व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०८
***************************************
हो ची मिन्ह शहरात तिन दिवस मनसोक्त फिरल्यानंतर आता वेळ होती या ऐतिहासिक आणि सामरिक शहराचा निरोप घ्यायची. अर्थातच स्पॅनिश, फ्रेंच आणि अमेरिकन संस्कृतीत रूळलेले हे आधुनिक शहर व्हिएतनामची सध्याची राजधानी असलेल्या हनोई शहरांपेक्षा आधुनिकतेच्या बाबतीत कितीतरी पुढे आहे. एखाद्या शहरातील लोकांच्या वेशभुषेवरून त्या शहराची संस्कृती आणि परंपरा याची पुसटशी कल्पना जरूर येते. इथल्या टोलेजंग इमारती, हॉटेल्सची वर्दळ, गजबजलेली बाजारपेठ आणि अविरत धावणाऱ्या प्रवासी टॅक्सीज पाहून एखाद्या मेट्रोपॉलिटन शहराची आठवण येते. विशेष म्हणजे इथली मुख्य भाषा व्हियतनामी जरी असली तरी मोडक्या तोडक्या इंग्रजीत आपले काम सहज निभावते.
शेवटचे तिन दिवस आमचा मुक्काम हनोई शहरात होता, जे हो ची मिन्हपासून १७७२ कि.मी. अंतरावर होते. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही याकरीता विमानप्रवासाला प्राधान्य दिले आणि हे अंतर तिन तासात कापत आम्ही हनोईच्या नोई बे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. हनोई हे शहर व्हिएतनामच्या उत्तर टोकाला आहे आणि इथे सोव्हिएत रशिया तसेच चीनचा बराच काळ दबदबा राहिल्याने हो ची मिन्हच्या तुलनेत पारंपरिक पद्धतीचे शहर भासते. लाल नदीच्या कुशीत वसलेले हे शहर आयलॅंड इन दी रिव्हर*म्हणून प्रसिद्ध आहे.
जवळपास ८० लाख लोकसंख्या असलेलं हे शहर प्रशासकीय भवन, शैक्षणिक संस्था, संग्रहालय, महाल, संसद भवन, राष्ट्रपती भवन याकरिता ओळखले जाते. कॉम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या या शहरात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी घुसखोरी केली होती. तर १९ व्या शतकात फ्रेंचांनी इथे आपले वर्चस्व गाजवत बऱ्याच चर्चेसची उभारणी केली. सध्या इथे बौद्ध धर्माचे बाहुल्य असले तरी कॉम्युनिस्ट साम्यवादी सरकारच्या नो रिलीजन पॉलिसीचे कटाक्षाने पालन केले जाते. अतिशय वर्दळ असलेल्या या शहरात सार्वजनिक वाहतुकीची चांगली व्यवस्था नसल्याने दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे.
हनोई शहरापासून १०० कि.मी. अंतरावर व्हियतनामची प्राचिन राजधानी हो ल्यू हे स्थान आहे. नवव्या शतकात आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक राजधानीचे हे स्थळ आता ओसाड झालेले आहे. इथे सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याने इथल्या राजवटीत पगोडाला अनन्यसाधारण महत्त्व होते. १२ व्या शतकापर्यंत एकुण लोकसंख्येच्या जवळपास अर्धी लोकसंख्या बौद्ध भिक्षुंनी व्यापली होती. ही राजधानी लाईमस्टोन पर्वतरांगांमध्ये सामावली असल्याने बाह्य आक्रमणाचा फारसा धोका नव्हता परंतु चीनकडून आक्रमण होताच या पहाडांमध्ये सुरक्षेसाठी माती आणि लाकुड मिश्रीत दहा भिंती बांधण्यात आल्या होत्या. सर्वात मोठी भिंत ५०० मिटर लांब तर छोटी ६५ मिटर लांब होती. प्रत्येक भिंतीची उंची १० मिटर तर रूंदी १५ मिटर एवढी होती. मात्र काळाच्या ओघात, ऊन पाऊस आणि वातावरणाचा मारा झेलत या भिंतींचे आता काही अवशेषच बाकी आहेत. शिवाय पुरातत्त्व खात्याने केलेल्या खोदकामाने उरलेसुरले अवशेषही नामशेष होत आहेत.
हो ल्यु या राजधानीत ली राजवंशाने ९ व्या आणि १० व्या शतकापर्यंत राज्य केले. १०१० मध्ये मात्र हे स्थान सोडून हनोईला ही राजवट स्थानांतरीत झाली. या भुमीवर जस जसे परकिय आक्रमण होत गेले तस तसे इथले धर्म, संस्कृती आणि परंपरेची अतोनात हानी झाली. परकिय आक्रमकांनी पगोडा आणि इतरही धार्मिक स्थळांना लक्ष्य करत आपली बाहृय संस्कृती इथे रूजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातच सोव्हिएत रशिया आणि चीनच्या कॉम्युनिस्ट साम्यवादी विचारसरणीचा इथे प्रचंड पगडा असल्याने फक्त पौर्णिमा अथवा चायनीज नवीन वर्षाच्या वेळी स्थानिक पगोडा मध्ये जातात.
सध्या हो लु मध्ये दोन राजांचे मंदिरे असून हा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. दोन्ही राजांच्या मंदिरात फुले, फळे, अन्नपदार्थ यासोबत बिअरच्या कॅन ठेऊन पुजा केलीली असते. हिरवीकंच पार्श्वभुमी आणि सभोवताल लाईमस्टोनचे हिरवेगार, गगणभेदी पहाड पाहून आपण स्वर्गात आल्याची अनुभुती येते. इथले वातावरण इतके निसर्गरम्य आणि आल्हाददायक असते की कोणालाही इथे फोटोसेशन केल्याशिवाय राहवले जात नाही.
इथुनच एक तासाच्या अंतरावर टॅम कॉक हे प्रेक्षणीयस्थळ आहे. १९९४ ला युनोस्कोने याला जागतिक वारसा स्थळात स्थान दिलेले आहे.लाईमस्टोन पहाडांची महाकाय श्रृंखला आणि त्यात नागमोडी वळणे घेत शांतपणे वाहणारी नदी, सभोवताल हिरवा शालू नेसलेला रम्य परिसर तुमची नजर खिळवून ठेवते. डिसेंडींग ड्रॅगन अर्थातच हॅलाॅंग बे नावाने हे स्थान प्रसिद्ध असून छोट्या होड्यांद्वारे यात भटकता येते. या प्रवासात पहाडात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या तिन गुफेतुन आपला प्रवास पार पाडल्या जातो. स्थानिक स्त्रीयांद्वारे या होड्यांचे संचालन केले जाते.
जवळपास १२२५२ हेक्टरवर पसरलेला हा परिसर लाईमस्टोन माऊंटेन इकोसिस्टीम आणि एक्वॅटीक इकोसिस्टीम अशा दोन भागात विभागला जातो. पहिल्या इकोसिस्टीम मध्ये वनस्पतींच्या ६०० प्रजाती प्राण्यांच्या २०० प्रजाती आढळतात. तर एक्वॅटीक इकोसिस्टीम मध्ये जलचरांच्या ३० तरंगणाऱ्या आणि ४० पाण्याखालील प्रजाती आढळतात. दुर्मिळ प्रजातीत गणला गेलेला स्ट्रिप नेक टर्टल इथे आढळतो. अंदाजे एक दिड तासांचा हा प्रवास संपुच नये असे वाटतो. मधातच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आणि थंडी हवा या प्रवासाचा रोमांच आणखी वाढवून जातो. खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यातला हा रम्य प्रवास खऱ्या अर्थाने पैसा वसूल करून देतो. प्रवासाच्या एका टोकाला चहा, काॅफी, कोल्ड्रींक्स आणि बिअरची तरंगती दुकाने असल्याने काही काळ तिथे विश्रांती घेता येते.
क्रमशः,,,,,,
***************************************
दि. ०५ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment