व्हियतनाम प्रवासवर्णन भाग ०९
व्हियतनामचे राष्ट्रनायक "हो ची मिन्ह"
***************************************
२२ नोव्हेंबरला सुरू झालेला आमचा व्हियतनाम प्रवास अखेरच्या टप्प्यात आला होता आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबरला सकाळी आम्ही पोहचलो हो ची मिन्ह मॉसेलिअम अर्थातच हो ची मिन्ह यांचे पार्थिव संरक्षीत, सुरक्षीत आणि जतन करून ठेवलेल्या जागी. खरेतर मृत्युनंतर आपला दाह संस्कार करून ती राख उत्तर,मध्य आणि दक्षिण व्हियतनामच्या भुमीत अर्पण करावी अशी या जननायकाची इच्छा होती परंतु हो ची मिन्ह यांचे कर्तृत्व, देशभक्ती आणि जनमानसावर असलेली छाप पाहता त्यांच्या पार्थिवावर प्रक्रिया करून ते जतन करून हनोईच्या मॉसेलिअम मध्ये ठेवण्यात आले आहे.
हा संपूर्ण परिसर सैन्याच्या ताब्यात असून कडक सुरक्षा तपासणी केल्यानंतर आत प्रवेश मिळतो. जवळपास २०० मिटर पैदल चालल्यानंतर आपण मुख्य इमारतीजवळ पोहचतो. ही इमारत १९७२ ते १९७५ च्या दरम्यान बांधल्या गेली असून वर्षातून ३ महिने म्हणजेच जुलै ते सप्टेंबर पर्यंत बंद असते. २१.६ मिटर उंच आणि ४१.२ मिटर रूंदीच्या या इमारतीच्या दर्शनी भागात हो ची मिन्ह असे ठळक अक्षरात लिहिलेले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूला सात पायऱ्यांचे दोन मोठे प्लॅटफॉर्म असून सैन्याची परेड बघण्यासाठी याचा उपयोग होतो. मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे पुष्पचक्र ठेवलेले असतात. या इमारतीच्या सभोवताल सुंदर बगीचा असून तिथे व्हियतनामच्या विविध भागातील २५० प्रकारच्या वनस्पती आणि फुलझाडांची लागवड केलेली आहे.
संपुर्ण परिसरात पांढऱ्या शुभ्र गणवेशातील सैनिकांचा राबता असून मुख्य इमारतीच्या आत जायच्या पहिले पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी केली जाते. विशेषतः गळ्यातील दुपट्टे, गॉगल्स, डोक्यावरील हॅट, म्युझिक सिस्टिम, इअरफोन काढून सरळ हाताने आत प्रवेश दिला जातो. मॉस्को, रशियातील लेनिनच्या मॉसेलिअमच्या धर्तीवर ही इमारत बांधली गेली असून बाह्यभाग ग्रे ग्रॅनाईटने तर अंतर्भाग ग्रे,ब्लॅक, रेड पॉलीशच्या दगडांपासून निर्मित केला आहे. इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये सशस्त्र सैनिकांच्या खड्या पहाऱ्यात, काचेच्या पेटीत हो ची मिन्ह चिरनिद्रा घेत आहेत. अतिशय शांत, थंड वातावरणात आणि अंधुक प्रकाशात समाधीस्त,,, व्हियतनामचा हा भाग्यविधाता संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे. जिथे त्यांचे पार्थिव संरक्षीत आहे, त्या मागच्या भिंतीवर उजव्या बाजूला कॉम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह विळा हातोडा तर डाव्या बाजूला व्हियतनामच्या राष्ट्रध्वजावर असलेला तारा अंकीत केलेला आहे.
खरेतर हो ची मिन्ह यांचा एकुण सक्रिय कार्यकाळ १९४१ ते १९६५ पर्यंत राहिलेला आहे. या दरम्यान त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वी झोकून दिले. ते जनमानसावर पकड असलेले बुद्धीमान नेते होते. साधी राहणी, देशासाठी वाट्टेल तो त्याग करायची भावना, सोबतच *माझे जीवन फक्त आणि फक्त मातृभुमीसाठी व जनतेच्या भल्यासाठी आहे* याच तत्वावर त्यांनी व्हियतनामकरीता आपले आयुष्य वेचले. ते एक उत्तम लेखक, कवी आणि पत्रकार होते. फ्रेंच, इंग्लिश, रशियन, कॅंटोनीज, मॅंडारीन आणि व्हियतनामी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. १९६५ पर्यंत त्यांनी सरकारमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती अशी विविध पदे भुषवली. १९६५ नंतर प्रकृती ढासळल्याने त्यांचा राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग कमी झाला.
मॉसेलियमच्या जवळच ते राहत असलेले छोटेखानी घर आहे. दोन खोल्या, एक बिछाना, रेडीओ, एक चप्पलची जोडी आणि त्यांचा खाकी गणवेष ,,,,हीच त्या महात्म्याची साधनसंपत्ती होती.
ते अध्यक्ष असतांना त्यांना रशिया आणि इतर देशांकडून तिन आलिशान कार सप्रेम भेट मिळाल्या होत्या मात्र त्याचा फारसा उपयोग ते करत नव्हते. घराशेजारीच शत्रुंच्या बॉंम्बहल्लापासून बचावासाठी एक मोठे बंकरसुद्धा केलेले होते. आयुष्यभर कधी फ्रेंच तर कधी अमेरिकेशी निधड्या छातीने लढलेल्या या योद्ध्यावर मार्क्स आणि लेनिनचा प्रचंड प्रभाव होता. हो ची मिन्हच्या राहत्या घरात आजसुद्धा मार्क्स आणि लेनिनचा फोटो बघायला मिळतो. तसेच महाराष्ट्र अथवा भारतातील कोणतेही आराध्य दैवत, महापुरुष, साधुसंत अथवा राजनेत्याचा त्यांच्या राहत्या घरात अथवा मॉसेलिअममध्ये उल्लेख नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे घर अथवा मॉसेलिअममध्ये भारतातील कोणतेही आराध्य दैवत, महापुरुष, साधुसंत, राजनेता यांची वचने, काव्यपंक्ती, श्र्लोक अथवा टिप्पणी यांची नोंद केलेली नाही. वास्तविकत: व्हियतनाममध्ये जननायक, राष्ट्रनायक, उद्धारकर्ता, तारणहार, राष्ट्रीय हिरो म्हणून एकमेव नाव समोर येते आणि ते म्हणजे हो ची मिन्ह यांचे.
०२ सप्टेंबर १९६९ ला म्हणजेच वयाच्या ७९ वर्षी हो ची मिन्ह यांनी इहलोकाची यात्रा संपवली. व्हियतनाम अजूनही अमेरिकेच्या लादलेल्या युद्धात भरडले जात होते. त्यांच्या मृत्यूसमयी २,५०,००० लाख लोक, ५००० सरकारी अधिकाऱ्यांसह तब्बल ४० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हो ची मिन्ह यांच्या स्मरणार्थ, गौरवार्थ ०२ सप्टेंबर हा दिन राष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जात़ो तर १९७५ ला व्हियतनाम स्वतंत्र झाल्यानंतर सेगॉन शहराचे नाव बदलून त्याला "हो ची मिन्ह सिटी" असे नामकरण करण्यात आले.
क्रमशः,,,,,,
***************************************
दि. ०६ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment