व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०३
स्वातंत्र्ययज्ञाचे धगधगते अग्निकुंड, चु ची टनेल
***************************************
पहिल्या दिवशी आरामात फेरफटका मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे मुख्य आकर्षण होते चु ची टनेल. अर्थातच रणभुमी मग ती कोणतीही असो,, पावनखिंड, पानिपत असो अथवा कुरूक्षेत्र,, तुमच्या धमन्यात वीररस उफाळुन येण्यास पुरेशी असते. त्यातच साक्षात रणभुमीला भेट देणे म्हणजे इतिहास प्रेमींसाठी एक आगळीवेगळी पर्वणीच असते. युद्ध हे व्हिएतनामच्या पाचवीलाच पुजले असल्याने या उत्तर दक्षिण पसरलेल्या देशाने १९४५ ते १९५५, १९५५ ते १९७३ आणि १९७३ ते १९७५ अशी तिन युद्धे झेलली आहे. मात्र १९६४/६५ पासुन अमेरिका विरूद्ध लढलेले युद्ध चांगलेच गाजलेले आहे.
खरेतर १८६० पासून दक्षिण व्हिएतनामवर फ्रेंच वसाहतवाद्यांनी आपला कब्जा जमवला होता. १९४५ ते १९५४ पर्यंत याच फ्रेंच वसाहतवादी सैन्याविरूद्ध व्हिएतनामने चिवट लढा दिला. अखेर दुसरे महायुद्ध आटोपताच फ्रेंच सैन्याने इथुन काढता पाय घेतला. तर अमेरिकेने जापानच्या नागासाकी आणि हिरोशीमावर अणुबॉम्ब टाकत जापानचा पाडाव करताच जपाननेही व्हियतनाम मधून बाहेर पडणे सोयीस्कर समजले. यामुळे व्हिएतनामच्या भुमीवर मैदान मोकळे दिसताच अमेरिकेने तिथे कळसुत्री सरकारला हाताशी धरून आयत्या बिळात नागोबा होण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वातंत्र्याची ओढ, जाज्वल्य देशभक्ती, पराकोटीचा देशाभिमान आणि लढण्याच्या झुंजार वृत्तीपुढे बलाढ्य अमेरिकेला व्हिएतनाम पुढे घुटने टेकावेच लागले.
सेगॉन (आजचे हो ची मिन्ह) हे या लढ्याचे प्रमुख केंद्र होते आणि अमेरिकन सैन्याने शहरी भागात व्हियत कॉंगच्या मुसक्या आवळताच व्हियत कॉंगने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे म्हणजेच सेगॉनपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात चु ची टनेल(सुरंग) कडे वळवला. खरेतर ही सुरंगे १९४० पासुन व्हिएतमिन सैन्याने खोदल्याचा इतिहास आहे तर १९६० पासून व्हिएतकॉंग सैन्याने त्यात काळवेळेनुसार आवश्यक बदल केलेले आढळतात.
तिन स्तरांत आणि जवळपास २५० कि.मी. लांबीचे हे सुरंग केवळ छोटे फावडे आणि टोपल्याच्या साहय्याने खोदले गेले आहे. पहिला स्तर ५ फुटांवर, दुसरा १० फुटांवर तर तिसरा टप्पा यापेक्षा जास्त खोलीवर आढळतो. या सुरंगांचे प्रवेशद्वार अत्यंत चिंचोळे असुन पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून जमिनीपेक्षा थोडे वर काढले आहेत. सुरंगांचे तोंड लाकडी घट्ट पाटीने झाकले असल्याने पाणी किंवा इतर जिवजंतूना अटकाव केला जातो. सुरंगामध्ये ऑक्सीजनसाठी मोठे आणि लांब बांबु़चे व्हेंट लागलेले आहेत.
जमिनीवर हे व्हेंट कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून वारूळ किंवा छोट्या झुडपात लपवलेले असतात. सुरंगाच्या मार्गात खंदक किंवा शत्रुला चकवण्यासाठी डेड एंड, विषारी सर्प, विंचू याप्रकारे सुरक्षा व्यवस्था केलेली आढळते. ही सुरंगे शत्रुपासून लपून राहणे, घात लावणे, आपसात संपर्क करणे, सामान शस्त्रांची ने आण करणे आणि सैनिकांच्या राहण्यासाठी उपयोगी पडत असत.
आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अमेरिकन आणि त्यांचे सहकारी ऑस्ट्रेलिया, न्युझीलंडच्या सैन्याने जंग जंग पछाडले परंतु व्हिएयतकॉंग सैन्याने गनिमी कावा वापरत परदेशी सैन्याला चांगलेच जेरीस आणले. एकतर छोट्या चिंचोळ्या सुरंगांचा थांगपत्ता लागत नव्हता आणि चुकुनही शोध लागला तर धिप्पाड शरीरयष्टीचे अमेरिकन सैन्य त्यात शस्त्रास्त्रांसह प्रवेश करू शकत नव्हते. शिवाय अशा प्रकारचे गुरिल्ला युद्ध अमेरिकन सैन्यासाठी नवीन असल्याने त्यांची चांगलीच फजिती झाली. सोबतच सुरंग मधातच ढासळून जाणे, विषारी सरपटणारे प्राणी, विषारी वायू, ऑक्सीजनची कमी यामुळे अमेरिकन सैन्याची चांगलीच दमछाक होऊ लागली. वरून कितीही बॉम्बहल्ले केले तरी व्हियतकॉंग सैन्य दाद देत नसल्याने अमेरिकन सैन्य गोंधळले होते.
व्हियतकॉंग लढवय्ये दिवसा सुरंगात लपून रहायचे आणि रात्र होताच अमेरिकन सैन्य आणि त्यांच्या ठाण्यांवर हल्ले चढवायचे. या गनिमी काव्याने अमेरिकन सैन्य पुरते हवालदिल झाले आणि अखेर प्रत्यक्ष युद्धापेक्षा सुरंगांचा शोध घेणे, ते उध्वस्त करणे याकरिता त्यांनी ऑपरेशन क्रिंप आणि ऑपरेशन सेडर फॉल्स या मोहिमा राबवल्या.
क्रमशः,,,,,
***************************************
दि. ०२ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment