किती खुबसुरत ये 'तसविर' है
मौसम' 'बेमिसाल' "बेनझीर" है
*************************************
दुपारी बारा वाजता सुरु झालेली आमची तामीया यात्रा अखेर मजल दर मजल करत गर्द हिरव्या वनराईच्या कवेत असलेल्या सिरेंडीपिटी या आलिशान रिसोर्टला संध्याकाळी येऊन पोहोचली. खरेतर पाच-सहा तासांच्या प्रवासानंतर कुणीही थोडावेळ विश्रांती घेणे पसंत केले असते परंतु इथले वातावरण इतके आल्हाददायक आणि निरव शांततेने नटलेले आहे की लगेच कधी एकदा फेरफटका मारतो कसे वाटत होते. मुख्य म्हणजे सर्वांच्या हातात स्मार्टफोन असल्याने चेकइन असो की भुक लागली असो, आधी फोटोबा मग विठोबा करत सर्वांनी मनसोक्त फोटोसेशन करून घेतले. लाकडी डिझाइनचे भव्य स्वागतकक्ष, प्रवेशद्वारावर उभे दोन सेनापतीने पुतळे पाहून आपण एखाद्या राजवाड्यात तर प्रवेश करत नाही ना असे सहजच वाटून जाते.
वास्तविकत: सिमेंटच्या जंगलातून जेव्हा आपण नैसर्गिक वनसंपदेत पाऊल टाकतो तेंव्हा स्वत:च्या वागण्यात,मानसिकतेत किती बदल होतो हे इथे पाऊल टाकताच लगेच कळून येते, मनावरचा ताणतणाव झटक्यात दुर पळतो. मुख्य म्हणजे इथल्या वास्तूची रचनाच या प्रकारची केलेली आहे की तुम्हाला पदोपदी निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळेल. स्वागत कक्षाला लाकडी कलाकुसरीचे कोंदण लाभलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर मध्यभागी श्रीगणेशाची कलाकृती मन वेधून घेते. उजव्या हाताला एक करड्या तांबड्या रंगात तगड्या अश्वाची हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे, ती पाहताच लगेच आपण बालपणात हरवून जातो आणि लकडीकी काठी काठीपे घोडा हे गित आपोआप ओठांवर येते.
टाईम इज मनी अर्थातच वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मनाला मुरड घालत आम्ही चेकइनची औपचारिकता पार पाडली आणि आपापल्या राहुटीकडे मार्गस्थ झालो. या भव्य रिसोर्टला ९ डिलक्स रूम, १३ कॉटेजेस तर ८ झोपडीवजा घरकुल आहेत. जवळपास १२ एकरवर डिसेंबर २०१९ ला आकारास आलेल्या या रिसोर्ट मध्ये २५० व्यक्ती सामावून शकेल असा कॉन्फरन्स हॉल,प्रशस्त रेस्टॉरंट, धाबा, सुसज्ज लॉंज आणि या सर्वांना वेढा घातलेला छोटेखानी तलाव परिसरात जीवंतपणा आणतो. या तलावात स्वच्छंदपणे बागडणारी बदके आणि त्यांचे मुक्तपणे क्वॅक क्वॅक ओरडणे जरी शांततेचा जरी भंग करत असले तरी ते कर्णप्रिय असते.
सर्वांनी आपापल्या खोल्यांचा ताबा घेतला आणि अल्पावधीतच पुढील कार्यक्रमासाठी तयार झालो. गरमागरम पकोडे, चहा, कॉफी यांचा आस्वाद घेत आम्ही कॉन्फरन्स हॉल गाठले. जवळपास एक तास चाललेल्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत चांगलेच ज्ञानरंजन झाले. सोबतच धार्मिक,ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थिती आणि पार्श्र्वभूमी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर वेळ होती ती मखमली थंडीत मनोरंजनाची. आधुनिकतेचा पुरेपूर ठसा असलेले लॉंज, विशाल स्क्रिन, दणादण डीजे संगीत आणि बेधुंद मित्रमंडळींची साथ,,, नाचू किती नाचू किती कंबर लचकली अशी अवस्था होईपर्यंत कोणीही थांबायला तयार नव्हते. अखेर काळवेळेचे बंधन पाळत आमची पाऊले रेस्टॉरंटकडे वळली.
भरपेट जेवण आटोपताच सर्वांनी निद्रेला शरण जाणे सोयीस्कर समजले. शरीर थकले असले तरी मनाला तामीयाची ओळख खुणावत होती. पचमढीच्या तुल्यबळ असलेली परंतु तुलनेत बाह्य जगाशी काहीशी अनोळखी असलेली मंतरलेली ही जागा व्यक्त होण्यास आतुर होती. पुर्वीच्या सी.पी. ॲंड बेरार या प्रशासकीय क्षेत्रात सामावलेले हे क्षेत्र ब्रिटीशांनी शोधून काढले. इंग्रज राजवटीत सी.पी. ॲंड बेरारची नागपुर ही हिवाळी राजधानी तर उन्हाळ्यात छिंदवाड्याला असायची. मात्र यापेक्षाही उन्हाळ्यात सोयीकरीता इंग्रजांना एक थंड हवेचे ठिकाण हवे होते. याकरिता त्यांनी नागपुरहून एक घोडदळ स्थानिकांसोबत रवाना केले. मात्र बहुतांशी पचमढीला पोहचले आणि अवघ्या दोघांनी तामीयाला गाठले. अखेर पचमढी नावारूपाला आली आणि दुर्दैवाने तामीयाला दुय्यम स्थान अथवा विस्मृतीचा सामना करावा लागला.
क्रमशः,,,,,
**************************************
दि. २६ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment