व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०४
अमेरिकेच्या शक्तीपुढे व्हिएतकॉंगची युक्ती श्रेष्ठ
***************************************
१९५५ पासून व्हिएतनाम मध्ये मदतीच्या नावाखाली चंचुप्रवेश केलेल्या अमेरिकेला तिची सत्तापिपासू वृत्ती नडली आणि सोबतच सोव्हिएत युनियन व चिनसोबतच इंडोचायना मध्ये कॉम्युनिस्ट सरकार सत्तेत येणे खटकले होते. व्हियतनाम आपण सहज कब्ज्यात घेऊ तसेच कॉम्युनिस्ट राष्ट्रांवर अंकुशही ठेऊ या उद्देशाने अमेरिकेने व्हिएतनामला युद्धमैदान बनवले मात्र दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की एकदिवस आपणही त्याच खड्ड्यात पुरले जातो याचा त्यांना विसर पडला आणि पहिल्यांदाच बलाढ्य अमेरिकेला युद्धात नामुष्कीचा सामना करावा लागला.
अनोळखी जंगल, वाटेत नदीनाल्यांचे जाळे, चु ची टनलचे चक्रव्युह, व्हियतकॉंग सैनिकांची चिवट झुंज सोबतच स्थानिक जनतेचा अमेरिकन सैन्याविरोधात असणारा रोष या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे अमेरिकन सैन्य प्रचंड फौजफाटा युद्धात उतरवून सुद्धा यशस्वी होत नव्हते. अखेर व्हिएतकॉंगला चु ची टनेलमधुन बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने ऑपरेशन क्रिंप हाती घेतले. ही मोहीम ८ जानेवारी १९६६ ते १४ जानेवारी १९६६ दरम्यान राबवली गेली. मुख्य म्हणजे यात शत्रुंचा कर्दनकाळ असलेले कुख्यात बी ५२ हे बॉंम्बवर्षक विमान वापरले गेले. स्ट्रॅटोफोरस्ट्रेस असे मुळ नाव असलेले दुर पल्ल्याचे, सबसोनिक, जेट पॉवर्ड, स्ट्रॅटेजिक बॉंम्बर विमान १९५० ला बोईंग कंपनीने डिझाईन आणि निर्माण केले. १९५६ ला बी ५२ विमानाची किंमत १४.४३ मिलीयन अमेरिकन डॉलर्स एवढी होती. तब्बल ३२,००० किलो शस्त्रास्त्रे वहन करण्याची, तसेच १४०८० कि.मी.मारक क्षमता असलेल्या या विमानाने ३० टनाचे बॉंम्ब टाकून चु ची टनलचे हिरवेगार जंगल क्षणार्धात बेचिराख करून टाकले. या चकमकीत अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या ८००० सैन्याने व्हियतकॉंगच्या जवळपास ५००० लढवय्यांचा सामना केला. अमेरिकन सैन्याने सुरंग निकामी करण्यासाठी त्यात विषारी वायू, गरम पाणी, डांबर इत्यादी सोडले, हॅंडग्रेनेड्स फेकले तरीही पण शेवटपर्यंत सुरंगाचे कोडे अमेरिकन सैन्याला सोडवता आले नाही.
अखेर ऑस्ट्रेलियन स्पेशल इंजिनिअरींग ट्रुपच्या सॅंडी मॅक ग्रेगरने ४ दिवस अथक परिश्रम करून चु ची टनलचे मायाजाल तोडले. तपासणी दरम्यान त्याला सुरंगात शस्त्रास्त्रे, रेडीओ महत्त्वाची कागदपत्रे, नकाशे हाती लागले. अर्थातच मॅक ग्रेगरला चु ची सुरंगाच्या शोधाकरीता मिलिटरी क्राॅस ने सम्मानित करण्यात आले. झालेल्या चुकांतून शिकत अमेरिकन सैन्याने सुरंगात लढण्यासाठी वेगळे सैनिकदल प्रशिक्षित केले,ज्यांना टनेल रॅट म्हटले जायचे. यात सैनिकांना हॅंडगन, चाकू, फ्लॅशलाईट आणि दोरीच्या साहाय्याने सुरंगात लढण्याची तयारी करून घेतली आणि जय्यत तयारीनिशी मग १९६७ ला राबवण्यात आली ऑपरेशन सेडर फॉल्स मोहीम.
या मोहिमेत तब्बल ३०,००० सैनिक मैदानात उतरवण्यात आले. सोबतीला बी ५२ बॉंम्बर विमानांना मोकळी सुट देणृयात आल्याने उत्तर व्हियतनामसुद्धा कार्पेट बॉंम्बींगने भाजून काढण्यात आले. मात्र युद्ध दिर्घकाळ चालू राहिल्याने अमेरिकेच्या पदरी निराशाच पडली. सोबतच अतोनात सैन्यहानी होत असल्याने खुद्द अमेरिकेतच या युद्धाचा सार्वत्रिक स्तरावर विरोध होऊ लागला.
या युद्धात चु ची टनेलचे प्रचंड नुकसान होऊन आता उरलेली १२१ कि.मी. ची सुरंग सुरक्षित आणि संरक्षीत केलेली आहे. सुरंगाच्या सुरवातीला छोटेखानी संग्रहालय आहे जिथे विविध शस्त्रास्त्रे, बंदुका, रायफल्स, आर्टीलरी, तोफगोळे, २५० आणि १५० टनाचे बॉंम्ब शेल्स, हॅंडगन प्रदर्शनार्थ ठेवलेले आहे. जंगलात आत गेल्यावर तुम्ही प्रत्यक्ष सुरंगात उतरू शकता. काही सुरंगात पर्यटकांसाठी सुरंगाचे रूंदीकरण आणि विजेची सोय केलेली आहे. सोबतच तुम्ही इथे बॉंम्बने जमिनीवर पडलेले भलेमोठे विवरसुद्धा पाहू शकता.
शत्रुला कोंडीत पकडण्यासाठी केलेल्या विविध क्लुप्त्या आणि शस्त्रास्त्रांची इथे माहिती दिली जाते. शुटींग प्रेमींसाठी इथे एक शुटींग रेंज असून असॉल्ट रायफल्स, एम १६, एके ४७, मशिशगन एम ६० चा थरथराट तुम्ही स्वत: नक्कीच अनुभवू शकता. व्हियतकॉंग सैन्याने कठीण परिस्थितीत काढलेल्या दिवसाचे स्मरण म्हणून ते सेवन करत असलेले रताळ्यासारखे कंद आणि बांबुच्या नळाच्या पाण्याची चव तुम्ही घेऊ शकता.
क्रमशः,,,,,
***************************************
दिनांक ०२ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment