तामीया प्रवासवर्णन, भाग ०४
थंडी गुलाबी, हवा ही शराबी, छेडीत जाऊ,,,
***************************************
दिवसभराचा प्रवास, सोबतीला बेधुंद नाचगाणे, मस्ती आणि परिसरातील गारठ्याने रात्री निद्रादेवीच्या कधी अधिन झालो ते कळलेच नाही. घोडे बेचके सोना काय असते हे त्यारात्री प्रत्यक्ष अनुभवले. सकाळी थोड्या गजबजाटाने डोळे उघडले आणि बाहेर जाऊन पाहतो तर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सकाळचे सात वाजले होते आणि सभोवतालच्या वातावरणाचा धुक्याने ताबा घेतला होता. इतके दाट धुके होते की पाच फुटांच्या वर काही दिसतच नव्हते. खरेतर उत्तर भारतात नियमितपणे किंवा कधीकधी आपल्याकडे सुद्धा धुके पडते परंतु इतक्या दाट धुक्याचा अनुभव पहिल्यांदाच आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा हिलटॉप ब्रेकफास्टचा बेत होता परंतु दाट धुक्याने आमचे हे स्वप्न धुक्यातच विरले. अखेर रिसोर्टच्या प्रशस्त रेस्टॉरंटचा आम्ही ताबा घेतला. खमंग पोहे, चवदार सॅन्डविच, गावरानी दह्यासोबत लुसलुशीत आलुपराठे यावर तुटून पडत आम्ही आमची क्षुधा शांत केली आणि जाडजूड पोट आवरत बाजूलाच असलेल्या धाब्याच्या खाटांवर आडवे झालो. एखाद्या अस्सल पंजाबी धाब्यासारखे सजलेल्या याठिकाणी ट्रक, कार, ऑटो सारख्या वाहनांच्या प्रतिकृती सोबतच टायरचे डिझाईन असल्याने इथले वातावरण धाबामय होते. जवळपास अर्धा तासाने सुर्यदेव प्रसन्न झाले आणि धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने हिलटॉपला जायचा आमचा मार्ग मोकळा झाला.
रिसोर्ट पासून जवळच छोटा महादेव हे धार्मिक तर हिलटॉप हे नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ आहे. या स्थळांचा थेट संबंध रामायनकालीन आहे. असे म्हटल्या जाते की रावणपुत्र मेघनादने इथच्या पहाडावर श्रीशंकराची कठोर तपश्चर्या केली होती आणि शंकराने प्रसन्न होऊन त्याला लढण्यासाठी शस्त्रास्त्रे अर्पण केली होती. याच शस्त्रास्त्रांच्या सामर्थ्याने इंद्राला पराजीत केले होते, मुख्य म्हणजे तेंव्हापासून मेघनादला इंद्रजीत या नावाने ओळखले जाऊ लागले होते. आपली तपश्चर्या आटोपताच मेघनाद पातालकोटच्या मार्गाने लंकेला गेला तर भगवान श्रीशंकराने या पहाडाच्या पायथ्याशी म्हणजेच पातालकोट खोऱ्यात पुन्हा ध्यानस्थ झाले, त्या स्थानाला छोटा महादेव असे म्हटले जाते.
अर्थातच एवढी माहिती आमचे रक्त सळसळावयाला पुरेसी होती आणि हरहर महादेव ची गर्जना करत आमची पाऊले मेघनादने तपश्चर्या केलेल्या हिलटॉप या स्थानाकडे आपोआप वळली. हेल्थ इज वेल्थ अर्थातच आरोग्यं धनसंपदा असे का म्हणतात याचा प्रत्यय या ठिकाणी नक्कीच येतो. कारण सातपुडा पर्वतरांगांची उभी चढाई, सोबतच खडकाळ पायवाट, एका बाजुला काळजात धस्स होईल इतकी अथांग खोल दरी तर दुसरीकडे ठिसुळ दगडांवरून तोल सांभाळत जाणे. इथे इग्निअस व सेडीमेंटरी दगडांचे मिश्रण आढळते. जवळपास पाऊन तासांची दमछाक होणारी चढाई संपताच आम्ही नियोजीत स्थळी म्हणजेच हिलटॉपला पोहोचलो, अर्थातच इथेही धुक्याने आमची पाठ सोडली नव्हती.
इथे थोडाफार सपाट भाग आहे आणि इथुन आपल्याला पाताळकोट खोऱ्याचे विहंगम दर्शन घडते. गर्द हिरव्या मखमली शालूने नटलेले पाताळकोट खोरे, सोबतच सरळसोट उभ्या पर्वतरांगा, सपाट, उभ्या कडा आणि तिथे स्वच्छंदणे विहार करणारे पक्षी पाहताच मन स्तब्ध होऊन जाते. एव्हाना सुर्यदेवाने आपले अस्सल रुप दाखवताच धुके संपुर्णपणे नाहीसे झाले आणि सभोवताल नजर टाकताच चौरा पहाडाचेसुद्धा दर्शन घडले. आमच्यासोबत रिसोर्टचे व्यवस्थापक आणि निसर्गप्रेमी श्री पराग देशपांडे होते आणि त्यांनी इथली इत्यंभूत माहिती आम्हाला दिली.
शिंद्री न्युक्युब हा जापानी टाऊ संस्कृतीतला प्रकार असून निसर्गाशी सलोखा, संगोपण याद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे प्राप्त करता येईल याचा उल्लेख यात आढळतो. जंगल बाथ अर्थातच इथे इतकी शुद्ध हवा असते की इतकी चढाई करूनसुद्धा थोडावेळ विश्रांती केली की लगेच आपण ताजेतवाने होऊन जातो. या संकल्पनेत निसर्गाशी नाळ जोडणे यात पर्वत, वनराई, वृक्षवेली, पशुपक्षी, प्राणी एवढेच नव्हे तर निर्जिव दगडधोंडे सुद्धा समाविष्ट होतात.
निसर्गाला समजून घ्या, निसर्गाला जाणून घ्या, निसर्गाशी एकरुप व्हा या तत्त्वावर आपण चाललो तर शारीरिक असो वा मानसिक व्याधी नक्कीच आपल्या पासून चार हात दुर राहतील. मुख्य म्हणजे इथल्या दगड,वृक्षांवर लिचेनची वस्ती आढळते. वातावरणात सल्फर, नायट्रोजन, शिसे आणि मर्क्युरी सारख्या घातक विषारी उत्सर्जनामुळे फंगस आणि अल्गी चे मिश्रण असलेले लायकेन जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत परंतु जिथे वायुप्रदूषण नसते किंवा हवा ८५% पेक्षा जास्त शुद्ध असते तिथेच हे वृक्षांवर पांढऱ्या ठिपक्यांच्या रूपात आढळतात.
क्रमशः,,,,
***************************************
दि. २७ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment