*आग ऐसी लगाई, मजा आ गया*
*************************************
नुकतेच मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी रॅकेटचा भांडाफोड करत माध्यमांच्या दुनियेत एकच धुराळा उडवून दिला आहे. मात्र असे करताना पोलिस आयुक्तांनी या रॅकेटमध्ये रिपब्लिक टिव्हीचा उल्लेख करताच गदारोळ आणखी वाढला आहे. कारण एफआयआरमध्ये दोन मराठी वाहिन्यांसोबत इंडिया टुडेचे नाव तिनदा आले असले तरी रिपब्लिकचे नाव नसल्याने रिपब्लिकचे मालक आणि संपादक अर्णव गोस्वामी यांनी चक्क मानहानीचा दावा ठोकण्याचा संकल्प केला आहे. कुठेतरी घाई गर्दीत आणि कसेही करून अर्णवच्या मुसक्या आवळण्याच्या नादात पोलिसांचे हसे झाले असून आता कितीही पत्रपरिषदा घेतल्या तरी बुंदसे गई वो हौदसे नहीं आती याचा प्रत्यय येत आहे.
खरेतर अर्णव गोस्वामी हे एक अजब रसायन आहे. त्याचे हातवारे करत किंचाळणे असो अथवा प्रचंड आक्रस्ताळेपणा, अजिबात समर्थन करण्याजोगे नाही. शिवाय मुख्यमंत्री आणि इतरांचा एकेरी उल्लेख करून समोरच्याला थेट शिंगावर घेणेही पचण्यास जडच जाते. तरीपण अर्णव किती ओरडतो, किती उसळतो यापेक्षा तो नक्की काय बातमी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते आणि इथेच तो इतरांपेक्षा उजवा ठरतो. तसेही भारतीय माध्यमांवर असलेला डाव्यांचा पगडा सर्वश्रूत आहेच. याच प्रस्थापितांना छेद देत अर्णवने टीआरपीत जी मुसुंडी मारली आहे ती वाखाणण्याजोगी आहे.
वास्तविकत: अर्णवच्या पहिलेही माध्यमांचे अस्तित्व होते. मात्र गुळगुळीत, बुळबुळीत बातम्यांसोबत एका विशिष्ट घराण्याच्या चरणी निष्ठा वाहलेल्या माध्यमांच्या विश्वासार्हतेला जनता कंटाळली होती. त्यातच २०१४ पासून देशातील राजकारणाने ३६० च्या अंशात फिरकी घेतली असली तरी जुनी काही माध्यमे आपल्या निष्ठांशी घट्टपणे कवटाळून बसली होती. जनतेचा आवाज, पसंती, कौल याला गौण ठरवत आपला ठराविक अजेंडा जनतेवर लादण्यात मशगुल होती. कदाचित मिळणारे नजराणे, बिदागी, पुरस्कार, देशविदेश वाऱ्या आदी खैरातींमुळे त्यांचे सत्व विकले गेले असावे अशी शंका येते. यामुळे जनतेत कुठेतरी माध्यमांविषयी नाराजी होती.
अशी परिस्थिती असताना जनतेची नाडी अचूक जाणणाऱ्या अर्णवने माध्यमांच्या दुनियेत आपला झेंडा यशस्वीपणे रोवला आहे. ज्वलंत मुद्यांना बेधडकपणे सवाल जवाब करत जनतेसमोर मांडल्याने तो जनतेच्या गळ्यातला ताईत झाला आहे. मग ते जेएनयूचे प्रकरण असो की आतंक्यांचे पोस्टमॉर्टेम करणे असो, अर्णवच्या राष्ट्रप्रेमी झंझावाताने जनतेला मोहिनी घातली आहे. बहुतांशी माध्यमे आतंकी आणि देशद्रोह्यांबाबत बोटचेपी आणि लाळघोटी भुमिका घेत असतांना अर्णव त्यांना सर्वांसमक्ष नागडे करत त्यांचे सालटे सोलत आहे. अर्णवच्या रुपात जनतेला आपला आवाज दिसू लागला आणि इथेच मग अर्णव विरूद्ध कारस्थाने सुरू झाली.
मात्र अर्णव काही कच्च्या गुरूचा चेला नाही. आली अंगावर घेतली शिंगावर स्टाईलने पत्रकारीता करत त्याने विरोधकांना नामोहरम करून सोडले. विशेषतः पालघर साधू हत्याकांडाला रिपब्लिकने जेवढे उचलून धरले तितकेच बाकी माध्यामांनी याप्रकरणी मिठाची गुळणी घेणे पसंत केले होते. अखेर व्हायचे तेच झाले. पालघर प्रकरणी जनतेत खदखदणारा लाव्हा अर्णवच्या रुपाने बाहेर पडताच रिपब्लिकच्या टीआरपीने सगळ्या सिमा ओलांडल्या. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर अटकेचे जाळे पण टाकले होते परंतु अर्णव धरलं तर चावते सोडलं तर पळते असल्याने हा डाव यशस्वी ठरला नाही.
रिपब्लिकचा वारू चौखुर उधळला असतानाच सुशांत प्रकरण घडले आणि नेहमीप्रमाणेच अर्णव सुसाट निघाला. त्याने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. मात्र असे करताना काही मर्यादा त्याने निश्र्चितच ओलांडल्या होत्या. सोबतच पोलिस तपासाचा जो जांगडबुत्ता झाला त्याने रिपब्लिकचा जोश आणखी वाढला होता. एवढे सर्व झाल्यावर अर्णव विरोधकांच्या डोळ्यात खुपला नसता तर नवल वाटले असते. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्नच होता. अखेर बनावट टीआरपी रॅकेटचा घंटा सापडताच पोलिसांनी ती अर्णवच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र कर नाही त्याला डर कशाला सारखं अर्णवने चवताळून हा खेळ पोलिसांवरच उलटवला. टीआरपी रॅकेटचा बुमरॅंग होताच पोलिसांतर्फे खुलासे करण्यात आले मात्र तोपर्यंत अर्णवची प्रतिमा आणखी उजळून निघाली होती.
खरेतर सुशांत असो की सध्याचेबनावट टीआरपी रॅकेट प्रकरण असो यात घाईगडबडीने कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नव्हे. एफआयआरमध्ये रिपब्लिक चे नाव नसतांना उगाचच त्यांना गोवणे सध्यातरी पोलिसांच्या अंगलट आलेले दिसते. मात्र सुडबुद्धीने म्हणा की आणखी दुसऱ्या कोणत्याही कारणाने म्हणा अर्णवची कोंडी करण्यात सध्यातरी अपयश आलेले आहे. याप्रकरणाचा तपास जसा पुढे जाईल तसे आणखी रहस्य उघडत जाईल. मात्र सध्यातरी अर्णवच्या शेपटावर पाय देऊन त्याला चिथवणे महाग पडलेले दिसत आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. प्रशासकीय अधिकारी खरेतर जनता आणि सरकारमधला दुवा असतात. त्यांनी सत्याची कास धरत निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असते. त्यांनी अनावश्यकपणे अर्णवला यात गोवणे योग्य नाही. तरीपण याप्रकरणी अर्णवने विरोधकांना जी पटकनी दिली पाहता आग ऐसी लगाई मजा आ गया असे म्हणावेसे वाटते.
*************************************
दि. ०९ ऑक्टोबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
No comments:
Post a Comment