वाराच्या सारखे असून जागोजागी सजवलेल्या मुर्ती आणि सजावटींनी आपण एखाद्या मंदिरात आल्याचा भास होतो. 

इथे रूद्र आणि श्रीगणेश या देवतांना अत्यंत महत्व असुन कित्येक चौकात रामायण आणि महाभारतातल्या प्रसंगावर आधारित देखावे, सजावट केलेली आढळते. विमानतळ ते हॉटेल पर्यंत जागोजागी , रस्त्याच्या दुतर्फा, प्रत्येक घर अथवा दुकानासमोर हमखास आढळणारी मंदिराची प्रतिकृत आणि तिथे विधीवत मांडलेली पुजा पाहून आपल्याला हिंदू संस्कृती इथे किती खोलवर रूजली आहे याची साक्ष देते. चकचकीत रोड, व्यवस्थित मार्किंग केलेले वाहतूक चिन्ह, शिस्तबद्ध वाहतूक, कुठेही लेन कटींग नाही की ओव्हरटेकींग नाही. इथच्या वाहनांना हॉर्न आहे की नाही हा प्रश्नच पडतो इतकी इथची वाहतूक विना गोंगाट, प्रदुषणाशिवाय सुरू असतो. तसेच प्रत्येक वाहनावर मग ते दुचाकी असो की चारचाकी,,,परवाना अवधी लिहीलेली असते. वाहतूक पोलीस तर शोधुनही सापडत नाही.

 रस्त्यावर कुठेही भाऊ, दादा, ताई, श्रद्धास्थान यांचे कामगिरी, अभिनंदन, जन्मदिवस याचे बॅनर्स आढळत नाही तर कुठेही पानठेले, चहाटपऱ्या नसल्याने दुर्मिळ चित्र पहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी विविध दुकाने, रेस्टॉरंट, मॉल यांची गर्दी दिसते मात्र ग्राहकांची फारशी वर्दळ आढळत नाही. जागोजागी व्यवस्थित पार्किंग आणि जाणिवपूर्वक जपलेली हिरवळ मनाला समाधान देते.अर्ध्या तासात आम्ही कुटा शहराच्या हॉटेल ग्रँड झुरी या मुक्कामी पोहोचलो. इथली प्रमाणवेळ भारतापेक्षा दोन तास अगोदर आहे. फ्रेश होण्याकरिता सर्वांनी हॉटेलच्या स्विमिंग पुलमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटला.

संध्याकाळी आठला आम्ही डिनरकरता बाहेर पडलो. इथले चलन इडोनेशियन रूपया (आयडीआर) हे आपल्या रूपयाच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहे. भारतीय एक रुपयाला इथे जवळपास दोनशेच्या वर इंडोनेशियन रुपये मिळतात. यामुळे इथले व्यवहार हे लाखात होतात. एक हजार रुपयाच्या नाण्यापासून ते एक लाख रुपयांच्या नोटा इथे चलनात आहेत. डिनरकरिता आमचे गणेशा दी संस्कृती हे हॉटेल बुक होते. अगदी नावाप्रमाणेच इथे दर्शनी भागात गणेशाचे दर्शन होते. इथले कर्मचारी पारंपरिक वेषभुषेत सुहास्य वदनाने आपले स्वागत करतात. अत्यंत विनम्र, निटनिटके आणि कर्तव्य तत्पर असलेले कर्मचारी आपुलकीने सेवा देतात. मात्र झणझणीत, चमचमीत आणि तर्रीबाज सावजी खाणाऱ्यांचा इथे हिरमोड होतो. अत्यंत साधे, मिळमिळीत आणि गोडसर अन्न घशाखाली उतरत नाही मात्र आलिया अन्नाशी असावे सादर म्हणत आम्ही कसेबसे जेवन उरकले. 

पटाया, बँकॉक प्रमाणे इथे नाईटकल्चर फोफावले नसले तरी पब, डिस्कोथेक, नाईट क्लबची इथे भरमार आहे, मसाज पार्लर क्वचितच आढळतात अर्थातच कुठलेही पर्यटनस्थळ म्हटले की ही स्थिती कमीजास्त प्रमाणात सर्वत्र आढळते. कानठाळ्या बसवणारे संगीत, लाईट्सचा झगमगाट, विदेशी पर्यटकांची लगबग हे इथे अगत्याने पहायला मिळते. दिडदिवसाचा विमानप्रवास आणि थकलेले शरीर घेऊन आम्ही लवकरच हॉटेलमध्ये मुक्कामासाठी परतलो.
क्रमशः,,,,,
**************************************
दि. २२ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...