@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
*"कोरोना, अंतिम भाग"*
*अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली*
*"डॉ अनिल पावशेकर"*
**************************************
२९ ऑगस्ट पासून आगमन झालेल्या कोरोनाने तब्बल "बारा" दिवस धुमाकूळ घालत आमचे "तिनतेरा" वाजवले होते. सुरवातीला बरोबरीत वाटणारी लढाई कोरोना एकतर्फी जिंकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. कारण फॅबीफ्ल्यू आणि डॉक्झीसायक्लीनला भीक न घालता लागोपाठ सातव्या दिवशीही तापमानाची सेंच्युरी ठोकणाऱ्या कोरोनाने लढाई जवळपास अंतिम टप्प्यात आणली होती. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक तणावाने भेजा फ्राय झाला असला तरी मी अजून हरलो नाही कारण लढाई अजूनही संपली नाही म्हणत आयुष्याचा पीचवर सिंगल सिंगल दिवस ढकलत पुढे जात होतो. मात्र हा जीवघेणा खेळ कधी एकदाचा संपतो असे झाले होते.
अखेर आता आपल्याल रुग्णालयात भरती होऊन इंजेक्शन आणि संबंधित उपाराचाची नितांत गरज आहे हे कळून चुकले होते. मात्र कोरोनासाठी रुग्णालयात भरती होणे म्हणजे आना अपनी मर्जीसे जाना कोरोनाकी मर्जीसे असा अलिखित नियम असल्याने आपल्या पायावर चालत गेलेला व्यक्ती पुन्हा एकदा आपल्याच पायावर चालत येईल की पॉलीथीन बॅगमध्ये गु़ंडाळून घाटावर जाईल याची खात्री कोणीच देऊ शकत नसल्याने आतमधून आमची चांगलीच टरकली होती. मात्र आता फार जास्त वेळ दवडून फायदा नव्हता. डू ऑर डाय परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत नवीन काही औषधी सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला.
सुरवातीपासून डॉ शांतनू सेनगुप्ता, डॉ रितेश गिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू होते. अंतिम टप्प्यात डॉ निर्मल जयस्वाल यांनी फॅबीफ्ल्यू सोबतच टॅमीफ्ल्यू आणि ओम्नाकाॅर्टील या औषधांचा उपचारात समावेश केला आणि जादुची कांडी फिरावी तसा चमत्कार झाला. ९ सप्टेंबरला रात्री उपरोक्त दोन औषधे दिमतीला येताच अब तुम्हारे हवाले वतन साथीयो म्हणत निश्चिंतपणे निद्रादेवीच्या कुशीत शिरलो. कारण औषधीप्रयोगाचा हा अंतिम भाग होता आणि हिच औषधे आता रुग्णालयात भरती व्हायचे की नाही याचा न्यायनिवाडा करणार होती. खरेतर वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक रुग्णागणिक लक्षणे, उपचार पद्धती आणि औषधांना रुग्णांकडून मिळणारा प्रतिसाद नेहमीच अचंबित करणारा असतो. मात्र आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे असते.
दुवा काम नहीं करती, दवा काम करती है, लेकिन दुवाओंसेही दवा जादा काम करती है असे उगाचच नाही म्हणत. डॉ निर्मल जयस्वाल यांचा उपचारांचा परिसस्पर्श होताच कोरोनाच्या चिंधड्या उडाल्या. गेले बारा दिवस मानगुटीवर बसलेला आजार रात्रभरात होत्याचा नव्हता झाला. इतक्या दिवसांपासून माझ्या शरीराचे अविभाज्य अंग झालेले थर्मल गन, पल्स ऑक्सीमिटर क्षणार्धात गळून पडले. कधी नव्हे ते ९ सप्टेंबरला मनासारखी झोप लागली आणि १० सप्टेंबरची सकाळ माझ्या आयुष्यात नवीन पहाट घेऊन आली. इतक्या दिवस छळणाऱ्या तापाचे नामोनिशाण गायब होते. टॅमीफ्ल्यू आणि ओम्नाकाॅर्टील ही औषधे इतर औषधांसोबत मास्टरस्ट्रोक ठरली होती. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याची निर्दोष मुक्तता व्हावी अशी माझी स्थिती झाली होती.
मात्र ही तर केवळ सुरूवात होती. स्वराज्यावरील संकट अजून टळले नव्हते. चोरपावलांनी घुसलेल्या कोरोनाची हकालपट्टी झाली असली तरी जातांना हम भी डुबेंगे सनम, तुमकोभी ले डुबेंगे सारखे पोस्ट कोविड कॉम्प्लीकेनशन्स फार धोकादायक असतात. त्यामुळे अंगात दहा हत्तीचे बळ आले तरी एवढ्या लवकर उड्या मारणे योग्य नव्हते. इतक्या दिवस सुप्तावस्थेत असणारी आमची जाठराग्नी चांगलीच भडकली आणि मग दिवसभर चरणे सुरु झाले. इतकी भुक लागायला लागली की कधी काळी आपण भोजनसम्राट होतो याची आवर्जून आठवण झाली. मनाची अवस्था तर विचारायची सोय नव्हती. आज मै उपर, आसमां निचे , आज मै आगे जमाना है पिछे म्हणत बागडायची इच्छा होत होती. तरीपण प्रोटोकॉल प्रमाणे विलगीकरणाचे १७ दिवस काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याने मनाला मुरड घालत आपल्या एक रूम ला च एक महल हो सपनोंका करत पाहणे सुरू होते.
अखेर सतरा दिवसांचे कोरोना दुष्टचक्र एकदाचे संपले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना संक्रमण नक्की कशामुळे झाले, कुठे झाले असेल अशा प्रश्नांना काही अर्थ नव्हता. नक्कीच कुठेतरी आपण कोरोनापासून बचाव करण्यात कमी पडलो हे मात्र खरे होते. वास्तविकत: कोरोना खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव, समानता पाळणारा आहे. गरिब, श्रीमंत, जातपातधर्म, स्त्री,पुरुष, शहरी ग्रामीण, साक्षर ,निरक्षर किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता अगदी कोणालाही आपल्या विळख्यात ओढतो. केवळ प्रतिबंधात्मक बचाव करणे हा सर्वोत्तम पर्याय आपल्याकडे असतो. गर्दी, समारंभ, सोहळे याबाबतीत तर बुलाती है, मगर जानेका नहीं हे धोरण अवलंबले पाहीजे.
सोबतच कोरोनाग्रस्त रुग्णांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्याला कोरोना झाला म्हणजे त्याने काहीतरी भयंकर पाप केले असावे अशातला प्रकार निश्चितच नाही. शिवाय कोरोनाग्रस्त होणे म्हणजे खुप मोठा सामाजिक अपराध केला असेही नव्हे. पोलीस, डॉक्टर्स, स्थानिक प्रशासन, कर्मचारी अथवा सामाजिक आणि राजकीय व्यक्ती असो, सध्याचा काळ आपण सर्वांना या महामारी सोबतच काढायचा असल्याने आपण स्वत:सहीत इतरांना पण कसे सुरक्षित ठेऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करणे जरूरी आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना सापत्नभाव, बहिष्कार किंवा वाळीत न टाकता त्यांची काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. विशेषतः कोरोनाग्रस्त मानसिकदृष्ट्या खचलेले असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे खुप प्रभावी ठरते.
निश्र्चितच कोरोना आज ना उद्या हद्दपार होणार यात शंका नाही. मात्र तोपर्यंत सर्वांनी आपली नैतिक सामाजिक जबाबदारी पार पाडणे जरुरी आहे. केवळ सरकार, प्रशासन यांच्या नावाने बोटे मोडून चालणार नाही. सोशल डिस्टंसिंगचा वापर करणे, मास्क मजबूरी नव्हे तर जबाबदारी आहे हे समजून वापरणे, शक्यतोवर गर्दीची ठिकाणे टाळणे, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे सारख्या साध्या सोप्या परंतू परिणामकारक उपायांचे पालन करणे आपल्या हातात नक्कीच आहे. एवढी दक्षता घेऊनही कोरोनाचा सामना झाला तर लगेच तपासणी करणे, विलगिकरण करणे, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे याद्वारे आपण हमखासपणे कोरोनाला हरवू शकतो.
धन्यवाद 🙏
***************************************
दि. १९ सप्टेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
+++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment