Thursday, April 13, 2023

व्हिएतनाम प्रवास वर्णन, अंतिम भाग


   प्रेसिडेंट पॅलेस, पगोडा,टेंपल ऑफ लिटरेचर
***************************************
दिनांक २८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहाला हनोई ते कोलकाताचे परतीचे विमान होते त्यामुळे आम्हासर्वांना परतीचे वेध लागले होते. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिन तास पहिले पोहचायचा नियम असल्याने सकाळी हो ची मिन्ह मॉसेलिअम पाहिल्यानंतर इतर प्रेक्षणीय स्थळांना थोडे लगबगीने भेट द्यावी लागली. सुदैवाने प्रेसीडेंट पॅलेस, वन पिल्लर पगोडा आणि लिटरेचर टेंपल जवळच असल्याने आणखी धावपळ झाली नाही.

१) प्रेसिडेंट पॅलेस,,,,
हो ची मिन्ह मॉसेलिअम च्या जवळच तुमचे लक्ष वेधून घेणारी एक देखणी पिवळी धमक इमारत उभी आहे, ती प्रेसिडेंट पॅलेस म्हणून ओळखली जाते. फ्रेंच असो वा इंग्रज,,आपले साम्राज्य पसरवतांना त्यांनी कारभार सुरळीत होण्यासाठी काही प्रशासकीय इमारती बांधल्या ज्या आजही दिमाखात उभ्या आहेत. गव्हर्नर जनरल ऑफ इंडोचायनासाठी ही इमारत १९९० ते  १९०६ दरम्यान उभारली गेली. आजुबाजुला आंब्यांच्या झाडांनी वेढलेली ही वास्तू  इटालियन वास्तुकलेचा उत्तम नमुना असून आपल्या विशिष्ट रंगामुळे यलो पॅलेस म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. सामान्य जनते करिता या इमारतीत प्रवेश नसून फक्त सरकारी अधिकारी किंवा परदेशी शिष्टमंडळ यांच्या बैठकीसाठी या ठिकाणाचा उपयोग होतो. अमेरिकचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची फेब्रुवारीला झालेली दुसरी शिखर परिषद इथेच प्रस्तावीत होती परंतु काही कारणास्तव ती सोफीटेल लिजेंड मेट्रोपोल या हनोईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये घेण्यात आली.

२) वन पिल्लर पगोडा,,,,,
इ.स. १०२८ ते १०५४ पर्यंत राज्य करणाऱ्या ली थाई टॉंग या बादशहाने १०४९ मध्ये वन पिल्लर पगोडाची रचना केली. याच्या निर्मीतीची एक वेगळीच कहाणी आहे. या राजाच्या स्वप्नात येऊन बोधीसत्व अवलोकितेश्वराने कमलपुष्पात बसून राजाला एक पुत्र दिला. याच्याच स्मरणार्थ राजाने या पगोडाची रचना केली. इथे बादशहाच्या काळात बौद्ध धर्माशी संबंधित वसक सारखे समारंभ पार पाडले जायचे. लाकडी बांधकाम असलेला हा पगोडा एका दगडी खांबावर उभा आहे. सव्वा मिटर व्यासाच्या आणि चार मिटर उंचीच्या खांबावर उभ्या या पगोडाची रचना उमलत्या कमलपुष्पासारखी आहे. अर्थातच एवढे सुंदर धार्मिक स्थळ आक्रमकांच्या नजरेत नसते आले तर नवलच असते. १९५४ ला फ्रेंच युनियन सैन्याने पहिल्या इंडोचायना युद्धात हे स्थळ उध्वस्त केले होते. मात्र याला पुन्हा एकदा मुळ स्वरूपात उभे करण्यात आले आहे.

३) लिटरेचर टेंपल,,,
खरेतर हे धार्मिक ऐवजी एक पुरातन शैक्षणिक स्थळ आहे. कन्फ्युसिएनिझम अर्थातच याला स्कुल ऑफ थॉट म्हटले गेले आहे. १०७० ला ली थॉंग टॉंग नामक बादशहाने याची स्थापना केली होती. ५०,००० चौ.मिटरवर उभी असलेल्या या वास्तुच्या सुरवातीलाच एक मोठी घंटा ठेवली आहे, जी एखादी महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या आगमणप्रसंगी वाजविली जायची. चार प्रांगणानंतर आपण पाचव्या आणि मुख्य दोन मजली इमारतीजवळ येतो. इथे उजव्या बाजूला २.१ मिटर उंच आणि ०.९९ मिटर रुंद विशाल घंटा आहे तर डाव्या बाजूला २.१ मिटर रूंद, २.६५उंच ड्रम आहे. तळमजल्यावर प्राचिन गुरूचे मंदिर असून पहिल्या मजल्यावर  तिन राजांचे मंदिर आहे. पहिल्या राजा  ली थॉनने १०७० ला या शिक्षणमंदीराची स्थापना केली तर ली नाह याने ११२७ पर्यंत याचे शाही विद्यालयात रुपांतर केले. ली टॉंगने १४४२ ते १४९७ दरम्यान इथली शिक्षणपद्धती, विविध विद्वान, परिक्षापद्धती याबाबत ११६ शिलालेख तयार केले. १९४५ ते १९५४ पर्यंतच्या इंडोचायना युद्धात फ्रेंचांनी या इमारतीची प्रचंड नासधूस करून तिथे रुग्णालय उभारले होते.एव्हाना दुपारचे बारा वाजले होते आणि आता वेळ होती हनोईचा निरोप घ्यायची. 

सात दिवस स्वप्नवत घालवल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. मात्र या सात दिवसांत युद्धाची थरारकता, फ्रेंच, अमेरिकन आक्रमकांची क्रुरता, व्हियतनामी जनतेची मातृभुमीप्रती असलेली श्रद्धा, समर्पन आणि अनन्वित छळ सोसूनही हार न मानण्याची झुंजार वृत्ती, हो ची मिन्ह यांचे असामान्य नेतृत्व मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेले. सोबतच परकिय भुमीवर कब्जा करण्यासाठी युद्धात रासायनिक आणि विध्वंसक हत्यारे वापरणाऱ्या अमेरिकेविषयी चिड निर्माण होते. दक्षिण व्हिएतनामच्या कामचलाऊ आणि अमेरिका धार्जिण्या नेतृत्वापुढे उत्तर व्हिएतनामी कॉंगने स्वातंत्र्यलढ्याला धार देत न केवळ दक्षिण व्हिएतनामला अमेरिकन जोखडातून मुक्त केले परंतु उत्तर दक्षिण व्हिएतनामला एकत्र करून एका भक्कम राष्ट्राची निर्मिती केली. 

महाराष्ट्राच्या तुलनेत अर्धा असलेल्या व्हिएतनामने भारताच्या तिप्पट असलेल्या आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्य अमेरिकेला धुळ चारत आक्रमकांना एक चांगला धडा शिकवला आहे. १९४५ ते १९७५ असे  ३० वर्षे युद्धात भरडल्यानंतरही व्हिएतनामने घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. इतिहास दर्दी आणि  निसर्गप्रेमींना भटकंतीसाठी  व्हिएतनाम एक आदर्श ठिकाण आहे. 
"प्रवासवर्णन समाप्त."
***************************************
दि. ०६ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...