Friday, April 14, 2023

तामीया प्रवास वर्णन, अंतिम भाग


        तामीया प्रवासवर्णन, अंतिम भाग
   पातालकोट, तामीया "दि अनटोल्ड स्टोरी"
***************************************
पाताळकोट बाबत अशीही माहिती समोर येते की नागपुरच्या राजांनी आपला खजिना सुरक्षीत ठेवण्यासाठी इथल्या गुहेचा वापर केला होता. तसेच काही काळ सैन्यासोबत आश्रय पण घेतला होता‌. राजाच्या खजिन्याचा ज्यांनी भारवहन केला त्या आदिवासींना भारीया असे म्हणतात. भारीया सोबतच इथे गोंड आदिवासी सुद्धा राहतात. असे म्हटल्या जाते की राजाच्या खजिन्याचे रक्षण व्हावे म्हणून इथे कोणाला पाय ठेऊ दिले जात नाही किंवा त्यांच्यावर हल्ले केले जातात. मात्र यात कितपत तथ्य आहे ते सांगणे कठीण आहे.
राजांचा गुहांशी संबंध आल्याने याला राजाकोह गुहा पण म्हणतात. इथल्या गुफांमध्ये नक्षीकाम आढळते ते फार प्राचिन काळाचे मानले जाते. मात्र भुकंप, भुस्खलन आदी कारणांमुळे या गुफा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पाताळकोट व्ह्यु प्वाईंटपासून खाली ३००० फुट खोलीत या गुफांचे साम्राज्य असल्याचे कळते. जवळपास अडीच तासांत तिथे खडकाळ पायवाटेने पोहोचता येते‌. मात्र तिथे सध्या शंकराचे मंदिर, पर्वतातून झरणारे जलप्रपात याशिवाय आणखी काही असल्याचे ऐकले नाही. याबाबत एक रामायणकालीन  आख्यायिका मात्र प्रसिद्ध आहे. 

रावण सितामातेला पळवून नेत असताना त्याचे जटायू सोबत घनघोर युद्ध झाले. जटायुचे पंख जिथे छाटले गेले  ते कटुतीया गांव खाली उतरताना आपल्याला लागते. अशी चार पाच गावे ओलांडल्यावर आपण या पाताळकोटच्या तळाशी पोहचू शकतो. रामायणातील युद्धात कुंभकर्ण आणि मेघनादचा बळी जातात रावणाने युद्धात जिंकण्यासाठी अहिरावण आणि महिरावण यांची मदत घेतली. अहिरावणने आपल्या मायावी शक्तीने श्रीराम व लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना याच पाताळकोटात लपवून ठेवले होते आणि कामाक्षी देवीला बळी देण्याचा त्याचा मानस होता. परंतु अगस्ती ऋषींनी आपल्या दिवदृष्टीने त्याचा हा कट जाणून घेतला आणि महाबली हनुमानाला त्यांच्या सुटकेसाठी पाठवले. महाबली हनुमानाने पंचमुखी रूप धारण करत अहिरावणाचा वध केला आणि प्रभू रामचंद्र व लक्ष्मणाची सुटका केली अशी आख्यायिका आहे.

तामीयाचे जंगल ३,५०० चौरस एकरवर विस्तारले असून यांत पशु,पक्षी, वनस्पती, वेली, वृक्षांची विविधता आढळते. हरड, लायकेन, दगडफुल, आंब्याच्या विशेष प्रजाती, साल वृक्ष ज्यातून उन्हाळ्यात राळ प्राप्त होते ते इथे आढळून येते. मुख्य म्हणजे इथल्या जंगलात औषधी वनस्पतींचा खजिना असून चित्रक, अश्वगंधा, ज्योतिष्मती, भृंगराज, सर्पगंधा, नागबला इत्यादी सोबतच शिवलिंगी सारख्या औषधी विपुल प्रमाणात आढळतात. विशेषतः पिवळे फळ असलेल्या शिवलिंगीत औषधीय गुणधर्म जास्त असल्याचे मानले जाते, या वनस्पतीच्या बियांचा आकार शिवलिंगासारखा असतो आणि व्यंधत्वावर बहुगुणी असतात. पक्षांमध्ये प्रवासी पक्षांसोबतच मलबार व्हिसलींग बर्ड, वल्चर्स, हॉक ईगल, किंगफिशर इत्यादी आणि रसेल वायपर, रॅट स्नेक, कोब्रा, स्पॉटेड डिअर, जंगल कॅट सारखे प्राणी आढळतात.

इथले आदिवासी जंगलातून वनौषधी गोळा करून पाताळकोट व्ह्यु प्वाईंटला त्याची विक्री करतात. विशेषतः लकवा, चर्मरोग, दौर्बल्य, मानसिक रोग, हड्डी, वातरोग यावर हमखास इलाजाचे वर्णन केले जाते. मात्र खरी गर्दी असते ती "भैसाताड" या औषधीजवळ. भय, भुक आणि लैंगिकता ही सजीव असण्याची लक्षणे असल्याने या विषयाबाबत कुतुहल, जिव्हाळा, औत्सुक्य कायमच राहिलेले आहे. पुरूषत्ववर्धक मानली गेलेली ही औषधी हातोहात विकल्या जात होती. अंदाजे १० ग्रॅमची पुड ५०/- रुपयाला विकत घेतांना त्याची शुद्धता, प्रामाणिकता, असली नकली किंवा कितपत उपयोगी आहे या भानगडीत न पडता गिर्हाईक लगेच विकत घेत होते.
 
खरोखरच झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए म्हणतात ते याचकरिता. बन सिंगाडा (ताकद, फुर्ती ), गुडमार पत्ती (मधुमेह), केबन्द हातपान (हड्डी वातरोग) आदी  औषधींसोबत विविध कंद, शेंगा, बिया औषधी म्हणून विकल्या जात होत्या.

खरोखरच दोन दिवसीय सहलीकरीता तामीया,पाताळकोट हे उत्तम स्थान असून विद्यार्थी, पर्यावरण, निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत दडलेली ही पर्यटनस्थळे वन्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी आहे. इथल्या उंच डोंगरदऱ्या, रांगडे पहाड रांगा तुमच्यात दडलेल्या साहसी वृत्तीला आव्हान करण्यास सक्षम आहेत. त्यातच सिरेंडीपिटी सारखे अत्याधुनिक, सुसज्ज रिसोर्ट म्हणजे निसर्ग आणि नव्याकाळाचा सुंदर मिलाफ आहे. जिथे हिलटॉपचे सौंदर्य तुम्हाला खुणावत असते तर छोटा महादेवची दरी तुमची शारिरिक क्षमता जाणून घेते. इथली वनराई तुम्हाला मोहित करते तर स्वच्छंद बागडणारे पशुपक्षी तुमच्यातले बालपण जागृत करते. बालपणी आईच्या कुशीत जातांना जो विश्र्वास, जी माया, जे आपलेपण आपल्याला जाणवत अगदी तिच अनुभुती या धरतीमातेच्या, निसर्गाच्या सानिध्यात येताच तुम्हाला जाणवू शकते. पाताळकोटची रहस्यमयी दुनिया तुमचे पाऊले आपोआप इथल्या सखोल दऱ्याखोऱ्यांकडे वळवते. अर्थातच या सर्वांकरिता गरज असते ती आपल्याला नेहमीच्या रहाटगाड्यातून बाहेर पडायची आणि निसर्गाच्या कवेत जाऊन पुन्हा एकदा ताजेतवाने व्हायची.
***************************************
दिनांक २९ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...