Thursday, April 13, 2023

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०२


          व्हिएतनाम प्रवासवर्णन, भाग ०२
               हो ची मिन्ह सिटी (सेगॉन)
***************************************
खरेतर आमचा पुर्वनियोजीत प्रवास दि. २३ नोव्हेंबर पासून सुरू होणार होता मात्र विमान कंपन्यांच्या चतुराईने म्हणा किंवा ऐनवेळी वेळापत्रक बदलल्याने आम्ही २२ नोव्हेंबरला भल्या पहाटेच सेगॉन या व्हिएतनामच्या जुन्या राजधानीत पोहोचलो. दोन तासांची कशीबशी झोप घेऊन ताजेतवाने होण्यासाठी आम्ही स्विमींग पुलचा आधार घेतला आणि जवळपास अर्धा तास मनसोक्तपणे डुंबलो. ब्रेकफास्टची सोय हॉटेलमध्येच असल्याने आनंद झाला परंतु आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ब्रेकफास्टला नॉनव्हेज, सीफुड, बीफ आणि पोर्कची रेलचेल असल्याने व्हेज पदार्थ शोधतांना तारांबळ उडाली. अखेर चायनीज राईस आणि ऑमलेटवर समाधान मानत कसेबसे बाहेर पडलो.

पहिला दिवस विश्रांतीचा असल्याने शहरात सहज फेरफटका मारला असताना फ्रेंच राजवटीच्या खाणाखुणा  नजरेस पडतात. नॉट्रे डॅम कॅथेड्रल, १९ व्या शतकातले पोस्ट ऑफिस, ऑपेरा हाऊस, बेन थॅन बाजार ही काही यातली प्रमुख स्थळे आहेत. व्हिएतनाम युद्धातले हे प्रमुख शहर असले तरी वाहतुकीची आदर्श व्यवस्था इथे बघायला मिळते. बहुतेक ठिकाणी एकमार्गी वाहतुक तर कुठे दुचाकींसाठी वेगळी लेन किंवा वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याने वाहतूक पोलीस शोधुनही सापडत नाही. शिवाय जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्याने वाहतुक रश अवरमध्येसुद्धा शिस्तबद्ध असते. मार्गावर प्रेशर हॉर्न, कर्णकर्कश हॉर्न किंबहुना साधा हॉर्नसुद्धा ऐकायला नसल्याने इथच्या वाहनांना खरोखरच हॉर्न असतो की नाही हा प्रश्नच पडतो. त्यातच मार्गाच्या कडेला जपलेली वृक्षवल्ली, हिरवळ आणि सजवलेले चौक मन मोहून घेते‌. मुख्य म्हणजे इथे लेफ्ट हॅंड ड्राईव्ह असल्याने ड्रायव्हरच्या बाजूला बसताच गोंधळल्या सारखे होते.

धार्मिक बाबतीत बोलायचे झाले तर व्हियतनाम मध्ये ८५% लोकसंख्या बौद्धधर्मीय आहे. सोबतच इथे ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम धर्मीय सुद्धा सामावलेले आहेत. मात्र इथे कॉम्युनिस्ट साम्यवादी सरकार असल्याने कोणत्याही धर्माचे फाजील लाड इथे केल्या जात नाही. शिवाय सरकार नो रिलीजन पॉलिसी नुसार कार्यरत असल्याने धार्मिक तेढ असण्याचा प्रश्नच नाही तसेच सरकारी नोकरीकरीता नो रिलीजनला प्राधान्य दिले जाते जे नक्कीच कौतुकास्पद आहे. उत्तर व्हिएतनाम मध्ये चायनीज बौद्धधर्माचा प्रभाव आहे तर दक्षिण व्हिएतनामवर भारतीय बौद्धधर्माचा प्रभाव आहे. उत्तर व्हिएतनामवर बराच काळ सोव्हिएत युनियन आणि पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा प्रभाव असल्याने हा भाग काहीसा पारंपरिक, जुनाट विचारसरणीचा तर दक्षिण व्हिएतनाम फ्रांस,अमेरिकेच्या दबदब्याखाली राहिल्याने तुलनेत खुल्या, फॅशन आणि आधुनिकतेच्या विचारांचा दिसतो.

अर्थातच इथे धर्माला गौण स्थान असल्याने केवळ पौर्णिमेला किंवा चायनीज नवीन वर्षाच्या वेळी बौद्धधर्मीय पगोडामध्ये पुजाअर्चने करीता जातात. मुख्य म्हणजे फ्रेंचांनी जेव्हा इथे आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथल्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची अतोनात हानी केली. आताही सेगॉन शहरात फिरतांना धार्मिक स्थळे फारसे आढळत नाही. एवढेच नव्हे तर हॉटेल, शॉपिंग मॉल, विविध प्रकारच्या सार्वजनिक स्थानी किंवा दुकानात धार्मिक चिन्हे, प्रतिके अजिबात आढळत नाही.
इथल्या इमारतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या आहेत. लांबी,रूंदीपेक्षा बहुतेक इमारती टोलेजंग आहेत. संध्याकाळ होताच इथले चौक, फुटपाथ छोटेखानी हॉटेल्सने फुलून जातात. मात्र रात्री बारापर्यंत सर्वत्र सामसुम होऊन जाते. इथे के सर्कल सारखी २४ तास उघडी असणारी दुकाने जागोजागी आढळतात. इथल्या बाजारात खरेदी करायची म्हटली तर ते एक दिव्यच असते. इथले चलन डॉंग भारतीय रुपयाच्या तुलनेत कमी किमतीचे असल्याने (एक भारतीय रुपया म्हणजे ३३३ डॉंग) खरेदी करताना हातात कॅल्क्युलेटर असणे आवश्यक आहे. सोबतच खरेदी करताना मोलभाव करणे आवश्यक आहे, बरेचदा मुळ किंमतीच्या पाचपट किंमत सांगून परदेशी ग्राहकांची लुबाडणूक केली जाते.
क्रमशः,,,,,
***************************************
दि. ३० नोव्हेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...